तुका झालासी कळस!

तुकोबांच्या वैकुंठगमनाला साडेतीनशे वर्ष झाल्या निमित्ताने दिलिप पुरूषोत्तम चित्रे यांनी लिहिलेलं आणि शब्दालय प्रकाशनातर्फे प्रकाशित छोटेखानी पुस्तक म्हणजे 'तुकोबाचे वैकुंठगमन' हे होय.  एकाच वेळी संतत्व आणि कवित्व यांचा सुरेख संगम आपल्याला महाराष्ट्रातील कित्येक संत चरित्रात पहायला मिळतो. माऊली ज्ञानेश्वरांपासून ही परंपरा सुरू होऊन तुकोबारायांनी त्यावर कळस चढवला. सर्वसामान्य माणसाचे जीवन हे स्वार्थाच्या कसोटीवर चालणारे असते. संतांना वैयक्तिक स्वार्थ नसतो. माणसे स्वार्थी असतात हे संतांना ठाऊक असते. माणसे लुच्ची, लफंगी, इच्छा, वासना, विकार, महत्वाकांक्षा, अहंकार यत गुरफटलेली असतात याची संतांना जाणीव असते. तरी माणसांच्या सर्व चुका, त्यांचे सर्व अपराध, त्यांची सर्व वैगुण्ये सहन करण्याची शक्ती संतांमध्ये असते. आईवडीलांपेक्षाही संतांची माणसांवरची माया जास्त वत्सल असते असे तुकोबांनी सांगितलेले आहे.आपल्या सभोवारच्या माणसांच्या जीवनव्यवहाराची कठोर चिकित्सा तुकोबांनी आपल्या काव्यात केली आहे. १९ व्या शतकातील आपल्या मराठी समिक्षकांना एक वेडाने पछाडलेले आहे ते म्हणजे 'सामाजिक जाणीव'. ज्ञानेश्वरांना , एकनाथांना सामाजिक जाणीव नव्हती का ? मग संस्कृत मधली गीता प्राकृतात कशाला आणली असती त्यांनी? या सर्व वारकरी कवींनी जी प्रबोधन चळवळ उभी केली ती युरोपातील प्रबोधनाच्या चळवळीपेक्षा श्रेष्ठ वाटायला हवी आपल्याला. कारण हे प्रबोधन रक्त न सांडता झाले आहे. तुकोबाराय हे बुद्धीमान, महाजनकी करणारे तसेच वाणी देखील होते. पण प्रभातच्या 'संत तुकाराम' ने तुकोबारायांना बाळबोध करून टाकले. आज सगळीकडे तुकोबांच्या ज्या प्रतिमा आहेत त्या बहुतेक करून विष्णुपंत पागनीसांच्या आहेत.

              येशू ख्रिस्ताला सुळावर चढवलं गेलं आणि तो ईश्वरी चमत्काराने तीन दिवसांनी परत पुनर्जीवीत झाला असा समज आहे. तसाच तुकोबांच्या 'गाथेच्या जलदिव्याची'' कहानी आहे. पाण्यातून कोरड्याठाक वह्या बाहेर कशा आल्या? या मिथकाचे रहस्य त्याचे तथ्य समजून घ्यावे लागेल. तुकोबांना विरोध करणारी पुरोहित, पुराणिकांची,धार्मिक भ्रष्टाचार करणाऱ्यांची एक मोठी फळी असावी. तुकोबांची वाढती लोकप्रियता, त्यांच्या नैतिक शिकवणीने दंभावर केलेले प्रहार ह्या विरोधकांना असह्य झाले. तुकोबांच्या वह्या बळकावून त्या दडपून ठेवण्याचा किंवा नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला असावा. त्यामुळे सर्वसामान्य जनता खवळली असावी. तुकोबांचा तेरा दिवसांचा 'सत्याग्रह' लोकांना संघटित करणारी क्रांतिकारक कृती होती. त्यांचे विरोधक घाबरले. ज्या वह्या आपण बुडवल्या असे त्यांनी जाहीर केले होते त्या तरंगून वर आल्या असे त्यांनाच जाहीर करावे लागले. त्या बुडवण्याची हिंमत त्यांना न झाल्याने त्या सुरक्षितच होत्या. मराठी साहित्याच्या दृष्टीने विचार केल्यास तुकोबारायांच्या 'गाथेचे जलदिव्य' ही घटना फार क्रांतिकारक अशीच म्हणावी लागेल. तुकोबांच्या काव्याची दखल समकालीन इतर संत कवींनी देखील घेतल्याची नोंदी फार सापडत नाही ही देखील एक मोठी खंत आहे.

                 "लक्षूनिया योगी पाहाती आभास।

                   ते दिसे आम्हास दृष्टीपुढे॥"

तुकोबांचा हा अभंग जर बारकाईने अभ्यासला तर असे दिसते की सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरचा देव हा खरं तर त्यांच्या आवाक्यातला आहे हा आत्मविश्वास तुकोबा सर्वांना देतात. जी गोष्ट फक्त योग्यांनाच प्राप्त होऊ शकते असा सर्व सामान्याचा समज झाला होता. जे अप्राप्य आहे ते तुम्ही बहुजनही प्राप्त शकता, त्यावर तुमचाही अधीकार आहे हा प्राण बहुजनात तुकोबाराय भरताना दिसतात. कर्मकांडाच्या जंजाळातून वारीला मोकळे करणारे हे सर्व डोळस संत पण आज आपण त्यांच्याच नावाने वारीला कर्मकांडात तर गुरफटून टाकत नाही आहोत ना? जी वाट प्रबोधनाची होती तिच्यावर अंद्धश्रद्धांच्या रांगा तर लावत नाही आहोत ना आपण? तुकोबांच्या आणि आपल्या काळाच्या मधल्या अडीचशे-तीनशे वर्षांच्या काळात मराठी वाङ्‌मयाने कोणतीही मोठी झेप घेतलेली दिसत नाही. आध्यात्म ही हिमतीची बाब आहे आणि जीवन ही जोखीम आहे ही तुकोबांची शिकवण आहे. निरक्षर मराठी समाजाला वाङ्‌मयीन संवेदना देण्याची सुरूवात तुकोबारायांनी केली होती. 


पुस्तक - तुकोबांचे वैकुंठगमन 

लेखक - दिलिप पुरूषोत्तम चित्रे

प्रकाशन - शब्दालय

किंमत - १००₹

पृष्ठे- ६०


अजिंक्य कुलकर्णी 


Comments

  1. मधल्या अडीचशे तीनशे वर्षांच्या काळात मराठी वाडमयाने कोणतीही मोठी झेप घेतलेली दिसत नाही, या तुमच्या विधानावर अधिक विस्ताराने लिहीलंत तर वाचायला खूप आवडेल.

    ReplyDelete
  2. तुकोबांच्या गाथा इंद्रायणीत बुडविल्या ह्या आख्ययिकेचे तुम्ही छान वर्णन करून सत्य स्थिती काय असावी हा तर्क विश्वासरह रित्या मांडलात

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मनुष्य गौरव दिन!

रेणुका देवी यात्रोत्सव - अस्तगाव

विज्ञानव्रती एच.सी.वर्मा