साठ-सत्तरच्या दशकानंतर जगाच्या विचाराचा लंबक हा अति उपयुक्ततावाद तसेच भोगवादाकडे झुकलेला दिसतो आहे. गेल्या दोन-तीन दशकात झालेल्या आर्थिक उदारीकरणाने, माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे, साधनांच्या सहज उपलब्धतेमुळे मानवाकडून सातत्याने पृथ्वीला ओरबाडणे सुरूच आहे. पृथ्वी या शब्दाचा 'धैर्यशील' असाही एक अर्थ आहे. पण मानवाच्या औद्योगिक, व्यापार, दळणवळणामुळे प्रदूषण (जल, वायू, ध्वनी)कमालीच्या गतीने वाढत आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या जीवघेण्या प्रदूषणाबद्दल राजकीय नेत्यांची समज अतिशय तोकडी आहे. सर्वसामान्य नागरिकांना या समस्येचे गांभीर्य त्यांना सहज समजेल अशा सोप्या शब्दात कोणी सांगत नाही. या कारणांमुळे प्रदूषणाबद्दल ज्या गांभीर्याने जनचळवळ जगभर उभी राहायला हवी आहे तिला मर्यादा येत आहेत. पर्यावरणाच्या या धोक्याच्या घंटेचा हा घंटानाद मराठी भाषिकांना समजावण्याचा प्रयत्न गेल्या तीन दशकांपासून अतुल देऊळगावकर करत आहेत. हवामान बदल, पर्यावरण, निसर्ग, जैवविविधता या विषयावर सातत्यपूर्ण व अभ्यासू लिखाण ते करत आहेत आलेले आहेत. त्यांचं ताजं पुस्तक म्हणजे 'पृथ्वीचे आख्यान' हे राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेलं आहे.
सर्वप्रथम जगासमोर हवामान बदल ही संकल्पना १९८८ साली आली. यावर्षी हवामान बदलासंबंधी पहिली जागतिक शिखर परिषद झाली. मानवी हस्तक्षेपामुळे जगाचे तापमान एक अंश सेल्सिअसने वाढते आहे. सगळ्यात आगोदर हवामान बदल या संकल्पनेकडे जगाचे लक्ष वेधून घेण्यास कारणीभूत ठरले ते राचेल कार्सन बाईंचे 'सायलेंट स्प्रिंग' हे पुस्तक. शास्त्रज्ञांचं बखोट धरून त्यांना हवामान बदल या विषयाचा अभ्यास करायला या पुस्तकाने लावलं असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. १९९२ साली ब्राझीलच्या रिओ शहरामध्ये पहिली वसुंधरा परिषद झाली. जगभर हवामानासंबंधी अशा विविध परिषदा होतच असतात. या परिषदांमधून कर्ब उत्सर्जन कमी करण्याचे करारही होतात खरे पण त्याची कडक अंमलबजावणी मात्र होत नाही. कर्ब उत्सर्जन कमी करण्यासाठी असे बदल करायलाच हवे. या संबंधित कोणताही ठोस कृती आराखडा या परिषदांतून पुढे येताना दिसत नाही. आज बिघडलेलं हवामान हा काही केवळ वर्तमान काळातील प्रदूषणाचा परिणाम नसून तो भूतकाळातील प्रदूषणाचा परिणाम आहे. इतर देशांमध्ये पर्यावरण विषयक जागरुकता जशी वाढू लागली तशी ती भारतातही वाढत होती. भारतातही विविध पर्यावरण विषयक चळवळी चिपको, कित्तीको, सायलेंट व्हॅली, जोर धरत होत्या. विविध अभ्यासक, पर्यावरण विषयक सामाजिक कार्यकर्ते, या चळवळींना बळ देत होते. अर्थतज्ञ सर निकोलस स्टर्न म्हणतात की," महायुद्ध नंतरची आलेली मंदी फिकी वाटावी इतकी उलथापालथ या हवामान बदलामुळे होणार आहे. येणाऱ्या दोन दशकात आपण कसे वागतो यावर आपले भविष्य ठरणार आहे."

हवामान बदलामुळे सार्वजनिक आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. गरीब व श्रीमंत यांना उपलब्ध होत असणाऱ्या आरोग्य सुविधांमधील अंतर वाढत असून हे राष्ट्रांच्या आरोग्यासाठी घातक आहे. असमान वित्तवाटपामुळे समाजात आरोग्यसुविधा पुरवण्यामध्ये भेदाभेद होत आहे. "आपल्याला पुढे येणाऱ्या पिढ्यांच्या वाटेला निसर्ग येऊ द्यायचा आहे की नाही? नसेल, तर मग येणार्या पिढ्यांचे आपण शत्रूच नाही का झालो? असा विचार आपण कधी करणार आहोत?" हा बदल आपल्याला विलक्षण त्रासदायक ठरणार आहे. आपल्या मनावर निसर्गापासून वेगळे होण्याचे खोलवर परिणाम होऊ लागले आहेत. पर्यावरण विनाशामुळे आपल्या अज्ञ मनाचा (सबकॉन्शस माइंड) विकास थांबला आहे. यामुळे एक सार्वजनिक भयगंड तयार होऊ पाहत आहे. आज कित्येक मानसोपचार तज्ञ सुंदर बागा निसर्गसंपन्न जागांवर फिरायला जाण्याचा सल्ला सांगतात तो याचसाठी. जुन्या वस्तूंचा पुनर्वापर, अत्यल्प कार्बन व पर्यावरणीय गुण पाहून वस्तूंचे पर्यावरणीय निकष ठरवावे लागेल. निकोलस स्टर्न म्हणतात की," एक टन कार्बन डाय-ऑक्साइड मुळे अर्थव्यवस्थेची ८५ डॉलरची हानी होते. एक टन कर्ब उत्सर्जन कमी करण्यासाठी २५ डाॅलरहूनही कमी खर्च लागेल. संपूर्ण जगाने कर्ब उत्सर्जन कमी करण्याचे ठरविल्यास जागतिक अर्थव्यवस्थेस अडीच लाख कोटी डॉलरचा नफा होऊ शकले." जगातील अति श्रीमंतांच्या विमान प्रवासामुळे सुमारे दहा पट अधिक कर्ब उत्सर्जन होते आहे. बिल गेट्स यांच्यासारख्या धनाड्यांच्या एकट्याने केलेल्या विमान प्रवासामुळे अठराशे टन कर्ब उत्सर्जन होते. भारतात जंगलतोडीमुळे मागील पाच वर्षात एक लाख वीस हजार हेक्टर जंगल नष्ट झाले आहे असा अहवाल 'वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट' ने नासाच्या उपग्रहावरून घेतलेल्या छायाचित्रे पाहून म्हटले आहे.
केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाने २०१६ साली 'हवेच्या प्रदूषणामुळे होणारे मृत्यू व आजार' यावर एक अहवाल सादर केला,तो 'द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ' या नियतकालिकात प्रसिद्ध झाला होता. त्यात म्हटले की," भारतात प्रत्येक आठवा मृत्यू हा विषारी हवेमुळे होतो." हृदय विकाराचा, मज्जासंस्थेचा झटका, कर्करोग, फुफुसाचे विकार, श्वसनाचे आजार याला ही प्रदूषित हवा जबाबदार आहे. महाराष्ट्रातील ४९ नद्या या अतिगलिच्छ असल्याचे केंद्रीय प्रदूषण मंडळाचे निरीक्षण आहे. नाशिक मधून गोदावरीत, कोल्हापुरातून पंचगंगेत, अहमदनगर मधून सीना नदीत, मुंबईतून समुद्रात लाखो लिटर सांडपाणी सोडले जाते. महाराष्ट्रातील कोणत्याही सरकारच्या काळात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. कोणत्याही सरकारच्या काळात त्यांच्या अग्रक्रमात आपत्ती व्यवस्थापनाला अग्रक्रम दिला गेला नाही. भारताला शेकडो किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. अतिवृष्टीमुळे जंगलं जंगलतोडीमुळे सुपीक माती वाहून जाते. इतर वृक्षांच्या मुळव्यवस्था नष्ट होते. मग हे सगळं येतो कुठून? सदानंद देशमुख यांच्या 'तहान' कादंबरीत म्हटल्याप्रमाणे, "व्यक्तिवादाने जोमाने प्रवेश केल्यानंतर उपभोक्तावाद आला. त्याचवेळी माणसातील कणव सहानुभूती निघून चालली. जमिनीतला आणि मनातला जिव्हाळा अटत चालला आहे." माइक ह्युम म्हणतात,"सामान्य व्यक्तीला पर्यावरण विनाश, हवामान बदल या समस्या आपल्या वाटतच नाही. उलट त्या दूरवरच्या अनाठायी व क्षुल्लक वाटू लागतात. याचं कारण व्यक्तीच्या स्वभावात स्थायीभावात दडलेलं आहे. आपल्या स्वभावानुसार मनामधील आयुष्याविषयीच्या कल्पना, मूल्य व उपदेश ठरत असतात. आपलं वर्तन व कृती याचं मूळ तिथं खोलवर रुजलेलं असतं. वाढतं कर्ब उत्सर्जन व त्याचे परिणाम, हवेचे प्रदूषण, पिण्यासाठी स्वच्छ पाणी याविषयी लोक आग्रही नसल्यामुळे या समस्या राजकीय पटलावर येत नाहीत. परिणामी हवामान बदल हे विषय राजकीय अनास्थेचे व उदासीनतेचे ठरतात. यामुळे पर्यावरण विषयाची लोकांना समजेल अशी मांडणी कशी करावी ही मोठी समस्या सगळीकडेच भेडसावते आहे."
इस्पेन स्टोकन्स असं म्हणतात की,"आपल्या आवडीनिवडी व जीवनशैलीत बदल अनिवार्य आहे, असं सुचविणारा विचारच नकोसा वाटतो. मनामध्ये तयार होणारी भीती व अपराधगंड ही समस्या नाकारताच दूर होतात. त्यामुळे आपण स्वतःला या विचारांपासून 'सुरक्षित अंतरावर' ठेवू लागतो. हवामान बदल व पर्यावरण विनाश हे अस्वस्थ करणारे विषय असल्यामुळे अनेक वैज्ञानिक पुरावे थेट मिळून सुद्धा ते आपल्या मनातील धारणांच्या विरुद्ध असल्यामुळे आपण त्यांचा स्वीकार करत नाही." आपल्या सारख्या सामान्य लोकांच्या दैनंदिन सवयी जरा बदलल्या तर सुद्धा खूप फरक पडू शकतो. दहा किलोमीटर अंतर कापण्यासाठी सायकल वापरली तर २.३ किलो कर्ब वायू रोखू शकतो. रोज दोन तास टीव्ही पहायचा कमी केला तर ०.१२ किलो कर्बवायू कमी उत्सर्जित होईल. एक महिनाभर मांसाहार नाही केला तर २० किलो कर्ब वायूचे उत्सर्जन वाचवता येईल. आपला आहार आणि कर्ब उत्सर्जन व जगाची तापमान वाढ यांचा संबंध थेट व सरळ असल्याने प्रत्येकाने आहारात विचारपूर्वक बदल करणं आवश्यक झालं आहे. 'लॅन्सेट'ने फेब्रुवारी २०२० च्या अंकात म्हटलं आहे की," जगातील श्रीमंतांनी मांसाहार व दुग्धजन्य खाद्यपदार्थाचे सेवन कमी करून शाकाहाराचा प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. तसं झाल्यास कर्ब उत्सर्जनात येत्या दहा वर्षात साठ टक्के कपात करता येऊ शकते."

हवामान बदलाचा गेल्या दोन दशकापासून भारतातील कृषी क्षेत्राला चांगलाच धोका जाणवतो आहे. हवामान बदलामुळे भारतातील विविध भागांना उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागत आहे, असा निष्कर्ष आयपीसीसी या हवामानबदलाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने म्हटलं आहे. शेतीवर याचा विपरीत परिणाम होऊन पावसाळ्यात अतिवृष्टी आणि महापूर किंवा दुष्काळ, हिवाळ्यात ढगाळ हवामान, कडक थंडी, अवकाळी पाऊस, गारपीट होणे वगैरे समस्यांना सामोरं जावं लागत आहे. या सगळ्यांचा हंगामातील पिक आणि पीक पद्धतीवर विपरित परिणाम होत आहे. हवामान बदलाचा पिकांच्या वाढीवर परिणाम होतो. शेती आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्या रोजगारावर प्रतिकूल परिणाम होतो. पिकांच्या फळधारणा यावर परिणाम होतो. अतिवृष्टीमुळे शेतात साचून राहिलेल्या पाण्यामुळे जमिनीचा सामू बदलतो. पिकांचा मोहर गळून पडतो. फळ तोडणीच्या वेळी पाऊस झाला तर मोठे नुकसान होते. म्हणून हवामान बदल हा विषय केवळ बुद्धिवंत व्यक्तीं पुरता मर्यादित न ठेवता तुम्हा आम्हा सामान्य व्यक्तींना, कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना समजून घ्यावाच लागेल, त्यावर विचार करून उपाययोजना कराव्या लागतील. हे प्रश्न समजून घेण्यासाठी अतुल देऊळगावकर यांची हे 'पृथ्वीचे आख्यान' एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून भूमिका नक्कीच बजावेल.
पुस्तक - पृथ्वीचे आख्यान
लेखक- अतुल देऊळगावकर
प्रकाशन - राजहंस
पृष्ठे - २१५
किंमत - २५०
अजिंक्य कुलकर्णी
१० एप्रिल २०२२ च्या दै. पुण्यनगरीत प्रकाशित
Comments
Post a Comment