लेखकाची गोष्ट
भारतीय तत्वज्ञान हे मुख्यतः तीन प्रश्नाचा शोध घेत असते. मी कोण?, मी कोणाचा? आणि मी कोणासाठी?. यातल्या मी कोण या प्रश्नाचे उत्तर हे व्यक्तीसापेक्ष आहे. याच 'मी कोण?' या प्रश्नाचे माझं स्वतःचे उत्तर काय तर, 'मी एक लेखक आहे.' हे शोधण्याचा लेखक म्हणून केलेला प्रयत्न म्हणजेच विश्राम गुप्तेंच लेखन आत्मचरित्र 'लेखकाची गोष्ट' हे होय.
आत्मचरित्रात त्या व्यक्तिच्या समकालीन आर्थीक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे चित्रणही यायला हवे. केवळ चरित्रनायकाच्या जीवनात येणाऱ्या व्यक्तीबद्दलचंच लिखान नको. गुप्तें आपल्या या गोष्टीत या सामाजिक, राजकीय, साहित्यिक पर्यावरणाचा वेधही घेतात व त्यांना आपल्या परीने डिकोड करण्याचाही प्रयत्नही करतात. मराठी साहित्याबद्दल बोलताना ते म्हणतात की, मराठी लेखक हे प्रायः कौटुंबिक लिहितात. तसं लिखान करण्यात वाईट असं काहीच नाही परंतु ते लिखान हे अपूर्ण आहे असं समजावं. साहित्य विश्वात जे जे ग्रेट साहित्य लिहिलं गेलं आहे ते ते माणसाला सतत भेडसावणाऱ्या समस्यांना हात घालत असते. सत्तरच्या दशकात महाराष्ट्रात साहित्य वर्तुळात तसेच राजकीय वर्तुळातही दोन गट पडले होते. त्यांचाच साहित्यावर प्रभाव पडला होता. त्यातील एक गट होता दलित क्रांतिवादी व दुसरा समाजवादी किंवा कम्युनिस्ट क्रांतीवादी. क्रांतिकारी म्हटलं की बऱ्याच लेखकांचा तोल जातो, तो सावरण्यात त्यांची बरीच उर्जाही खर्च होते. ऐंशीच्या दशकात सामाजिक कामात बाबा आमटेंनी तरुणांना एक क्रियेटिव्ह फोकस दिला. मध्यमवर्गीय व्यक्तीला समाजकार्यचे एक सुप्त आकर्षण असते त्याचं एक 'रोमँटिक माॅडेल' बाबांनी दिलं. या सर्चाव गोष्टींचाही काही काळ गुप्तेंवर प्रभाव राहिला जो विकास आमटेंकडुन दुखावल्या गेल्यामुळे जमिनीवर आला असं गुप्ते म्हणतात.
पुढे जी.ए., ग्रेस, चि.त्र्यं यांचे गुढ, दुर्बोध साहित्यातही गुप्ते रमतात. नंतर यथावकाश तोही प्रभाव कमी होतो. गुप्तेंच हे अशा विविध लेखकांच्या शैलीचे फॅन होणे हे वैयक्तिक मला सर्वसामान्य वाचकांच्या अवस्थेचे प्रतिनिधित्व केल्याचे जाणवले. "मी काहीही वाचले तरी ते मला चांगलेच वाटायचे, मी त्या शैलीत वाहून जात असे". गुप्तेंची ही प्रामाणिक कबुली मला जास्त मानवी वाटते. त्यामुळे ती मला जास्त अपील होते. जेंव्हा त्यांनी व्ही.एस.नाॅयपाॅल यांचे चरित्र वाचले त्यावेळी त्यांना जाणवले की जसे नाॅयपाॅलांना स्वतःला असे वाटले की आपल्यातले मटेरियल संपले आहे, आपली बॅटरी डिस्चार्ज झाली आहे. तेंव्हा मात्र नायपाॅल हे जगाच्या प्रवासाला बाहेर पडले. गुप्तेंना या उदाहरणातून हेच सांगायचे आहे की लेखकाने नेहमी संवेदनशील मन, उद्विग्नता, असमाधान सोबत घेऊन हिंडल्याशिवाय तसेच, मान-अपमान, सुख-दुःख हे आयष्याचे रस पिल्याशिवाय त्याला लिहिता येणार नाही. लेखकाने नेहमी अस्वस्थ रहायला हवं. हे वाचताना मला जाॅन स्टुअर्ट मिलच्या विधानाची आठवण झाली. मिल म्हणतो की It is better to be human being dissatisfied than a pig satisfied; better to be Socrates dissatisfied than a fool satisfied. समाधानी डुकरापेक्षा पेक्षा मला असमाधानी साॅक्रेटिस बनणे कधीही आवडेल.
नाॅयपाॅलांनी स्वतःच्या आत्मचरित्रात स्वतःबद्दलचे कित्येक नागडे सत्य सांगितलेले आहेत आणि नाॅयपाॅलांचा त्याबद्दल काही आक्षेपही नाही. जे आहे ते हे असं असं आहे! मराठीत हे असं स्वतःबद्दलचं कठोर सत्य सांगण्याची हिंमत इतर कोणत्या लेखकांनी दाखवली आहे का? असा हा रोकडा सवालही गुप्ते विचारतात. आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारण्याची बऱ्याच लोकांची तयारी नसते. त्याला साहित्यिकही अपवाद नाही. अशी तयारी ज्यांची नसते ती मंडळी मग पुढे नार्सिसिसम चे शिकार होतात. ही आत्मप्रवणता लेखकाला स्वतःला तर मारक असतेच तसेच त्याच्या भोवतालच्या साहित्यिक पर्यावरणालाही मारक ठरते. मराठी साहित्यात टोकाची खलप्रवृत्ती फार दिसत नाही. जी पाश्चात्त्य साहित्यात सर्रास दिसते. मराठी साहित्य हे ग्रामीण, कौटुंबिक, किंवा ऐतिहासिक यातच जास्त रमलेले दिसते (काही सन्माननीय अपवाद वगळता). याला डिकोड करताना गुप्ते म्हणतात की 'आनंद' की आम्हा भारतीयांची आद्यप्रेरणा आहे. म्हणून आपल्याकडे शोकांतिका फारशा प्रसूत होत नाही.
लेखक होणे म्हणजे केवळ भाषेवर प्रभुत्व मिळवणे नाही, आपले 'काॅन्टॅक्ट्स' वाढवणे नाही, जेष्ठ लेखकांच्या पायापाशी बसून अनुग्रह मागणेही नाही तर 'लेखक होणे म्हणजे भानात येणे होय!' नेहमी असंतोषी राहणे, अस्वस्थ राहणे होय. आपलं लिखान कालातीत व्हावं, त्या लिखानाने प्रत्येक पिढीला पथदर्शन करावे यालाच लिखानाचे 'झेन' होणे असे गुप्ते म्हणतात. असं झेन कडे वाटचाल करणारे लिखान करायचे असेल तर मराठी साहित्याने प्रादेशिकतेची कोंडी फोडून उदात्तता स्वीकारायला हवी. संतपरंपरेत ही उदारवृत्ती दिसते. संतांच्या जीवनात भौतिक व आध्यात्मिकतेत समन्वय दिसतो. नंतर ढसाळ, नेमाडे, मर्ढेकर, चित्रे यांनी ऐहिक सुखाला प्राधान्य देत पारलौकिक सुखाला न्यून ठरवले. मौजेच्या आखीव रेखीव,सौंदर्यवादी लिखानाला दलित साहित्याने सुरूंग लावला. या समकालीन स्थित्यंतरांचा आढावा यात घेतलेला आहे. हा समकालीन आढावा घेणे लेखक म्हणून गरजेचे आहे नाहीतर आत्मचरित्र हे आत्मचरित्र न राहता आत्मसमर्थन ठरते.
मराठीला प्रादेशिकतेचा मोह सुटत नाही. या विळख्याला सोडवू शकेल असा एकही लेखक मराठीत झाला नाही. मराठीचे याच साचलेपणावर देशीवाद पोसवला तो आपल्याच लोकांनी. मराठीला 'आपलं गावच बरा!' हा शाप आहे. म्हणूनच काही अपवाद वगळता मराठीतील कोणत्याही लेखकाने सीमोल्लंघन केलेले नाही. आपल्या साहित्याची हद्दपारी झाली पाहिजे. यालाच गुप्ते साहित्यातील 'नो मॅन्स लँड ' म्हणतात. लेखक व त्याचे साहित्य हे जात, धर्म, देश या पलिकडे जात असते. उदा. ज्ञानेश्वर, शेक्सपिअर, टाॅलस्टाॅय यांच्यासारखे कोण लिहू शकले आपल्याकडे? लेखक व्हायचे असेल तर साधना आवश्यक आहे. नियमित लिखाणाचा सराव हवा. लेखन शिस्त हवी. प्रतिभेला दैवी मानणारे लेखक हे लेखन शिस्तीला कमी लेखतात. एडिसन म्हणतो तसं success is 99% perspiration and 1% Inspitaton. लिहिताना नेहमी हे भान असायला हवं की असं आपल्याकडे काय आहे की जे लोकांनी वाचावं? लिहायचं का, तर राॅयल्टी साठी? समीक्षकांची दाद मिळावी म्हणून ? रोज काही ना काही लिहिणाऱ्या लेखकाला जगातला कुठलाही संपादक, प्रकाशक संपवू शकत नाही!
महेश एलकुंचवारांच्या प्रोत्साहनामुळे गुप्तेंना जरा आत्मविश्वास मिळाला लिहिण्यासाठी. आपल्या लिखानाच झेन करायचे असेल तर लेखकाने कुणाचही यश मिळवण्यासाठी बोट पकडू नये,अन्यथा आयुष्यभर त्यांच्या उपकाराखाली रहावं लागतं. लेखनासाठी धरसोड वृत्ती चालत नाही. जर जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर लिखान हे पूर्ण होतेच. लेखक असला तर तो हौसेखातर, कौतुक मिळवण्यासाठी कधीच लिहित नाही. लेखक हा स्वतः ची वाट स्वतः शोधत असतो. साहित्यिक गप्पा आणि पारितोषिक समारंभ हे कधीकधी लेखनमार्गात व्यवधाने ठरू शकतात. अशा कित्येक गाईडलाइन्स ने हे पुस्तक खच्चून भरलेलं आहे.
पुस्तक :- लेखकाची गोष्ट
लेखक :- विश्राम गुप्ते
प्रकाशक :- देशमुख आणि कंपनी
किंमत :- ४००रू.
अजिंक्य कुलकर्णी.
खूपच छान आणि नेमका परिचय. धन्यवाद
ReplyDelete