'बंदसम्राटाची' सुसाट गोष्ट...
जुन्या राजकीय वर्तुळात संघ भाजपचे कार्यकर्ते असो वा समाजवादी, एकमेकांसमोर कायमच दंड थोपटून उभी असणाऱ्या या दोन्ही गटांचे लोक मात्र एका व्यक्तीसाठी प्रचंड हळवे होतात, ती व्यक्ती म्हणजे जॉर्ज फर्नांडिस! या दोन्ही गटांचा जॉर्ज हा हळवा कोपरा होता. जॉर्ज सारखा इमानदार माणूस आपण पाहिला नाही यावर या दोन्ही गटांचे एकमत असे. समाजवादी चळवळीत आयुष्य घालवलेल्या जॉर्ज एका क्षणी भाजपच्या गोतावळ्यात जावे लागले ही त्यांची राजकीय अपरिहार्यता होती हे स्वतः जॉर्ज यांनी जाहीरपणे कबूल केले आहे. निळू दामले यांनी 'सुसाट जॉर्ज' नावाने जॉर्ज यांची १९४० ते २०१० यादरम्यानची कारकीर्द पुस्तक रुपाने मांडली आहे. या पुस्तकाला चरित्र म्हणण्यापेक्षा जॉर्ज यांच्या राजकीय जीवनाचे 'प्रोफाइल' म्हणणे जास्त उचित होईल. मंगळूर मध्ये जन्मलेल्या जॉर्ज यांची सर्व राजकीय कारकीर्द मात्र बिहार मधल्या मुजफ्फरपुर या मतदार संघात गेली. जात-पात, धर्माच्या अस्मिता प्रचंड टोकदार असणाऱ्या बिहार मध्ये तसा जन्माने ख्रिश्चन, पण स्वतःच्या आयुष्यात निधर्मी असणारे जॉर्ज हे बिहार मध्ये इतकी वर्षे टिकले कसे हा मोठा प्रश्न आहे? त्याचे उत्तर बहुतेक त्यांच्या अत्यंत साध्या राहणीमानात, प्रामाणिकपणा, स्वच्छ चारित्र्य आणि अगदी तळागाळातील व्यक्तीलाही आपलं म्हणण्याच्या त्यांच्या स्वभावात असावं असं मला वाटतं. संघ भाजपनेही जॉर्ज यांच्या कायमच फायदा उठवला. आम्हीही कसे 'सेक्युलर' आहोत हे दाखवण्यासाठी. तसेही भाजपात जॉर्ज हे 'आउटसाइडर' होते. पण भाजपात जॉर्ज यांच्या पाठीमागे एक मोठी शक्ती भक्कमपणे उभी होती ती शक्ती म्हणजे अटल बिहारी वाजपेयी ही होय. वाजपेयी यांच्या पाठिंब्यामुळे जॉर्ज यांचे राजकारणात वजन खूप वाढलं. राजकीय वर्तुळात जॉर्ज यांना वाचपेयींनंतर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून समजले जाऊ लागलं होतं. पण आपल्या ख्रिश्चन असल्याने आपण भाजपात तसे 'आउटसाइडरच' आहोत हे जॉर्ज यांना वेळीच उमगले होते. निकटवर्तीयांना ते तसं बोलूनही दाखवत कि," ख्रिश्चन असल्याने या देशाचे पंतप्रधानपद मला कधीही मिळणार नाही".
जॉर्ज यांचा जन्म मंगलोरचा. बालपण व शिक्षण मंगलोरातच झालं. वडिलांशी त्यांचे काही फार विशेष असं पटत नव्हतं. वडील जाॅर्ज यांना खेळू, वाचू देत नसत. त्यामुळे वडिलांबद्दल त्यांच्या मनात कायमच एक अढी राहिली. शालेय जीवनापासून जाॅर्ज यांना वाचनाची प्रचंड आवड होती. ती पुढे शेवटपर्यंत टिकली. जॉर्ज यांचा गीता, बायबल यांचा दांडगा म्हणावा असा अभ्यास होता. तुरुंगात असताना गीतेच्या शिकवणीवर जॉर्ज इतर कैद्यांना गीतेवर प्रवचन देत. गीतेवर जॉर्ज यांचे किती प्रभुत्व होतं याचा एक छोटा प्रसंग आहे. गीता हा ग्रंथ प्रत्येक समयी वास्तवाशी ताडून त्यातून काय घेतलं पाहिजे यावर जॉर्ज तुरुंगातील कैदी, गुंड त्यांच्याशी गप्पा मारत. त्यामुळेच कर्मठ बिहारी ब्राह्मण सुद्धा बिहारच्या तुरुंगात जाॅर्ज यांचे कट्टर अनुयायी झाले होते. दररोज दोन तास पूजा केल्याशिवाय घराबाहेर न पडणारे ब्राह्मण सुद्धा जाॅर्ज यांच्या सोबत संपामध्ये, निवडणुकीमध्ये स्वतःला झोकून देत असत. जॉर्ज यांना कोणतेही व्यसन नव्हतं. सहकाऱ्यांना, ओळखीतल्या लोकांना सभेतून व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत. सुरवातीच्या काळात जॉर्ज यांनी काही वर्तमानपत्रे चालवली. टाइम्स ऑफ इंडियात प्रूफ रीडर म्हणूनही काम केलं. घर सोडून मुंबईत आलेल्या जॉर्ज यांना रणजीत भानु यांनी स्वतःच्या घरात आसरा दिला. कॉलेजात प्रवेश घेतल्यावर त्यांची ओळख मधु दंडवते यांच्याशी झाली. पोर्ट ट्रस्ट, डिमेलोनी स्थापन केलेली 'ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन' इथे कामगारांचे संघटन केले. ट्रक ड्रायव्हर संघटनेतर्फे संप घडवून आणला. संपामुळे ट्रक ड्रायव्हर यांचा पगार वाढवून मिळाला. हळूहळू या संपांमुळे, युनियन मुळे कामगार जॉर्ज यांच्याकडे आकर्षित होऊ लागले. जाॅर्ज समाजवादी चळवळीत सक्रिय झाले. नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, अशोक मेहता ही समाजवादी पक्षातील देश पातळीवरील काही नावं त्यावेळी चांगली गाजत होती. जॉर्ज कम्युनिस्ट आणि काँग्रेस विरोधी होते. नेहरूंना त्यांचा नेहमी विरोध असे.
जॉर्ज सफाई कामगारांचे प्रश्न समजून घेत होते. या सफाई कामगारांत रिपब्लिकन पक्षाची एक संघटना होती. सफाई कामगारांसोबत जॉर्ज यांनी काम करायला सुरुवात केली तेव्हा हे रिपब्लिकन नेते चवताळले. जॉर्ज यांची तक्रार घेऊन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे गेले. आंबेडकरांनी जॉर्ज यांना बोलावून घेतले. जाॅर्ज आणि आंबेडकरांच्या अनेक भेटी झाल्या. कामगारांच्या न्यायासाठी, त्यांचे जीवन सुधारावे म्हणून आपण प्रयत्न करत आहोत हे जाॅर्ज यांनी आंबेडकरांना समजावून सांगितले. सफाई कामगारांना जॉर्ज यांच्या मार्गाने न्याय मिळेल, यासाठी आपली जातीयवादी संघटना अपुरी पडणार हे आंबेडकरांच्या चाणाक्ष नजरेला वेळीच लक्षात आले होते. आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना स्पष्ट सांगितले कि, "जॉर्ज ला युनियन करू द्या. तुम्ही त्यांना सहकार्यच करा. तो तुमचे कल्याण करेल". जॉर्ज हा केवळ पगारवाढ मागणारा कामगार पुढारी नाही. त्याच्याजवळ एक सामाजिक आणि आर्थिक दृष्टी देखील आहे असं आंबेडकरांचे मत झालं. संपाच्या भाषणात जॉर्ज म्हणत,"संप हे लढ्यातील एक हत्यार आहे. संप हे लढ्याचे साध्य नव्हे". संपाच्या सभा, बेस्टच्या कामगारांचा संप, टॅक्सी ड्रायव्हर यांचा संप अशा संपाच्या वेळी जॉर्ज वर अनेक वेळा हल्ले झाले. कित्येक वेळेस संपाच्या ठिकाणी, निवडणूक प्रचार सभेत रस्त्यावरून जाताना हल्लेखोरांनी जॉर्ज यांच्यावर प्राणघातक हल्ले देखील केले. त्यात जॉर्ज बऱ्याच वेळा जबरी जखमी व्हायचे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाच्या वेळी २५ जुलै १९५८ च्या नवाकाळच्या पहिल्याच पानावरील एका बातमीने सर्वांचे लक्ष वेधले होते. त्या बातमीतल्या एका पदवीने सर्वांचे लक्ष वेधले. ती पदवी होती 'बंद सम्राट'. ही बातमी देशभर झळकली.
सभांमध्ये जॉर्ज इतके पोटतिडकीने बोलत कि ऐकणारे श्रोते त्यांच्या भाषणात स्वतःला विरघळून घेत. एका गुंडाला जॉर्जना जीवे मारण्याची सुपारी मिळते. तो जॉर्ज यांची सभा संपण्याची वाट पाहत त्यांचे भाषण ऐकतो. सभा संपल्यावर जॉर्ज आपल्या ऑफिसमध्ये पेपर वाचत बसलेले असतात. पेपरच्या पाठीमागून एक आवाज येतो. " हे घ्या". पेपर बाजूला करत जॉर्ज विचारतात कि, "हे काय?" तो गुंड म्हणतो," मला तुम्हाला मारण्याची सुपारी दिली होती. तुम्हाला मारण्यासाठी मी तुमच्या दोन तीन सभांना आलो होतो. तुमची भाषणे ऐकली पण मला वाटले की तुम्हाला मारणे हे बरोबर नाही. तेव्हा हे सुपारीचे पैसे तुमच्या युनियनला देणगी म्हणून ठेवा". मुंबईतल्या हॉटेल कर्मचाऱ्यांचा संप जॉर्ज यांच्या आयुष्यातील एक अभूतपूर्व घटना होती. त्यावेळी झालेल्या संपात जॉर्ज यांना पोलिसांनी रेल्वे रूळावरून घसरत नेलं. बेदम मारहाण केली होती. जॉर्ज यांना आता निवडणुका लढण्याची लढवण्याची गरज भासू लागली. मुंबईतले तेव्हाचे काँग्रेसचे एक मोठे नेते होते स.का. पाटील. असे म्हणतात की त्यावेळी काँग्रेस पक्षाला स.का.पाटील हे पैसे पुरवत. पाटलांकडे गुंड, पैसा, सत्ता, उद्योगपतींचे मोठे पाठबळ याची काही एक कमी नव्हती. तरी पाटील 'बंद सम्राटाच्या' झंझावाताला थोपवू शकले नाही. दिड लाख मतांनी जॉर्ज निवडून आले. वर्तमानपत्रांनी बातमी केली होती 'द जायंट किलर'.
८ मे १९७४ रोजी मुंबईत मोटरमन यांचा संप झाला. या संपात कॉम्रेड डांगेही सहभागी होते. पण हा संप फसला. काय कारण होते संप फसण्याचे? या संपात समाजवादी गटाने भाग घेतला नव्हता म्हणून. पूर्ण तयारी झाल्याशिवाय संप करू नये असे जाॅर्ज म्हणत. डांगे यांचा गट म्हणत की जॉर्ज घाबरट आहे. १९७५ साली इंदिरा गांधींनी देशभर आणीबाणी लादली. जॉर्ज यांनी आणीबाणीचा कडाडुन विरोध केला. जॉर्ज भूमिगत होऊन चळवळी करू लागले. पत्रक वाटू लागले. चळवळीसाठी निधी गोळा करण्यासाठी ते एकदा तमिळनाडूच्या करुणानिधी यांच्याकडे गेले. जॉर्ज करुणानिधी सोबत चालत होते. मागे एक पोलीस आयुक्त चालत होते. करुणानिधी यांनी आयुक्तांना विचारले,"पत्ता लागला का जाॅर्ज यांचा? तो आपल्या राज्यात तर आला नाही ना?" या प्रसंगवरून जॉर्ज यांचे वेषांतर किती बेमालून होते हे लक्षात येते. जॉर्ज यांचे वाचन अफाट होते. झोपण्यापूर्वी तासभर वाचन केल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. प्रवासात नेहमी एखादं पुस्तक त्यांच्यासोबत असे. आणीबाणीच्या काळात भूमिगत असताना जॉर्ज यांनी बडोद्यात जागोजागी स्पोट केले. ही प्रेरणा त्यांनी भगतसिंग यांच्याकडून घेतली असावी. बहिऱ्या सरकारला जागं करण्यासाठी मोठा 'आवाज' करावाच लागतो. जॉर्ज यांच्या आयुष्यात हे प्रकरण 'बडोदा डायनामाईट' म्हणून फार प्रसिद्ध आहे. या पुस्तकात त्याचे तपशील मुळातूनच वाचण्यासारखे आहे. जॉर्ज पकडले गेले त्याआधी त्यांचे धाकटे बंधू यांना पोलिसांनी पकडले. तीन दिवस उपाशी ठेवलं. बेदम मारहाण केली. त्यात त्यांचा पाय मोडला. इंदिरा गांधींनी आणिबाणीच्या नावाखाली हा जो नंगानाच चालवला होता त्याची जबरदस्त किंमत जाॅर्ज यांना मोजावी लागली. संप, निवडणूक प्रचार सभा यात जॉर्ज यांना मारहाण होणे हे जणू एक समीकरणच बनलं होतं. पुढे वाजपेयींच्या सरकारात जॉर्ज काश्मीर मंत्री नंतर संरक्षण मंत्री झाले. पाच वर्षात जॉर्ज हे सियाचीन ला १४ वेळा गेले. असे करणारे जॉर्ज हे एकमेव संरक्षण मंत्री. या फिरण्यामुळे सियाचीन मधल्या सैन्याचे मनोबल प्रचंड वाढले होते. सियाचीन मधील सैन्याला जाॅर्ज यांनी खूप सुविधा पुरवल्या. अशा या 'बंद सम्राटाची' ही सुसाट प्रोफाइल फार वाचनीय झाली आहे.
पुस्तक - सुसाट जॉर्ज
लेखक - निळू दामले
पृष्ठे - २१०
प्रकाशन - राजहंस
किंमत - २५०₹
अजिंक्य कुलकर्णी
Good
ReplyDelete