विज्ञानव्रती एच.सी.वर्मा
भारतात इयत्ता बारावी सायन्स झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांला विचारा की IIT-JEE या परिक्षेसाठी 'फिजिक्स' या विषयाच्या तयारी साठी कोणते पुस्तक वापरले? तर तो/ती फक्त एकच नाव घेईल ते म्हणजे 'कन्सेप्ट अाॅफ फिजिक्स बाय एच सी वर्मा'.
तर अशा या अफलातून पुस्तकाचे लेखक हरिश चंद्र वर्मा उर्फ H C Verma यांचा जन्म ३ एप्रिल १९५२ रोजी बिहार मधल्या दरबंगा नावाच्या एका निमशहरी भागात झाला. त्यांचे वडील हे गणिताचे शिक्षक होते. सुरवातीला गणिताचे प्राथमिक शिक्षण हे त्यांनी वडिलांकडेच घेतले. शालेय जीवनात त्यांना फारशी गती नव्हती. जसजसी ते वरच्या इयत्तेत जाऊ लागले तसतसी मग अभ्यासात त्यांची रुची वाढू लागली. आज जर वर्मा सरांच्या कामाचा झपाटा, त्यांची शैक्षणिक गुणवत्ता पाहीली तर कुणाचाही विश्वास बसणार नाही की, त्यांना स्वतःला इयत्ता दहावी पर्यत केवळ पास होण्यासाठी खुप संघर्ष करावा लागला होता. आपण पास होऊ कि नाही ही भीती सतत मनात घर करून रहायची. अभ्यास, परीक्षेच्या भीतीचे भूत सतत त्यांच्या मानगुटीवर बसलेले असायचे. पण याच मुलाने बी.एस.सी. ला फिजिक्स हा विषय घेउन पटणा विद्यापीठात 3^rd रँक मिळवला होता. एम.एस.सी साठी त्यांनी IIT कानपूर मध्ये प्रवेश घेतला. तिथून एम.एस.सी 9.9 GPA ने पास केली. एम.एस.सी. ला त्यांच्यावर 'हॅलिडे आणि रेसनीक' या पुस्तकाचा खूप प्रभाव होता. या पुस्तकाचे ते फॅनच होते म्हणा नं ! IIT मध्येच त्यांनी 'न्युक्लीअर फिजीक्स' मध्ये संशोधन केले व आजपावेतो त्यांची जवळजवळ १४० शोध प्रबंध प्रकाशित आहेत.
त्यांच्या जीवनाचे एक साधं सुत्र आहे, "मी देशाचे काय देणं लागतो? तर मला जे चांगले जमते ते मी देशाला देण्याचा प्रयत्न करीन." याच प्रेरणेचे रूपांतर पुढे 'स्कूल फिजिक्स प्रोजेक्ट', 'शिक्षा सोपान', 'उत्साही फिजिक्स टिचर्स' या सारख्या कमालीच्या सुंदर उपक्रमांमध्ये झाले. हे उपक्रम आजही वेगवेगळ्या ठिकाणी उत्तमरीत्या सुरू आहेत. आता हे उपक्रम इतक्या मोठया प्रमाणात करण्यामागचे कारण एकच की फिजिक्सची भिती घालवणे! करता करता १९७९ ला त्यांनी IIT कानपूर मध्ये शिकवायला सुरूवात केली. वर्मा सर म्हणतात, " जर तुम्हाला आयुष्यात काही युनिक काम करायचे असेल तर तुमची सर्व आंतरिक ताकद त्या कामाच्या पाठीमागे लावावी लागते, तेंव्हाच ते होतं. लोक काय म्हणतील, तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल की नाही, तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल की नाही याचा विचार न करता ते काम नेटाने करत राहिले पाहिजे".
वर्मा सर ज्या रिमार्केबल कामासाठी ओळखले जातात ते म्हणजे 'कन्सेप्ट आॅफ फिजिक्स' हे पुस्तक होय. या दोन खंडात्मक पुस्तकाचे लिखाण करण्यासाठी तसेच हे पुस्तक काय धाटणीचे असले पाहिजे याची एक रोचक गोष्ट आहे. वर सांगितल्याप्रमाणे वर्मा सरांना एम.एस.सी ला 'हॅलिडे आणि रेसनिक', 'इरोडोव्ह' यांची पुस्तके फार अावडली होती. तर त्यांनी IIT मध्ये शिकवण्यास सुरुवात केली त्या सुरुवातीच्या वर्षात हीच पुस्तके संदर्भ ग्रंथ म्हणून मुलांना वाचायला सांगितली होती. हीच पुस्तके आपलीही संदर्भ ग्रंथ असतील. पण झालं असं की सरांनी कितीही सुंदर शिकवले तरी निकाल काही केल्या समाधानकारक लागत नसायचा. बरं, हे काय एका वर्षापुरते घडले काय? तर नाही, ३-४ वर्ष हे सतत होत होते. मग त्यांनी आत्मपरीक्षण केले व या समस्येच्या मुळाचा शोध घ्यायचं ठरवलं तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की 'हॅलिडे आणि रेसनिक', 'इरोडोव्ह' ही पुस्तके आपण स्वतः तर एम.एस.सी. लेव्हल ला वापरली होती आणि ही मुले तर नुकतेच बारावी झाले आहेत. हॅलिडे, इरोडोव्ह यांच्या पुस्तकात येणारी उदाहरणे हे पाश्चात्य धाटणीची आहेत आणि IITत येणारी मुले ही भारतातील गरीब, ग्रामीण भागातून येणारी होती. त्यामुळे व्हायचे काय की ही मुले काही केल्या फिजीक्ससोबत कनेक्ट होत नसत. परिणामी निकाल कमी लागायचा. त्यांना अशी पुस्तकं हवी की ज्यातली उदाहरणे ही भारतीय असतील. मग या व्यथेतुन व आठ-दहा वर्षाच्या मेहनतीनंतर तयार झाले ते 'कन्सेप्ट आॅफ फिजिक्स' हे पुस्तक. ते लिहायला घेतल्यावर त्यांच्या बऱ्याच सहकार्यांनी त्यांना विरोध केला होता, की का वेळ वाया घालवतोयस ? इतकी सर्व पुस्तके असताना ? पण यांचा निर्णय पक्का होता की भारतीय मातीतली उदाहरणे असलेले पुस्तकच पाहिजे. मग त्यात झाडावर चढणारे माकड, त्याने उर्ध्व बाजूला इतका इतका फोर्स लावला, इतके डिस्प्लेसमेंट झाले अशी भारतीय उदाहणे देऊन फिजीक्सचे हे पुस्तक तयार केले.
आज हे भारतातील सर्वात जास्त खपाचे, सर्वात जास्त वाचले जाणारे पुस्तक आहे. सत्तावीस वर्ष होऊन गेली आहे या पुस्तकाला येऊन दरम्यानच्या काळात कित्येक वेळा IIT चा अभ्यासक्रम बदलला. परीक्षा पद्धतीतही तर अमुलाग्र बदल झालेत. पण हे पुस्तक या सर्व बदलांना पुरून उरले आहे. UPSC ची प्रिलीम म्हणू नका, Polytechnic म्हणू नका, अकरावी बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी तर हे बायबल आॅफ फिजीक्स आहे. त्यामुळे कितीही अभ्यासक्रम बदलले, परीक्षा पद्धत बदलली तरीही या पुस्तकाचे महत्व कमी होणार नाही. पुस्तकातील 'माकडे' आपले काम करतातच. सोशल मिडियावर वाॅल्टर लुई यांचा एक व्हिडिओ खुप व्हायरल आहे ज्यात ते वर्गात एका पेंडुलम ला स्वतः उलटे लटकुन सिंपल पेंडुलम चा सिद्धांत समोरच्या विद्यार्थांना समजावतात. आपल्याकडे हा व्हिडिओ व्हायरल करणारे म्हणतात की असे फिजीक्स शिकवणारे शिक्षक आम्हाला नाही भेटले. जणूकाही असे कुणी शिक्षक भेटले असते तर हे नोबेलच आणणार होते! पण त्यांना हे माहित नाही की वाॅल्टर हे MIT मध्ये शिकवतात तिथे पैसा, सोविसुविधेला काहीही कमी नाही. तसेच दिल्लीचे शिक्षणमंत्री मनिष सिसोदियांचे असेच एक शिक्षण पद्धतीवरिल भाषण व्हायरल झाले होते. ते भाषण ऐकूण कुणीही प्रभावित होईल. पण ह्याच मनिष सिसोदियांकडे कित्येक वेळा वर्मा सर शिक्षणव्यवस्थेबद्दल काही सुचना घेउन गेले तर त्यांनी यांना हिंग लावूनही विचारले नाही. एकदा एका मिटिंगच्यावेळेस सिसोदीया यांची वर्मा सरांनी रितसर वेळ घेतलेली होती तर सिसोदीया महाशय तब्बल २ तास उशिरा आले नंतर कार्यकत्यांनाच वेळ दिला वर्मा सरांनाही आपण वेळ दिला आहे हे साफ विसरून गेले, त्याबद्दल साधी दिलगिरीही व्यक्त केली नाही. एका IIT च्या डिपार्टमेंट हेड [HOD] ला ही वागणूक मिळाली होती. तरीही त्याबद्दल तुमच्या मनात कटुता नाही. निवृत्त झाल्यावर काय करावं त्यांनी तर कानपूर च्या आसपास असलेल्या आदिवासी पाड्यावर जातात त्या आश्रम शाळेत प्राथमिक वर्गात शिकणाऱ्या मुलांना विज्ञानाची गोडी कशी वाटेल ह्याबाबतीत त्या लहान मुलांशी हितगुज करतात. एक IIT चा प्रोफेसर पहिली दुसरी च्या मुलांना शिकवतो! अहो आश्चर्यम् ! सध्या ते Online एक कोर्स चालवतात आहे Bsc लेव्हलच्या विद्यार्थ्यांसाठी आईनस्टाइन च्या Theory of relativity आणि Quantum physics वर. अश्या या विज्ञानव्रती, निगर्वी व्यक्तिमत्त्वाचा आज जन्मदिवस. Wish you many many happy returns of the day. H C Verma sir.
अजिंक्य कुलकर्णी
वाह ! आजचा दिवस छान सर
ReplyDeleteमस्त माहिती मिळाली
खूप खूप धन्यवाद...!
" जर तुम्हाला आयुष्यात काही युनिक काम करायचे असेल तर तुमची सर्व आंतरिक ताकद त्या कामाच्या पाठीमागे लावावी लागते, तेंव्हाच ते होतं. लोक काय म्हणतील, तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल की नाही, तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल की नाही याचा विचार न करता ते काम नेटाने करत राहिले पाहिजे".
आवडलं सर