'इन्शाअल्लाह'- मुस्लिमांच्या ताज्या समस्यांवर योग्य भाष्य करु पाहणारी कादंबरी

   हल्ली हिंदू - मुस्लिम हा धार्मिक संघर्ष फार प्रतिक्रियावादी होत चालला आहे. विशेषकरुन सोशल मिडियावर याचं फारच बटबटीत स्वरूप पहायला मिळतं. आरे ला कारे करणे हे नेहमीचंच झालयं आता. पण प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्यावर काम करण्याची किती लोकांची तयारी असते? सर्जनात्मक (constructive), सकारात्मक (positive) काम करण्यासाठी समाजात स्वतःला किती लोक गाडून घेतात? हे प्रश्न जेव्हा अनुत्तरितच राहतात तेव्हा अशा वेळी कोण मार्ग दाखवणार? राजकारणाने कायमस्वरूपी चिघळवत ठेवलेल्या या प्रश्नाकडे डोळसपणे कोण पाहणार ? महाकवी रामधारी सिंह दिनकर यांच्याच शब्द सांगायचे तर दिनकर म्हणतात, "जब जब राजनीति लडखडाई है तब तब साहित्यनेही उसे संभाला है! " दर्जेदार साहित्य हेच अशा प्रश्नांना थेट भिडण्याची क्षमता ठेवते. सध्याच्या काळात मुस्लिम समाजाच्या समोर असलेले काही प्रश्न की ज्यांना अग्रक्रमाने सोडवलं पाहिजे ते म्हणजे ट्रिपल तलाक, मुस्लिम मुलांची शिक्षणं, बुरखा पद्धत, घटस्फोटानंतरची पोटगी आणि साहित्य निर्मितीत पिछाडीवर असलेल्या मुस्लिमांचा टक्का या आणि अशा ज्वलंत विषयांना थेट हात घालणारी कादंबरी म्हणजे राजहंस प्रकाशन प्रकाशित व अभिराम भडकमकर लिखित 'इन्शाअल्लाह' ही होय. गेल्या दहा वीस वर्षांपासून केवळ भारातातच नाही तर जगभरात मुस्लीम धर्माबद्दल एक वैचारिक घुसळण सुरु आहे. ही वैचारिक घुसळण केवळ मुस्लीम विरुद्ध इतर धर्म अशी नाहीये. मुस्लीमांमध्ये असलेले इतर पंथ जसे शिया सुन्नी यांचेही कित्तेक वर्षांपासूनचे वाद आहेत. धार्मिक कट्टरता, टोकाचा धर्मवाद याची पहिली शिकार ठरते ती मानवता!


  इन्शाअल्लाह या कादंबरीत मुख्य पात्र आहेत तीन. जमीला, झुल्फी आणि रफीक. कोल्हापूर रेल्वे स्थानक बाँब स्फोटाने उडवून देण्याचा कट पोलिसांनी उधळून लावलेला असतो. या घटनेपासून जमीलाचा मुलगा जुनैद हा फरार आहे. झुल्फी हा काॅलेजच्या शेवटच्या वर्षात शिकत असणारा एक तरूण मुलगा. स्वभावाने समजूतदार, विचारी आणि मुख्य म्हणजे सुधारणेच्या बाजूने झुकणारा तर आहे पण कट्टर सुधारणावादी नव्हे. नव्या - जुण्याचा सुवर्णमध्य साधण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्न असतो. रफीक हा 'फतेह' नावाच्या एका मुस्लिम सुधारणावादी संघटनेचा कार्यकर्ता -अध्यक्ष. एकदम तडतड्याच. टोकाचा सुधारणावादी, इतका की प्रसंगी दोन देण्याची तसेच दोन खाण्याची सुद्धा तयारी असलेला. कादंबरीचे कथानक कोल्हापूरातील एका छोट्या मुस्लिम मोहल्यात घडत आहे. तिथे राहणारे मुस्लिम लोक हे रूढीग्रस्त, अशिक्षीत तर आहेतच त्याचबरोबर मुस्लिम मौलवी, धर्मगुरूंचा जबरदस्त पगडा असलेला असा हा मोहल्ला आहे. बाँबस्पोटाचा कट उधळून लावल्यानंतर जी धरपकड होते त्यात या मोहल्यातील दोन तरूण मुलांना पोलिस पकडून नेतात. अशा कथानकाने कादंबरीची सुरुवात होते. कादंबरी पहिल्या दहा पंधरा पानातच वाचकांच्या मनाची पकड घेते. शेवटपर्यंत कादंंबरीची विषयावरची पकड ढिल्ली पडणार नाही हे भान राखण्यात ही कादंबरी कमालीची यशस्वी झाली आहे. जमीला, झुल्फी, रफीक हे जरी कादंबरीचे मुख्य पात्र असले तरी इतर दुय्यम पात्र सुद्धा आपलं असं एक स्थान राखून आहे. 'महाकादंबरी' सारखं मुख्य नायकाच्या आजूबाजूला काहीच घडत नाही असं 'इन्शाअल्लाह' मध्ये मात्र होत नाही. 'इन्शाअल्लाह' या कादंबरीतील नायक नायिकेच्या व्यतिरिक्त सुद्धा जी स्त्री-पुरुष पात्र आहेत ती मुस्लिम समाजाच्या त्या वर्गाचे प्रतिनिधित्व करतात जे समाज्यात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घटनांमुळे सहज भेदरले जातात. ज्यांच्या धर्मभावना सहज आहत होतात. त्यांच्या याच दुखावलेल्या धर्म भावनेच्या जोरावर राजकारणाची पोळी सहज भाजता येऊ शकते इतपत त्या आहत झालेल्या असतात. या वर्गाचे धार्मिक ध्रुवीकरण सहज करता येते. सोशल मीडिया च्या जोरावर त्याला अजून खतपाणीही घालता येते. एका बाजूला काही लोक असतात जे म्हणतात, "अरे हा कोण लागून चालला आहे आमच्या धर्मात सुधारणा शिकवणारा, त्याने त्यांच्या धर्मात सुधारणा करावी की…!" तसेच दुसरीकडे "आपल्याला काय करायचंय या धार्मिक राजकारणाशी? नकोच ते!" म्हणून व्यक्त होणारे तसेच गप्प बसणाऱ्या लोकांचे प्रतिनिधित्व करणारे कित्येक पात्र आपल्याला या कादंबरीत जागोजागी भेटतात.

     कादंबरीत एक प्रसंग आहे जुनैदची केस लढवण्यासाठी मीना गोखले नावाची एक स्री वकील तयार होते. सोशल मिडियावर जुनैदला लोकांनी अगोदरच अतिरेकी ठरवून टाकलेलं असतं. आपल्याकडे नाही का रिया चक्रवर्तीला सुशांत सिंग च्या केस मध्ये  कोर्टाने दोषी ठरवण्याच्या आत मिडियानेच तीला दोषी करार दिलेला असतो, अगदी तसंच! यावरून सोशल मीडियावर वाद होतात. किती उथळ विचार करून व्यक्त होत असतात लोक सोशल मीडियावर ! एखाद्या केसचा पूर्ण तपशीलही माहीत नसतो अनेकदा लोकांना. कुणाला दोषी तर कुणाला निर्दोषी ठरवून मोकळी होतात लगेच. अनेकदा प्रतिक्रियावादी लोक जे असतात ते आपल्या क्रियेवर  विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या प्रतिक्रियेलाच जास्त प्राधान्य देतात. त्यातच धन्यता मानतात. परंतु प्रतिक्रियेच्या नादात ही मंडळी एक गोष्ट विसरतात की त्यांच्या प्रतिक्रियावादी असल्याने ते आपलाच विचार कमकुवत करतात! दोन्ही बाजूचे (हिंदू-मुस्लिम) असे प्रतिक्रियावादी हे आपापल्या धर्मात सुधारणा करू शकत नाहीत. धार्मिक सुधारणा करण्यासाठी रुढींच्या विरुद्ध दंड थोपटून उभे राहावं लागतं. प्रसंगी एखाद्या वर्गाचा कायमस्वरूपी रोष पत्करावा लागतो. मुस्लिमांमधील अशा प्रचलित रुढींच्या विरुद्ध मग ती बुरखा पद्धत असेल, ट्रिपल तलाक असेल किंवा तलाकनंतर दिली जाणारी पोटगी असेल यांच्या विरूद्ध जो उभा राहतो तो म्हणजे या कादंबरीतला नायक झुल्फी. त्याला मार्गदर्शनाचं काम करतो तो म्हणजे रफिक. रफीक या पात्रावर हमीद दलवाईंचा प्रभाव असावा असं मला कादंबरीत भरपूर ठिकाणी जाणवतं. मला कादंबरीत सुरुवातीला असं वाटत होतं की यात मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नाला हाताळलं गेलं नसेल. पण हा समज लवकरच गैरसमज ठरला जेव्हा मी कादंबरीत निम्याच्या पुढे सरकलो. मुस्लिम स्त्रियांचे वर उल्लेखलेले महत्वाचे प्रश्न कादंबरीत तरुण मुलांच्या संवादातच गुंफलेले आहेत त्यामुळे ते आपल्याला जास्त अपील होतात. त्यांचा मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आधुनिक आहे. तलाक झालेल्या स्त्रीला तीनच महिने पोटगी मिळते असं शरिअतचा कायदा सांगतो. पुढे ह्या टाकलेल्या स्त्रीचं जगणं, मुलांचं संगोपन किती मुश्कील आहे याचा विचार जेव्हा ही तरुण मंडळी करू लागले तेव्हा किती बरं वाटतं, हे झुल्फी पात्रावरून दिसून येते. समान नागरी कायदा केला गेला तर द्विभार्या प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी हा मुस्लिम स्त्री प्रश्नही हाताळेल. या जाचातून त्यांची सुटका होईल. 

   'इन्शाअल्लाह' एका गोष्टीवर मात्र नेमकं बोट ठेवते. मुस्लिमांच्या समस्यांवर जे सामाजिक कार्यकर्ते सोयीस्कररीत्या मौन बाळगतात त्याच्यावर. या कार्यकर्त्यांची, सेलिब्रिटींची वेळोवेळी घुमजाव करणाऱ्या वक्तव्यांमुळेच बऱ्याच वेळा मुस्लिम धर्मातील लोकांचीच पंचायत होते. ही मंडळी इतर धर्मातील दोष तर दाखवताना पण स्वधर्मातील कर्मठपणा, रूढी परंपरा याबद्दल मात्र आपल्या सोयीने मौन पाळतात.  हिंदूंना हिंदूपण टाका म्हणणारे मुस्लिमांना मुस्लिमपण टाका म्हणतील का ? असेच सोयीस्कर वागणारे काही मुस्लिमांमध्येच आहेत असे नाही, थोड्याफार फरकाने सर्व धर्मात आहेत. परंतु मला वैयक्तिक असं वाटतं की भारतीय या नात्याने भारतातील कोणत्याही धर्मात दिसणाऱ्या चुकीच्या, अनिष्ट गोष्टींचा विरोध हा मात्र करायलाच हवा असं.  तसेच सुधारणाही या काही आभाळातून पडत नाही. सुधारणा ह्या ज्या त्या समाजातूनच वर आल्या पाहिजे. त्यासाठी चटकेही सहन करण्याची तयारी असावी लागते. सुधारणेचा हा रेटा त्या त्या धर्मातूनच यायला हवा.  वेळप्रसंगी कायद्याची बंधने घालून किंवा प्रबोधनातून. मला तरी वाटतं भारतात ही गोष्ट करणे काही अशक्य नाहीये.  कारण भारतात प्रबोधनाची अशी एक मोठी परंपरा आहे. एक मुस्लिम मोहल्ला तिथले स्वतःला धर्माच्या चुकीच्या समजुतींना बदलू पाहणारे तरुण, राजकारणी, हिंदू-मुस्लिम नेते, कार्यकर्ते यांना चित्रित करणारी अशी ही एक सुंदर कादंबरी 'इन्शाअल्लाह'.

अजिंक्य कुलकर्णी

Comments

  1. आपल्याकडून ऐकले होते. 'इन्शाअल्लाह' वाचावीच लागेल. 👍

    ReplyDelete
  2. छान गोषवारा लिहिला आहेस. वाचतो सवडीनं .

    ReplyDelete
  3. छान लिहिलंय...उत्कंठावर्धक!!!
    वाचते...

    ReplyDelete
  4. पुस्तक परिक्षण छानच केले आहेस,त्यामुळे आता पुस्तक वाचायची उत्कंठा लागून राहिली आहे.बाहेर पडलोकी,पहिले पुस्तक खरेदी करेन.
    चांगल्या विषययावरील पुस्तक परिक्षण केल्याबद्धल धन्यवाद!अशीच पुस्तके सुचवत जावीत.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. माझ्या ब्लाॅग वर इतरही पुस्तकांवरील लेख वाचायला मिळतील.

      Delete
  5. बऱ्याच वेळा ग्रूपवर हे नाव वाचलं आहे. पण नेमकं हे पुस्तक कशाबद्दल आहे, ते वाचावं की नाही याबद्दल इतकं स्पष्ट आणि सरळ लिहिणारे तुमच्यासारखे वाचक थोडकेच ! विषय नक्कीच संवेदनशील आहे. कादंबरी जरूर वाचेन. बाकी सामाजिक सुधारणा या बाबतीत हिंदू धर्मियांनी बरीच क्रांती घडवून आणली आहे, आणि ती स्वीकारलीही आहे. अजून बरेच बदल व्हायला हवे आहेत, ते सगळीकडे पोहोचायला हवे आहेत. श्रीमान योगी मधे शिवाजी महाराजांच्या तोंडी एक वाक्य आहे, " धर्म हा वाहत्या पाण्यासारखा निर्मळ असायला हवा. समाजाचे डाग धुवायला तो समर्थ हवा." बाकी हे तत्त्व सर्वांनीच अंगिकारालं, तर अनेक प्रश्न सुटतील. ते होईल तेव्हा होईल, पण आता हे पुस्तक नक्की वाचेन.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you नेहा. आवर्जुन वाच ही कादंबरी. खुप प्रश्नांचा विचार करायला लावते ही कादंबरी.

      Delete
  6. कादंबरीचे उत्कृष्ट विवेचन अजिंक्य 👍👍👍

    ReplyDelete
  7. Lucid as usual, well written 🌹

    ReplyDelete
  8. Lucid as usual, well written 🌹

    ReplyDelete
  9. Lucid as usual, well written 🌹

    ReplyDelete
  10. Pratek dharmat, purvipasun chalat alelya jya samjuti kinva niyam ahet tyat velenusar badal karana khup avashyak ahe...ani baryach vela dharmatil ya sudharana varati je rajkaran hota ...tyamule ya sudharana hotana khup tras hoto samanya janatela... Ani ha tras tyanna hoto jyanna ya sudharana garjechya aahet.. Muslim dharma suddha yala apavad nahi...
    Khup changla vishay aahe ya Kadambari cha...ani tyacha vivaran paan chaan lihilay Ajinkya.. lekhakacha drushtikon samajla...ya blog madhun..
    Thank you for sharing this blog.

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्राय दिल्याबद्दल आभारी आहे.

      Delete
  11. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  12. अभय जगताप24 November 2020 at 09:48

    पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाढली आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मनुष्य गौरव दिन!

रेणुका देवी यात्रोत्सव - अस्तगाव

विज्ञानव्रती एच.सी.वर्मा