औकात दाखवणारं आयुष्य!
काही लोकांचं खरं हे इतकं खरं असतं की ते आपल्याला अक्षरशः खोटं वाटतं. आपण जे वाचत आहोत ते घडणं जणू काही अशक्यच आहे असंही वाटून जातं. हे असं वाटण्याचे कारण म्हणजे सिनेमा जगतातील एखाद्या यशस्वी अभिनेत्याने आपल्या कुकर्माची, पापाची इतकी जाहीर कबुली दिलेली माझ्यातरी वाचनात आलेली नाही. मी नुकतच अभिनेते पियुष मिश्रा यांची आत्मचरित्रात्मक कादंबरी 'तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा' हे वाचली. सिनेमा जगत हे जरी जादुई असलं आणि पडद्यावर तीन तास मनोरंजन करत आपलं वास्तव जग विसरून एका आभासी दुनियेची सफर घडवत असलं तरी, पडद्यावर ते साकारीत करणाऱ्या अभिनेत्याचे वास्तविक आयुष्य हे इतकं स्ख़लनशील होतं हे पचवणं फार जड जातं. आयुष्याची ही अशी पार्श्वभूमी असताना आपल्याला पुन्हा चांगलं जगता येतं हा आत्मविश्वास काही लोक आपल्यामध्ये भरतात. पियुष मिश्रा हे त्यातलंच एक नाव!
पियुष यांचा जन्म ग्वाल्हेर मध्ये १९६३ साली झाला. कलेची प्रतिभा घेऊन जन्मलेले पियुष यांना लहानपणापासून काही वेगळं करण्याची तहान होती. पण वेगळं करायचं म्हणजे नक्की काय करायचं हे समजण्याचं ते वयही नव्हतं. शालेय अभ्यासात मन लागत नव्हतं. आपल्याला कविता करता येतात, चित्रं काढता येतात, लाकडापासून वस्तू तयार करणे, गाण्यांना चाली लावणे, अभिनय करता येणे, या सर्व गोष्टींचे साक्षात्कार व्हायचे होते अजून. ह्या सर्व कला आपल्यात आहे हे जरी आपल्याला समजलं तरी आपल्या घरचे त्यात करिअर करु देण्याची मुभा देणार नाही हे कुमार वयातील पियुष यांना चांगलंच माहीत होतं. त्यामुळे वडिलांशी त्यांचे कधीच पटले नाही. सतत काड्या करणारी आणि टोचून बोलणारी आत्या घरात होती. शाळेतील शिक्षीकेमुळे पियुष यांना आपल्याला चांगलं गाता येतं नाटक करता येतं हे समजलं. आपल्या आयुष्यात आपल्याला काय करायचं आहे याचं चित्र स्पष्ट होत नसेल किंवा त्याचा रस्ता दाखवणारं कुणी नसेल तर त्या व्यक्तीची प्रचंड चडफड होते. तसेच काय करायचं हे जरी समजलं पण दरम्यानच्या काळात व्यसनांनी जर विळखा घातला असेल तरी गाडी रूळावरून घसरायला वेळ लागत नाही.
याच धडपडीत बरेचदा आपला पाय घसरण्याचा संभव असतो. पियुष मिश्रांच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये शिकत असताना पियुष यांना दारूचे व्यसन तर लागलेच त्याचबरोबर व्यसनांने उग्ररूपही धारण केलं होतं. दिवसभर नाटकांच्या तालमी वगैरे करायच्या व रात्री दारू ढोसायची. यादरम्यान पियुष कम्युनिस्ट चळवळीत ओढले गेले. नंतरच्या आयुष्यात याच कम्युनिस्टांना ते प्रचंड शिव्याही घालतात. कारण यांच्यामुळे माझी उमेदीची अनेक वर्ष वाया गेली, कुटुंबापासून दूर गेलो होतो. दिल्लीतील वास्तव्यात त्यांचे कित्येक स्त्रियांशी त्यांचे शारीरिक संबंध आले. कित्येकांना त्यांनी दारूच्या नशेत, उदासीनतेत, वैफल्यग्रस्त अवस्थेत दुखावलं होतं.
आयुष्यात आपल्याला नक्की कुठे जायचे असते? हा प्रश्न त्यांना कायम त्रास देत असे. मरणे हाच जर जीवनाचा अंत आहे तर उत्पत्तीच का झाली? काम करण्यासाठी? काम करण्यासाठी तर मी तसं काम करत आहे का? काय माझं काम हे कर्म आहे का? अभिनय करणे की निर्माण करणे? मग मी काही निर्माण करत आहे का? हे आणि असे अनेक अनुत्तरीत प्रश्न त्यांना कायम छळत असत. ड्रामा स्कूल पासूनच पियुष हॉलीवुड मधील प्रसिद्ध अभिनेते रॉबर्ट डी निरो यांचे मोठे चाहते होते. निरोंचा अभिनय पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ग्वाल्हेर, दिल्लीत जेव्हा आपण होतो तेव्हा आपला अभिनय प्रादेशिक होता. आपली मूल्य प्रादेशिक होती. आपल्या समस्या प्रादेशिक होत्या. या मोठ्या लोकांचे काम पाहिल्यावर त्यांच्या इच्छांमध्ये बदल झाला. त्या नवीन तयार झालेल्या इच्छा पूर्ण करण्याच्या इच्छा ह्या वाढतच चालल्या होत्या. पण कशा? ते मात्र समजत नव्हतं. ड्रामा स्कूलमध्ये अभिजात नाटकांमध्ये मुख्य किंवा महत्त्वाचं पात्र करायला मिळणे ही एक अतिशय सौभाग्याची गोष्ट मांडली जात असे. पियुष यांच्या एका सहाध्यायीला अशीच एक महत्त्वाची भूमिका मिळाली होती. त्या भूमिकेला ती व्यक्ती न्याय देऊ शकली नाही. अभिजात भूमिकेला न्याय देऊ न शकणे ही गोष्ट सदर व्यक्तीला फारच अपमानकारक वाटली. त्याने स्वतःला विजेचा धक्का लावून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा पियुष यांच्या आयुष्याच्या वर फार खोल प्रभाव पडला.
ड्रामा स्कूलच्या दुसऱ्या वर्षाला असताना पियुष यांना विल्यम शेक्सपियरच्या हॅम्लेट नाटकातील हॅम्लेटचीच भूमिका करायला मिळाली. तसेच हे नाटक दिग्दर्शित करणार होते फ्रिट्ज बेनेवेट्ज. फ्रिट्स हे शेक्सपियरचे मोठे अभ्यासक. त्यांनी भारतातील प्रमुख भाषांमध्ये नाटकं केली होती. पियुष यांनी हॅम्लेटची भूमिका इतकी उत्तम उभी होतं की, त्यातल्या हॅम्लेटच्या जो डंका वाजला त्याचा आवाज थेट दिल्लीतून मुंबईत पोहोचला. इतक्या यशाला झेलण्याची, पचवण्याची ताकद आपल्या 'हॅम्लेट' मध्ये होती का पण? कारण आपला हॅम्लेटला लहानपणापासूनच सतत अशी अनामिक भीती वाटत आली आहे. एन.एस.डीचा सुवर्णकाळ संपल्यानंतर वास्तव जीवनात काय करायचं याचा मात्र त्यांनी विचार केलेला नव्हता. म्हणजे नाटकात अभिनय करायचा पण मुंबईला सिनेमा करायला जायचं नाही अशी स्वतःशी प्रतिज्ञाच केली होती, "मी रंगमंचाचा बादशहा आहे आणि माझी बादशाही ही दिल्लीत आहे. मी मुंबईत कशाला जाऊ?" ह्या प्रतिज्ञेपायीच त्यांच्या हातातून 'मैंने प्यार किया' हा सिनेमा गेला. ती मूळ गोष्ट पुस्तकातच वाचलेली बरी. हे सर्व वाचताना मनात येतं की, "वेडा आहे का हा माणूस जरा?" हा हातात आलेल्या संधी काय गमावतोय?
पियुष यांची बाहेरख्याली, दारूचे हाताबाहेर गेलेले व्यसन हे सर्व माहीत असूनही त्यांची पत्नी जिया या त्यांच्याशी एकनिष्ठ राहिल्या. जिया यांनी दिलेल्या खंबीर साथीमुळे व आपले अभिनयातील सुरुवातीचे गुरु बिश्नोईजी यांनी सुचविलेल्या विपश्यनामुळे पियुष व्यसनाच्या अजगर मिठीतुन सुटू लागले. पियुष यांनी व्यसनावर कशाप्रकारे मात केली? आपली, "मी मुंबईला जाणार नाही!" ही प्रतिज्ञा त्यांनी का मोडली? अनुराग कश्यप यांचे त्यांच्या जीवनात काय महत्त्व आहे? पियुष यांनी 'द लेजंड ऑफ भगतसिंग' हा सिनेमा स्वतः लिहिलेला असून सुद्धा त्याचे लेखक म्हणून त्यांना श्रेय दिलं गेलं नाही. त्यानंतर झालेलं 'पेट्रोल कांड' काय आहे हे मूळ पुस्तकातच वाचलेलं बरं. आयुष्याबद्दल कायम तक्रार, वैफल्य, ना उमेद आणि यामुळे कडवट झालेलं मन हे मात्र उत्तर आयुष्यात आपल्यासोबत इतरांचेही भलं व्हावं यासाठी प्रार्थना करू लागलं! इतका एकशे ऐंशी अंशाच्या कोनात झालेला बदल पियुष यांच्या आयुष्यात पाहायला मिळतो. अभिनयाबद्दल ते नेहमी म्हणत असत की, "मै ॲक्टिंग नाम के आर्ट के मायक्रो लेव्हल तक पहुँचना चाहता हूँ!" हे पुस्तक वाचत असताना वाचकाला जणू आपण पुस्तक वाचत नाही तर एखादा सिनेमा पाहत आहोत असं वाटतं. एक बिघडलेला मुलगा, आपल्या हातात आलेल्या संधी कशा गमावत जातो? मुलाच्या चिंतेत असलेले आईवडील शेवटी त्याच्यापुढे हार पत्करून गप्प होऊन जातात. इतकं सगळं असलं तरी आत्मचरित्राला हे असं कादंबरीचे स्वरूप देण्याचा हा प्रयत्न मात्र फसला आहे. म्हणजे यातल्या घटना ह्या सत्य आहेत पण त्या घटनां जे कादंबरीचे स्वरूप दिलं आहे ते परिपूर्ण उतरलं नाही
अजिंक्य कुलकर्णी
धन्यवाद सर
ReplyDeleteWow
ReplyDelete😊
Deleteसुंदर पुस्तक परिचय
ReplyDeleteधन्यवाद
DeleteThank for sharing
ReplyDeleteThanks
Deleteअजिंक्य .. तुमच्या मुले एक चांगल्या पुस्तकाची माहिती मिळाली .. पियुष मिश्रा .. अनुराग कश्यप हे दोन व्यक्ती सर्व कलाकार जे सोप्या आयुष्य करता डॉक्टर इंजीनियर झालेत त्यांच साठीं उत्तर आहेत ..
Deleteधन्यवाद आणि लिहत रहा
Thank you so much.
Deleteउत्तम परिचय... योग्य ठिकाणी थांबल्यामुळे पुस्तक वाचण्याची उत्सुकता नक्की निर्माण करते तुमचे लिखाण.
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद.
Deleteमस्त
ReplyDeleteधन्यवाद 😊
Delete