रेणुका देवी यात्रोत्सव - अस्तगाव

एकदा का चैत्र महिना सुरु झाला की गावागावात प्रत्येकाला चाहूल लागते ती आपल्या गावातील ग्रामदेवतांच्या यात्रेची. चैत्रात झाडांना जशी नवी पालवी फुटते तसेच मरगळलेल्या मनाला उत्साहाची पालवी फुटते ती या यात्रा उत्सवांमधून. दिवसेंदिवस काबाडकष्ट करून जेरीस आलेल्या शरीराला थोडा विसावा आणि कंटाळलेल्या मनानेही पुन्हा उत्साहाची भरारी घ्यावी हाच तर मूळ उद्देश असतो आपल्या सण उत्सवाच्या मागे. त्याला थोडे धार्मिक अधिष्ठान दिले जाते/गेले आहे इतकचं. पण या गावोगावच्या यात्रा, वेगवेगळे उत्सव हे चैत्र महिन्यानंतरच का येत असावे बरं ? या प्रश्नाचे उत्तर आपल्या कृषि संस्कृतीशी संबंधित आहे. चैत्रापर्यंत रब्बीचे पिकं काढून झालेले असतात. शेतकऱ्यांच्या गाठीशी थोडासा पैसाही आलेला असतो. उन्हाळा सुरु झाल्यामुळे शेतीची कामेही थोडी मंदावलेली असतात. आजकाल या काळात मुलांच्या परीक्षा देखील जवळजवळ संपलेल्या असतात. पण हे परीक्षांचे कारण झालं आजचं. या रिकाम्यावेळेत करायचे काय ? खाली मन शैतानका घर होता है असं जे म्हटलं जातं ते आपलं मन तसं सैतानी होऊ नये त्यासाठी त्या मनाला कुठेतरी चांगल्या कामात गुंतवावे लागेल. आता ते मन गुंतवायचंच ठरलं तर मग ते काम ईश्वराच्याच कामात का गुंतवू नये ? हा खरा त्यामगचा विचार. वर्षभर धान्याच्या रुपाने 'तू' आमच्या झोळीत जे काही भरभरून टाकलस त्याबदल्यात कामाच्या धबडग्यात तुला साधं थँक्यूही म्हणायला जमलं नाही आम्हाला. ते जे सार्वजनिक रूपाने आपल्या ग्रामदैवताला थँक्यू म्हणनं आहे ना ते म्हणजेच 'गावाकडच्या यात्रा'. गावोगावच्या या यात्रा हे ग्रामीण समाजजीवनाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. गावजत्रा हे सामाजिक -सांस्कृतिक इतिहास सांगणारे महत्वाचे संसाधन आहे. यात्रेला आर्थिक, सामाजिक तसेच राजकीय पैलू आहेत. कारण यात्रा ह्या खरेदी-विक्री, जात-पंचायतीच्या बैठका, विवाहाची नाती जुळविणे, राजकीय व्यवहार, धार्मिक कर्मकांड, आनंद उपभोगण्याचे असे एक मिश्र ठिकाण असते. म्हणूनच यात्रा ह्या लोकांच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग असतात. गावयात्रांचा अभ्यास समाजशास्त्रात तसा फारसा झालेला नाही. भारतीय समाजव्यवस्थेतील हे गावयात्रांचं महत्व ओळखले ते एका जर्मन अभ्यासकाने. गुंथर सोन्थायमर हे त्या अभ्यासकाचे नाव. 


     महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ म्हणजे माहूरची रेणुका देवी हे. माहूर हे तसं देवीचे अर्ध शक्तिपीठ आहे. म्हणजे माहूरच्या रेणुका देवीची मूर्ती ही गळ्यापासून वरती इतकीच आहे. मात्र आमच्या अस्तगावच्या रेणुका देवीची मूर्ती ही मात्र पूर्ण उभी अशी आहे. तर चैत्र वद्य सप्तमी म्हणजेच हनुमान जयंतीनंतर सात दिवसांनी आमच्या अस्तगाव या गावच्या ग्रामदेवता 'रेणुका मातेची यात्रा' षष्ठी, सप्तमी आणि अष्टमी अशी तीन दिवस पार पडते. मध्ये कोरोनामुळे दोन वर्ष काही यात्रा भरू शकली नाही. गाव असं भकास झाल्यागत वाटायचं गेली दोन वर्ष. त्याचा सर्व वचपा लोकांनी चालू वर्षात काढलेला दिसतोय इतकी तुंबळ गर्दी होती यात्रेला. यात्रेचा पहिला दिवस (षष्ठी) हा देवीच्या पालखीचा. या दिवशी देवीच्या मंदिरात सकाळी मंत्रोच्चाराच्या नादब्रम्ह गजरात देवीला पहाटे रुद्राभिषेक घातला जातो. देवीची साग्रसंगीत पूजा देवीचे पुजारी श्री रमेश कुलकर्णी (माझे वडील) करतात. त्याच दिवशी संध्याकाळी देवीची सुंदर अशी पालखी सजवली जाते. त्यात देवीची एक प्रतीकात्मक मूर्ती ठेवली जाते. गावातील भजनी मंडळातले वारकरी आगोदर श्रीराम मंदिरासमोर टाळ, मृदुंगाच्या साथीने भजनं म्हणतात. त्यानंतर पालखी श्रीराम मंदिरापासुन प्रस्थान करते. गावातील मंदिर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी तसेच गावातील प्रतिष्ठित मंडळी या पालखी मिरवणुकीला जातीने हजर असतात.  सर्वात आधी देवीची विधिवत पूजा होते ती श्री सोमेश्वर भुसनळे यांच्या घरी, तो मान त्यांच्या घराचा. ही पूजा करतात ते गावातील देवीचे दुसरे पुजारी श्री पुरूषोत्तम लक्ष्मण कुलकर्णी व त्यांचे दोन चिरंजीव तुषार आणि अभिजित यांच्या हस्ते. (व्हिडिओतील दोघे)

        पालखी निघाल्यावर गावातील मातंग समाजातील लोक हलगी वाजवतात. इतर बहुजन वर्गातील मंडळी सुद्धा आपापली पारंपारिक वाद्ये वाजवतात जसे की धनगर समाजातील लोक आपले पारंपरिक बिरोबाचे डफ वाजवतात. ह्या डफाचा आवाजाने पालखीसमोर नाचावेसे वाटले नाही तरच नवल! सर्वात महत्वाचे म्हणजे गावातील ह्या सार्वजनिक मिरवणूका जे एक वाद्य वाजवल्या शिवाय निघत नाही ते वाद्य म्हणजे 'ताशा' अाणि तो वाजवण्याचा मान आहे मुस्लिम समाजातील सिकंदर भाई इनामदार ह्यांच्या घराला. आज ते हयात नाहीत म्हणून त्यांचे चिरंजीव ख्वाजा भाई हा वारसा पुढे चालवत आहे. अशा पद्धतीने पालखी श्रीराम मंदिरापासुन प्रस्थान करते. पालखी उत्तरेला शिंपी गल्लीतुन खाली उतरत सुतारगल्लीत प्रवेश करते. ज्याच्या दारासमोर पालखी येईल त्याने पुढच्या घराच्या दारापर्यंत पालखीचे भोई (पालखीला खांदा देणारे) व्हायचे. अशा पद्धतीने पालखी संपूर्ण गावाला प्रदक्षीणा घालत शेवटी रेणुका देवीच्या मंदिरात पोहोचते.

   ही पालखी गावभर मिरवली जाते. ही गोष्टच किती छान आहे ना की विश्वाला चालवणारी ती जगतजननी जगदंबा स्वतः आपल्या दारात येते दर्शन द्यायला! असा विचार करताच मी हरखून जातो. माझा अशा पद्धतिने विचार करणे हे चुकीचेही असू शकेल. मग पालखी पुढे जात राहते व गावातील सर्व वारकरी संप्रदायातील भजनीमंडळ भजने, गौळणी, जोगवा म्हणत पालखीला पुढे घेऊन जातात. देवाच्या नामाचा अखंड जयघोष चालू असतो.पालखीची एक मशाल असते त्यामशालीसाठी मिरवणूकित प्रत्येकजन आपल्या यथाशक्ति तेल देत असतो. ते तेल गोळा करुन वर्षभर मंदिरात जो दिवा लावला जातो त्यासाठी वापरले जाते. अशा प्रकारे सर्व गावभर ही पालखी मिरवली जाते व देवीच्या मंदिरात आणली जाते. मंदिरात परत भजन, जोगवा, आरती होते आणि परत पालखीचा परतीचा प्रवास श्रीराममंदिराकडे होतो. पालखी राममंदिरात ठेवून दिली जाते.

यात्रे चा दुसरा दिवस (सप्तमी) हा जत्रेतील मुख्य आकर्षणाचा दिवस असतो. या दिवशी देवीचे "भळंद" (वरचा फोटो पहावा) मिरवणूकीचा कार्यक्रम असतो. भळंद म्हणजे आपला जो पिण्याच्या पाण्याचा जो माठ असतो ना त्याचा वरचा भाग कापून काढून त्याच्या खालच्या गोल खापरी भागात कापसाची सरकी, तेलात भिजवलेले पलिते हे सर्व त्यात टाकून त्याची प्रथम पूजा केली जाते. ही पूजा श्री विजय कचेश्वर कुलकर्णी यांच्या घरी विधीवत केली जाते. तेथून भळंद राममंदिराच्या जवळ आणले जाते व तेथे त्यात अग्नि प्रज्वलित केला जातो. असे हे भळंद मग गावभर पुन्हा पालखी प्रमाणे मिरवले जाते. गावातील सर्व पारंपारिक वाद्याच्या गजरात त्याची मिरवणूक निघते.  विशेष उल्लेख करावा असे काही असेल तर ते म्हणजे २०-३० वयोगटातील तरूण मुलांचा यात सहभाग लक्षणिय होता. श्री पुरूषोत्तम कुलकर्णी यांचे नातू चि. हिमांशू याने सुद्धा यात भाग घेतला. ते इटुकलं पिटुकलं इतकं सुंदर नाचलं कि उपस्थितांची मने त्याने अक्षरशः जिंकून घेतली. जणूकाही भविष्यात भळंद्याची धुरा मीच सांभाळणार याचे सुतोवाचच त्याने केले. हे पेटलेले भळंद हातावर घेऊन नाचावे लागते. मग ही मिरवणूक देवीच्या मंदिरात पोहचते व तिथे परत भजन, गौळण, जोगवा म्हटला जातो. दरवर्षी प्रमाणे आमचे मित्र दिनेश त्रिभान यांनी असला अफलातून जोगवा म्हटला की उपस्थित सगळे भावीक मंत्रमुग्ध झाले होते. काय तो आवाज म्हणावा! त्याची जोगवा म्हणतानाची तल्लीनता ही फार विलक्षण असते. ती समोर बसून अनुभवल्याशिवाय नाही कळणार. दिनेशला सुंदर अशी पखवाजाची साथ दिली ती योगेश महाराज जेजुरकर व इतर भजनी मंडळातील सदस्यांनी.

दिवस तिसरा(अष्टमी) हा शिळी यात्रा म्हणून ओळखला जातो. या दिवशी हनुमान मंदिराच्या प्रांगणात देवीच्या नावाने जागरण गोंधळ सुरु असतो. भळांद्याची मिरवणूक संपली की हे गावोगावचे वाघे मुरळी जागरण गोंधळाला सुरूवात करतात. मारूतीच्या मंदिर प्रांगणात कित्येक लोक अगदी मन लावून हे जागरण ऐकतात. या तिसऱ्या दिवशी बाजारतळावर खेळणी, मिठाईची दुकाने, पाळणे यांनी बाजारपेठ फुलून जाते. पाय ठेवायला जागा नसते इतकी गर्दी असते. कित्येकांच्या घरी लेक जावयाला बोलावलेले असते. ह्या माहेरवाशीनी जत्रेत खरेदीची हौस भागवतात. कितीतरी गोष्टी अगदी रोज सहज उपलब्ध असल्या तरी यात्रेत खरेदी करण्याची हौस काही कमी होत नाही. शहरात शिक्षणासाठी, नोकरीसाठी गेलेली मुलं घरी दोन दिवस येवून जातात. सासुरवासिणी माहेराला येतात. गावाला अक्षरशः उधान आलेले असते. शिकायला बाहेर गेलेल मुलं गावातील आपल्या मित्रांना भेटतात. एकत्र भेळीच्या दुकानात भेळ, गोडीशेव, खुर्मा, जिलेबी खातात. फार आनंद असतो या उघड्यावरच्या पालं ठोकुन तयार केलेल्या भेळीच्या दुकानात खाण्यात. दुपारी चार वासता कुस्त्यांचा हगामा होतो. आजुबाजुच्या गावातील मल्ल कुस्त्यांसाठी येतात. अश्याप्रकारे हा यात्रोत्सव आनंद ,उल्लासात पूर्ण होतो. उदयोस्तु जगदंबे उदयोस्तु ! शुभं भवतु .

अजिंक्य कुलकर्णी

8208218308

Comments

  1. मस्त वर्णन! प्रत्यक्ष सहभागी झाल्यासारखं वाटलं वाचताना.

    ReplyDelete
  2. अस्तगावची यात्रा व त्यात नाचवले जाणारे भंदे याविषयी ऐकुण होतो..बर्याच वेळा आमचे सासरे कै.दिगंबर जोशी यांनी आग्रह केला पण योग आला नाही...
    वाचून यात्रेचे चित्र नजरे समोर आले व सर्व समाजाचे एकत्रितपणे यात्रेत आनंदाने सहभागी होणे भावले पुढच्या वर्षी पहीले दोनही दिवस जोडीने नक्की येणार तुमचा पाहुनचार नक्की घेणार
    त्र्यंबकराव गाढे कुलकर्णी कोळपेवाडी

    ReplyDelete
    Replies
    1. आवर्जुन या. स्वागत आहे तुमचे.

      Delete
  3. खुप सुंदर वर्णन.. पुढच्या जत्रेला आधीच आठवण करुन द्या.. नक्की येऊ..

    ReplyDelete
  4. तुमच्या गावच्या जत्रेचे अतिशय सुरेख वर्णन केले आहेस अजिंक्य.

    जत्रेच्या दरम्यान तीनही दिवस चालणाऱ्या उपक्रमांचे विस्तृत वर्णन केल्यामुळे लेख मनाला जास्त भावला.

    आम्हा शहरी लोकांना ह्या गोष्टी अनुभवायला मिळत नाही याची खंत तर आहेच पण त्याचवेळी तुम्ही या सर्व गोष्टी अनुभवताय त्यामुळे तुमचा हेवा सुद्धा वाटतो.

    ReplyDelete
  5. आपल्या गावाच्या यात्रेचे अतिशय सुंदर वर्णन तुम्ही या लेखातून केले आहे..😊

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद 😊

      Delete
  6. 👌👌👌🌹🌹🌹

    ReplyDelete
  7. यशोधन जोशी13 April 2023 at 12:20

    फक्त पोस्टी फिरवता यात्रेला बोलवत नाही हे बरोबर नाही.

    झकास जमलेला आहे लेख अजिंक्य 👌

    ReplyDelete
    Replies
    1. नक्की बोलावतो पुढल्या वर्षी.

      Delete
  8. अतिशय सुंदर लेख आहे sir

    ReplyDelete
  9. आपण केलेली वर्णन ऐकल्यावर सर्व यात्रा डोळ्यासमोर दिसू लागली,या वर्षी गावाची यात्रेची खुप आठवण येते, या वर्षी गावाची यात्रेला येऊ नाही शकलो.

    ReplyDelete
  10. 😍खूप खूप मस्त 🙏🏻अजिंक्या सर.... 🥰ज्या गावात आपण जन्म घेतला, लहानपणी पाससून बघत, (जगत )आलेली आपल्या कुलदेवत (कुलस्वामिनी )जगतजननी 🙏🏻देवी ची यात्रा उत्साह,, हा चे अश्या प्रकार वर्णन, 👌🏻woww 🤩खूप खूप छान 👌🏻🙌🏻🙏🏻सर 🙏🏻जगदंबा माते ची यात्रा. आपल्याजन्म स्थाना ची यात्रा एक प्रकार ची ओढ लावते, लागते 🥰🥰पुन्हा पुह्ना वाचंवास.. वाटतेय 🥰return Read केल मी 😃🥰🤗❤️thank you 🙏🏻धन्यवाद सर एवढ मस्त छान प्रकारे माहिती, दिल्या बदल,...... (तुमची students )😊हू 👍🏻

    ReplyDelete
  11. खूप खूप,छान लेख आहेत, 🙏🏻👍🏻🙌🏻💐

    ReplyDelete
  12. Replies
    1. छान माहिती दिली

      Delete
  13. हा लेख वाचुन इतका ध्यानस्त झालो की लेखात दर्शविलेल्या प्रत्येक स्पॉटवर जणू मी स्वतः हजर राहून आपल्या उघड्या डोळ्याने सर्वकाही बघत आहे,असे वाटू लागले होते मात्र कुसत्यांचा हंगाम या वाक्यानंतर दोन ओळीत लेख संपला आणि वास्तविकतेशी एकरुप झालो,
    हनुमान जयंती नंतर सात दिवसांनी म्हणजे आज यात्रा आहे का ?,की झाली आहे ?, तसं माझं जन्मगावच अस्तगांव मात्र सध्याला गावात माझे कोणीच नातेवाईक वैगरे नाही, नेहमी गावाची खुप आठवण येते,अधूनमधून कधीतरी राहाता- शिर्डीला जातेवेळी मुद्दामहुन अस्तगांव मार्ग निवडत असतो,मात्र सर्व मित्र मंडळी आपापल्या कामाधंद्याला गेलेली असतात भेट होत नाही,आता यात्रा आहे म्हणून सर्वांची भेट होईल असे वाटत असले तरी त्याची तारीख कळाल्यास येता येणे आणि यात्रेचा आनंद घेणे आणि सर्व जुन्या मित्र कंपनींशी भेट होणे किती आनंदाचे ठरु शकेल? नाहीका.

    पत्रकार शौकत शेख - अस्तगांवकर
    श्रीरामपूर. मोबा: 9561174111


    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर. आपल्या प्रतिक्रियेने छान वाटलं.

      Delete
  14. Yogesh Kulkarni13 April 2023 at 18:42

    खूप छान लेख..keep it up..👍

    ReplyDelete
  15. खूप।छान

    ReplyDelete
  16. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  17. सर, यात्रेचे इतके यथायोग्य सुसूत्र वर्णन या अगोदर फक्त शंकर पाटील यांच्या लेखणीत वाचले होते. तुमच्या लिखाणातून लेख वाचतोय की प्रत्यक्ष एका कोपऱ्यात उभा राहून यात्रा बघतोय अन् अनुभवतोय असे वाटले. खूप उत्सुकता वाढली पुढच्या वर्षी च्याच यात्रेत सहभागी होण्याची. सलाम तुमच्या यात्रेतील परंपरांना, त्या जपणाऱ्या सर्व गावकऱ्यांना, बारा बलुतदार यांना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्या पर्यंत यात्रा इत्यंभूत पोहचविणारे तुम्ही सर्वांना सलाम.
    --- विजय थोरात शिर्डी

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद आपल्या इतक्या सुंदर प्रतिक्रियेसाठी 😊

      Delete
  18. खुप छान सर 🙏

    ReplyDelete
  19. 9 वर्ष अस्तगाव मध्ये S9 न्युज चॅनेल चा प्रतिनिधी म्हणून पत्रकारिता करत होतो तेव्हा यात्रेच्या बातम्याही केल्या पण एवढी सखोल माहिती नव्हती.... भन्यवाद अजिंक्य

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मनुष्य गौरव दिन!

विज्ञानव्रती एच.सी.वर्मा