Spelling Bee

    अमेरिकेत दहा ते पंधरा वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना एका स्पर्धेचं प्रचंड आकर्षक असतं अन् ती स्पर्धा म्हणजे 'स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी.' ही फक्त 'स्पेलिंग बी' म्हणूनही ओळखली जाते. अमेरिकेत सध्या या स्पर्धेत भारतीय वंशाची मुलं, मुली हे प्रचंड यश मिळवत आहेत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्यांना असं वाटत होतं की, "आपल्या कामाला इथे भारतात प्रतिष्ठा नाही किंवा म्हणावा असा वाव मिळत नाही किंवा पैसा मिळत नाही" त्या मंडळींनी भारत सोडून अमेरिकेत स्थाईक होण्याचा धोका पत्करला होता. ह्या पहिल्या पिढीचा काळ हा अमेरिकेत पाय रोवण्यातच गेला. दुसऱ्या पिढीलाही स्थिरस्थावर होण्यात बराच काळ गेला. पण गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून येत असलेल्या तिसऱ्या पिढीला मात्र चांगलेच सुगीचे दिवस आहेत. ह्या पिढीची म्हणजेच नव्वोद्दोत्तर पिढीची मुलं हे मात्र या स्पर्धेत कमालीचं यश मिळवत आहेत. लिंडन जाॅन्सन अमेरिकेचे अध्यक्ष असताना ३ आॅक्टो १९६५ साली त्यांनी एक बील पास केलं ज्याला 'नागरिकत्व कायदा १९६५' असे म्हणतात. या कायद्यात असं म्हटलं होतं की, "ज्यांना अमेरिकेत स्थाईक होण्याची इच्छा आहे. त्यांना त्यांच्या कौशल्याच्या जोरावर स्थाईक होण्याची परवानगी देण्यात यावी. ज्यांची आपल्या कौशल्याच्या जोरावर अमेरिकेच्या विकासात, सामर्थ्यात भर घालायची तयारी आहे. त्यांना लगेच भरती करुन घ्यावं." 

       कोणताही श्वेतवर्णीय डाॅक्टर हा अलाबामाच्या ग्रामीण भागात जाण्यास तयार नसायचा. अमेरिकेत वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय लोकांनी या संधीचा पुरेपूर फायदा उठवला. मोठी संधीच आयती चालून आली होती त्यांच्याकडे. हे झालं एका क्षेत्राचं उदाहरण, असे बरेच सांगता येतील. या पिढीचं पोटापाण्याचं भागल्यावर यांनी आपल्या मुलांना स्पेलिंगच्या स्पर्धापरिक्षेत उभं करायचं ठरवलं. मुलांची भारतीय शिक्षण पद्धती प्रमाणे हा पालकवर्ग पाढे पाठ करवून घेणं, सर्वसामान्य गणित पक्कं करुन घेऊ लागला. थोडं विषयांतर करुन सांगतो गणित या विषयाचा अभ्यासाने माणसामध्ये critical thinking करण्याची वृत्ती उभी राहते. एक दीड महिन्यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात गणिताचा अभ्यास करण्यास सांगितले ते अशाच अर्थाने. आपल्याकडे शिक्षणावरील सिनेमांनी एक वेगळाच नॅरेटिव्ह समाजात सेट केलाय. जसं थ्री इडिअट मधील आमीर खान करिनाला विचारतो की, "तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला बँकेत नोकरी करायची होती तर इंजिनियरिंग का केलं?" तसेच जर एखाद्याला काही कला जोपासायची असेल तर त्याने गणित शिकण्याची काही गरजच नाहीये असा एक समज झालाय जणू सगळ्यांचा. 

         तर या स्पेलिंग बी स्पर्धेत विद्यार्थ्यांना परीक्षक इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग विचारतात. स्पर्धेत विद्यार्थी स्पेलिंग सांगताना  एकदा जरी चुकला तरी तो स्पर्धेतून बाद होतो. समजा विद्यार्थ्यांना परीक्षकांनी स्पेलिंग सांगण्यासाठी दिलेला शब्द याचा उच्चार, व्युत्पत्ती, तो कोणत्या भाषेतून आलेला आहे यासंबंधी काही प्रश्न विचारायचे असल्यास तो परीक्षकांना विचारू शकतो. म्हणजे विद्यार्थी खात्री करवून घेऊ शकतो की परीक्षकांनी उच्चारलेला शब्द आणि विद्यार्थ्याने गृहीत धरलेला शब्द एकच तर आहे ना, असं. भारतीय मुलांचं या स्पर्धेत जवळजवळ ३५ वर्षांहून अधिक काळापासून वर्चस्व आहे. याची वेगवेगळी कारणे सांगितली जातात. भारतीय लोक हे कुटुंब पद्धतीला महत्व देणारे आहेत. त्यामुळे भावंडांचं एकमेकांना नियमित भेटणं हे अगदी काॅमन आहे. जेव्हा ही मुलं आपल्या मोठ्या चुलत, मावस भावंडांना पाहतात की ते या स्पर्धेत भाग घेत आहेत, मेहनत करत आहेत, स्पेलिंग लक्षात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या करत आहेत. त्यांचे आईवडीलही त्यांची तयारी करवून घेत आहेत त्यामुळे या स्पर्धेविषयीचे बी ह्या लहान वयातील मुलांच्या मनात आपोआप पेरलं जातं. त्यांच्यात आपोआप या स्पर्धेविषयीची स्पर्धा वाढत जाते. 

         साठ ते नव्वदच काय तर अगदी अत्ता आत्तापर्यंत भारतीयांना अमेरिकेत ना नाटकात काम मिळत असे ना सिनेमात ना टीव्हीवर झळकण्याची कोणतीही संधी मिळत असे. पण स्पेलिंग बी मधील यशाने या लहान मुलांनी केवळ टिव्हीला आपल्यावर प्रकाशझोत टाकायला मजबूरच केलं नाही तर समस्त श्वेतवर्णीय लोकांच्या ह्दयात धडकी भरवली की, "आता गाठ आमच्याशी आहे!" २०१७ मध्ये scripps National spelling Bee मध्ये २९१ स्पेलर्स ने भाग घेतला होता आणि त्यातले २५% हे भारतीय वंशाचे होते. या स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक आणि त्यांचे आईवडील स्वतःचे असे एखादे  तंत्र शोधून काढतात स्पेलिंग पाठ करण्यासाठी. एका मुलाने स्वतःच्या कंप्यूटरवर स्पेलिंग Type करण्याची पद्धत डेव्हलप केली होती ज्यायोगे तो स्पेलिंग लक्षात ठेवायचा. या टाइपिंग साठी लागणारं Excel sheet त्याने तयार केलं होतं. म्हणजे स्पर्धेच्या वेळेस तो डोळे बंद करत हवेत किबोर्ड वर टाईप केल्यासारखं करायचा. स्पर्धेत जसजशा फेऱ्या वाढत जातात तसतशी त्याची काठिण्य पातळी वाढत जाते. कमीत कमी १५ फेऱ्या तरी होतात. शालेय स्तर, मग तालुका, जिल्हा, राज्य करत करत देशपातळीपर्यंत ही स्पर्धा जाते. ही स्पर्धा काही स्पर्धकांची एकमेकांसोबत नसते तर ती स्पर्धा स्पर्धाकाची डिक्शनरीसोबत असते. पाठांतराला अमाप महत्व असणाऱ्या या देशपातळीवरील स्पर्धेला बक्षीस किती असतं? तब्बल ५०-६० हजार अमेरिकन डाॅलर. विभागून वगैरे असले थेरं नसतात यात. आपल्याकडे काय परिस्थिती आहे? आमच्याकडे संध्याकाळी देवासमोर म्हटले जाणारे शुभंकरोती गेलं, गीतेचा पंधरावा अध्याय गेला, मनाचे श्लोक, करुणाष्टके गेले. संध्यासमयी आजी आजोबा नातवंडांकडून म्हणून घेणारे पाढे गेले, निमकी, दिडकी, पाऊनकी, मोरोपंतांची 'केकावली' ह्यांचा तर पत्ताच हरवलाय. संध्याकाळी लहाण्यांनी मोठ्यांना मोठ्याने वाचून दाखवणं आम्ही गमावलं. आमच्या मुलांच्या इतिहासाच्या सनावळ्या पाठ नसतात, कविता पाठ नसतात. शालेय जीवनातून पाठांतर हद्दपार करुन आम्ही मुलांना संस्कारांपासून कैक योजने दूर ठेवलं आहे. कालाय तस्मै नमः दुसरं काय?

अजिंक्य कुलकर्णी

Comments

Popular posts from this blog

मनुष्य गौरव दिन!

रेणुका देवी यात्रोत्सव - अस्तगाव

विज्ञानव्रती एच.सी.वर्मा