कालजयी दिनकर
सदियों की ठंडी बुझी राख सुगबुगा उठी,
मिट्टी सोने का ताज पहन इठलाती है,
दो राह, समय के रथ का घर्घर नाद सुनो,
सिंहासन खाली करो की जनता आती है|
सत्तरच्या दशकात इंदिरा गांधींच्या दडपशाही आणि संपुर्ण देशावर १९७५ सालानंतर तब्बल २१ महिने लादलेल्या आणिबाणीच्या विरोधात जयप्रकाश नारायण यांचे एक देशव्यापी आंदोलन चालू होते. त्या आंदोलनाच्या यज्ञकुंडातून बाहेर पडणारी अग्निशिखा जनमानसात धगधगती ठेवण्याचे काम ज्या कवितेने केले होते ती कविता म्हणजे 'सिंहासन खालि करो की जनता आती है'.आणि या क्रांतिकारी कवितेचे उद्गाते आहे राष्ट्रकवी 'रामधारी सिंग दिनकर' उर्फ 'दिनकर'.
दिनकर हे आजही हिंदी साहित्यातील एक दिग्गज कवी म्हणून ओळखले जातात. ज्यांची ख्याती 'संसद से लेकर सडक तक, और जिल से लेकर जन-जन तक' अशी होती. दिनकरांचा जन्म २३ सप्टेंबर १९०८ सिमरिया (मुंगेर) जे आता बिहार मधिल बेगुसराय जिल्हात येते तिथे झाला. दिनकरांचे बालपण फारच हालाखीत गेले कारण त्यांचे वडील हे दिनकर दोन वर्षांचे असतानाच देवाघरी गेले. दिनकरांची आर्थिक बाजू ही प्रचंड कमकुवत झाली म्हणून त्यांचा थोरल्या व धाकट्या भावांनी ठरवले की आपण स्वतः न शिकता मधल्या नुनुवाला(दिनकर) जो हुशार आहे त्याला शिकवूया. शाळेत जाण्यासाठी त्यांना गंगेला ओलांडून जावे लागत असे. एक नावाडी नेहमी दिनकरांना नावेतून शाळेसाठी गंगा पार करवून देत असे. त्याबदल्यात नावाड्याला नुनुवाने रामायण, महाभारतातील गोष्टी किंवा कविता म्हणवून दाखवायच्या ही अट ठरलेली होती. पुढे शिक्षण पूर्ण झाले. घरच्या लोकांची जबाबदारी, भावांचा त्याग, घरातील बहिणींचे भविष्यात लग्न या सर्वांचा गाडा ओढायचा असेल तर नोकरी पत्करावी लागणार आहे हे लवकरच दिनकरांना समजले होते. दिनकरांनी आपल्या जवळजवळ बारा भगिनींचे लग्न लावून दिले होते. सर्वसामान्य भारतीय व्यक्ती हा एका मुलीच्या लग्नामुळे थकून जातो!
१९३५ ते १९४५ मध्ये इंग्रजांच्या काळात त्यांनी एका काॅलेजात निबंधक म्हणून काम पाहिले. ज्या लेखणीमुळे त्यांना ही नोकरी मिळाली होती त्याच धारदार लेखणीमुळे नोकरीच्या काळात कित्येक संकटेही त्यांनी स्वतःहून ओढवून घेतले होते. इंग्रजांच्या अंमलाखाली नोकरी करत असून सुद्धा इंग्रजांविरूद्ध क्रांतिकारक, तिखट कविता ते करत असल्यामुळे त्यांच्या दोन वर्षात तब्बल बावीस वेळा बदल्या झाल्या ! कित्येक इंग्रजी अधिकाऱ्यांनी व जवळच्या मित्रांनी दिनकरांना विचारले की, " या अशा कविता लिहून कशाला स्वतःवर संकटे ओढवून घेत असतोस? " जगाचा संसार करण्यांचा ध्यास घेतलेल्या या महाकवीने अशा या प्रश्नांना काय उत्तर द्यायचं ? दिनकरांचा कवितेद्वारे व्यक्त होणे हा काही स्वान्त: सुखाय केलेला उद्योग नव्हता, तर ती त्यांच्या अंतरआत्माची गरज होती. मुळात लेखकांना, कवींना जिवंत ठेवते ती त्यांची लेखणी. मग दिनकर यांच्या सारखा मूर्तिमंत कवी कसा स्वस्थ बसू शकेल ! कवितेच्या अभिव्यक्तीत 'नोकरी' हा मोठा अडसर ठरू लागला होता. पण कौटुंबिक गरजेपोटी नोकरी करणे गरजेचे होते. शेवटी ज्यावेळी कुटुंबाच्या गरजांचा बोज्या हलका झाला त्यावेळी(१९४५) त्यांनी नोकरीला रामराम ठोकला व फिरुन कधी कोणत्याही इंग्रज अधिकाराचा उंबरठा नोकरीसाठी ओलांडला नाही. मग, आता?
"निकल पडे कुरुक्षेत्र और,
युद्ध की ललकार सुन प्रतिशोध से
दिप्त हो अभिमान उठता बोल है,
चाहता नस तोडकर बहना लहू
आ स्वयं तलवार जाती हात मे,
रुग्ण होना चाहता कोई नहीं
रोग लेकिन आ गया जब पास हो,
तिक्त औषधी के सिवा उपचार क्या,
शमित नहीं होगा ये मिष्ठांन्न से|"
दिनकरांना महाभारतातील कर्ण हा प्रिय होता. याच कर्णावरिल प्रेमापोटी त्यांनी 'रश्मिरथी' हे काव्यसंग्रह लिहिले. रश्मिरथी लिहित असताना दिनकरांचे सर्व कुटुंब त्या रश्मिरथीचे पारायणं करायचे. जेव्हा तो काव्यसंग्रह लिहून झाला तेव्हा साधारण दुपारचे तीन वाजले होते. त्यावेळी दिनकर मुजफ्फरपूर मध्ये राहत होते. रश्मिरथीची शेवटची ओळ लिहून ते त्यांच्या खोलीतून बाहेर आले तेव्हा त्यांचे डोळे रक्तबंबाळ झाले की काय इतके ते रडले होते लिहून झाल्यावर. रश्मिरथी च्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे महाभारतातील कर्ण या पात्राचा वापर करुन तत्कालीन समाज व काळावर दिनकरांनी नेमकं बोट ठेवलं आहे. स्वातंत्र्य तर मिळाले पण आपल्या देशात समाजातील सर्व लोक स्वतंत्र आहेत का? स्वातंत्र्याच्या पश्चात दलित, पीडितांची झालेली उपेक्षा त्यांना सलूं लागली. याच उपेक्षीत समाजाचा रूपक असलेलं कर्ण हे पात्र मध्यवर्ती ठेवून दिनकरांनी आपल्या आतील घुसमटिला रश्मिरथी च्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली. रश्मिरथीत कर्णाच्या मुखातील एक स्वगत आहे…
मै उनका आदर्श,कहीं जो व्यथा न खोल सकेंगे,
पुछेगा जग किन्तू,पिता का नाम न बोल सकेंगे,
जिनका निखिल विश्व में कोई कहीं न अपना होगा,
मन मे लिये उमंग जिन्हे चिरकाल कलपना होगा|
वैयक्तिक मला रश्मिरथी मधील तृतीय सर्गा मधील एक प्रसंग फार आवडतो. श्रीकृष्ण हस्तिनापूरला पांडवांच्यातर्फे शिष्टाई साठी येतात. त्यावेळी नाही पांडवांच्या वाट्याचे अर्ध राज्य द्यायचे मग किमान पाच गांव तर देशील? दुर्योधन त्यालाही नकार देतो. दिनकरांच्या लेखणीचे तेज, त्यांचे शब्दांवर असलेले प्रभूत्व तृतीय सर्गाच्या काव्याची ध्वन्यात्मकता अनुभवायचे असल्यास तो प्रसंग पुढील दुव्यावर क्लिक करा व आवर्जुन ऐका. त्याच सर्गामधिल
" वर्षों तक वन में घूम घूम,
बाधा-विघ्नों को चूम-चूम,
सह धूप-घाम,पानी पत्थर,
पाण्डव आयें कुछ और निखर|
यानंतर चे कडवे तर ह्दयावर कोरून ठेवावे असे आहेत. एक ऐकीव प्रसंग आहे, खरं खोटं माहीत नाही मला. एकदा पं.नेहरू एका कविसंमेलनाला गेले तिथे दिनकरही होते. नेहरू आणि दिनकरांचे ६२ च्या चीन युद्धानंतर फार खटके उडत असत. नेहरू कार्यक्रमाला आले व त्यांचे स्वागत दिनकरांनी केले. दोघे एकत्र मंचावर जाऊ लागले. तेवढ्यात नेहरू अडखळले व त्यांचा तोल जाऊन ते पडणार तेव्हढ्यात दिनकरांनी त्यांना धरले. त्यानंतर दिनकर जे बोलले ते फार मार्मिक आहे. ते म्हणाले,"जब जब राजनीती लडखडायी है, तब तब साहित्य ने ही उसे बचाया है|". वरील प्रसंग महत्वाचा नसून त्यातले मर्म महत्वाचे आहे.
१ डिसेंबर १९७३ रोजी ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारताना दिनकर म्हणतात की," देशासाठी केलेला संघर्ष हा मोठा व कुटुंबासाठी केलेला संघर्ष हा छोटा असतो. मी हा छोटा संघर्ष केला आहे. तो करताना जो फावला वेळ मिळाला त्यात त्यामध्ये मी साहित्यसाधना केली आहे. असं असतानाही साहित्य जगताने नजर उचलून माझ्याकडे बघितले हे मी माझे भाग्य समजतो." दिनकरांची ही किती मोठी इंटेलेक्च्युअल माॅडेस्टी आहे. कवी आणि कवितांच्या भूमिके बद्दल एजरा फ्राॅडर चं वाक्य उद्धृत करताना दिनकर म्हणतात की,"कविता ही कविता आहे. जसा वृक्ष हा वृक्ष असतो. जसा वृक्ष हा एका जागी स्थिर असतो. तो कुणालाही बोलावत नाही पण तरीही लोक त्याचा हिरवेपणा बघून खूष होतात, त्याच्या सावलीला बसतात,त्याची फळे तोडून खातात. त्याच प्रमाणे मानवी चेतनेच्या तळाला जो आनंद आहे तो कवितेच्या माध्यमातून अभिव्यक्त करणे हीच तर कवीची मोठी उपलब्धी असते. दिनकरांवर सुरूवातीच्या काळात गुरूदेव रवींद्रनाथ टागोर आणि मोहम्मद इक्बाल यांचा खूप प्रभाव होता. वास्तविक हे दोन्ही कवी अगदी विरूद्ध टोकाचे होते. गुरुदेवांची भूमिका ही ईश्वरासमोर समर्पणाची असायची तर इक्बाल म्हणत की
'खूदी को कर बुलन्द इतना
कि हर तकद़िर से पहले
खूद खूदा बंदे से पूछे
बता तेरी रजा क्या है?
अशा दोन टोकांच्या कवींचा एका व्यक्तीवर कसा काय प्रभाव पडू शकतो हा प्रश्न मला नेहमी पडतो? दिनकर म्हणतात माझ्या काव्यलेखनात पहिला भूकंप झाला तो १९४३ मध्ये जेव्हा माझा परिचय इलियट च्या कवितेसोबत झाला. दिनकर म्हणतात की मला इलियट च्या कविता समजत नसत पण रवींद्रनाथ आणि इक्बाल वाचून माझ्या मनाच्या शांतीला मात्र भंग करण्यास त्या कविता मात्र पुरेशा होत्या.
ज्या काव्यनाटक लेखनासाठी दिनकरांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९७२ चा) मिळाला होता ती कलाकृती म्हणजेच 'उर्वशी'. उर्वशी बद्दल बोलताना दिनकर म्हणतात की,"आजकाल कविता सत्याचा उद्घोष करत नाही तर सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. मी देखील 'उर्वशी' मधून काही शिकवण्यापेक्षा काही शोधण्याचाच प्रयत्न करतो आहे. 'कुरुक्षेत्र' मध्ये प्रकाश आहे तर 'उर्वशी' मध्ये दुपार आणि संधिप्रकाश आहे. 'कुरुक्षेत्र' मध्ये विश्वास आहे तर 'उर्वशी' मध्ये संशय आणि द्विधा मनस्थिती आहे. 'कुरुक्षेत्र' मध्ये धाडसाने गुरयपदावर बोललो आहे तर 'उर्वशी' मध्ये उर्वशी पदावर पोहोचल्यावर त्याच्या रहस्यांबद्दल विचारलं असतं". ऋग्वेदात आणि इतर वैदिक वाड्मयात उर्वशी आणि पुरुरवा यांच्या कथेकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन आपल्याला दिनकर देतात. भारतीय तत्वज्ञानाचा 'काम' या प्रेरणेकडे पाहण्याचा किती विशाल, भव्य, उदात्त आणि व्यापक दृष्टिकोन होता हे 'उर्वशी' वाचल्यावरच समजते. पुरुरवा हा सनातन नराचे तर उर्वशी ही सनातन नारीचे प्रतिनिधित्व करते. याची तुलना बायबलच्या अॅडम आणि इव्ह सोबत करुन पहा आणि निष्कर्ष स्वतःच काढा. 'काम' याचा अर्थ होतो इच्छा, वासना, कामना, काही मिळवण्याची इच्छा, प्राप्त करण्याची उत्कट अभिलाषा. पण पाॅर्नोग्राफीने काम = Sex हे इतक फिट्ट बसवलं आहे ना आपल्या मनात की त्यापलीकडे काही असतं असा विचारच मनाला शिवायला तयार नाहिये आपल्या. इतकं विकृत करून ठेवलय आपण 'काम' याला. 'इंद्रियांच्या मार्फत अतींद्रियांना स्पर्श करणे हाच प्रेमाचा आध्यात्मीक महिमा आहे' या गोष्टीवर उर्वशी हे काव्य उभं आहे. उर्वशी वर एक दीर्घ लेख लिहिलाय करीन कधीतरी त्याला पोस्ट. विज्ञान तंत्रज्ञानाबद्दल दिनकर हे प्रचंड सकारात्मक होते. वैज्ञानिक असूनही कवी, कलाकार असणारे गॅलिलीओ आणि लिओनार्दो द विंची यांचाही उल्लेख दिनकर आपल्या भाषणात करत असत.
६२ च्या भारत चीन युद्धात भारताचा झालेला पराभव हा दिनकरांना फार जिव्हारी लागला होता. त्यामुळे भारतीय जनतेचे मेलेल्या, खचलेल्या मनाला जागृत करण्यासाठीचा प्रयत्न त्यांनी 'परशुरामकी प्रतिक्षा' मधून केला. यात 'परशुराम' हे भारताला उद्देशून रुपक आहे. त्या परशुरामाला उद्देशून दिनकर लिहितात की,
यह उत्तेजित भारत साकार भारत है,
यह और नहीं कोई विशुद्ध भारत है|
दिनकर हे एकमेव हिंदी कवी आहे ज्यांनी दक्षिणेतीलही लोकांच्या ह्दयावर अधिराज्य गाजवले होते. चीन युद्धात झालेल्या पराभवामुळे त्यांना खूप एकाकी वाटू लागले,जणू जीवनातील रसच संपला त्यांचा. आयुष्याच्या शेवटी त्यांनी तिरुपती यात्रा करण्याचा निर्णय घेतला. इकडे देशात जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन शिखरावर होते. व्यंकटेशाच्या समोर मला रश्मिरथीचे पारायण करायचे आहे ही इच्छा त्यांनी मंदिरातील संबंधित व्यक्तींकडे प्रगट केली. मंदिरात साक्षात रामधारी सिंग दिनकर रश्मिरथीचा पाठ करणार! हा हा म्हणता म्हणता ही वार्ता काही तासात तिरूमाला परिसरात वाऱ्यासारखी पसरली. काही क्षणात मंदिर परिसरात चार पाच हजार लोकांनी गर्दी केली. पण या लोकांना कुठे माहित होते की हा पाठ शेवटचा पाठ ठरणार म्हणून. त्यानंतर दिनकरांनी व्यंकटेश्वराला नमस्कार केला व म्हणाले माझी एक इच्छा आहे की, माझे उर्वरित आयुष्य जयप्रकाश नारायण यांना मिळावे! त्यानंतर दिनकरांनी स्वतःला समुद्राला स्वाधीन केले. हा शब्दसुर्य शरीररुपाने कायमचा अस्ताला गेला एक प्रखर, मोठी काव्यशिदोरी मागे सोडून.
अजिंक्य कुलकर्णी.
छान लिहिलं आहे.
ReplyDelete