उषा प्रियंवदा यांच्या कादंबऱ्यांमधील स्त्री
पंचायत सिझन -२ पाहिली असेल तर त्यात रघुवीर यादव म्हणजेच पंचायत चे प्रधानजी यांच्यावर चित्रित केलेल्या एका दृष्यामधला हा खालील फोटो सर्वांनी पाहिला असेलच. तर, प्रधानजींच्या हातात आहे हिन्दी मधील जेष्ठ लेखिका उषा प्रियंवदा यांची "पचपन खंबे लाल दीवारें" ही कादंबरी. गेल्या वर्षी उषा प्रियंवदा यांच्या बऱ्याच कथा ऐकल्या होत्या. त्यांच्या कादंबऱ्याही वाचायला सुरुवात करायची होती पण, नोव्हेंबर २०२१च्या शेवटी मन्नू भंडांरींचे निधन झाले. मन्नूजींची पुस्तके पुन्हा वाचण्यात गर्क झाल्याने उषाजींना वाचायचं राहून गेलं होतं. 'पंचायत' मुळे ते पुन्हा उफाळून आलं.
उषाजींच्या "पचपन खंबे लाल दीवारे" आणि "रुकोगी नहीं राधीका?" या दोन्ही कादंबऱ्या ऐकल्या. त्यातली 'पचपन खंबे...' ही खूपच आवडली. "रुकोगी नहीं राधीका?" या कादंबरीचा मला शेंडा बुडूख असं काहीच हाती लागलं नाही. 'रुकोगी नही..' मधीली राधीका असेल किंवा 'पचपन खंबे...' मधली सुषमा, ही जी या दोन्ही कादंबऱ्यांमधली मुख्य स्त्री पात्र आहेत ती उत्तम शिकलेली आहेत. या दोघी स्वतःची मतं स्वतः ठरवणाऱ्या आहेत. वेळ प्रसंगी घरच्या लोकांनाही धुडकावून लावत ह्या दोघींनी आपल्या स्वप्नांचा पाठलाग केलेला आहे. करिअरच्या बाबतीत या दोघीही यशस्वी आहेत. सुषमाकडे काॅलेज प्राध्यापिकेच्या जबाबदारी सोबतच हाॅस्टेलच्या रेक्टरची सुद्धा जबाबदारी असते. परंतू घरगुती जबाबदाऱ्या पार पाडत असताना या दोघींच्या वयाची तिशी पस्तिशी कधी ओलांडून जाते ते त्यांचं त्यांनाही कळत नाही. विवाह झालेला नसतो. वयाच्या या टप्प्यावर या दोघींच्या आयुष्यात आयुष्यभराचा जोडीदार नसण्याची एक पोकळी असते. या जोडीदार नसण्याच्या गोष्टींमुळे या दोघींचे आयुष्य कुरतडत असतं. आपल्या आयुष्यात आपल्याला साधं प्रेमही करायला मिळालं नाही! कुणी आपल्यावर प्रेम करत असेल तर त्याच्याशी आयुष्यभराची गाठ बांधण्याची या दोघींची हिम्मत होत नाही. या दोघींवर प्रेम करणारे तरुण हे काही वाईट नाहीये ना या दोघी वाईट आहेत. परिस्थितीमुळे, कौटुंबिक कटू अनुभवांमुळे या दोघींनाही विवाहाचा निर्णय घेता येत नसतो. एक वेगळीच कश्मकश अनुभवायला मिळते या कादंबऱ्यांमध्ये. मला आणि राधीका या दोन्ही स्त्रिया या माझ्या आजच्या काळाच्या प्रतिनिधी वाटतात. कालजयी साहित्य म्हणतात ते हे असं असतं. ज्या साहित्याला काळाच्याही पुढचा विचार करता येतो ते उत्तम साहित्य. कोणत्याही काळात ते वाचलं तरी ते त्या काळाशी सुसंगत वाटतं. उषाजींनी हे तीस चाळीस वर्षापूर्वी लिहून ठेवलय. असं काळाच्या पुढचं पाहता येण्यासाठी आपली स्वतःची अशी एक 'उंची' लागते. आज तरी वेगळं काय सुरु आहे समाजात? आज आपली लग्नसंस्था ही बेदम गंडली आहे. लग्नाला आलेली मुलं/मुली लग्न झाल्यानंतर ते टिकेल का? या एकाच भीतीच्या सावटाखाली आहेत. आईवडिलांच्या पिढीचा आणि बोहल्यावर चढू पाहणाऱ्या पिढीचा काही संवादच नाहीये.
या दोन्ही कादंबऱ्या आपल्या समाजातील अशा एका वर्गाचे प्रतिनिधित्व करतात ज्यांचं भौतिक जीवन समृद्ध आहे तरी पण ते सुखी नाहीयेत. तसेच त्यात अशीही पात्रे पहायला मिळातात जी गरिबीतही स्वतःला समाधानी मानतात. सुषमा, राधीका ह्या समाजातील त्या सशक्त स्त्रियांचं प्रतिनिधित्व करतात ज्या स्वतंत्र आहेत. वेळ प्रसंगी कुटुंबातील सदस्यां विरुद्ध बंडखोरी करायलाही मागे पाहत नाही. आपल्याला आवडतो त्या तरुणासोबत सिनेमाला जायला, त्याचा हात हातात घेऊन रस्तावरुन फिरत असताना सुषमाचं तिचं प्राध्यापक असणं आडवं येत नाही. राधीका तिला आवडणाऱ्या पत्रकारासोबत विदेशात निघून जाते. अशा determined स्त्रियांना वाचायचं असेल तर या दोन कादंबऱ्या चांगला पर्याय आहे.
अजिंक्य कुलकर्णी
व्वा, छान
ReplyDelete