झाडांनाही बुद्धी असते...
झाडं ही जंगलाचा पाया आहेत. मुळात जंगल म्हणून आपण जे पाहतो किंवा जंगल म्हणून जे काय आपल्याला माहित आहे, असं जे आपण समजतो त्यापेक्षा ते कित्येक पटीने आपल्याला माहीत नसतं! जंगल हे समजून घ्यायचं असेल तर पीटर व्होलेबिन किंवा सुझान शिमार्ड यासारख्या जंगल तज्ञांकडून ते समजून घ्यावं लागतं. जंगल हे जितकं जमिनीच्या वर असतं त्यापेक्षा कित्येक पटीने ते अदृश्य स्वरूपात जमिनीच्या खाली असतं. जंगलामध्ये झाडांच्या खाली मातीत अगणित असे जैविक मार्ग असतात. हे मार्ग झाडांचा एकमेकांशी संवाद घडवून आणतात. एकमेकांशी जोडतात. संपूर्ण जंगलाला एकजीव करण्याच्या मार्गात हे भूमिगत मार्ग मोठी भूमिका बजावतात. हे भूमिगत जैविक मार्ग म्हणजे एका झाडाची मुळांनी दुसऱ्या झाडाच्या मुळांशी संवाद साधने हे होय. जगदीश चंद्र हे 'झाडांना देखील संवेदना असतात' या शोधाचे जनक म्हणून ओळखले जातात. तर सुझान या 'झाडांना देखील बुद्धिमत्ता असते' या शोधासाठी म्हणून ओळखल्या जातात.
सुझान लहान असताना त्यांच्या घराजवळ एक मोठे पाईनचे झाड कोसळले. त्या झाडाखाली त्यांचा पाळीव कुत्रा अडकला. सुझान यांच्या आजोबांनी त्या कुत्र्याला वाचवण्याचीसाठी धावपळ केली; पण त्या लहान वयातही सुझान यांना त्या मोडून पडलेल्या पाईन वृक्षाच्या मुळांनी विचार करायला प्रवृत्त केले. सुझान सांगतात की,"त्याक्षणीही मला झाडांच्या मुळांची आणि मातीची ताकत जाणवली. मुळं आणि माती हे जंगलाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. मला याबद्दल अधिक जाणून घ्यायचं होतं म्हणून मी वनशास्त्र (फाॅरेस्ट्री) शिकायला घेतलं". त्या कॉलेजमध्ये शिकत असताना काचेच्या एका विशिष्ट परीक्षानळीत (व्हिट्रो) पाईनच्या एका बियाच्या मुळातून दुसऱ्या पाईनच्या बियाच्या मुळात कार्बन डाय-ऑक्साइडची वाहतूक करू शकतो हे निदर्शनास आले. पण हे सर्व घडत होतं फक्त प्रयोगशाळेत. पण मग मुळांमार्फत कार्बन-डाय-ऑक्साईडच्या वाहतूकीचा हाच प्रकार खऱ्या जंगलात प्रत्यक्ष होत असेल का? सुझान म्हणतात की," मला त्यावेळीही असं वाटलं होतं की झाडं सुद्धा जमिनीमधून काहीतरी देवाण-घेवाण करत असावेत". त्यांनी काही शास्त्रज्ञांना आपला हा विचार बोलून दाखवला. त्या शास्त्रज्ञांनी सुझान यांची खिल्ली उडवली. या संशोधनासाठी पैसे मिळवणे ही देखील एक अवघड गोष्ट होऊन बसली होती. पंचवीस वर्षांपूर्वी त्यांनी मग किर्र जंगलात काही प्रयोग केले. तीन वाणांच्या (पेपर बर्च, डग्लस फर आणि वेस्टन रेड सिडर) त्यांनी जवळजवळ ऐंशी प्रतिकृती तयार केल्या. त्यांचा अभ्यास करताना सुझान यांच्या एक गोष्ट निदर्शनास आली कि बर्च आणि फर हे भूमिगत रित्या एकमेकांच्या संपर्कात आले पण, सीडर सोबत मात्र ते संपर्क साधू शकले नाही. सिडर चे एक स्वतंत्र भूमिगत विश्व होते.
सुझान यांनी या तीनही वाणांच्या झाडांवर प्लॅस्टिकचे आच्छादन टाकले जेणेकरून त्यांना सूर्यप्रकाश तर मिळेल पण हवेतला कार्बन डाय आॅक्साईड मिळणार नाही. कार्बन डाय आॅक्साईड जर नसेल तर झाडं प्रकाश संश्लेषण प्रकियेतून अन्न तयार कसे करणार ? इथेच या प्रयोगाची मोठी गम्मत आहे. सुझान यांनी त्या प्लॅस्टिक आच्छादनातून इंजेक्शन च्या मार्फत झाडांच्या पानात कार्बन डाय आॅक्साईड जो सोडला त्या कार्बन डाय आॅक्साईड मध्ये त्यांनी कार्बनचा एक समस्थानीक (Carbon Isotope) वापरला. साधारणपणे हवेतल्या कार्बन डाय आॅक्साईड मध्ये C12 हे समस्थानिक असते. तर या प्रयोगात सुझान यांनी C14 हे समस्थानिक वापरले. आता बर्च च्या मुळांकडून फरच्या मुळांकडे जर कार्बन डाय आॅक्साईड गेला तर तो इंजेक्शन मधून सोडलेला असणार हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी गायगर काउंटर, मास स्प्रेक्ट्रोस्कोपी सारखी आधुनिक यंत्र वापरली. हे तपासण्यासाठी त्यांनी बर्चवरचे आच्छादन काढलं तेव्हा आश्चर्यकारकरित्या 'खर्रर्र' असा आवाज आला. हा आवाज प्लॅस्टिक आच्छादन काढल्याचा नव्हता. मग फर वरचे आच्छादन काढले त्यावेळीही 'खर्रर्र' असा आवाज आला. सिडरच्या बाबतीत मात्र हा आवाज आला नाही. या सर्व प्रयोगातून सुझान म्हणतात कि 'झाडं बोलतात'. ते जमिनीखालून एकमेकांशी संवाद साधतात. पण हा संवाद रासायनिक संयुगांच्या मार्फत असतो इतकचं. झाडं आणि जंगलं ही अशी इतकी महत्वाची आहे. सुझान यांचा हाच प्रयत्न आहे की आपली जंगलांकडे बघण्याची दृष्टी बदलायला हवी.
अजिंक्य कुलकर्णी
खूपच इंटरेस्टिंग झाला आहे हा लेख. तुझ्या चौफेर वाचनाचा, नवीन बाबी समजून घेण्याच्या वृत्तीचा आज जरा जास्तच हेवा वाटला.
ReplyDelete- मनीषा
Thank you 😊
Deleteअजिंक्य सर आपणाकडून नेहमी खूप काही नवे नवे शिकायला मिळते.आजचा लेख प्रचंड विचार करायला लावणारा !! मला तरी. मानव हा प्रचंड बुद्धिमान प्राणी आहे पण त्याच्या 'मुळांत' संवादाची ,भावनांची , देवाण - घेवाणाची प्रचंड कमतरता जाणवते आहे हे नक्क्की. यासाठी मानवी मुळांच्या संशोधनात मोठा वाव आहे.त्यासाठी सुझान सारख्या सुजाण शास्त्रज्ञांची गरज वाटते.
ReplyDeleteखरं आहे.
Deleteधन्यवाद सर...
ReplyDeleteयाबाबत मी कधी विचारच केला नव्हता. यावर आणखी संशोधन होणं खुपच गरजेचं आहे. ज्यामुळे भविष्यात जंगल वाढ करुन, वृक्षांचे संगोपन करण्यात खुपखुप फायदा होईल...
होय.
Delete