लाहोरचे अंतरंग...

  लाहोर ... रावी नदीकाठी वसलेलं एक ऐतिहासिक शहर. एक असं शहर, की ज्याच्या अस्तित्वाचे दाखले रामायण काळापर्यंत देता येतात. कधीकाळी श्रीरामाचा पुत्र लव याचेही वास्तव्य या ठिकाणी होते म्हणूनच त्याचे नाव लाहोर पडले अशीही एक धारणा आहे. एक असं शहर की ज्याच्या रस्त्यावरून फिरताना कदाचित शहीद-ए-आझम भगतसिंगांनी राम प्रसाद बिस्मिल यांची 'सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है...' हे तसेच बुल्ले शाह या पंजाबी सुफी तत्वज्ञ कवीच्या कविता उंच रवाने म्हटल्या असतील. लाहोर! एक असं शहर ज्या ठिकाणी मुगल बादशहा औरंगजेब याने आपली प्रिय कन्या झैबुन्नीसा हिला नजर कैदेत ठेवले होते. झैबुन्नीसाने त्याच शहरात कवी साहित्यिकांची गुप्त मंडळे चालवली होती. लाहोरचा हा आणि असाच पुरातन तसेच आधुनिक कालखंडाचा आढावा घेतला आहे पाकिस्तानी लेखक हरून खालीद यांनी. खालीद यांची 'वॉकिंग विथ नानक' आणि 'व्हाईट ट्रेल' यानंतरच 'इमॅजिनिंग लाहोर' हे तिसरे पुस्तक होय. अनाम झकारिया (1971 या पुस्तकाच्या लेखिका) या त्यांच्या मैत्रीणी सोबत पाकिस्तानच्या फाळणीचा अभ्यास करताना खालिद यांचे लाहोर बद्दलचे वाचन वाढू लागले. त्यांचे लाहोरबद्दलचे आकर्षण वाढू लागले. लाहोर या एकट्या शहराचा स्वतंत्र असा एक इतिहास आहे, व तो सदर पुस्तकात प्रवासी डायरीच्या स्वरूपात त्यांनी सांगितला आहे. 

 लाहोरच्या मध्यवर्ती भागात असलेले चौबुर्जी (चार बुरुज असलेला) च्या शेजारी मुघल काळात सुंदर अशी एक बाग बसवलेली होती. ही बाग म्हणजे मुघलांच्या सौंदर्यदृष्टी चा एक उत्कृष्ट नमुना होती असे खालीद म्हणतात.  ही बाग बसवण्याबद्दल इतिहासकारांमध्ये वेगवेगळे तर्क आहेत. त्यातल्या एका तर्काच्या म्हणण्याप्रमाणे ही बाग औरंगजेबाची मुलगी झैबुन्नीसा हिने बसवलेली आहे. झैबुन्नीसाचे सुफी तत्त्वज्ञानाकडे झुकणे,अकील खान याच्यासोबत तिला निकाह करायची इच्छा असणे हे औरंगजेबाला मान्य नव्हते. म्हणून औरंगजेबाने तिची रवानगी लाहोरला नजरकैद ठेवण्यासाठी केली. अठराव्या शतकापर्यंत ही बाग लाहोरमध्ये होती. मुघलांचा प्रभाव जसा ओसरायला लागला त्यानंतर लाहोरमध्ये अराजक माजायला सुरूवात झाली. त्यात या बागेचं जंगलात रूपांतर झाले. सरदारांनी पंजाब वर कब्जा केला आणि लाहोर शहर तीन शिख सरदारांमध्ये विभागले गेले. १७९९ मध्ये रणजीत सिंह ने लाहोर वर विजय मिळवला. २०१६ साली याच चौबुर्जीला जोडून लाहोर शहरातील मेट्रो प्रकल्प सिद्ध होणार होता. पण पाकिस्तानातील मुस्लिम लीग नवाज (पिएमएनएल) या संघटनेने या प्रकल्पाला विरोध केला. २०१६ साली पाकिस्तान कोर्टाने निकाल दिला की चौबुर्जी पासून कमीत कमी दोनशे फूट लांबूनच हा मेट्रो प्रकल्प न्यावा. बुटासिंग- झैनाब यांच्या प्रेमाची कथाही लाहोर पासून वेगळी काढता येणार नाही. भारत-पाक फाळणीच्या वेळी झालेल्या दंगलीत बुटासिंग ने झैनाबला वाचवले होते. पुढे हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. दोन मुलीही झाल्या त्यांना. फाळणीच्या पाच वर्षांनी दोन्ही देशांनी एक निर्णय घेतला की ज्या स्त्रियांचे अपहरण झाले आहे त्यांना आपापल्या देशात परत पाठवावे म्हणून! त्यामुळे झैनाबला परत लाहोरला परतावे लागले. झैनाब ला परत भारतात आणण्यासाठी बुटासिंग अवैधरीत्या सीमा ओलांडून पाकिस्तानात जातो. पण यावेळी झैनाब त्याच्यासोबत परत यायला नकार देते. परतताना लाहोर रेल्वे स्टेशनवर बुटासिंग रेल्वेखाली आत्महत्या करतो. आजही लाहोरमध्ये बुटासिंग चे समाधीस्थळ हे 'शहीद-ए-मोहब्बत' म्हणून ओळखले जाते.

  ७ डिसेंबर १९९२ या दिवशी अयोध्येत कार सेवकांनी बाबरी मशीद पाडली. आयोध्येपासून हजार किलोमीटर लांब तिकडे पाकिस्तानात लाहोरमध्ये मोठे, सुंदर असे तीन जैन मंदिरे होती. एक चौबुर्जी जवळ, एक पट्टी गेट जवळ आणि  तिसरे स्वतः सम्राट अकबराने जैन साधूंच्या विनंतीला मान देऊन एक मंदिर बांधून दिले होते. फाळणीचा वेळेस चौबुर्जी जवळची दोन जैन मंदिरे नष्ट केली गेली. बाबरी मशीद पाडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हजारो लोकांनी त्या उरलेल्या तिसऱ्या जैन मंदिरालाही जमीनदोस्त केले. फाळणीच्या वेळीही आणि बाबरीच्या दुसऱ्या दिवशीही या लोकांना हिंदू आणि जैन धर्मात फरक आहे हे लक्षात घेण्याची गरजही वाटली नाही! फाळणी अगोदरच्या पंजाबचेही मुख्य व्यापारी केंद्र लाहोरच होते. पंजाब मध्ये सगळीकडे जैनांचा वावर होता. त्यांची एक मोठी परंपराच पंजाबात होती. आजही तिकडे 'भाबरियन' नावाचा एक जैन अल्पसंख्याक समुदाय आहे. 'भाबरा' नावाचे एक जैन व्यापारी हे त्या पंथाचे मूळ पुरुष. आजही लाहोरमधील चौबुरर्जी जवळील जैन मंदिर पाडून त्यावर बांधलेल्या रस्तावरील चौकास 'जैन मंदिर चौक' म्हणूनच ओळखतात. जरी सरकार दप्तरी त्याचे नाव वेगळे असले तरी. हे एक फक्त उदाहरण झालं. पुस्तकात अलीकडच्या वीस- तीस वर्षाच्या काळातील लाहोर व त्याच्या परिसरातील किती जैन हिंदू मंदिरांना पाडले गेले याची माहिती मिळते. फाळणीपासून ते आज पर्यंत कशाप्रकारे अल्पसंख्यांकांवर, त्यांच्या धार्मिक स्थळांवर हल्ले केले गेले हेही वाचायला मिळते. कोणत्याही धार्मिक विचारधारेला झुकतं माप न देता खालिद शक्य तितके तटस्थ होऊन माहिती पुरवतात. लाहोर हे पाकिस्तानातील पंजाबचे एक सांस्कृतिक केंद्र देखील आहे. पण आज तिथे पंजाबी भाषिकांना पंजाबी बोलण्याची सुद्धा भीती वाटते आहे. गेल्याच वर्षी एका व्यक्तीने रत्यावरील पोलिस अधिकाऱ्याला पंजाबीत माहिती विचारली. त्या पोलिसाला पंजाबीत माहिती विचारणे ही जणू आपल्याला शिवीच दिली आहे असे वाटले. यावरून त्या पोलिस अधिकाऱ्याने त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली. हे असे का घडले? या पाठीमागचे कारणे काय होती? याची उत्तरे आपल्याला इतिहासात सापडतात. पाकिस्तान निर्मितीपासून तेथे शालेय शिक्षणाचे इस्लामीकरण केले गेलं. पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासून तेथील शाळांमध्ये उर्दू भाषा शिकवणे, कुराणाचे पठण करणे हे पूर्व तसेच पश्चिम पाकिस्तानात सर्वत्र सक्तीचे केले गेले. पाकिस्तानातील पंजाब, सिंध, बलुचिस्तान, पूर्व पाकिस्तान यांच्यात मुस्लिम हा धर्म जरी एक असला तरी त्यांच्या रोजच्या बोला-चालाच्या भाषा ह्या मात्र वेगवेगळ्या होत्या. या सर्वांना एका सूत्रात बांधणे पाकिस्तानातील कोणत्याही धर्माधिष्ठित सरकारांना, लष्करी हुकुमशहांना कधीही जमले नाही. यामुळे पाकिस्तानात नेहमीच अराजकाची परिस्थिती राहिलेली आहे. पूर्व पाकिस्तानात बंगाली भाषा बोलली जाते त्यांच्यावर उर्दू भाषा थोपवण्याचा प्रयत्नात पाकिस्तानने स्वतःचे दोन तुकडे करून घेतले. पाकिस्तानच्या फाळणीच्या अनेक कारणांपैकी भाषा हे ही एक कारण आहे. 

   लाहोर! एक असे शहर की आज आपल्या ऐतिहासिक हिंदू वारशापासून, इतिहासापासून लांब जाऊ पाहत आहे. लाहोर हे शहर राष्ट्रवादाचे एक मोठे प्रतीक होते. मुस्लिम लीगच्या चळवळने लाहोर मध्ये स्वातंत्र्य पूर्व काळात जन्म घेतला. म्हणजे तसा अगदी अलिकडच्या काळातलाच. पण आज मात्र ते हिंदूंचा हा वारसा अमान्य करता आहेत. लाहोर जे आज जवळजवळ मुस्लिमांचे शहर झाले आहे ते सत्तर वर्षापूर्वी हिंदूंचेही होते हे मान्य करतील का? हे कसे अमान्य करणार की पाकिस्तान झाल्यानंतर जे मुस्लिम झाले त्यांचे पूर्वज हे एकेश्वर बनण्यापूर्वी हिंदू देवतांची उपासना करायचे आणि त्यांच्या स्तुती साठी भजन गात असत? हे कसे अमान्य करणार की आज जी मंदिर पाडून जागा पवित्र केल्याचा दावा करत आहेत ती अगोदर अगोदरच पवित्र होती म्हणून? असे खडे सवालही खालीद विचारतात.  २२-२४ मार्च १९४० मुस्लिम लीगचे 'लाहोर अधिवेशन' झाले. ज्यात पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राचा ठराव पास केला गेला. लाहोरमधील मोगलांच्या काळातील 'बदामी बाग' जिचे इंग्रजांच्या वासाहत काळात गव्हर्नर जनरल मोर्ले मिंटो यांच्या सन्मानार्थ 'मिंटो गार्डन' म्हणून नामांतरण झाले. 'लाहोर ठरावाच्या' जोशात याच बागेचे मोहम्मद इक्बाल यांच्या सन्मानार्थ 'इक्बाल बाग' म्हणून पुन्हा नामांतर झाले.  इम्रान खान यांच्यासाठी लाहोर आणि ही इक्बाल बाग खूप महत्त्वाची ठरली. ३० ऑक्टोबर २०११ च्या एका सभेत इम्रान खान म्हणाले की,"पाकिस्तानच्या राजकीय इतिहासात लाहोरने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे." इम्रान खान यांना त्यावेळी वाटले की त्यांना लाहोर मध्येच जास्त जोर लावावा लागणार. त्यावेळी कोणत्याही राजकीय विश्लेषकांनी इम्रान खान यांना गंभीरतेने घेतले नव्हते. त्या वेळच्या निवडणुकीत इम्रान खान यांना चांगले यश मिळाले. पुढे पाकिस्तानच्या राष्ट्रीय राजकारणातही इम्रान खान यांची पीटीआय या पार्टीने जोरदार मुसंडी मारली. 

    लाहोर हे शहर जसे वर्चस्ववादी अधिकाराचे जसे प्रतीक आहे तसेच हेच लाहोर बंडखोर कवी हबीब जालीब यांचेही आहे. जालीब! ज्यांनी आपल्या आयुष्यभर या वर्चस्ववादाला आव्हान दिले. आयुब खान जे पाकिस्तानचे पहिले लष्करी हुकूमशहा होते. त्यांच्या लष्करशाही विरुद्ध सर्वात मोठा बुलंद असा आवाज जर कुणाचा होता तर ते होते हबीब जालीब!  तो कालखंड असा होता की ज्यावेळी लष्करी राजवटीसमोर सर्व विचारवंत, कवी, लेखक, कलाकार यांनी आपल्या तलवारी म्यान केल्या होत्या. तेव्हा हबीब जालीब यांनी आयुब खान यांच्या विरोधात दंड थोपाटले. लष्करशाही असताना इतरांप्रमाणे ते घाबरून रोमँटिक आणि सौंदर्यवादी कविता करत न बसता रस्त्यावर उतरले. सरकारच्या सर्व प्रकारच्या मार्गदर्शक सूचनांचा धिक्कार करत त्यांनी पाकिस्तान रेडिओवरून अयुबखान  यांच्या लष्करशाही विरूद्ध एक मुशायरा सादर केला. आपल्या शायरी मधून त्यांनी आयुबखान यांच्या  लष्करशाहीला चांगलेच धारेवर धरले. पाकिस्तानातील डाव्या विचारसरणीच्या 'प्रोग्रेसिव रायटर्स चळवळीशीही' ते संबंधित होते. १९६२ साली अयुबखान यांनी त्यांचे संविधान सादर केले. तेव्हा या संविधानाचा विरोध करणारे जे मोजके लोक होते त्या लोकांमध्ये जालीब यांचा क्रमांक वरचा लागतो. या संविधानाचे निषेधार्थ त्यांनी लिहिलेली 'दस्तुर' ही नज़्म आजही निषेधगीत म्हणून सादर केली जाते.  २८ मे २०१० या दिवशी याच लाहोर शहराने पाकिस्तानातील अल्पसंख्याक असलेल्या अहमदिया मुस्लिमांचे सार्वजनिक हत्याकांड अनुभवले. ऐंशी अहमदिया पंथीय लोकांची लोकांची हत्या केली गेली. जे जखमी झाले होते त्यांना जीना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांचीही नंतर दवाखान्यात जाऊन हत्या केली गेली. ईशनिंदा(ब्लास्फेमी) केल्याचा आरोप या अहमदियावर तेहरीक-ए-तालिबान या संघटनेने केला होता. नवाज शरीफ यांनी याबद्दल मात्र सोयीस्कररीत्या मौन बाळगले. लाहोर शहराशी निगडीत इतिहास वर्तमानातील बहुतेक महत्त्वाच्या धार्मिक राजकीय घटनांचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. हे पुस्तक वाचल्यावर वाचक म्हणून आपल्याला प्रश्न पडायला लागतात की लाहोर शहराने या आधुनिक काळात कधी आनंद अनुभवलाच नाहीये का? शहराच्या ऐतिहासिक वास्तुंच्या खाली हजारो निरपराध लोकांच्या मरणाच्या किंकाळ्या दाबून टाकल्या आहेत. लाहोरातील या ऐतिहासिक वास्तूंच्या या तळघरात पर्यटकांना जाऊ दिलं नाही कारण जगात आपली बेअब्रु होईल या भीतीने. पाकिस्तान तसेच लाहोर ह्या आपला इतिहासावर पडदा टाकू पहात आहे. पण तसे शक्य आहे का? पाकिस्तान आजही राष्ट्रीय अस्मितेच्या शोधात आहे.

पुस्तक - इमॅजीनींग लाहोर

लेखक - हरून खालीद

प्रकाशन - पेंग्वीन वायकिंग

पृष्ठे - ३०४

किंमत - ५९९

ajjukul007@gmail.com


अजिंक्य कुलकर्णी 

३ एप्रिल २०२१ च्या लोकसत्तामध्ये प्रकाशित 

Comments

  1. मिळवून वाचायला हवं असं पुस्तक.

    ReplyDelete
    Replies
    1. खरंच वाचण्यासारखंच आहे हे.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मनुष्य गौरव दिन!

रेणुका देवी यात्रोत्सव - अस्तगाव

विज्ञानव्रती एच.सी.वर्मा