स्पिरीट आॅफ स्काॅटलंड
एखाद्या भूप्रदेशावर निसर्गाने फक्त मुक्तहस्ते उधळण नाही तर निसर्गाने तिथे दौलतजादा केलेली असते. असाच निसर्गसंपन्न प्रदेश म्हणजेच स्काॅटलंड! स्काॅटलंड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम कोणती गोष्ट येते ? हो हो... बरोब्बर... तीच 'ती'. स्काॅटलंडने जगाला दिलेली ती जगप्रसिद्ध भेट म्हणजे स्काॅटलंड व्हिस्की अर्थात स्काॅच! पण मग स्काॅटलंड हा फक्त स्काॅच साठीच ओळखला जातो का? राॅबर्ट बर्न, सर वाॅल्टर स्काॅट यांच्या साहित्यापासून ते अत्ता आत्ताच्या डग्लस स्टुअर्ट लेखकांच्या साहित्याने समृद्ध आहे स्काॅटलंड. जगभरातील साहित्य प्रेमींना आजही ज्या एका काल्पनिक पात्राने खिळवून ठेवले आहे तो राॅबीन हूड हाही स्काॅटीशच.
नमनाला एव्हढं घडाभर तेल वहायचे कारण मी नुकतीच कुणाल कपूरचं निवेदन असलेली डिस्ने हाॅटस्टारवरील 'स्पिरीट आॅफ स्काॅटलंड' ही ट्रॅव्हल सिरिज पाहीली. यू ट्यूब वरही ती उपलब्ध आहे. स्काॅटलंडमध्ये स्काॅच व्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टी ज्यासाठीही स्काॅटलंड ओळखला जातो. एडिंबरो या राजधानीच्या शहराने तर कित्येक साहित्यांना खाद्य पुरवलं आहे. शेक्सपिअरच्या नाटकांसाठी एडिंबरो मध्ये स्वतंत्र नाट्यगृह असायची. एक असा महाल जो स्काॅटलंडच्या एक हजार वर्षाच्या इतिहासाचा साक्षीदार आहे तो महाल म्हणजे 'ग्लाम्स कासल' (Glamis Castle). हा महालाने केवळ खऱ्या गोष्टींनाच नाही तर कित्येक काल्पनिक गोष्टींनाही भरपूर रसद पुरवली आहे. कित्येक अभिजात कलाकृतींमध्ये या महालाला मानाचे स्थान आहे. शेक्सपिअरच्या 'मकबेथ' मध्येही याच ग्लाम्स कासलचा उल्लेख येतो. Ghillie Basen ह्या सुविख्यात स्काॅटीश फुड ॲन्ड ट्रव्हल रायटर. त्या स्काॅटलंडमधल्या अशा भागात राहतात जिथे ना धड पाणी आहे ना धड वीज. आणि ही जग हिंडून आली आहे. चिक्कार खपाची पुस्तके आहेत तिची. या लोकांची एक धारणा असते कि निसर्गाला जसं आहे तसं ठेवा कालवे काढून, वीज आणून त्या जागेचं व्यावसायिकीकरण करू नका.
या सिरिज मधला 'Saint Andrew's golf course' वरचा भाग मला सगळ्यात आवडला. स्काॅटलंड बद्दल लिहायचं, बोलायचं आणि स्काॅचचा उल्लेख टाळला तर तो अक्षम्य अपराध होईल. या सहा एपिसोडच्या सिरिज मध्ये प्रत्येक एपिसोड मध्ये स्काॅटलंड मधील स्काॅच तयार करणाऱ्या एकेका ब्रँडेड डिस्टिलरीची धावती सफर होते. फार पाहण्यासारख्या आहेत त्या डिस्टीलरी. स्काॅचच्या एकेका बॅच साठी केव्हढी मेहनत घेतात ही लोकं! आपण हिऱ्याला जपतो त्याहून जास्त ही मंडळी स्काॅचच्या बॅचला जपतात. कमालीची काळजी घेतात कारण एक बॅच फेल गेली तर पंचवीस पंचवीस वर्षाची मेहनत फेल जाते. स्काॅचचा फ्लेवर, त्याचा रंग, त्याला ज्या अमेरिकन oak casks मध्ये कमीतकमी चार वर्ष तरी ठेवले जाते. सिंगल माॅल्ट आणि मॅच्यूअर व्हिस्कीच्या Ballentine's, Chivas Brother, Glenlivet Distillery पाहून मद्यपीच्या तोंडाला पाणी नाही सुटलं तरच नवल. Kelvingrove art gallery बद्दलचा एपिसोड पाहताना एक वाक्य मला फार आवडलं you realize that being a craftsmen requires courage, conviction and undaunted spirit whenever its playing golf or creating masterpiece or blending Whiskey.
स्काॅटलंड बद्दल पाहताना एक royal luxury दिसते. ती luxury अशी नैसर्गिक वाटते. ओढून, ताणून, corporated वाटत नाही. स्काॅटलंड मध्ये निसर्ग आणि आधुनिकता याचा सुरेख मिलाफ झालेला दिसतो (कमीतकमी सिरिज मध्ये तरी तसा वाटतो). निसर्गाला फार हानी न पोहोचवता आधुनिकतेची कास धरलेली दिसते. स्काॅटलंड म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो बॅगपाईपर वाजवणारा बॅन्ड आणि त्यांचा तो गणवेष. त्याला Kilt असं म्हटलं जातं. Kilt हा स्काॅटलंडचा पारंपारिक पोशाख आहे. एक Kilt तयार करण्यासाठी नऊवार साडीच्या कमीतकमी दीडपट कापड लागतं. जर एक प्राॅपर Kilt शिवायचा असेल तर तो शिवण्यासाठी टेलरला कमीतकमी दीड महिना लागतो. तेव्हा शक्य असल्यास ही सिरिज नक्की पहा.
अजिंक्य कुलकर्णी
Comments
Post a Comment