अभिनयातून आत्मशोधाकडे...
.jpeg)
आठ वर्षांची एक गरीब मुलगी. घरी अठरा विसे दारिद्रय़ त्यात जगण्यास अभिशाप ठरावा असा तिचा वर्ण. ती कृष्णवर्णीय आहे. वडील अट्टल दारुडे. पिऊन आल्यावर ते तिच्या आईला इतकं बेदम मारायचे की त्या मारामारीत प्रत्येक वेळी तिच्या आईला जबरी दुखापत व्हायची. या भयंकर गृहकलहाचा त्या कोवळय़ा जीवावर व्हायचा तोच परिणाम झाला. ती दिवस-रात्र त्या भीतीच्या मानसिक दडपणाखाली जगू लागली. तिचं ते वयही असं नव्हतं की तिला नक्की काय झालंय हे कुणाला सांगता यावं. अर्थात कुणाला त्याच्याशी काही देणंघेणंदेखील नव्हतं. हा गृहकलह एकदा तर इतका विकोपाला गेला होता की तिच्या वडिलांनी एका अणकुचीदार काचेनं तिच्या आईवर हल्ला केला व तिच्या आईच्या डोळय़ाच्या खाली जेव्हा ती काच घुसली तेव्हा रक्ताची एक चिळकांडी उडाली आणि ती या मुलीच्या अंगावर पडली. आई-वडिलांच्या या भांडणात पडण्याची तिची हिंमत होत नसे. भीतीच इतकी वाटायची तिला की बास. पण चिळकांडी अंगावर उडाली तेव्हा मात्र तिच्यातील भीतीने परमोच्च बिंदू गाठला होता आणि त्यात ती मोठय़ांदा किंचाळत एकच शब्द बोलू शकली, ‘‘थांबा! बास झालं..’’ हे झालं फक्त घरातलं. घराबाहेर शाळेत तरी ती सुरक्...