कॅमेऱ्याच्या लेन्स मधून जीवन

आपण दिग्दर्शक व्हावं ही जाणीव स्टिव्हन स्पिलबर्ग यांना अगदी लहानपणीच झाली होती जेव्हा, त्यांच्या वडिलांनी (अरनाॅल्ड) स्टिव्हन यांच्या हातात एक कॅमेरा दिला होता. स्टिव्हन लहानपणापासूनच त्या कॅमेऱ्याच्या सहाय्याने छोट्या छोट्या फिल्म्स् तयार करु लागले.  रिचर्ड ड्रेफुल (जॉज मधला अभिनेता) म्हणतात की,"जॉजचं शूटिंग सुरू झालं होतं २ मे ला आणि मला ३ मे ला घेतलं. त्यावेळी त्यांच्याकडे ना कोणता शार्क होता ना कोणती पटकथा ना कोणताही अभिनेता/अभिनेत्री होती." स्पीलबर्ग म्हणतात की,"जाॅजच्या पटकथेला कधीच पूर्णविराम दिलेला नव्हता. शूटिंगच्या बारा तास आधीही कधी कधी पटकथेत बदल केले जात असे."  दिग्दर्शक म्हणून हे मला खूप घाबरवणारं असायचं की, "माझ्या हातात आत्ता जी पटकथा आहे ती काल रात्री जी होती ती नाहीये, त्यामुळे रात्री जी पटकथा होती ती सकाळी शूटिंगच्या वेळेस असेलच असं नाही." स्टुडिओत एक मोठं कृत्रिम तळं असताना देखील स्पिलबर्ग यांनी जाॅजचं शूटिंग मात्र प्रत्यक्ष महासागरात केलं. जमिनीवर शूटिंग करणे आणि समुद्रावर शूटिंग करणे यात मोठा फरक असतो. समुद्रावरची आव्हाने ही वेगळी असतात. जाॅजच्या शूटिंगच्या बाबतीत स्पिलबर्ग म्हणतात की," त्यावेळी मला समुद्राच्या भरती ओहटीचं गणित माहीत नव्हतं. पाण्याचा प्रवाह, समुद्री वारे कसे वाहतात? दिवसभर बदलणाऱ्या वेळेनुसार आकाशाचा रंग बदलतो. त्यामुळे समुद्राच्या पाण्याचाही रंग बदलतो हेही माहीत नसायचं. या सगळ्या गोष्टींचा शूटिंगवर परिणाम व्हायचा. जाॅजमधल्या एका भीतीदायक प्रसंगाचं शूटिंग किनाऱ्यापासून १२ मैल आत समुद्रावर करायचं होतं. जास्तीतजास्त परिणामकारक होण्यासाठी हा खटाटोप होता. डेव्हिड एडिलसन हे समिक्षक जाॅज या सिनेमाबद्दल बोलताना म्हणतात की,"जाॅज मध्ये प्रत्येकवेळी बोटींच्या आजूबाजूला शार्क आहे पण शार्क प्रत्येकवेळी दाखवला गेला नाहीये. केवळ पाण्याच्या हलण्यानेही आपल्याला शार्क असल्याची जाणीव होते. त्यामुळे पडद्यावर एकाचवेळी रहस्य आणि भिती निर्माण करण्यात जाॅज कमालीचा यशस्वी होतो. प्रत्येक दिग्दर्शक याच प्रकारची भिती निर्माण करण्यासाठी धडपडत असतो." 


  स्पिलबर्ग हे शालेय अभ्यासात फार हुशार वगैरे नव्हते. स्वभावाने बुजरे होते. फारसा मित्रपरिवारही नव्हता. शरीराने फार सुदृढ होते असंही नाही. एकटे असायचे. त्यांचा कॅमेरा हीच त्यांची लेखनी होती. पुढे दिग्दर्शक म्हणून युनिव्हर्सल स्टुडिओने जेव्हा त्यांना बोलावले तेव्हा त्यांना समजून चुकलं होतं की त्यांना जे पडद्यावर दाखवायचं आहे ते प्रथम स्टुडिओ एक्झिक्युटिव्ह यांच्या गळी उतरावे लागणार आहे. त्यामुळे स्टुडिओ एक्झिक्युटिव्ह हेच आपले पहिले प्रेक्षक आहेत. युनिव्हर्सलच्या स्टुडिओत गेल्यावर तिथले एक्झिक्युटिव्ह स्पिलबर्ग यांना म्हणाले की, "मी तुमचे सिनेमे पाहिलेले आहेत, युनिव्हर्सल स्टुडिओ साठी मला तुम्हाला सात चित्रटासाठी करारबद्ध करायचे आहे. जर तुम्ही आमच्यासोबत करारबद्ध होण्यास तयार असाल तर मी तुम्हाला शब्द देतो की, यशापेक्षाही जास्त अपयशात मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील!" आणि त्यांनी तो शब्द पाळला देखील. निर्माते स्टिव्हन बॅचको म्हणतात की, "स्पिलबर्ग यांच्या मेंदूतच असं काही आहे जे जाणिवेच्या पातळीवर कोणतीही प्रक्रिया न करता आपोआप शब्दांना पडद्यावर चित्ररुप प्राप्त करून देते." याचं उदाहरण म्हणजे 'ड्युअल' या सिनेमातील ट्रक ड्राईव्हर. ड्युअल मध्ये संपूर्ण सिनेमात कुठेही प्रेक्षकांना ट्रक ड्राईव्हरचे दर्शन होत नाही पण, तरीही त्याचे अस्तित्व आपल्याला क्षणोक्षणी जाणवत राहते. प्रेक्षकांच्या मनात भिती निर्माण करत राहते. ड्युअलची प्रेरणा स्पिलबर्ग यांच्या लहानपणात दडलेली आहे. स्पिलबर्ग यांच्या लहानपणी त्यांच्या मनात सतत एक अनामिक भिती असे. स्पिलबर्ग म्हणतात की, "तो ट्रक म्हणजे ती भिती आहे व ती कार म्हणजे मी आहे. ट्रक कारचा जसा पाठलाग करते तसं भीतीनेही मी लहान असताना माझा पाठलाग केला आहे. ड्युअलचा शेवट पाहिल्यास लक्षात येतं की स्पिलबर्ग यांनी दरीत कोसळणारा त्या ट्रकचा स्पोट होताना दाखवलेला नाही. जे अधिकतर वास्तवाला धरून आहे. हे सिनेमांनीच लोकांमध्ये रुजवलय की दरीत मोठं वाहन कोसळलं म्हणजे त्याचा स्पोट हा झालाच पाहिजे. जणू स्पोटाशिवाय प्रेक्षकांना समजणारच नाही की त्या अपघातात माणसं ठार झाली आहेत ते!
    सिनेमा हा भावनेला जास्त साद घालणारा असावा असा एक प्रवाद आहे. पण विज्ञानपट असेल तर विज्ञानाशी फारकत घेऊन चालणार नाही. मात्र 'एक्स्ट्रा टेरेस्ट्रिअल (ET)' मध्ये स्पिलबर्ग यांनी विज्ञान आणि भावना यांचा सुरेख संगम जमवला आहे. ET मध्ये जेव्हा परग्रहावरील यान जेव्हा पृथ्वीवर येते तेव्हा त्या परग्रहवासींसोबत संवाद साधायचा कसा ? याचे वैज्ञानिक उत्तर आहे गणिती भाषेने! पण पडद्यावरील गणिती भाषा ही सर्वांनाच समजेल असं नाही. म्हणून ध्वनी आणि प्रकाश यांचा मिलाफ तिथे वापरलेला दिसतो. ध्वनी सर्वांना समजतो. स्पिलबर्ग त्यांच्या वडिलांबद्दल अपार कारूण्याने बोलतात. ते म्हणतात की," वडील म्हणून ते माझ्याबाबतीत कुठेही कमी पडलेले नाहीत. उलट मीच दिग्दर्शन व्हायचं म्हणून घराबाहेर पडलो होतो." कुटुंब व्यवस्थेचे महत्व जरा उशीरा उमगल्यामुळेही असं वाटलं असेल कदाचित स्पिलबर्ग यांना म्हणूनच अमिताभ बच्चन यांनी स्पिलबर्ग यांची घेतलेल्या मुलाखतीत ते म्हणतात की, "मला बाॅलिवूड सिनेमांमधली एक गोष्ट फार आवडते ती म्हणजे बाॅलिवूड सिनेमातल्या हिरोला कुटुंब असते. आईवडील, भाऊ -बहिण अशी नाती असतात. हाॅलिवूड मध्ये हे खूप कमी पहायला मिळतं." लहान मुलं व तरुणांकडून काम करवून घेण्याचे मोठे कसब स्पिलबर्ग यांच्याकडे आहे. शिंडलर्स लिस्ट हा सिनेमा दिग्दर्शित करण्याआगोदर स्पिलबर्ग यांना आउश्वित्झ छळछावणीबद्दल फार कल्पना नव्हती. म्हणून हा सिनेमा मूळ जागी जाऊनच चित्रित करावा असं त्यांना वाटलं. पण पोलंड मधील आउश्वित्झला गेल्यावर छावणी पाहून सर्व टीमच गोठून गेली होती. शिंडलर हा तसा व्यापारी. ललना, मदिरेत रममान असणारा. त्याने तब्बल अकराशेच्या वर ज्यू लोकांचे प्राण वाचवले. व्यापारी वृत्तीच्या शिंडलरला आपला जीव धोक्यात घालून हे काम का केलं असेल? स्पिलबर्ग यांना वाटले की याचं उत्तर आपण देण्यापेक्षा प्रेक्षकांनाच ते ठरवू द्यावं. शिंडलर्स लिस्ट हा सिनेमा छाया प्रकाशाचा प्रभावीपणे कसा वापर करता येतो याचा उत्तम नमुना आहे. त्यातले क्लोज-अप पाहिल्यावर तर हे अधिकच लक्षात येतं. शिंडलर्स लिस्ट मधला शिंडलर साकारताना माझी फार चडफड होत असे असं लिआम नेसन हा अभिनेता म्हणतो. कारण स्पिलबर्ग त्यांना इतक्या सुचना करत की, सिगारेक कशी पकडायची, सिगारेटचा धूर हवेत कसा सोडायचा, त्याची वलये कशी तयार करायची इ. लिआम नेसन यांना वाटायचे की,"मी काय स्पिलबर्गच्या हातातला बाहुला आहे का? मला माझं काही आहे की नाही? मला माझी काही मतं आहे की नाही?" पण सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. शिंडलर्स लिस्टचं यश हा स्पिलबर्ग यांच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा टप्पा आहे. त्यांना वाटले की आपण या सिनेनातून मिळालेला पैसा नको वापरायला. तो परत देऊन टाकायला हवा. म्हणून त्यांनी शॅओ(Shoah) फाउंडेशनची स्थापना केली. हे करण्यामागे स्पिलबर्ग यांचा उद्देश होता की, लोकांनी हा इतिहास विसरता कामा नये. १९९३ च्या आॅस्करची सर्वोत्तम चित्रपट आणि सर्वोत्तम दिग्दर्शकाची बाहुली शिंडलर्स लिस्टला न मिळते तरच नवल. 

  ज्युरासीक पार्क या सिनेमातून संगणकाद्वारे तयार केलेल्या स्पेशल इफेक्ट या तंत्राचा वापर सुरु झाला. रंगसंगती आणि तंत्रज्ञान याचा सुयोग्य वापर आपल्याला स्पिलबर्ग यांच्या सिनेमात पहायला मिळतो. जसे शिंडलर्स लिस्ट हा सिनेमा कृष्णधवल असूनही त्यातली लहान मुलगी लाल कोट मध्ये दाखवणे, डायनासोर, वाॅर आॅफ द वर्ल्ड. पण या कोणत्याही सिनेमात तंत्रज्ञानाला भावनांवर वरचढ होऊ दिलेले पहायला मिळत नाही. भावना आणि तंत्रज्ञानाचा हा समन्वय साधनं हे तसं अवघड आहे. 'सेव्हिंग प्रायव्हेट रायान' मधील युद्ध प्रसंगी सैनिकांच्या चेहऱ्यावर हवे असलेले कुतूहलमिश्रित भीतीचे भाव दिसावे म्हणून आपण ओहामो च्या समुद्रकिनारी चाललो आहोत हे सिनेमातील कोणत्याही अभिनेत्याला स्पिलबर्ग यांनी कळू दिले नव्हते. स्पिलबर्ग आणि त्यांचे वडील यांच्यात जरा तणाव आला होता. स्पिलबर्ग यांनी जेव्हा म्हणाले की सेव्हिंग प्रायव्हेट रायान हा मी माझ्या वडिलांसाठीच बनवला आहे. जे जाहीर वाक्य ऐकल्यानंतरच या बाप-लेकाच्या नात्यातला तणाव पुढे कमी झाला. स्पिलबर्ग हे काळासोबत उत्क्रांत होत गेलेले दिग्दर्शक आहेत. आमिस्टाड, लिंकन आणि ब्रिजेस आॅफ स्पाइज हे तीन सिनेमे कायद्याचं राज्य या संकल्पनेवर आधारित आहेत. स्पिलबर्ग हे माणसांच्या कथा सांगण्यास फार उत्सुक असलेले दिग्दर्शक आहेत. माणसांच्या कथा म्हटल्यावर त्यात मानसांकडून घडणाऱ्या चुका आल्या, त्या सुधारणे आलं. स्पिलबर्ग यांनी माणसांना सुपरहिरो म्हणून पडद्यावर कधी दाखवले नाही. त्यांना माणूस म्हणूनच दाखवले. 

टीप:- स्टीव्हन स्पिलबर्ग आज (१८/१२/२०२२) रोजी वयाची पंच्चाहत्तरी पूर्ण करताहेत त्यानिमित्ताने लिहिलेला हा लेख.

अजिंक्य कुलकर्णी

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मनुष्य गौरव दिन!

रेणुका देवी यात्रोत्सव - अस्तगाव

विज्ञानव्रती एच.सी.वर्मा