समाजवादाचा एक निरलस सात्विक चेहरा.

स्थळ पुणे,साने गुरुजी नुकत्याच मॅट्रिकला आलेल्या काही मुलांना घेऊन फर्ग्युसन काॅलेजच्या मागच्या टेकडीवर घेऊन जातात आणि मुलांना शपथ घ्यायचे आवाहन करतात, गुरुजी म्हणाले,"गोखल्यांनी इथेच देशसेवेची शपथ घेतली व जीवनभर पाळली. तुम्हीही शपथ घ्या की आपली मायभूमी स्वतंत्र होण्यासाठी तुम्ही सर्वस्व अर्पण कराल.या पुढच्या स्वातंत्र्य लढ्यात आपण तुरूंगातच भेटू!". याच किशोरवयीन मुलांच्या समुहात एक साधा मुलगा होता नाव होते गणेश प्रभाकर प्रधान (ग.प्र.प्रधान) उर्फ प्रधान मास्तर. आज २६ आॅगस्ट प्रधान सरांचा जन्मदिवस. आजपासून (२६/०८/२०२१) त्यांची जन्मशताब्दी सुरु होते आहे. त्या निमित्ताने लिहिलेला हा ब्लाॅग. 


           पुढे १९४२ च्या गांधींच्या चलेजाव आंदोलनात सहभागी झाल्यामुळे येरवडयाच्या तुरूंगात साने गुरूजींच्या सोबत राहण्याचा योगही आला. फर्ग्युसन मध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून २० वर्षे नोकरी केली. सक्रिय राजकारणात यायचे तर नोकरी सोडावी लागेल अशी सक्त ताकित फर्ग्युसन चे प्राचार्य भाटे सरांनी त्यांना नोकरीवर रूजू करून घेताना दिली होती. कौटुंबिक कारणास्तव त्यांनी ती मान्य केलीही. दरम्यान च्या काळात लग्न झाले, आपल्या पत्नीला त्यांनी लग्नानंतर डाॅक्टर केले. सौभग्यवतींकडून प्रधान सरांनी नोकरी सोडून सक्रिय राजकारणात येण्याची परवानगी मागितली ती त्यांनी दिली कारण बऱ्यापैकी आर्थिक स्थैर्यही आलं होतं आणि प्रधान सरांच्या आतला चळवळीचा कार्यकर्ता काही केल्या स्वस्थ बसु देईना. म्हणून आता पुर्णवेळ राजकारणात उडी घेऊ शकतो इतका आत्मविश्वास आल्यावर म्हणजेच लग्नाच्या १५-१६ वर्षांनंतर त्यांनी राजकारणात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले होते. पुढे १८ वर्षे आमदारकी केल्यानंतर त्यातून आता आपण निवृत्त झाले पाहिजे हा विचार प्रधान सरांचा पक्का झाला होता. परंतु त्यांच्या या निर्णयामुळे पुण्यातली आपल्या समाजवादी पक्षाची एक जागा कमी होणार होती म्हणून मास्तरांनी अपल्या निर्णयाला मुरड घालावी असा जोर राजारामबापू पाटील धरत होते. नानासाहेब गोऱ्यांनी मात्र राजारामबापूंचे काहीएक न ऐकता प्रधान सरांना पक्ष सेवेतून सहज मुक्त केले. नानासाहेब गोऱ्ह्यांना प्रधान सरांची भूमिका अगदी मनोमन पटली होती की,जोपर्यंत हातपाय चालताहेत तोपर्यंतच प्रधान सर उत्तम साहित्य लिहू शकतील! पुढे प्रधान सरांनी 'साधना' चे संपादकपदही सात-आठ वर्षे भूषवले. प्रधान सरांमध्ये खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतितील आश्रम पहायला मिळतात शैशवात- विद्याभ्यास, तारुण्यात- गृहस्थ, उतारवयात- राजकारण व इतर व्यापातून सन्यास. नंतर ते एक व्रतस्थ जीवन ते जगत होते. त्यांनी मृत्यूपत्रात (जे नरेंद्र दाभोळकरांकडे गुप्त ठेवले होते व मृत्यूनंतरच साधनेच्या अंकात छापावे अशी हमी घेतली होती) आपले सदाशिव पेठेतलं (पुण्यातील लोक समजू शकतील सदाशिव पेठेत घर असणे म्हणजे काय!) राहते घर ज्याची आज किंमत कोटीच्या घरात असेल ते साधना ट्रस्टला दिले व आपली आयुष्याची उरलेली गंगाजळी साडेतीन लाख रुपये (विस वर्षापुर्वीचे हं) विविध संस्थांना दान करुन टाकले. 

         मराठवाडा विद्यापीठाला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिले पाहिजे ही मागणी त्यांनी विधिमंडळात मांडली होती. नामांतरनाच्या चळवळीचे नेते कैदेत होते त्यांनी हा प्रस्ताव विधिमंडळात मांडण्यास प्रधान सरांना विरोध केला होता. विधिमंडळात प्रस्ताव मांडल्यामुळे नामांतर चळवळीचे नुकसान होईल असे मत शरद पवार, रा.सू. गवई यांचे होते. नामांतरनाच्या बाजूच्या लोकांच्या दबावामुळे प्रधान सरांनी तो प्रस्ताव विधिमंडळात मांडला व सभागृहाने तो फेटाळून लावला. याबद्दल प्रधान सरांना बऱ्याच जनांच्या रोषाला सामोरे जावे लागले. प्रधान सरांनी आमदारांच्या गलेलठ्ठ पेंशन योजनेचा जो प्रस्ताव विधीमंडळात मांडला गेला होता त्याला त्यांनी कडाडून विरोध केला होता. जेव्हा पुण्यात महात्मा गांधी यांना भेटायला अरूणा असफअली आल्या होत्या तेव्हा त्यांना सुखरूप गांधींची भेट घेऊन परत स्टेशन वर पोहोच करायची जोखमीची जबाबदारी प्रधान सर व त्यांचे एक मित्र या दोघांवर होती. दोघांनी ती चोख पार पाडली. लोकमान्य टिळकांवरचे पुस्तक असो वा 'साता उत्तराची कहाणी' सारखी राजकीय कादंबरी प्रधान सरांच्या ह्दयाला एक सल फार टोचू लागली की आपण डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांवर आपल्या पुस्तकांमध्ये काहिच न लिहून आपल्या स्वतःसोबत अप्रामाणिक राहत आहोत. हा आंबेडकरांवर आपण अन्याय करत आहोत. आगोदरच्या पुस्तकात आपण बाबासाहेबांचा फक्त जुजबी उल्लेख केला ही खंत त्यांना स्वस्थ बसू देईना. म्हणून अंतरात्म्याशी प्रामाणिक राहण्यासाठी त्यांनी बाबासाहेबांवर "डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दांत" नावाचे एक नितांत सुंदर पुस्तक लिहिले.

               अरूण टिकेकर प्रधान सरांबद्दल म्हणतात की, " आपले दुर्दैव असे की आपला समाज अशा व्यक्तींना जाहीर पणे वंदन तर करतो, त्यांचे गोडवेही गातो परंतु त्यांच्यापासून चार हात लांब राहतो.स्वतःची, स्वतःच्या गुणांची प्रसिद्धी न करणाऱ्यांच्या वाट्याला त्याच्या आदर्शवत जीवनाबद्दल योग्य पोचपावती देत नाही. अर्थात् त्याची अशा व्यक्तींना पर्वाही नसते.पण ते समाजाचे नुकसान असते, ते समाजाला कळत नाही. याचे वाईट वाटते". 

            ग.प्र.प्रधान हे जरी समाजवादी पक्षात होते तरी कोणत्याही एकांगी विचारसरणी त्यांना मानवणारी नव्हती आणि मनाच्या या मोकळेपणामुळेच विविध राजकीय व सामाजिक विचारांच्या लोकांत त्यांची ऊठबस असे. याचेच दर्शन त्यांच्या 'साता उत्तराची कहाणी' या राजकीय बखरीतून दिसून येते. प्रधान सर हे कार्यकर्ते म्हणून पत्रकार म्हणून कसे होते? हे मला त्यांच्या 'आठा उत्तराची कहाणी' या पुस्तकातून समजले. मुलाखत घेतल्यानंतर मुलाखतीचा ड्राफ्ट मुलखतकर्त्याला दाखवायचा जेणेकरून भविष्यात त्याची अडचण होवू नये (किती ही सभ्यता,नम्रता).मुलाखतकर्त्याकडून हिरवा कंदिल आल्याशिवाय मुलाखत छापायची नाही. आजच्या सारखे सोशल मिडियासारखा भान सोडण्याचा तो काळ नव्हता. या पुस्तकात प्रत्येक पक्षांच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांच्या मुलाखती आहेत. या मुलाखतीतून एक गोष्ट स्पष्ट जाणवते की कार्यकर्त्यांच्या मनाविरूद्ध केवळ पक्षश्रेष्ठी लोकांच्या निर्णयाचा या लोकांच्या विचारसरणीवर काय परिणाम होतो त्यांची मनेही कशी दुखावली जातात जेव्हा पक्षाची किंवा पक्षश्रेष्ठींची भूमिका ही जेव्हा ideology ला तिलांजली देणारी असते.

    अभिजात साहित्याचे ते निस्सिम भोक्ते होते. याच साहित्याच्या प्रेमातून त्यांनी टाॅलस्टाॅयला उद्देशून पत्रं लिहिली ती 'लेटर्स टू टाॅलस्टाॅय' या नावाने पुस्तक रूपाने प्रकाशित आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून जी मोठी नावे आहेत दत्ता देशमुख, दत्ता ताम्हणे, रामभाऊ म्हाळगी या नेत्यांच्या पंगतीत प्रधान सरांचे नाव घेतले जाते. आजच्यासारखे नव्हते आजचा विरोधी पक्षनेता पुढच्या पाच वर्षात सत्ताधारी पक्षात प्रवेश करणारा. या जुण्या लोकांची नैतिकता ही पोपड्याप्रमाणे गगेच गळून पडणारी अजिबात नसे. जी.एं च्या कित्येक पुस्तकांना प्रधान सरांची प्रस्तावना आहे. आणि-बाणी च्या काळात यांनी काय केले, कसे राहिले हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होवू शकतो. 

         श्री.ग.माजगावकर आणि गिरिश प्रभुणे हे एकदा प्रधानांच्या व्याख्यानाला गेले होते. तेव्हा मास्तरांनी त्यांच्या नातीचा एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले की माझी नात म्हणते, "तुम्ही मराठीत का लिहिता? मला हे 'साता उत्तराची ...का काय ते वाचताही येत नाही." प्रभुणेंनी याचं वृत्त लिहिलं. माजगावकरांनी ते बाजूला ठेवलं. तेव्हा माजगावकर म्हणाले की," ज्या व्यक्तीने आपल्या नातीला मराठी शिकवलं नाही त्यांनी मराठी भाषेवर व्याख्यान द्यावं का?" प्रभूणेंनी मास्तरांसोबतचे अनुभव तरुण भारत मध्ये लिहिले आहे . तो लेखही सोबत जोडतो आहे. 


संदर्भ:-

साता उत्तराची कहाणी.

आठा उत्तराची कहाणी.

'साधना' चा ग.प्र.प्रधान विषेशांक.


अजिंक्य कुलकर्णी

Comments

Popular posts from this blog

मनुष्य गौरव दिन!

रेणुका देवी यात्रोत्सव - अस्तगाव

विज्ञानव्रती एच.सी.वर्मा