Band of Brothers
जागतिक महायुद्धांमुळे मानवी जीवन अक्षरशः पुरतं ढवळून निघालेलं आहे. महायुद्धांचा अभ्यास करत असताना तो फक्त राजकीय अंगाने करणे इतकेच पुरेसं नसते. बऱ्याचदा आपल्या समोर तो राजकीय अंगानेच मांडला जात आहे. तर मानवी जीवनावर प्रभाव पाडणाऱ्या अनेक गोष्टींच्या अनुषंगानेही या युद्धांचा अभ्यास करावा लागतो. जसे महायुद्धापूर्वी व महायुद्धानंतर विज्ञान, तंत्रज्ञान, मानसशास्त्र, माणसाची विचार करण्याची पद्धत, साहित्य, संगीत, सिनेमा असं एकही क्षेत्र नसेल ज्यावर या महायुद्धांचा परिणाम झाला नसेल. आज शंभर वर्षांनंतरही ही महायुद्धे साहित्य आणि सिनेमांना खाद्य पुरवत आहेत. त्यांचा मानवी जीवनावर काय व कसा परिणाम होतो याचे जवळजवळ तंतोतंत चित्रण करण्यात स्टीवन स्पिलबर्ग आणि टॉम हँग्स ही जोडी यशस्वी झाली आहे. या जोडीचा 'सेविंग प्रायवेट रायान' हा सिनेमा आणि 'बँड ऑफ ब्रदर्स' ही वेब सिरीज ही याची उत्तम उदाहरणं आहेत. दोन्ही महायुद्धाच्या दरम्यान समष्टीवाद आणि मनोमापन या विषयातील अभ्यासांनी शैक्षणिक मानसशास्त्र समृद्ध केलं आहे. प्रायोगिक मानसशास्त्राच्या अनेक अचूक पद्धतीही या महायुद्धांनंतरच तयार झाल्या आहेत. जगाला शांततेचं महत्व खऱ्या अर्थाने पटलं ते या दोन्ही महायुद्धांनंतरच असं म्हटलं तरी ते वावगं ठरू नये. परंतू जगात सतत संशयाची भीती, अविश्वास देखील याच युद्धानंतर जास्त प्रमाणात वाढीस लागला हे ही तितकचं खरं. 'भावनिक बुद्धिमत्ता' नावाच्या गोष्टीचा जगाला विचार करावा लागला तो ही या महायुद्धाचाच परिणाम परिणाम म्हणावा लागेल.
इझी कंपनी ही दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान सेकंड बटालीयन आॅफ ५०६ पॅराशूट इंफ्रंट्री रेजीमेंट या यूएस आर्मी च्या १०१ एअरबाॅर्न डिव्हिजन ची एक तुकडी. या तुकडीचे वेगवेगळ्या देशात स्थलांतर होत असे. जेव्हा ही तुकडी हॉलंड मधून जर्मनीला खदेडून देते तेव्हा हॉलंड वासियांना खूप आनंद होतो. लोक रस्त्यावर येऊन त्यांचा आनंद साजरा करतात. त्या आनंदात हॉलंडच्या काही तरुणी या यूएस आर्मीतल्या जवानांशी लगट करतात. ज्या ज्या तरुणींनी लगट केली आहे त्यांची गावातले लोक भर रस्त्यात विटंबना करतात. हे दृष्य पाहताना मोनिका बेलुकीचा 'मलेना' या सिनेमाची प्रकर्षाने जाणीव होते. मलेना मध्येही अशाच प्रकारे युद्धात लढायला गेलेल्या एका जवानाच्या बायकोची तिला वेश्या समजून गावकऱ्यांकडून विटंबना केली जाते. पाचवा एपिसोड मध्ये एक फार हृदयद्रावक प्रसंग आहे. या वरील यु.एस आर्मीच्या इझी कंपनीचा मेजर रिचर्ड विंटर हा एकदा एका रेल्वेने प्रवास करत असतो. तर काल-परवाच्या त्या रेल्वे प्रवासात आपल्या समोरच्या सीटवर बसलेला एक नवयुवक आज अचानकपणे आपल्या समोर शत्रू पक्षातला एक सैनिक म्हणून जेव्हा उभा राहतो तेव्हा कितीही नाही म्हणत असलं तरी केवळ कर्तव्यापोटी का होईना 'त्याला गोळी घाल!' म्हणून मन सांगतं. युद्ध ऐन भरात असताना सैनिकांना रसद अपुरी पडली, शस्त्रसाठा वेळेत पोहोच झाला नाही तर कितीही चांगली योजना आखली असली तरी ती वाया जाते. सैनिकांच्या मनोबलावर याचा कसा परिणाम होतो, अशावेळी कशी लाजिरवाणी माघार घ्यावी लागते हे फार सुरेख दाखवलं आहे.
युद्धादरम्यान होणाऱ्या या स्थलांतरात काही वेळेस अक्षरशः कातडं भाजून काढणारं ऊन तर काही वेळेस हाडं फोडणारी थंडी असायची. या परस्पर विरुद्ध परिस्थितीत सुद्धा युद्धभूमीवर जवानांना वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर लोकांच्या सेवेला खरच नमस्कार आहे. सैनिकांचा जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असताना शत्रूच्या कधी कोणत्या गोळीवर आपला मृत्यू लिहून येईल हे सांगता येणार नाही. आजूबाजूला इतकी मरणासन्न परिस्थिती असताना या डॉक्टरांना मदत करणाऱ्या नर्सेस स्वतःचं मानसिक संतुलन कशा राखत असतील? या सर्व परिस्थितीत त्या स्वतःचं स्त्रीत्व कसं सांभाळत असतील ? कोडग्या तर होत नसतील ना त्या ही परिस्थिती पाहून? असे एक ना अनेक प्रश्न पडतात. नववा एपिसोड 'व्हाय वी फाईट' तर एखाद्या सदहृदयी व्यक्तीला हलवून टाकेन. हा एपिसोड ज्यू लोकांना मारण्यासाठी तयार केलेल्या छळ छावण्यांवर आहे. बरेच प्रश्न पडतात हे पाहताना. सैन्यत भरती कोण होतं ? तर साधारण सतरा-अठरा वर्षाची मुले. त्यात हे महायुद्ध म्हटल्यावर स्वयंसेवक(volunteers) यांचा सर्वात जास्त भरणा झाला असणार. भले त्यांना प्रशिक्षण दिलं गेलं असेल पण ते प्रशिक्षण हे शारीरिक तंदुरुस्तीच्याच बाबतीत जास्त असणार. या कोवळ्या वयाच्या पोरांनी छळछावण्यांत जेव्हा ज्यूंची मृत शरीर पाहिली असतील तेव्हा ते पाहिल्यावर त्या गोष्टीचा त्यांच्यावर काय परिणाम झाल असेल ? त्यांना मुळात माणसांना अशा प्रकारचीही शिक्षा केली जाते याची कल्पना तरी असेल का? या सैनिकांनी छळछावण्या पाहिल्यावर त्यांच्या मनाची जी घालमेल झाली असेल त्याची फक्त आपण कल्पनाच केलेली बरी. छावण्यामधील लोकांना उपासमारीची इतकी सवय झालेली असते की जर त्यांना पोटभर जेवण दिलं तर त्याचेही विड्रॉल सिम्प्टम्स दिसून येत असत. त्यामुळे इच्छा असूनही त्यांना पोटभर जेवण देता येत नसे.
ज्या ठिकाणी लढाई जिंकली तिथे जिंकलेल्या सैन्याकडून तेथील घरादारांची लुटमार केली जात होती. चांदीची भांडी, चांगली पेंटिंग्स, कलाकुसरीच्या वस्तू दोस्त राष्ट्रांच्या सैनिकांनी आपापल्या घरी पळवून नेल्या होत्या. सैनिक तिथले अनुभव आयुष्यभर विसरु शकले नसतील. तसेच युद्ध संपले म्हणजे सगळीकडे छान छान वातावरण झालं असंही नसतं. युद्ध जिंकणारे हे युद्ध हरणाऱ्यांसोबत कसे वागतात याचा खरा कस हा या काळात लागतो. जिंकणारं राष्ट्र युद्धकैद्यांना सुद्धाशत्रुपक्षाचे का असेना पण ते सैनिकच आहेत, असं समजून वागवतात का हा प्रश्न आहे? आपलं कार्यक्षेत्र कोणतेही असो मानसशास्त्राला डावलून आपल्याला पुढे जाता येणार नाही. मग ते रोजचं जगणं असो वा युद्धभूमी.
अजिंक्य कुलकर्णी
Comments
Post a Comment