ए भाऊ! 'शिक्षक' नको होऊ...
सकाळी सकाळीच रविच्या व्हाट्सप वर विनयचा एक मेसेज आला 'शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!' म्हणून. तो मेसेज वाचून रविच्या समोर मागील सहा सात वर्षाचा काळ असा झरझर सरकत गेला. तेव्हढ्यात रविला विनयचा फोनच आला. हाय हॅलो झाल्यावर काय चाललंय सध्या वगैरे विनय ने विचारपूस केली. गेली दोन तीन वर्ष या दोघा मित्रांचा एकमेकांशी तसा संपर्कच राहीला नव्हता. विनय एका आयटी कंपनीच्या प्रोजेक्ट साठी बंगलोरला गेला होता. तेव्हढ्यात रविला आलेला हुंदका त्याला आवरता येईना.
विनय:- रव्या अरे काय झालंय?
रवि:- काही नाही रे असंच जरा भरून आलं होतं.
विनय:- हो, पण कशामुळे? नेमकं काय झालंय ते सांगशील तर खरं. मला कसं कळणार?
रवि :- विन्या! अरे माझं ग्रँटेबल ला काम झालंय. (हे सांगताना रविच्या डोळ्यात पाणी आलं) "विन्या! अरे शिक्षकांच्या ग्रँटेबल- नाॅन ग्रँटेबल नावाची काही पदं असतात हे माहीत तरी आहे का तुला? गेल्या चार वर्षात आपला मित्र काय करतोय, काय भोगतोय याची काडीचीही कल्पना आहे का तुला ?" गहिवरून आल्याचा आवाजात रवि बोलत होता.
दोघेही लहानपणापासून मित्र एका शाळेत शिकले. पुढे अकरावी बारावी सायन्सपण सोबतच केलं. बारावी नंतर मात्र दोघांचे मार्ग बदलले. रविला शिक्षक व्हायचं होतं म्हणून त्याने प्लेन बिएसस्सीला प्रवेश घेतला तर विनय ने कंप्यूटर इंजीनियरींगला. २०१४ ला दोघांची शिक्षणं पुर्ण झाली अन् आता वाटा बदलल्या. विनय एका मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीत सर्व्हिसला लागला. वर्षाकाठी चांगल्या हाईक घेत घेत पुढे सरकत गेला. रविला मात्र ग्रॅज्युएशन पासून शिक्षक व्हायची स्वप्न पडू लागली होती. पुढे त्याने बिएड केलं व तो एका तुटपुंज्या पगारावर एका ज्यूनिअर काॅलेजवर नाॅन ग्रँटवर नोकरी करू लागला. २०१६ ला रविचं लग्न झालं तर २०१८ ला एक मुलगा. विनय अजून सिंगलच आहे. रविच्या लग्नात फक्त अक्षता टाकण्यापूरता विनय आला व लगेच माघारी फिरला. पुढे व्हाट्सपवर सणावाराला एखादा शुभेच्छांचा संदेश फक्त. बाकी टाटा बाय बाय. आज विनयचा फोनच आल्याने रविला रहावले नाही आणि मागील काही वर्षात भोगलेल्या गोष्टी तो विनयला सांगू लागला. बोलता बोलता त्याचं लक्ष गेलं ते सुवर्णाच्या गळ्याकडे आणि तो काही क्षण बोलायचा थांबला अन् पुन्हा भानावर येत विनयशी बोलू लागला. सुवर्णा ही रविची बायको. रविच्या हातात चहाची कपबशी देऊन पुन्हा ती आत स्वयंपाक घरात निघून गेली.
विनय :- रव्या अरे साॅरी यार! मागची तीन एक वर्ष करिअर सेट करण्याच्या नादात तुला तुझ्याबद्दल काही विचारता आलं नाही रे. बरं ते मघाशी ग्रँटेबल का नाॅन ग्रँटेबल ते काय सांगत होतास तू?
रवि:- कसलं काय यार! Life has fucked me. चांगलीच ठासली रे माझी, अयुष्याने! उमेदीची वर्षातच आत्मविश्वास गमावून बसलो होतो रे मी.
विनय:- म्हणजे?
रवि :- विन्या अरे कसंय २००९ नंतर सरकारी शिक्षक भरतीच झालेली नाहीये अरे. 'पवित्र पोर्टल' मार्फत शिक्षक भरती होत असते आता. म्हणजे सरकारी शाळांमध्ये शिक्षक म्हणून भरती. जुलै २०१७ आगोदर अशी कोणती रचनाच नव्हती भरतीची. म्हणजे सरकार शिक्षक भरत नव्हतं. संस्था चालक म्हणतील ती पूर्व दिशा असायची. आजही यात काही फरक पडलेला नाहीये. डिसेंबर २०१७ मध्ये भाजप सरकारने २४००० हजार जागा भरू असे आश्वासन दिले होते. त्यावेळी या शिक्षक भरती परीक्षेला बसलेले उमेदवार होते सहा लाख. तुला माहिती आहे का विन्या, या शिक्षक भरती प्रक्रियेत पहिल्या फेरीत (प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक) असे ६००० शिक्षकांची भरती झाली तर दुसऱ्या फेरीत ३९००. तुला सांगतो विन्या पहिली भरती जी झाली ना ती मुलाखतीविनाच झाली अरे. ज्याला एकास एक असं म्हणतात. स्ट्रेंज वाटेल तुला हे सगळं, पण हे असं आहे. हॅलो! हॅलो! हॅलो हॅलो हॅलो. रेंज गेली वाटतं.
विनय चा पुन्हा फोन येतो.
विनय :- हा! आहेस का?
रवि:- हा बोल, आता येतंय का ऐकू?
विनय:- हा. बोल!
रवि:- हा तर काय सांगत होतो मी? शिक्षक भरतीच्या दोन परीक्षा असतात एकाला म्हणतात TET (Teachers Eligibility Test) व दुसरी असते TAIT ( Teachers Aptitude Intelligence Test) TAIT च्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून फेब्रुवारी २०१९ मध्ये पहिली फेरी झाली. म्हणजे भाजप सरकारच्या काळात. पण बहुतेक सर्व शिक्षणसंस्था ताब्यात आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात. काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो वा भाजप कुणालाच काही घेणं देणं नाहीयेरे. आमचे हाल तर कुत्रही खात नाही रे. अरे मघाशी बोलताना सुवर्णा जेव्हा चहा द्यायला आली ना तेव्हा तिचा रिकामा गळा पाहून स्वतःचीच लाज वाटली मला. चार वर्षात तिचे दागिनेही सोडवू शकलो नाही.
विनय :- दागिने विकले? अरे बापरे! का,कशासाठी?
रवि:- सांगतो! आधीचा मुद्दा पुर्ण करतो मग सांगतो.
तर, TAIT च्या माध्यमातून भरतीच्या आगोदर म्हणजे २०१७ आगोदर संस्थाचालक मुलाखतीच्या माध्यमातून शिक्षक भरती करायचे. संस्थेची जाहिरात निघायची. संस्थेने उमेदवार आधीच फिक्स केलेला असायचा. जो पैसा फेकेल तो उमेदवार सिलेक्ट होणार. तुला 'भाव' माहीती आहे का 'भाव'? माध्यमीक साठी सतरा लाख, उच्चमाध्यमीक साठी २१-२२ लाख आणि सिनियर काॅलेजला शिकवण्याची इच्छा असेल सेट/नेट पास असेल तरी ३५-४० लाख देण्याची तयारी ठेवायची उमेदवाराने. विन्या कुठून आणला असता रे मी इतका पैसा? मुलाखत ही फक्त फाॅर्मेलिटी असते दाखवण्याची की आम्ही मुलाखतीद्वारे पदं भरलेत असं. आता TET पास झाल्याशिवाय TAIT देता येत नाही. पहिली ते आठवी साठी TET कंपल्सरी आहे. नववी ते बारावीसाठी TAIT कंपल्सरी आहे. २०२२ मध्ये येऊ घातलेल्या शैक्षणीक धोरणात नववी ते बारावी TET लागू करणार आहेत. बऱ्याच पुढाऱ्यांच्या खाजगी संस्था आहेत त्यांनी तर या पवित्र पोर्टल मध्ये भागही घेतला नाही. याचे कारण त्यांना सापडलेल्या कायद्याच्या पळवाटा हे आहे. १/०४/२०२१ रोजी एक जी.आर आला की नाॅन ग्रँट टू ग्रँटेबल शिफ्टींगचा. म्हणजे या लोकांकडे विहित नमुन्यातील स्केल order आहे. ज्यांच्याकडे ही order असेल तेच नाॅन ग्रँट ते ग्रँटेबल शिफ्ट होऊ शकतात. इतर जणांनी मात्र बसा बोंबलत. काही ठिकाणी २०% ग्रँट असते काही ठिकाणी ४०%. ह्याच चक्रात फिरत राहीलो रे मागची चार वर्ष. संस्थाचालकांनी या कायद्याचा पुरेपूर फायदा उठवला. नाॅन ग्रँटचे शिक्षक त्यांनी ग्रँटेबलला शिफ्ट केले. या साठी पुन्हा उमेदवारांकडून पैसा घेतला. महाराष्ट्र शिक्षक नियमावली कायदा १९७८ आणि १९८१ नुसार खाजगी संस्थांना आपल्या संस्थेत शिक्षक भरण्याचा अधिकार आहे. म्हणून हे संस्थाचालक या पवित्र पोर्टल उतरले नाहीत. कारण त्यांच्या सो काॅल्ड हक्कांवर गदा येते म्हणे. आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. चार पाच वर्षापूर्वी मी उच्चमाध्यमीक विद्यालयात ग्रँटेबल पोस्ट मिळवण्यासाठी माझ्या संस्थाचालकांना पंधरा लाख रूपये देण्याचे कबूल केले होते. नुकतच लग्न झालं होतं. सासऱ्यांकडून, घरून बँकेकडून कर्ज घेऊन कसेतरी दहा लाखापर्यंत उडी मारू शकलो. संस्थेने कमीतकमी बारा लाख भरायला सांगीतले व उरलेले आॅर्डर निघाल्यावर. बारा लाखाचा पल्ला गाठण्यासाठी शेवटी मी सुवर्णाचे दागिने विकले! जीला मी दागिन्यांनी मढवायला पाहीजे आज तिच्याच दागिन्यांवर शेवटी मी नोकरी मिळवण्यासाठी माझ्या स्वाभिमानाची लक्तरं वेशीवर टांगली. मागच्या पंधरा दिवसांपूर्वी संस्थेने आॅर्डर काढली. अन् उरलेले तीन लाख तातडीने भरायला सांगितले. हरल्यासारखं झालं रे अक्षरशः! एका सहकाऱ्याची ओळख होती एका पतसंस्थेत तिथून बारा टक्क्याने पैसे उचलले अन् भरले. मागचे पैसे ज्या ज्या लोकांकडून घेतले ते आज माझ्याकडे 'पैसे बुडवणारा' अशा नजरेनं पाहतात रे. आज फक्त हे समाधान आहे की काही दिवसांनी जरा चांगले दिवस येतील. या काळात माझे छंद, माझ्या आवडीनिवडी जोपासता आल्या नाही. माझ्या नातेवाईकांनाही भेटायची लाज वाटयची पैसे घेतलेले होते ना त्यांच्याकडून. आत्मविश्वासाने कधी कुणाच्या नजरेला नजर देऊ शकलो नाही या काळात. सतत दबून रहायचं! हेच शिकलो. आयुष्यात खूप खूप काही गमावलं मी फक्त आणि फक्त एक नोकरी मिळवण्यासाठी. अरे ही झाली माझ्यासारख्या ग्रँटेबल वाल्यांची परिस्थिती अजून एक कॅटेगरी असते शिक्षकांची जे 'सेल्फ फायनान्स'शाळा काॅलेजात शिकवतात. त्यांचं तर विचारूच नको. असो, फार बोअर केलं तुला मित्रा!
विनय :- म्हणूनच तुला त्यावेळी इंजीनियरींग कर म्हणालो होतो किंवा एम एस सी केल्यावर एखादी कंपनी जाॅईन कर म्हणालो होतो. पण तुम्हाला तर 'शिक्षक' डसला होता!
रवि:- मग 'शिक्षक' कुणी व्हायचं रे?
विनय :- ...
अजिंक्य कुलकर्णी
8208218308
'झाकली मुठ सव्वा लाखची' सगळ्यांची हीच गोष्ट आहे.
ReplyDeleteहोय.
Deleteसत्य परिस्थिती आहे भाऊ....
ReplyDeleteहोय
ReplyDeleteAavghad aahe Aapan fakta kam karaycha ..Aamhi tar eka namankit sansthet asun he aaj lock down madhe bin pagari ghari aahe.
ReplyDeleteखरं आहे.
Deleteखरं असुनही सम्राटा विरूद्ध कोणीही बंड करणार नाही उलट पैशाच्या रांगा लागतील .
ReplyDeleteहो हे पण खरं आहेच.
Deleteअतिशय प्रखरतेने मांडले भाऊ..... कटू सत्य.......
ReplyDeleteधन्यवाद
Deleteएकदम खर आहे अजिंक्य भाऊ सर तुमच तिकडे इंजिनिअर एक दोन वर्षात काही लाखात पगार घेतात व शिक्षक मात्र कमी पगारावर आयुष्य जात पण वाढत नाही..कटू सत्य
ReplyDeleteहोय, खरं आहे. धन्यवाद.
Deleteवास्तव
ReplyDeleteThanks
Deleteहे सर्व झालं परमनंट जॉब वाल्या साठीच प्रयत्न परंतु खाजगी च्या शिक्षण संस्था काम करणाऱ्या शिक्षकांचे अवस्था एका मुजरापेक्षा पन वाईट आहे. मजूर तरी दिवसभर काम करून संध्याकाळी दिवसाचा पगार घेऊन सुखा सुखी आनंदाने झोपत आहेत. परंतु शिक्षक शाळेमध्ये जातच शिकवतात तरी पण संस्थेच्या लोकांचे मन समाधान होत नाही उलट थोडी जरी चूक झाली तरी संस्थाचालक आई माय वरती शिवीगाळ करून शिक्षकाला हाकलून देतात आणि हेच वास्तविक सध्याच्या परिस्थितीत आहे करायचं तरी काय
ReplyDeleteअगदी खरंय. खाजगी शाळांमधले शिक्षक म्हणजे जणू वेठबिगार झालेत.
Delete