गती आणि अवगती, संगतीयोगे
इंग्रजीत एक म्हण आहे ‘मॅन इज नोन बाय द कंपनी ही किप्स’. या म्हणीत ‘मॅन’ हा केवळ पुरुषवाचक शब्द नाहीये, त्यात स्त्रियाही येतात. मुळात येथे ‘मॅन’ हा शब्द समस्त मानवजातीला उद्देशून आलेला आहे. माणसाची संगत ही वरील उक्तीप्रमाणे त्याची ओळख बनत जात असते. त्याच्या संगतीवरून त्याला ‘जज्’ केले जात असते. पण मग ही संगत काय फक्त शरीररूपाने लाभली पाहिजे असं आहे का काही? संगत ही अशरीरीसुद्धा असू शकते. बहुतेक वेळा असतेच. तर संगत ही उत्तम साहित्याची, संगीताची, चित्रपटांची, कलाकृतींचीही असू शकते. या संगतीमुळेच आपण जगण्यातील एकेक इयत्ता पुढे सरकत जात असतो. जगण्याच्या या इयत्तेला आता अजून एक आयाम द्यावाच लागणार आहे. त्या आयामाला डावलून आता आपल्याला पुढे जाता येणार नाही. तो आयाम म्हणजे ‘पर्यावरण’ हा होय. पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी वर उल्लेख केलेल्या विविध क्षेत्रांत आपला अमीट ठसा उमटवलेल्या विविध मान्यवरांशी वेगवेगळ्या काळांत केलेली बातचीत, घेतलेल्या मुलाखतींचे संकलन हे आता पुस्तकरूपाने वाचकांसाठी उपलब्ध आहे. हे पुस्तक म्हणजे ‘विवेकीयांची संगती’ हे होय. ‘विवेकीयांची संगती’ हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहे. प्रत्येक काळात समाजाला सुसंस्कृत करण्यासाठी विचार व कृती देणाऱ्या विवेकी व्यक्तिमत्त्वाची लोकं ही कार्यरत असतात. त्यांच्या विचारातून अंधारात चाचपडणाऱ्या समाजाला नवी उमेद मिळू शकते. त्यासाठी अट एकच- ‘त्यांना मनापासून शांतपणे ऐकणे!’ ही होय. ‘विवेकीयांची संगती’ या पुस्तकातून अतुल देऊळगावकर यांनी मूल्यांचा आग्रह धरणाऱ्या समाजातील विविध स्तरांमधील लोकांना बोलते केले आहे तर काहींची व्यक्तिचित्रणे लिहिली आहे. या पुस्तकात डॉक्टर नॉर्मन बोरलॉग, अमर्त्य सेन, रीचर्ड बकमिंस्टर फुलर, सत्यजित राय, मृणाल सेन, कुमार केतकर, कुमार गंधर्व, लॉरी बेकर, व्यंगचित्रकार केशव - सुरेंद्र, भागवतराव धोंडे व जयंत वैद्य यांच्यावर लेख आहेत.
दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व सोव्हिएत युनियन यांच्यामधील शीतयुद्धाने जगाला विनाशाच्या कडेवर नेऊन उभं केलं होतं. एकीकडे दुष्काळाच्या चटक्याने माणसं, जनावरं होरपळून निघत होती तर दुसरीकडे अण्वस्त्रांवर करण्यात येणाऱ्या खर्चाबाबतीत स्पर्धा चालली होती. याचा उबग येणारे वैज्ञानिक विश्वाला भूकमुक्त करण्यासाठी एकत्र येत होते. विसाव्या शतकात भुकेने जगभरात जवळजवळ आठ कोटी लोकांचा बळी गेला होता. 1942 मध्ये जपानने ब्रह्मदेशावर विजय मिळवला. त्यामुळे ब्रिटिशांचं चांगलंच धाबं दणाणलं. ब्रह्मदेश हा ब्रिटिशांसाठी भाताचे आगार होता. त्याच वेळी भारतात बंगालमध्ये वादळामुळे भाताचे प्रचंड नुकसान झाले होते. व्यापाऱ्यांनी ही संधी साधून भाताची प्रचंड साठेबाजी केली होती. जगभरात गव्हाचे उत्पादन वाढवणं ही त्या वेळी सर्वच राष्ट्रांची गरज बनली होती. अशा वेळी डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी गव्हाच्या नवीन जातीची पैदास करण्यासाठी अनेक देशांमधील गव्हाच्या जातीचे नमुने गोळा करून संकरित गव्हाची निर्मिती केली. जपानमधील ‘नोरिन’सोबत मेक्सिकन व कोलंबियन गव्हाच्या वाणांचे मिळून एक संकरित वाण तयार केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अन्नधान्याची प्रचंड टंचाई भासू लागली. बोरलॉग यांना भारताने पाचारण केले. बोरलॉग यांनी भारतीय शेतीची पाहणी केली. भारताच्या वातावरणास योग्य वाणाची शिफारस केली. स्वामीनाथन यांनी या शिफारशी उचलून धरल्या. हळूहळू भारतात गव्हाचा साठा वाढू लागला. डॉक्टर विल्यम गॉड यांनी त्याला ‘हरित क्रांती’ हे नाव दिले. बोरलॉग हे केवळ हस्तिदंती मनोऱ्यात बसून काम करणारे वैज्ञानिक नव्हते. शेत हीच त्यांच्यासाठी प्रयोगशाळा होती. यासाठी 1970 मध्ये त्यांना शांततेचा ‘नोबेल’ पुरस्कार बहाल करण्यात आला. देऊळगावकर यांनी बोरलॉग यांची घेतलेली मुलाखत या पुस्तकात मुळातून वाचण्यासारखी आहे.
आर्थिक विषमता, गरिबी, जागतिकीकरणाचे लाभ हे मुद्दे जगाच्या मुख्य पटलावर आणण्याचे श्रेय ज्या अर्थतज्ज्ञ व विचारवंताकडे जाते ते म्हणजे अमर्त्य सेन हे होय. रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये सेन यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांचे ते ‘अमर्त्य’ हे नाव स्वतः रवींद्रनाथांनी ठेवले होते. शांतिनिकेतनच्या मुक्त वातावरणाचा सेन यांच्यावर खोलवर प्रभाव पडला. भारतातील ऐश्वर्यसंपन्न विविधता हे आपले सामर्थ्य आहे. विविधतेचा आदर करणारी सहिष्णुता हीच खरी भारतीय संकल्पना आहे, असे विचार शांतिनिकेतनमध्ये रुजवले जात होते. अमर्त्य सेन यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी महाविद्यालयातून जॉन रोबिन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. संपादन केली. सेन यांना व्यक्तिगत आणि सामूहिक निवड हे गूढ उकलण्याची गरज भासू लागली. केनिथ रो यांचा ‘काही परिस्थितीमध्ये लोकशाही पद्धतीने समाजास निवड करता येत नाही. अशा प्रसंगी हुकूमशहा उदयास येतो. आणि समाज त्याची निवड करतो,’ हा सिद्धान्त सेन खोडून काढतात. तो खोडताना सेन म्हणतात की, शिक्षण, आरोग्य, अन्नधान्य या प्राथमिक गरजा पूर्ण होणे ही समाजाची निकड असते. त्यानंतर समाज्याच्या आकांक्षा वरचेवर उन्नत होत जातात. सामाजिक निकड व समाजाचे वर्तन हे असे तार्किक असते. समाजाच्या निवडीचा विचार करून कल्याणकारी अर्थशास्त्र आणि धोरणे ठरवणे आवश्यक आहे. असे झाले तरच लोकशाही प्रगत होऊ शकते. सेन यांचा हा सिद्धान्त आला. सेन यांच्या या सिद्धांताला नामवंत अर्थतज्ज्ञांनी मान्यता दिली. दुष्काळाबद्दल सेन एक सरळ मांडणी करतात. अन्नधान्याची उपलब्धता नसल्यामुळे भूकबळी जात नाही, तर कित्येक वेळा धान्य उपलब्ध असूनही ते विकत घेणे हेच गरिबांना परवडत नाही. स्वातंत्र्याचा अर्थ काय? या प्रश्नाला उत्तर देताना सेन म्हणतात, ‘‘नागरिकांना उपलब्ध होणारी संधी व त्यांच्या क्षमतांमध्ये वृद्धी होणे म्हणजे स्वातंत्र्य होय.’’ ‘द कंट्री ऑफ फर्स्ट बॉईज’ या पुस्तकात सेन असे म्हणतात की, भारतीयांना पहिल्या क्रमांकाचा सिंड्रोम आहे. याला शाळादेखील विशेष खतपाणी घालतात. अतिशय सुमार प्राथमिक शिक्षण यंत्रणेमुळे कोट्यवधी मुले शिक्षणापासून दुरावतात. कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यात हा मोठा अडसर ठरतो. मनुष्यबळाची परवड होणाऱ्या देशाची अर्थव्यवस्था भक्कम होऊ शकत नाही. ‘दारिद्र्य, युद्ध आणि शांतता’ या निबंधात ते असे म्हणतात की, विकास हा केवळ आर्थिक इतक्या संकुचित अर्थाचा असणे अपेक्षित नसून त्यामध्ये संपूर्ण समाजाचा विकास अभिप्रेत आहे.
पृथ्वीवर मानवाला प्रदीर्घ काळ उत्तम प्रतीचे आयुष्य जगता यावे या दृष्टीने विचार करत असताना काही लोकांना काळाच्या फार पुढचे दिसत असते. त्या अग्रस्थानी असणाऱ्या व्यक्तींमध्ये रीचर्ड बकमिंस्टर फुलर यांचे नाव घ्यावे लागेल. ‘‘पृथ्वीवर सर्व मानवजातीला अन्नधान्य पुरवायचे असेल तर सार्वभौम राष्ट्र, आंतरराष्ट्रीय व्यापारयंत्रणा यांच्यात सार्वभौमत्वाला तिलांजली दिली पाहिजे. असं जर झालं नाही तर आपला विनाश अटळ आहे,’’ असे फुलर म्हणत. विसाव्या शतकाच्या आरंभी कलेच्या क्षेत्रात ‘अल्प हेच अधिक आहे’ हा ‘किमानतावाद’ (मिनीमलिझम) दिसू लागला होता. फुलर हे ‘किमानतावादा’चे अग्रणी होते. फुलर हे जैव इंधनाचेदेखील पुरस्कर्ते होते. जैव इंधने आणि अणुऊर्जा यांना क्रमाने हद्दपार करूनही आपल्याला आपली ऊर्जेची गरज भागवता येऊ शकते असे फुलर म्हणत. फुलर यांच्यामुळेच रसायन शास्त्रज्ञांना कार्बन-60, कार्बन-70 या अणूंच्या प्रतिकृती तयार करता आल्या. या यशामुळे ‘नॅनो टेक्नॉलॉजी’ची पायाभरणी झाली होती.
भारतीय सिनेमाला जागतिक क्षितिजावर नेणाऱ्या तसेच भारतीय सिनेमात एक समांतर लाट आणण्याचे काम ज्या त्रिकुटाने केले ते चित्रपट त्रिकुट म्हणजे सत्यजित राय, मृणाल सेन व ऋत्विक घटक हे होय. ‘द स्टेट्समन’ या दैनिकात मभारतीय चित्रपटांचे कुठे चुकतं?’ या विषयावर लिहिलेल्या एका लेखात सत्यजित राय म्हणतात की, भारतीय चित्रपटांतून लखलखाट व चमचमाट यापेक्षा कल्पकता-सर्जनशीलता अधिक दिसली पाहिजे. भारतीय चित्रपटांनी स्वतःची भाषा व शैली, स्वतःची बोली (इडियम) व स्वतःचे प्रतिमाभान (आयकॉनोग्राफी) निर्माण करणे आवश्यक आहे. चित्रपटाला आवश्यक असलेला कच्चा माल जीवन हेच आहे. चित्रपट निर्माण करणाऱ्यांनी डोळे व कान उघडे ठेवले पाहिजेत; असं लिहून जाँ रेन्वा, चार्ली चॅप्लीन, जाँ लुक गोदार्द या परदेशांतील चित्रपटकारांनी कसा वेगळा व किती खोलवर विचार केला होता हे दाखवून दिले होते. जाँ रेन्वा यांच्या चित्रपटाचा जबरदस्त प्रभाव सत्यजित राय यांच्यावर दिसून येतो. रेन्वा यांच्या सोबत काम केल्यामुळे आपल्यात झालेल्या बदलांबद्दल राय म्हणतात की, शहरी वातावरणात वाढलेल्या मला गावाची थोडीशी ओळख ‘शातिनिकेतन’मुळेच झाली होती. परंतु रेन्वांसोबत गेल्यामुळे गावातले व्यवहार मला जवळून न्याहाळता आले. अकिरा कुरोसावा यांचा ‘राशोमान’ सिनेमा पाहून राय म्हणतात की, ती अस्सल जपानी कलाकृती होती. त्यामुळेच ‘पथेर पांचाली’तील अस्सलपणाची खात्री पटली आणि ठरवलं- हे करायलाच पाहिजे.
'भारतीय मनोविश्लेषणाची अधिकारी व्यक्ती’ म्हणून ज्यांची ख्याती आहे ते डॉक्टर सुधीर कक्कर यांचा डॉक्टर एरिक एरिक्सन यांच्याशी परिचय झाल्यावर कक्कर यांनी आपला मोर्चा मानसशास्त्राकडे वळवला. भारतीय व पाश्चात्त्य मनोविश्लेषण पद्धतींमधील भिन्नता स्पष्ट करताना डॉक्टर कक्कर म्हणतात की, पाश्चात्त्यांची ‘स्व’ ही संकल्पना फार बांधीव आहे. त्यांच्या मतानुसार ‘स्व’ हा देहात, मेंदूत आहे. याच्या अलीकडे-पलीकडे काहीही नाही. भारतीयांचा ‘स्व’ हा अतिशय व्यापक आहे. तो केवळ देहापुरता मर्यादित नसून संपूर्ण विश्वाशी निगडित व विश्वाचा एक अंश मानला जातो. भारतीय व्यक्ती कुटुंब, नातेवाईक व जात-धर्म यांच्याशी जन्मापासून सहजगत्या बांधली जाते. इथे वैयक्तिक असे काहीच नसते. फ्रॉईड या मनोविश्लेषकाबद्दलची डॉक्टर कक्कर यांची मते ही मूळ पुस्तकातच वाचणे हे योग्य ठरेल. प्रबोधन, शिक्षण, शहरीकरण व तंत्रज्ञान यांमुळे जातिभेद कमी होतील अशी अपेक्षा होती पण तसं झालेलं काही दिसत नाही. यावर बोलताना डॉक्टर कक्कर म्हणतात की, शिक्षणाकडून अवाजवी अपेक्षा ठेवणे ही चूक होती. शिवाय प्रबोधनाने मन बदलते का? आपल्या मनाचा एक तृतीयांश भाग हा अबोध आहे. तिथे तर्क व विवेक यांचा पूर्ण अभाव असतो. कितीही शिक्षण वा शहरीकरण झाले तरी मानवी मनातील अविवेकीपणा व अतार्किकता हा काही जात नाही. व्यक्तीला एकटे पडण्याची चिंता ही सतावत असते. त्यामुळे ती व्यक्ती धर्म-पंथ-वंश यांच्या कळपात शिरण्याचा प्रयत्न करते. 1984 च्या अमृतसर सुवर्णमंदिरातील लष्करी कारवाईनंतर राजीव गांधींनी डॉक्टर कक्कर यांना शिखांची मानसिकता अवस्था समजून विश्लेषण करण्यास सांगितले होते. डॉक्टर कक्कर यांनी इंदिरा गांधींना शिखांची दूरदर्शनवरून माफी मागण्याचा सल्ला दिला होता. तो इंदिरा गांधींच्या राजकीय सल्लागारांनी धुडकावून लावला. डॉक्टर कक्कर यांच्या ‘कलर्स ऑफ व्हायलन्स’ या पुस्तकात दंगलींचे विच्छेदन केले आहे.
व्यंगचित्रकारांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून आजूबाजूला चाललेल्या घडामोडींवर व्यक्त होताना काय पथ्ये पाळली पाहिजेत याबद्दल ‘द हिंदू’ या वर्तमानपत्रातील व्यंगचित्रकार जोडी किशोर - सुरेंद्र म्हणतात की, संतापावर नियंत्रण ठेवून सौम्यपणे अधिक परिणामकारकता आणता येते. भावनांच्या प्रकटीकरणावर ताबा हा असायलाच हवा, ही गोष्ट स्वत:वर बिंबवत गेलो की चित्र प्रगल्भ होत जातात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात व्यंगचित्रांबद्दल सुरेंद्र म्हणतात की, माध्यमं जरी बदलत गेली असली तरी व्यंगचित्रकारांची गरज ही भासणारच. उलट आता माध्यमं ही जास्त सार्वजनिक झाल्यामुळे व्यंगचित्रांना अधिक पाहिलं जात आहे. आवडलेल्या व्यंगचित्रांचा झपाट्याने प्रसार होत आहे. त्यासाठी कलाकाराने नेहमी अस्वस्थ राहायला हवं.
लोकसत्ता, लोकमत, म.टा, दिव्य मराठी या वर्तमानपत्रांचे माजी संपादक तसेच ‘ग्रंथाली’ चळवळीचे एक अग्रणी म्हणून सगळा महाराष्ट्र ज्यांना ओळखतो ते संपादक, खासदार कुमार केतकर होत. केतकर हे नेहरूविचारांशी जोडले गेले तसेच कॉम्रेड डांगे यांच्या सान्निध्यामुळे त्यांच्यावर मार्क्सवादी विचारांचादेखील संस्कार झाला असला तरी त्यांनी स्वतःला कम्युनिस्ट पक्षाला बांधून घेतले नाही. त्यांच्या संपादकीय कार्यकाळात त्यांनी पराकोटीच्या मतभेदांनाही मांडण्याची संधी दिली. आयआयटीमध्ये शिकत असताना तिथल्या ग्रंथालयामुळे त्यांना ज्ञानाचे विश्वरूप दर्शन झाले. त्यांना वाचनासाठी कोणताही विषय वर्ज्य नव्हता. इतिहास, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण व विज्ञान यांचे ते व्यासंगी आहेत. इंदिरा गांधींच्या राजकीय जीवनाचा पट त्यांनी ‘ज्वालामुखीच्या तोंडावर’ मध्ये सादर केला. केतकर हे विज्ञानाचा पुरस्कार करणारे असले तरी त्यांनी स्वतःला विज्ञानवादी म्हणवून घेतले नाही. त्यांचे विज्ञानविषयक विपुल लेखन ‘बदलते विश्व’ या पुस्तकात वाचायला मिळते. दिनकर गांगल, अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर यांनी ऐंशीच्या दशकात ‘ग्रंथाली’ चळवळ जोरदारपणे चालवली. मराठीतील नवनवीन विषयांवरील पुस्तके अल्प दरात जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे श्रेय ‘ग्रंथाली’ला जाते. परंतु केतकरांच्या या बहुआयामी व विशाल पैलूंची माहिती, जाणीव मराठी वाचकांना नसते. त्यामुळे त्यांचे मूल्यमापन हे केवळ त्यांच्या राजकीय भूमिकांवरून केले जाते जे पूर्णपणे गैर आहे.
अहमदनगर, सोलापूर, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांच्या उजाड टेकड्यांवर आपल्या ‘कुंटूर मार्किंग’ या संकल्पनेच्या माध्यमातून या टेकड्या वनीकरणाखाली ज्यांनी आणल्या ते म्हणजे प्रा. भागवतराव धोंडे सर होत. धोंडेसरांच्या नावावर ‘कंटूर मार्किंग’ शेतीत वाफे तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे ‘सारा यंत्र’ याचे पेटंट आहे. आज शेतकऱ्यांना कल्पनाही नसेल की, त्यांच्या बैल-शेतीसाठी किंवा ट्रॅक्टर-शेतीसाठी जे ‘सारा यंत्र’ ते वापरतात ते प्रा.भागवतराव धोंडेनी शोधलं आहे म्हणून. ‘सारा यंत्र’ हे शेतकऱ्यांनी इतकं आपलंसं केलंय की लोकगीतांप्रमाणे त्याचा जन्मदाता कोण याची माहिती असण्याची गरजही त्यांना वाटत नाही हे प्रा.धोंडेंचं मोठं यश म्हणावे लागेल. धोंडेसरांच्या ‘कंटूर मार्किंग’चा उपयोग करून घेण्यात मात्र महाराष्ट्र फार मागे पडला आहे. मुळात या मार्गाने जाऊन वनीकरण वाढवावे ही कोणत्याच राजकीय पक्षाची इच्छा दिसत नाही. एच.जे. कंपनीचे सर्वेसर्वा प्राध्यापक जयंत वैद्य कंपनीच्या अगोदर वैद्य गुरुजींचा मोटार रिवायंडिंगचा ट्रान्सफॉर्मर, शेतीपंप दुरूस्तीचा मोठा वर्कशॉप होता. वैद्य गुरुजींचा हा वर्कशॉप म्हणजे असंख्य कार्यांचं उगम व केंद्रस्थान होय. शेती, लघुउद्योग, सामाजिक चळवळ, यांकडे गुरुजींचे बारकाईने लक्ष असे. मराठवाड्यात कमी दाबाच्या विजेमुळे शेतीपंप जळून जात असत. या प्रश्नाकडे राजकारणी लोकांचे लक्ष वेधून ही समस्या विधिमंडळात जोरदारपणे मांडण्यासाठी वैद्य गुरुजींनी वेळोवेळी पाठपुरावा केला. आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगवास घडला. तुरुंगात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना राजकीय कैद्यांसारखी वागणूक दिली गेली होती, तर वैद्य गुरुजींवर ‘गुरुजी हे नक्षलवादी आहेत’ असा (गैर)आरोप करून अटक केली गेली होती. लातुरात जर्सी गार्इंच्या पैदाशीला बढावा देणे. शेतीसंबंधी शेतकऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देणे अशी अनेक लोकोपयोगी कामे वैद्य गुरुजींनी केली. प्रा.धोंडे व वैद्य गुरुजी यांच्यावरील लेख हेही वाचनीय झाले आहेत.
जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. आजूबाजूच्या लोकांच्या निरीक्षणातून आणि त्यांच्याबरोबर होणाऱ्या व्यवहारांतून तो शिकत जात असतो. या ज्येष्ठांसोबत केलेल्या सल्लामसलतींमुळे त्याला निर्णय घेण्यास मदत होते. मनाचे दौर्बल्य जाऊन त्याची जागा आत्मविश्वास घेत असतो. कन्फ्यूशियसच्या भाषेत सांगायचे झाले तर, ‘‘मी मासा खायला घालणार नाही तर मासा खाण्यासाठी मी स्वतः मासा कसा पकडायचा हे शिकवेल.’’ लेखात उल्लेखलेल्या व्यक्तींसारखा विद्वानांसोबत जेवढा वेळ आपण घालवू आपले मन तेवढे अधिकाधिक स्वावलंबी, सक्षम बनत जाते. उत्तम संगीत, संगतीमुळे माणूस किती आयामांनी खुलत जातो हे अतुल देऊळगावकर यांच्या या पुस्तकातील प्रत्येक व्यक्तिचित्रणातून दिसून येते. त्यामुळेच हे पुस्तक वाचनीय तर झाले आहेच; शिवाय त्याला एक संदर्भमूल्यही प्राप्त झाले आहे. अशा संगतीचा परिणाम विशद करताना समर्थ रामदास म्हणतात, ‘पुण्यवंता सत्संगती, पापीष्टां असत्संगती, गती आणि अवगती, संगतीयोगे’.
Comments
Post a Comment