प्रेरणादायी जीवन कहाणी

शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमामध्ये (बी.एड) शैक्षणिक तत्वज्ञान या विषयात देश विदेशातील ज्या शिक्षणपद्धती आणि त्या पद्धती शोधून काढणाऱ्यां ज्या मोजक्या शिक्षणतज्ज्ञांची ओळख करुन दिली जाते त्यात इटलीच्या मारिया माँटेसरींचा समावेश असतो म्हणजे असतोच. लहान मुलं मोठ्यांचे ऐकत नाही म्हणजे ऐकण्यासाठी त्यांना फक्त बदडूनच काढले पाहीजे असा जो सर्वसामान्य आणि सर्वमान्य समज होता. त्या काळात वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेली एक मुलगी सहा वर्षाखालील मुलांच्या शिक्षणासाठी काही करु पाहते. या वयोगटातील मुला-मुलींसाठी शिकणे आणि शिकवणे हे सहज कसे होईल यासाठी धडपडते म्हणजे हे एक प्रकारे लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यासारखीच गोष्ट झाली. सहा वर्षाखालील मुलांना सहज सुलभ शैक्षणिक साहित्य तयार करणे ही त्या काळाच्या मानाने फारच पुढची गोष्ट होती. जिथे जन्मदाते वडील आपल्या शिक्षणाला विरोध करत होते (पुढे हा विरोध मावळला) तिथे काळाच्या बरीच पुढे असलेली ही शिक्षण पद्धती समाज सहज स्वीकारेल हे होणं शक्य नव्हतं. या सगळ्यासाठी डाॅ. मारिया माँटेसरी यांना करावा लागणारा संघर्ष, त्यांच्या मार्गात आलेले खाच खळगे तसेच नंतरच्या का...