डाॅक्टर झिवागो

विसाव्या शतकात जगभर गाजलेले दोन सिनेमे कोणते असा प्रश्न पडला तर जी दोन नावे समोर येतात त्यातले एक रिचर्ड अॅटनबरो यांचा 'गांधी' आणि रशियन कवी,कादंबरीकार पास्तरनाक यांच्या कादंबरीवर त्याच नावाने निघालेला सिनेमा  'डाॅ.झिवागो'. 

     डाॅ.झिवागो व त्यांची पत्नी टोनिया या दोघांची क्रांतीच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही एक गोष्ट. झीवागो साकारलाय ओमर शरीफ आणि टोनिया साकारली आहे चार्ली चॅप्लिन ची मुलगी जेराल्डिन च‌ॅप्लिन ने. प्रथम या कादंबरीचा सिनेमा करायचा ही योजना होती कार्लो पाॅन्टीची. पण त्याच्या योजनेप्रमाणे जर सिनेमा बनवायचा ठरला तर तो MGM ला फार महागात पडणार होता. शिवाय त्यात सोफिया लाॅरेन्स ला ही घ्यायचे असाही तो विचार करत होता, त्याच्यामुळे बजेट आणखीनच वाढणार होते. हे MGM काही मान्य झाले नाही. त्यांनी या सिनेमाला हँड- ओव्हर केला डेव्हिड लीन कडे. लीन ने राॅबर्ट बोल्ट कडून या सिनेमाची संहिता राजकीय न बनवता ललित बनवावी असे सांगून त्याच्याकडून ती तशी लिहून घेतली. ओमर शरिफ हा यात रशियन वाटावा म्हणून त्याचे गाल उचलावे लागणार होते त्यासाठी त्याचे गाल दोऱ्याने बांधावे लागत. त्यामुळे त्याचा चेहरा बदलला गेला. लीन ने ओमरला आधीच सांगितले होते की यात तुला कवी मनाचा डाॅ. झिवागो साकारायचा आहे. ओमरही ती डाॅ. झिवागोची भूमिका अक्षरशः जगलाय. इतका सुंदर अभिनय आहे त्यात. 


      झिवागोची पत्नी लाराची भूमिका ज्युली ख्रिस्ती करणार म्हटल्यावर आपल्याला फार वाव असणार नाही असे सुरूवातीला जेराल्डिनला वाटले सिनेमा पाहिला तर त्या दोघींच्या भुमिका समान वाटतात. या सिनेमाचे चित्रीकरण रशियात होणे गरजेचे होते पण रशियन सरकारने त्याला परवानगी दिली नाही त्यामुळे हा चित्रपट इतर बऱ्याच देशात चित्रित केला गेला आहे. यात लीनला ज्या प्रकारच्या आगगाड्या हव्या होत्या त्या त्याला स्पेन मध्ये सापडल्या त्यामुळे या सिनेमातले आगगाड्यांचे चित्रीकरण तिकडे झाले. त्याकाळी बर्फाच्छादित झाडे दाखवण्यासाठी जी झाडी वापरत त्या झाडांच्या पानांवर मेण टाकत असत. पण ही कृत्रिमता लीन ला नको होती म्हणून  रशियातील बर्फाळ प्रदेश दाखवायचा तर तसा परिसर, झाडे व झाडांवरील बर्फ हे त्याला सापडले फिनलंड मध्ये, तर त्या प्रसंगाचे चित्रीकरण फिनलंड ला झाले.

या सिनेमात एका प्रसंगी आगगाडीत एक स्त्री चढत असताना दाखवली आहे तो प्रसंग चित्रित करत असताना एका महिलेचा पाय कापला गेला. 'इंटरनॅशनल' या गीताचे चित्रीकरण स्पेन मध्ये चालु असताना जो 'मार्च' काढला गेला तो पाहुन स्थानिक लोकांना वाटले की 'जनरल फ्रॅन्को' ची राजवट खरचं संपली की काय! त्या परिसरातील लोक या मार्च चे स्वागत करायला घरातून बाहेर आले मग त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की,  हे तर शूटिंग आहे. फार निराशा झाली त्या लोकांची त्यावेळी हिरमुसलेले चेहरे घेऊन ती मंडळी घरी परतली.


      हा चित्रपट पास्तरनाक यांच्या कादंबरीचे वातावरण बरोबर निर्माण करतो. पास्तरनाक यांची प्रेयसी इव्हिन्सकाया ही हा चित्रपट तयार झाला तेंव्हा हयात होती. त्यावेळची रशियातील परिस्थिती फार बेक्कार होती. पास्तरनाक यांची ही कादंबरी पंडित नेहरूनाही फार आवडायची. नेहरूंनी पास्तरनाक यांना एक घड्याळ भेट म्हणून पाठवले होते. या घड्याळ प्रकरणामुळे पास्तरनाक यांना क्रुश्चेव महाशयांच्या नाराजीला सामोरे जावे लागले होते. पास्तरनाक यांना साहित्याचे नोबेल जाहीर झाले त्यावेळी तेंव्हाच्या सोव्हिएत सरकारने पास्तरनाक यांना सागितले की 'नोबेल पारितोषिक घेण्यासाठी जाणार असल्यास परत स्वदेशी परतता येनार नाही!' (असाच प्रकार रशियातील अजून एका लेखकासोबत घडला होता. कादंबरीकार अलेक्झांडर सोल्झिनित्सन यांच्या बाबतीत. त्यांनाही रशियन सरकार ने नोबेल घ्यायला जाल तर परत रशियात येवू दिले जाणार नाही अशी धमकी दिली होती) नेहरूंनी क्रुश्चेव यांना पत्र लिहिले ते पंतप्रधान म्हणून नाही तर आंतरराष्ट्रीय लेखकांची संघटना 'पेन' चा सदस्य म्हणून. पास्तरनाक यांना चुकीची वागणूक द्यायला नको होती अश्या अर्थाचे. नेहरू इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी एक छान मनगटी घड्याळ पास्तरनाक यांना भेट म्हणून पाठवले. पास्तरनाक यांनी ते मिळाल्याचे नेहरूंना कळवले देखिल. डाॅ.झिवागो माॅस्कोतल्या रस्त्यावर मरुन पडतो व या कादंबरीचा शेवट होतो.

टीप :-आमचे लाडके मामा, अशोक पाटील यांनी ज्युली ख्रिस्तींना एक पत्र पाठवले होते त्या बदल्यात ज्युली ख्रिस्ती यांनी अशोक मामांना या चित्रपटात जो वेष वापरलाय त्या वेषातील एक फोटो पाठवला होता तो सोबत जोडलाय. आज (१४ एप्रिल) ज्युली ख्रिस्ती यांचा वाढदिवस आहे त्या संदर्भात लिहिलेला हा ब्लाॅग. 


संदर्भ - लाल गुलाग - गोविंदराव तळवळकर


Comments

Popular posts from this blog

मनुष्य गौरव दिन!

रेणुका देवी यात्रोत्सव - अस्तगाव

विज्ञानव्रती एच.सी.वर्मा