Loving Vincent

   व्हिन्सेंट व्हॅन गाॅग साधारण २१ वर्षाचा असताना उर्सुला नावाच्या एका सुंदर मुलीच्या प्रेमात पडला. परंतु ते व्हॅन गाॅगचे एकतर्फीच प्रेम होते. उर्सुलाने नकार कळवल्यामुळे हा बराच काळ नैराश्यात गेला होता. पुढे वडिलांच्या इच्छेप्रमाणे हा पाद्री झाला. व्हॅन गाॅग ज्या भागात प्रवचनं द्यायला जायचा ती सर्व वस्ती कामगारांची होती. तिथे एकदा एका काळोख्या खोलीत काही कामगारांचा मृत्यू झाला त्यानंतर याची परमेश्वरावरची श्रद्धा डळमळीत झाली व त्यानंतर याने प्रवचनं देणे अाणि पाद्री चे काम करणं बंद केलं. व्हॅन गाॅग च्या आयुष्यात त्याचा धाकटा भाऊ थिओडोर याचा मोठा हातभार आहे. व्हॅन गाॅग जास्त मनमोकळेपणाने बोलायचा ते फक्त थिओडोर सोबतच. जरी थिओडोर हा व्हॅन गाॅग पेक्षा लहान असला तरीही तो व्हॅन गाॅगचे सर्व करत असे. गाॅगला पेंटिंगसाठी लागत असलेला पैसा,कागद.इ. वेळपडल्यास व स्वतःची जरी नड असली तरी सुद्धा व्हॅन गाॅगला त्याने पेंटिंगसाठी काहीच कमी पडू दिले नाही. व्हॅन गाॅग ला लागणाऱ्या सर्व वस्तू थिओडोर खरेदी करून देत असे.कदाचित थिओडोर हा एकमेव व्यक्ती असावा त्या काळातला की ज्याला व्हॅन गाॅग हा किती मोठा कलाकार आहे याची जाणीव झाली असावी. व्हॅन गाॅगची आयुष्यात तीन- चार प्रेमप्रकरणे झाली जी बऱ्याच अंशी एकतर्फीच होती. या प्रत्येक प्रेमप्रकरणात तो अपयशीच ठरला होता. याही कारणामुळे असेल कदाचित त्याच्या पेंटिंगमध्ये जाणवणार जो एकाकीपणा आहे  इट्स अ रिफ्लेक्शन आॅफ हिज ओन लाईफ. यश त्याला नेहमीच हुलकावणी देत आलं होतं. व्हॅन गाॅगची तिसरी प्रेयसी ख्रिस्टिन ही एक वेश्या होती. तीच कदाचित त्याची 'न्यूड माॅडेल' म्हणून काम करत असावी.तिलाही व्हॅन गाॅगचा लळा लागला होता पण तो लळा तीच्या आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती तो पर्यंतच टिकला. नंतर ती त्याला झिडकारू लागली. व्हॅन गाॅगचे सुप्रसिद्ध असलेले 'साॅरो' हे पेंटिंग बहुधा तिचेच असावे. 


          जगातल्या इतर नावाजलेल्या चित्रकारांचेही पेंटिंग आपल्या भावाने पहावे म्हणून थिओडोर ने व्हॅन गाॅगला पॅरिसला जाण्याचा सल्ला दिला. गाॅगने पॅरिसला जाण्याचे  मान्यही केले. पॅरिसला त्याची भेट गोगँ सोबत झाली. गोगँनं त्याला आपल्या स्टुडिओत नेऊन आपली पेंटिंगस् दाखवली. ती पेंटिंग पाहताना गाॅग अचंब्याचा घक्काच बसला. अशाप्रकारची पेंटिंग त्याने या आधी कधीच पाहिले नव्हते. गोगँने वापरलेले रंग त्याला खुप आवडले. गोगँ गाॅगला म्हणतो," जाॅर्ज सेरा आणि आपण असे दोघेच महान चित्रकार आहोत." गोगँ व सेराला भेटेपर्यंत गाॅग हा फक्त ग्रामीण भागातले पशुपक्षी,निसर्ग चित्रच काढण्यापलिकडे काहीच माहित नव्हते. प्रमाणबद्ध चित्र काढायची असतात हेही गाॅगच्या गावी नव्हते. गाॅग हा स्वतःचेच म्हणणे रेटत असायचा. त्याची धारणा होती की,पेंटिंग प्रमाणबद्ध काढले की त्याचा आत्मा जेवतो जणू! असाच काहीतरी विचित्र विचार गाॅग करायचा.


          व्हॅन गाॅग ने काढलेली काही अप्रतिम पेंटिंगस् म्हणजे 'विन्सेन्ट चेअर्स', 'विन्सेन्ट शुज', 'पोटॅटो इटर्स', 'सेल्फ पोट्रेटस्', 'स्टारी नाईट', 'सन फ्लॉवर'. गाॅग हा इतका जगप्रसिद्ध चित्रकार पण त्याच्या हयातीत मात्र त्याचे फक्त अाणि फक्त एकच चित्र विकले गेले ते म्हणजे 'द रेन व्हाईनवार्डस्'. 'व्हिट फिल्ड विथ क्रोज्' हे एक गाॅगचे सुप्रसिद्ध पेंटिंग आहे. त्याने या चित्रात नुकतीच कापणी झालेले गव्हाचे शेत दाखवले आहे व त्या मोकळ्या रानातून उडणारे कावळे दाखवले आहे. असं म्हटलं जाते की हे चित्र काढताना गाॅग खुश होता. तो आगोदरच्या आयुष्यातील नैराश्यातून बाहेर पडून त्याने पेंटिंग मध्ये मन गुतवायला सुरूवात केली होती व त्याला ते आवडूही लागले होते. जणू त्याने आपल्या आयष्यातले नैराश्याचे कावळेच उडवून लावले की काय असा भाव त्या पेंटिंग मध्ये निर्माण व्हावा इतके ते छान पेंटिंग आहे. गाॅगला पिवळा, जांभळा व हिरवट पिवळा (पोपटी नाही) हे रंगफार आवडत असत. त्याची बरीचशी चित्र याच रंगांमध्ये रंगवलेली आढळतील.



आता लव्हिंग विन्सेन्ट(Loving Vincent) या चित्रपटाविषयी.

Loving Vincent ही काही साधारण फिल्म अजिबात नाही. जगातली पहिली पूर्णतः कॅनव्हासवर तैलरंगात रंगवलेली (इंग्रजी शब्दच चांगला आहे Fully painted) फिल्म आहे. Oil paint चित्रच ही फिल्म बनवताना वापरले आहे. ही फिल्म बनवण्यासाठी जवळपास साडेपाच ते सहा वर्ष लागली आहे. आजच्याकाळात जिथे ३-४ महिण्यात चित्रपट तयार होतो तिथे इतका वेळ लागणे म्हणजे एक आश्चर्यच आहे. चित्रपट तयार करण्यासाठी दिग्दर्शक ह्युज वेल्कमन व डोरॅटा कोंबियेला या द्वयींनी प्रचंड मेहनत घेतली आहे. फिल्मसाठी जवळपास ६५,००० पेंटिंग लागले होते. ही सर्व पेंटिगस् हाताने रंगवलेली होती. फिल्म साठी वापरलेले पेंटिंगमध्ये छोटे-छोटे बदल केलेले असत. हे बदल त्या पेंटिंगची जागा फिल्ममध्ये कुठे आहे व त्याची हलण्याची दिशा कोणती आहे,तसेच सिन च्या गरजेनुसार ठेवली आहे.

          आज जसे चित्रपटात स्पेशल इफेक्ट देण्यासाठी शूटिंगच्या दरम्यान मागे हिरवा पडदा वापरून शरीरावर काही स्पाॅट निश्चित केले जातात. त्यानंतर त्याच शूटिंग करून मग स्पेशल इफेक्ट साठी तो शुट केलेला भाग दिला जातो. थोडेसे त्याच पद्धतीचा वापर करुन दिग्दर्शक द्वयीने चित्रकारांनी काढलेल्या चित्रांना क्रमवार मांडणी करून त्याचं शूटिंग करुन त्याचं प्रोजेक्शन 'आर्टिस्ट बोर्ड' वर केलं जायचं. त्यानंतर त्या आर्टिस्ट बोर्डवरच्या पेंटिंगचा फोटो काढला जायचा. आता फोटो काढला म्हटल्यावर त्या फोटोत आपण पाहिजे तसे एडिटिंग करु शकतो. म्हणूनच आजच्या काळातील अगदी संथ गतीने बनवलेली फिल्म असे या फिल्म बद्दल म्हणता येईल. या फिल्मसाठी जगभरातील चित्रकारांच्या आॅडिशन घेण्यात आल्या. विविध देशातील ५००० चित्रकारांपैकी ४५ चित्रकार निवडले गेले त्यात मुंबईच्या सुशी या तरूण मुलीचाही समावेश आहे. गाॅगने काढलेल्या ३५०० चित्रांपैकी बेस्ट असणाऱ्या १२० चित्रांची निवड या फिल्मसाठी केली गेली. या प्रोजेक्टसाठी केवळ चांगला/ली चित्रकार असणे केवळ हाच एकमेव निकष नव्हता तर त्या/ती चित्रकाराला अॅनिमेशमनही यायला हवे. या चित्रपटात १ सेकंदाच्या अॅनिमेशन साठी सरासरी १२ पेंटिंगस् चा संच लागत असे. 'स्टारी नाईट' या प्रचंड गाजलेल्या पेंटिंगच्या वेळचा चित्रटातील सिन निखळ नेत्रसुखद आहे. कॅमेरा 'स्टारी नाईट' दाखवत फेमस अशा 'कॅफेटेरेस अॅट नाईट' मध्ये घुसतो. या इतक्या सिन साठी १२५० फ्रेम्स वापरण्यात आल्या आहेत आणि तेव्हढ्यासाठी ६५० पेंटिंग्स लागले. हा सिन पूर्ण करायला किती वेळ लागला असेल तर तब्बल सहा महिने लागले फक्त एक छोटा सिन करण्यासाठी. 'नाईट कॅफे' या चित्रात बिलियर्डस् च्या टेबलावरचे दिव्यांचा प्रकाश ज्या पद्धतीने चित्रपटात दाखवलं आहे ते इतकं सुंदर वाटतं पिक्चर चालू असताना की बास! #Loving_Vincent 

स्रोत :- कॅनव्हास - अच्युत गोडबोले दीपा देशमुख इंटरनेट वरील विविध साइट, You tube वरील विविध मुलाखती.


अजिंक्य कुलकर्णी.

Comments

Popular posts from this blog

मनुष्य गौरव दिन!

रेणुका देवी यात्रोत्सव - अस्तगाव

विज्ञानव्रती एच.सी.वर्मा