औकात दाखवणारं आयुष्य!

काही लोकांचं खरं हे इतकं खरं असतं की ते आपल्याला अक्षरशः खोटं वाटतं. आपण जे वाचत आहोत ते घडणं जणू काही अशक्यच आहे असंही वाटून जातं. हे असं वाटण्याचे कारण म्हणजे सिनेमा जगतातील एखाद्या यशस्वी अभिनेत्याने आपल्या कुकर्माची, पापाची इतकी जाहीर कबुली दिलेली माझ्यातरी वाचनात आलेली नाही. मी नुकतच अभिनेते पियुष मिश्रा यांची आत्मचरित्रात्मक कादंबरी 'तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा' हे वाचली. सिनेमा जगत हे जरी जादुई असलं आणि पडद्यावर तीन तास मनोरंजन करत आपलं वास्तव जग विसरून एका आभासी दुनियेची सफर घडवत असलं तरी, पडद्यावर ते साकारीत करणाऱ्या अभिनेत्याचे वास्तविक आयुष्य हे इतकं स्ख़लनशील होतं हे पचवणं फार जड जातं. आयुष्याची ही अशी पार्श्वभूमी असताना आपल्याला पुन्हा चांगलं जगता येतं हा आत्मविश्वास काही लोक आपल्यामध्ये भरतात. पियुष मिश्रा हे त्यातलंच एक नाव! पियुष यांचा जन्म ग्वाल्हेर मध्ये १९६३ साली झाला. कलेची प्रतिभा घेऊन जन्मलेले पियुष यांना लहानपणापासून काही वेगळं करण्याची तहान होती. पण वेगळं करायचं म्हणजे नक्की काय करायचं हे समजण्याचं ते वयही ...