सनातन्यांविरुद्ध बंड करणाऱ्या एका मुलीची गोष्ट
न्यूयॉर्क हे प्रचंड गजबजलेलं, आधुनिक, फॅशन चा झगमगाट असलेलं एक शहर. न्यूयाॅर्क मधील ब्रुकलीन या भागात तसेच युरोपमधल्या काही मोठ्या शहरात 'हासीदी' म्हणून एक कट्टर, कर्मठ, सनातनी ज्यू समुदाय आहे. हासीदी ही ज्यूंची एक उपशाखा आहे. या समुदायाच्या लोकांची दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हाॅलोकाॅस्ट मध्ये खुप मोठ्या प्रमाणात कत्तल केली गेली. म्हणून हे लोक जर्मनीतून न्यूयॉर्क मध्ये स्थलांतरित झाले. तिथे स्वतःच्या समुदायाची वेगळी ओळख रहावी म्हणून या लोकांनी आपल्या पारंपारिक वेशभूषेला, केशभूषेला अतोनात महत्त्व दिलेलं दिसतं. आजही देतात. पुरूष एक भलामोठा काळा झगा व डोक्यावर मोठ्या आकाराचं पागोटं परिधान करतात. मुली व स्त्रीयांनी घराबाहेर पडताना केसांभवती स्कार्फ गुंडाळलेलाच हवा ही सक्ती असते. पुरुष कानाभोवती कल्यांच्या जवळ आपले केस वेणीसारखे मोठे वाढवतात व ते चेहऱ्यावर रुळू देतात. या समुदायातल्या लोकांना इतराशी बोलायला मनाई असते. त्यांनी आपला समुदाय सोडून इतरांनी बोलणे टाळावे कारण यांना भिती असते की आपल्यातला कुणी बिघडला तर, वाटला तर...?
यांच्या मुलांना घरात चित्रपट पाहू दिले जात नाही. त्यामुळे मुलं चोरून, कधीकधी कुणाच्या गाडीत चित्रपट बघतात. त्यांनी स्वतःच्या स्वतंत्र शाळा काढलेल्या आहेत, ज्या शाळांमध्ये इंग्रजी पुस्तके शक्यतो मुलींना वाचायला दिले जात नाहीत. शाळेतील पुस्तकात जर पाश्चात्त्य पेहरावात मुलींची चित्रं असतील तर त्यावर स्केचपेनने किंवा मार्करने चिरखोड्या ओढून ते ब्लर केलं जातं. विचार करा, हे आजच्या आधुनिक काळात ते ही न्यूयॉर्क सारख्या शहरात घडतं! पण आता या हासीदी समाजातली नवी पिढी बंड करु पाहते आहे. याच हासीदी समुदायावर नेटफ्लिक्स वर 'Unorthodox' नावाची चार पाच भागांची एक उत्तम मालिका आहे. एस्टी (शिरा हास) ही एक हासीदी समुदायतली १७ वर्षाची मुलगी. तीचं वयाच्या १७ व्या वर्षी अरेंज मॅरेज करुन दिले जातं. लग्नानंतर ती नवऱ्यासोबत, सासू सोबत जुळवून घेण्याच्या फार प्रयत्न करते पण, काही केल्या तीला परंपरा, रूढी यांच्या जोखडात अडकून घेणं शक्य होत नाही. जीव गुदमरायला लागतो तिचा. लग्नानंतर कसतरी दोन वर्ष संसार रेटायचा ती एक अपयशी प्रयत्न करते पण, आता असह्य होऊ लागतं! ती बंड करायचं ठरवते. जस्ट इमॅजीन, एक एकोणावीस वर्षांची मुलगी हे करायला धजावते! ती घर सोडून जर्मनीला आपल्या आईकडे जी आगोदरच धर्मबहिष्कृत आहे तिच्याकडे पळून जाते. एस्टीचा हा बंडखोरीचा प्रवास म्हणजेच 'Unorthodox'. आवर्जुन पहावी अशी ही सिरिज आहे.
'One of us' ही एक डाॅक्युमेंटरी फिल्म आहे हासीदी या समुदायावर. यात एक हासीदी धर्मगुरू एका मोठ्या स्टेडिअम वर, जिथे कमीतकमी २०-२५ हजार लोक एकत्र आलेले असतील. तिथे हे धर्मगुरू (?) अतिशय तावातावाने व्यासपीठावर उपस्थित इतर धर्मगुरूंच्या समवेत उपस्थितांना संबोधतात की, "आपल्या समुदायातील लोक हे आता एका दुसऱ्याच विश्वात प्रवेश करु इच्छित आहेत. त्यातले काही असे आहेत की, ज्यांनी आगोदरच आपले आयुष्य बरबाद करून घेतलं आहे त्या दुसऱ्या दुनियेत प्रवेश करुन. (ही दुसरी दुनिया म्हणजे अत्ताचा चालू, आधुनिक काळ) या ठिकाणी आपण या व्यासपीठावर सर्व धर्मगुरू एकत्र आलो आहोत कारण आपल्याला 'इंटरनेट' चा धोका ओळखायचा आहे, जो आपल्या अस्तित्वालाच धोका पोहचवू इच्छितो. मी स्वतः माझ्या या आपल्या डोळ्यांनी पाहिलय की आपल्यातलेच काही लोक हे आपल्या ११ वर्षांच्या मुलांना आयफोन, आयपॅड, ब्लॅकबेरी देतात. त्यांचे डोकं तरी ठिकाणावर आहे का? माझ्या हासीदी बंधुभगीणींंनो काय होत अाहे तुम्हाला? "
एकट्या न्यूयॉर्क शहरात हासीदी समुदायाचे तीन लाख लोक राहतात. त्यामुळे या प्रचंड मोठ्या वोट बँक वर राजकारण्यांची नजर पडली नाही तरच नवल. आपल्या समुदायात कुणाची भेसळ होऊ नये म्हणून यांनी स्वतः च्या स्वतंत्र शाळा काढल्या, स्वतःचे स्वतंत्र दवाखाने, अॅम्बुलंस आहेत, स्वेच्छेने गस्त घालणारे पुलिस आहेत. खासगी शाळांमध्ये 'यीडीश' भाषेचा प्रभाव जास्त. हासीदी समुदायाच्या संघटनांनी त्या समाज्यावर कठोर नियमांचा फास असा काही आवळलेला आहे की त्या समुदायातील लोकांच्या खासगी जीवनातही काय चालले आहे त्यावर लक्ष ठेवून असतात. कुणी बंडखोरी करायचा प्रयत्न केला तर त्यावर पाळत ठेवली जाते.
विचार करा, जगाच्या अतिशय अत्याधुनिक मानल्या जाणाऱ्या शहरात असा एक कर्मठ, सनातनी समुदाय आपले अस्तित्व (?) टिकवण्याचा असा अमानवी प्रयत्न करतो आहे.या समुदायातील मुलींचे लग्न १६-१७ वर्षीच लावून दिले जातात. मुलंही फार काही शिकलेली नसतात. शिक्षण नसल्यामुळे त्यांना काहीच संधी उपलब्ध होत नाही. याचं पर्यवसान मग गुन्हेगारीकडे त्यांचा कल वाढण्याकडे झाला नाही तरच नवल.
अजिंक्य कुलकर्णी
Comments
Post a Comment