वह कौन रोता है वहाँ!

  गेली दोन-तीन महिने महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकरी अक्षरशः हैराण झाला आहे. कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ म्हणू नका असा कोणताच भाग नाहीये की ज्याला या अतिवृष्टीचा तडाखा बसला नाहीये. यात सर्वात कहर झाला तो गेल्या दोन आठवड्यात. परतीच्या पावसामुळे तब्बल ३६ लाख हेक्‍टरवरील पिके अक्षरशः मातीमोल झाली आहेत.

 दिवाळीला केवळ दोन दिवस राहिलेले असताना निसर्ग हा असा सर्वत्र कोपला आहे/होता.  खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेला घास या अतिपावसाने शेतकऱ्यांकडून असा हिरावून घेतला. ऑक्टोबर मधील केवळ दोन आठवड्यांत तब्बल १६ जिल्ह्यांना या पावसाने तडाखा दिला. यात तब्बल सव्वा लाख हेक्‍टरवरील सोयाबीनचे पीक नष्ट झाले. शहरांमध्ये पाणी तुंबल्याने नागरिकांचे जसे हाल झाले त्याहूनही वाईट परिस्थिती आज खेडोपाडी आहे. पण आज खेड्यापाड्यातही मोठ्याप्रमाणात पाणी तुंबून राहणे ही समस्या का भेडसावते आहे? या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन जरा विचार करावा लागेल. या समस्येला काही एक असं उत्तर नाहीये. अनेक कोणातून या प्रश्नाकडे आपल्याला पाहता येईल. अतिवृष्टी याला जागतिक तापमान वाढ होणं हे एक कारण आहेच पण, त्याचा नक्की काय व कसा परिणाम होतो आहे आपल्यावर ? प्रथमतः जागतिक तापमान वाढीमुळे दोन्ही ध्रुवांवरील बर्फ वितळतो आहे ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. अंटार्टिका खंडावरील बर्फ वितळल्यामुळे समुद्राच्या पाण्याचे क्षेत्रफळ वाढते आहे त्याचा परिणामस्वरुप पाण्याची पातळीही वाढते आहे. गेल्या काही वर्षात समुद्रातील पाण्याचे हे क्षेत्रफळ वाढले आहे. त्यामुळे सूर्यप्रकाशाखाली पाण्याचे जास्तीत जास्त क्षेत्र येऊ लागले आहे. त्यामुळे जास्त प्रमाणात बाष्पीभवन होऊन जास्त प्रमाणात पाऊस पडण्यात त्याचे रूपांतर होत आहे. याबद्दल हा एक पैलू आपल्याला सांगता येईल. अल निनो तसेच कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे वगैरे ही कारणे तर आहेतच. 

   आता झालंय काय की १९७२ च्या दुष्काळानंतर सगळीकडे रोजगार हमी योजनेअंतर्गत जी नालाबंडिंग (शेतात मोठाले बांध घालणे) ची कामे झाली होती, त्यामध्ये शेताचे बांध हे मोठे मोठे केले गेले होते. ही कामे सगळीकडेच झाली असंही नाही पण एकंदरीत वीस एक वर्षापूर्वी शेताचे बांध हे मोठमोठाले (चार ते आठ फूट रंद) असायचे. शेताच्या शेजारी मोठमोठ्या साइड गटारी असायच्या. या साइट गटारींमुळे अतिरिक्त पाण्याचा नैसर्गिक निचरा व्हायचा. हीच गटारं पुढे गावाबाहेर ओढे नाले यांना जाऊन मिळालेली असायची. बहुतेक ठिकाणी असं दिसून येतंय की शेतकऱ्यांचा या बांधावर आणि साइड गटारीसाठी वापरल्या गेलेला जमिनीवर डोळा असतो. तसेच आपले शेत हे रस्त्यालगत असायला हवे याही कारणास्तव हे बांध व साइड गटारं कोरून शेत थेट रस्ता पर्यंत वाढविण्याची (अतिक्रमण करण्याची) अहमहमिका खेडोपाडी सर्वत्र दिसते आहे. म्हणून अतिवृष्टीमुळे शेतात साठलेले पाणी शेताबाहेर काढायला काही संधीच मिळत नाहीये. शेतकऱ्यांचे हे बांध आणि साइड गटारांवरील अतिक्रमणे हेच महत्त्वाचे कारण आहे शेतात साचून राहिलेल्या पाण्याला आणि पिकांच्या नासाडिला. 

   आज बांध न राहिल्यामुळे दोन शेजारच्या शेतकऱ्यांध्ये कलह निर्माण व्हायला लागले आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतय की आपल्या शेतात पाणी साठून राहू नये म्हणून. मग हे अतिरिक्त पाणी शेतातून काढून दिले तर ते शेजारच्या शेतात जाते. यावरूनही हल्ली गावोगावी तणाव निर्माण होतोय. बरं या भांडणात इतर कुणीच पडत नाही. कारण प्रत्येकाला गावात आपले संबंध इतरांशी चांगले ठेवायचे असतात. शेतीचे नुकसान होण्यास शेतापर्यंत चांगले रस्ते नसणे हे ही एक महत्वाचं कारण आहे. शेताच्या रूंदीकरणाच्या नादात आज रस्त्यांवर म्हणावं असं लक्ष दिलं गेलं नाहीये. जर हे रस्ते चांगले असते तर आज सोयाबीन पिकाचे जेव्हढं नुकसान झाले आहे ते काही अंशी तरी नक्कीच कमी झाले असते. कारण ट्रॅक्टर, मळणी मशिन सारखी साधनं ही ओल्या शेतात जाऊ शकत नाही. तेच रस्ते चांगले असले तर शेतकरी चटकन आपला माल रस्त्यावर आणून या मळणी मशिन मधून काढू शकतो. 


        तिसरा भाग म्हणजे गावठाणातील बखळ जागा. या जागा कोणतेही भविष्यकालीन नियोजन न करता ग्रामपंचायतींनी सरसगट इंदिरा आवास योजने अंतर्गत जे घरकुल मंजूर केले जातात त्यासाठी दिल्या जातात. या योजनेअंतर्गत ज्यांना रहायला घर नाही त्यांना ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा घर बांधण्यासाठी तर दिली जातेच तसेच घरकुलासाठी अनुदानही दिले जाते. ग्रामपंचायत सदस्यांनी आपली मतपेटी सुरक्षित ठेवण्यासाठी या योजनेअंतर्गत घरकुलांच्या खैराती वाटल्या. यासाठी गावातील ओढे-नाले, पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बुजवल्याने भविष्यात भोगावे लागणारे परिणाम याचा कोणताही मागचा पुढचा विचार न करता या जमिनी देऊन टाकायच्या. नगर रचना नियोजन नावाचा कोणताच प्रकार कुठेच (शहर, गाव) अस्तित्वात नाहीये की काय असं दिसतय. यामुळेही सगळीकडेच गावठाणात प्रचंड पाणी साठले गेले. ओढे-नाले बुजवल्यामुळे, अरूंद झाल्यामुळे हे पाणी सहज गावाबाहेर काही जाऊ शकलं नाही.

     शेतीमध्ये सातत्याने होणाऱ्या या नुकसानीमुळे आज खेड्यापाड्यातही तरूणांचा शेतीकडचा ओढा कमी होतो आहे. त्यामुळे शिकलेले तरूण पोटापाण्यासाठी शहराकडे धाव घेताहेत. शिकलेले तरुण शेती करत नसल्यामुळे शेती ही ज्याचं शाळेत डोकं चालत नाही त्याने करायचा धंदा झालाय. या सगळ्याचा अतिरिक्त बोजाही शहरांवर पडतो आहे. या सर्व समस्या सोडवायच्या असतील तर सगळ्यात आगोदर शेतीला प्रतिष्ठा मिळवून द्यावी लागेल. शेतीला प्रतिष्ठा त्याच वेळेस मिळेल जेव्हा ती आर्थिकदृष्टया फायदेशीर होईल. त्यासाठी शेतमालाला योग्य मोबदला मिळायला हवा. गावोगावचे, वाड्यावस्त्यांवरची रस्ते हे पक्के डांबरी हवेत. शेतमाल हा शहरात लगेच विक्रिला नेता यायला उत्तम ट्रान्सपोर्ट हवा. त्यासाठी पुन्हा चांगले रस्ते हे आलेच. शेतमालाला योग्य असं विमासंरक्षण हवं. सोयाबीन काढणीचे सोपे यंत्र हवे. बाजरी,ज्वारी या धान्यांपासून उत्तम खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या रेसिपीज हव्या म्हणजे शहरी लोक याचा जास्त वापर करतील. ज्वारी, बाजरीची मोठी समस्या ही आहे की त्यांच्यापासून तयार केलेल्या भाकरी ह्या डब्यात घेऊन जाता येत नाही किंवा घेऊन जायची लाज वाटते. असं संशोधन करायला हवं ज्यामुळे या दोन्ही प्रकारच्या भाकरी डब्यात नेता येतील. गेल्यावर्षी सोयाबीनला आठ-नऊ हजार रूपये भाव होता तो चालू वर्षी थेट पाच हजार रूपये इतका खाली आलाय. अशाने तरुण शेतीकडे वळणार तरी कसा? आपत्तीच्या इतिहासाकडून आपण काही शिकणार आहोत की नाही? सुप्रसिद्ध हिन्दी कवी रामधारी सिंग दिनकर यांच्या 'कुरुक्षेत्र' या महाकाव्याच्या सुरूवातीच्या दोन ओळी आठवतात. दिनकर म्हणतात की, 

                        वह कौन रोता है वहाँ,

                        इतिहास के अध्याय पर?


                      ~ शेतकरी

अजिंक्य कुलकर्णी

Comments

Popular posts from this blog

मनुष्य गौरव दिन!

रेणुका देवी यात्रोत्सव - अस्तगाव

विज्ञानव्रती एच.सी.वर्मा