ढगातून पडलेली मुलगी!

   वेळ होती १९७१ च्या ख्रिसमसच्या आदल्या दिवशीची. त्यावेळी युलियाना कपके (Juliane Koepeke) ही सतरा वर्षाची एक तरुण मुलगी होती. आपल्या आईसोबत तिने पेरूची राजधानी लिमा इथून पुकाल्यासाठी फ्लाईट पकडली होती. त्यांचं शेवटचं गंतव्यस्थान होतं पेंगुआना. पेंगुआनाचं स्थान हे ॲमेझॉन च्या घनदाट जंगलाच्या पोटात आहे. जिथे एक जैविक संशोधन केंद्र देखील आहे. युलियानाची आई ही त्या केंद्रात गेल्या तीन वर्षापासून काम करत होती. युलियानाची आई मारिया आणि तिचे वडील हॅन्स विल्यम कपके हे दोघेही प्राणी शास्त्रज्ञ. लहानपणापासूनच युलियानावर आईवडिलांमुळे प्राणीशास्त्राचे चांगले संस्कार झालेले होते. जणू प्राणीशास्त्र हे त्यांच्या रक्तातच होतं. युलियानाला कधी स्वप्नातही वाटलं नसेल की आपलं हेच प्राणिशास्त्रातलं ज्ञान पुढे आपला जीव वाचवण्यास कामी येणार आहे ते! युलियाना आणि तिची आई मारिया या दोघी विमानात बसल्या आणि काही वेळाने लाॅकहीड -L- 188A या विमानाने हवेत झेप घेतली. उड्डाण होऊन अवघे पंचवीस मिनिटंही झाली नसतील, जेव्हा विमान पेंगुआनामधील ॲमेझाॅनच्या घनदाट जंगलावरून उडत असताना अचानकपणे उठलेल्या एका चक्रीवादळाच्या कचाट्यात सापडलं. या छोटेखानी प्रवासी विमानात जवळजवळ एक्याण्णव प्रवासी प्रवास करत होते. वादळामुळे विमानाच्या इंजिनात बिघाड झाला. भरीसभर म्हणून विमानाच्या एका इंजिनावर वीजही कोसळली. विमानातील पायलट, हवाईसुंदरीसह प्रवाशांची अक्षरशः पाचावर धारण बसली. विमानाच्या खिडकीच्या बाजूला युलियाना बसलेली होती तर तिच्या शेजारी तिची आई. विमान जेव्हा हेलकावे खाऊ लागलं तेव्हा तिची आई तिला म्हणाली, "आशा करुया की सर्व ठीक होईल." वीज पडल्यामुळे विमान चिरलं गेलं आणि त्यातील प्रवाशांसह त्या विमानाचेही तुकडे त्या घनदाट जंगलात इतस्ततः विखुरले गेले. त्या एक्याण्णव प्रवाशांपैकी फक्त युलियाना ही एकटी प्रवासी जिवंत राहिली. 

   युलियाना तिच्या विमानातील प्रवासी खुर्चीसह गटांगळ्या खात खात खाली पडली. युलियानाच्या विमानाचे उड्डाण झालं त्याच्या फक्त अर्धा तास आधी त्याच विमानतळावरून अजून एका विमानाचे उड्डाण होणार होतं पण त्या विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचं उड्डाण रद्द केलं गेलं होतं. त्या विमानातून दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध जर्मन दिग्दर्शन व्हर्नर हरजोग हे आपल्या 'अगीरे, द रॅथ आॅफ गाॅड' या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी पेरू देशातील पेंगुआनाच्या त्याच जंगलात आपल्या साथीदारांसोबत आले होते. जंगलाच्या एका टोकाला अगीरेचे चित्रीकरण चालू होतं तर जंगलाच्या दुसऱ्या भागात युलियाना ही कोवळी पोर जगण्यासाठी धडपडत होती. दैव बलवत्तर म्हणून ती वरून वरुन पडताना खुर्ची खाली व ती वर अशा पद्धतीने पडली. पण तरीही ती गंभीरपणे जखमी झालीच होती. तिचं गळ्याजवळचं हाड(काॅलर बोन) मोडलं होतं. तिच्या दंडाला बोटभर जखम झाली होती. त्या जखमेत चौथ्या पाचव्या दिवशी आळ्या पडायला सुरूवात झाली होती. हात लुळा पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. दिग्दर्शक हरजोग यांनी युलियानावर तयार केलेल्या 'विंग्ज आॅफ होप' या माहितीपटात ते म्हणतात की,"सळसळतं तारुण्य ओसंडून वाहत असताना, आयुष्याची गुलाबी स्वप्नं पाहणारी ही पोर २३ डिसेंबर १९७१ रोजी आपल्या शाळेत एका स्पर्धेत बक्षीस मिळवून रात्री विमानात बसली होती. चोवीस तारखेला संध्याकाळी तिला आपल्या मित्रासोबत प्राॅम नाईटलाही जायचं होतं. हे स्वप्न विमान अपघाताने तिच्यापासून हिरावून नेलं." विमान चिरलं गेलं तेव्हा युलियानाच्या आईच्या तोंडून शब्द बाहेर पडले की 'धिस इज द एन्ड!' विमानातून खाली येताना आपलं आता काय होणार आहे याचं स्पष्ट चित्र युलियानाच्या डोळ्यासमोर तरळू लागलं. गटांगळ्या खात खात खाली येताना तिची शुद्ध हरपली. शुद्धीवर येण्या आगोदरची शेवटची गोष्ट तिला जी आठवत होती ती फक्त ही की आपण खाली ब्रोकोलीच्या आकाराच्या झाडांच्या जंगलात पडत आहोत. सात आठ हजार फुटावरून पडून तिचं वाचणं हा एक चमत्कारच म्हणावा लागेल.

     सन त्झू यांच्या 'द आर्ट आॅफ द वाॅर' या गाजलेल्या पुस्तकात ते एक मोलाचा मिलिटरी सल्ला देतात, तो म्हणजे 'नो युअर एनिमी'. तुमच्या शत्रूला ओळखा. या सल्ल्याला स्थळकाळाचं कोणतही बंधन नाही. हा सल्ला फक्त युद्धातच वापरता येतो असं नाही. जर व्यवस्थित समजून घेतलं तर नैराश्य, शारीरिक व्याधी, निसर्गाचा प्रकोप, संसर्गजन्य रोग, विपरीत परिस्थिती या सर्वांमध्ये हा वरील सल्ला महत्वाचा ठरू शकतो. आपल्याला आपल्या प्रश्नाची माहितीच नसेल तर मात्र आपण चांगलेच गोत्यात येऊ शकतो. तर मग ॲमेझाॅनच्या किर्र जंगलात जिथे सूर्यप्रकाशालाही येण्यास मज्जाव आहे अशा ठिकाणी एक मुलगी स्वतःला कशी जिवंत ठेवू शकली? आपल्या पुढ्यात आता काय वाढून ठेवलय याचा अंदाज जर आला नाही तर हा अस्तित्वाचा लढा जिंकणं अधिक अवघड होऊन बसतं. पण युलियानाजवळ या विपरीत परिस्थितीतही एक गोष्ट होती ती म्हणजे 'शी वाॅज अ पर्सन विथ नाॅलेज.' ढगातून पडल्याच्या प्रचंड मानसिक धक्यातून सावरणं तिला आवश्यक होतं. भीतीने ती गलितगात्र झाली होती. इतक्या प्रचंड प्रमाणात घाबरण्याची ही तिची आयुष्यातली पहिलीच वेळ होती. आपल्या जन्मदात्या आईसह इतर प्रवाशांचे मृतदेहांचा खच आजूबाजूला पाहून तिला अर्धांगवायूचा झटकाच यायचा बाकी होता. तिने विमानाच्या ढिगाऱ्यातून गरजेपुरत्या काही गोष्टी हस्तगत केल्या आणि मानवी वस्ती शोधण्याचा प्रयत्न करू लागली. तिचे आईवडील प्राणी शास्त्रज्ञ असल्याने तिला वर्षावनांची थोडी माहिती होती. हा विमान अपघात होण्याआधी तिने आईसोबत त्यांच्या संस्थेसाठी पेरूमधील काही वर्षावनांमध्ये एक वर्ष घालवलं होतं. अगदी तिच्याच शब्दात सांगायचं झाल्यास,"माझ्या ज्ञान शस्त्रांना आजमावण्याची वेळ आली होती". कारण ती काही कुठे थंड हवेच्या ठिकाणी फिरायला आलेली नव्हती! 

     प्राणीशास्त्राची थोडी माहिती असल्याने तिला हे माहीत होतं की विषारी साप हे वाळलेल्या पाल्यापाचोळ्यावर असतील तर  त्या पाचोळ्यावरचा साप चटकन ओळखणं हे अवघड असतं. तिला विविध पक्ष्यांचे आवाजही माहीत होते. मातीवरील विशिष्ट चिन्हांवरून पाण्याचा स्रोत जवळपास आहे हे ओळखण्याचं तंत्र तिने वडिलांकडून शिकून घेतलेलं होतं. या गोष्टीचा फायदा तिला जंगलात एक मोठा झरा शोधण्याच्या कामी आला. युलियाने आपल्या 'व्हेन आय फेल फ्राॅम द स्काय' या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, गिधाडं तिचा घास घेण्यासाठी टपूनच बसलेली होती. विषारी साप, डास, विषारी कोळी, विषारी वनस्पती यांची भिती सतत तिच्या मानगुटीवर बसलेली असायची. वर सांगितल्या प्रमाणे जखमांमध्ये आळ्या व्हायला लागल्या होत्या. उष्णतेमुळे उष्माघात होईल की काय अशी परिस्थिती होती. पण तिला यावरचे प्रथमोपचार माहीत होते. प्रश्न होता तो तिथे हे उपचार मिळण्याचा. मग या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा तर तिला त्याच्या वडिलांचे शब्द आठवले, की "जेव्हा तुम्ही एखादी समस्या सोडवण्याचा निश्चयच करता तेव्हा तुमची यशस्वी होण्याची शक्यता वाढलेली असते. तसेच पाण्याचा प्रवाह हा तुम्हाला कुठेना कुठेतरी मानवी वस्तीकडे घेऊन जातो." युलियानने हे दोन सल्ले आमलात आणायचे ठरवले. शोधलेल्या मोठ्या ओढ्याच्या मध्यभागातून ती चालत राहीली. मध्यभागातूनच का? तर, मध्यभागी मगर, सुसरी व पिराना नावाच्या माश्यांच्या जातीपासून धोका कमी असतो. काठांवर हा धोका जास्त असतो. जखमांमध्ये पडलेल्या आळ्यांवर अँटीसेप्टीक म्हणून पेट्रोल हे तात्पुरतं वापरता येऊ शकत होतं पण जंगलात पेट्रोल आणणार कुठून? जंगलात ती अशी दहा दिवस भटकत राहिली. पाण्याच्या सोबत चालत राहिली आणि एका मानवी वस्तीवर जाऊन पोहोचली. त्या लोकांनी तिला जखमेवर लावायला पेट्रोल दिलं आणि अकराव्या दिवशी तिला शहराजवळ बोटीने नेऊन सोडलं. अशा या दिव्यातून गेल्यावर मग ती आपल्या वडिलांजवळ पोहोचली. युलियान आता म्युनिक शहरातील बव्हेरियन स्टेट कलेक्शन आॅफ झुलाॅजी या संस्थेतून ग्रंथपाल या पदावरून निवृत्त झाल्या आहेत.

अजिंक्य कुलकर्णी

Comments

  1. निसर्ग माणसाला धाडस शिकवतो हे खरे आहे.

    ReplyDelete
  2. खूप छान मांडणी केली आहे शब्दांची

    ReplyDelete
  3. किसी चीज को अगर हम पुरे सिद्त से चाहें तो पुरी कायनात आपके साथ खडी हो जाएगी !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मनुष्य गौरव दिन!

रेणुका देवी यात्रोत्सव - अस्तगाव

विज्ञानव्रती एच.सी.वर्मा