कॅप्टन फॅन्टॅस्टिक

मी नुकताच कॅप्टन फॅन्टॅस्टिक हा सिनेमा पाहिला. ॲमेझाॅन प्राईमवर तो पाहण्यासाठी उपलब्ध आहे. या सिनेमाची मध्यवर्ती गोष्ट अशी की यातला मुख्य नायक बेन (व्हिगो माॅर्टेसन) हा विधुर आहे. त्याची प्रिय पत्नी ही एका मनोविकाराशी झुंज देत असताना या जगाचा लवकरच निरोप घेते. बेन हा म्हटला तर जरा जास्तच आडमूठा आहे. त्याच्यावर थोरो या अमेरिकन विचारवंताचा प्रभाव दिसतो. म्हणजे बेन असा विचार करतो की माणसांना शाळा, काॅलेजांची गरजच काय? जे काही शिकायचं असेल ते आपण निसर्गाकडूनच शिकावं. स्वतःला चार भिंतीत कोंडून शिकण्यापेक्षा हिंडावं फिरावं त्यातून जे शिकता येईल ते शिकवं यावर तो ठाम असतो. आपल्या पत्नीवर वैद्यकीय इलाज काम करत नाहीये; तेव्हा बेन एक मोठा निर्णय घेतो की, आपण दोघांनी मुलांसह जंगलात जाऊन रहावं. तेही कायमचं. तस ते दोघे करतात पण. त्याची सहा मुलं घेऊन ते जंगलात राहतात पण. बेन एका मोठ्या बस मध्ये सर्व सोयी करवून घेतो आणि जातो मुलाबाळांसह जंगलात रहायला. सोबत चिक्कार पुस्तक घेऊन जातो ज्यात जेरेड डायमंड च्या गन्स,जर्म्स ॲन्ड स्टिल पासून ते नाॅम चोम्स्कीच्या सर्व पुस्तकांपर्यंत अशी सगळ्यांची पुस्तके असतात. तो मुलांना डावी, उजवी विचारसरणी म्हणजे काय असतं त्यावरचं साहित्यही मुलांना वाचायला देतो. जगातील विविध वाद काय आहेत, त्याबद्दल मुलांकडून अभ्यास करवून घेतो. मानवी शरीरावरची अभ्यासक्रमातील वैद्यकीय पुस्तकांपासून ते मुलांना उंच डोंगर दोऱ्या लावून कसे चढायचे, शिकार कशी करायची, संगीताची वाद्य कशी वाजवायची याचं ट्रेनिंग तो मुलांना देतो. यातून ही मुलं प्रचंड हुशार होतात. नंतर मग या मुलांच्या हुशारीला पंख फुटायला लागतात. त्यांना काॅलेज, युनिव्हर्सिटी मध्ये जावं वाटतं अन् इथे सिनेमा संपतो. मुलं काॅलेज मध्ये जाईपर्यंत जे नाट्य घडतं ते सिनेमात अनुभवण्यासारखं आहे. असं होम स्कूलींग करुन का औपचारिक शिक्षणानेच मुलांचा विकास होतो ? सिनेमाचा प्रभावच असा पडतो की मध्यान्हापर्यंत तर आपण होम स्कुलींग हा औपचारिक शिक्षणाला पर्याय होऊ शकतो ह्या निर्णयापर्यंत आपण येऊन थांबतो. पण पुढे शेवटापर्यंत गेलो की आपला हा विचार बदलतो.

    सिनेमातला नायक बेन याने जसं मुलांच्या बाबतीत निसर्ग आणि आजचं अत्याधुनिक शिक्षण याची सांगड घातली असं काही करण्याचा विचार तरी शिवतो का आपल्याला पालक म्हणून? दोन चार हजार रूपयांचे कपडे जसे हौसेने घेतो आपण मुलांसाठी तसा हौसेने एखादा मायक्रोस्कोप घेऊन दिलाय का आपण कधी मुलांना? शास्त्रज्ञ हे तर आदर्श म्हणून कधी नसतातच मुलांसमोर! निसर्गात आपल्या मनाला Heal करण्याची जबरदस्त ताकद असते. आपला अहंकार तोडण्याची नैसर्गिक शक्ती निसर्गात असते. बरं, या बेन सारखी उदाहरणे नाहीयेत का आपल्याकडे? आहेत की. पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे हे नोकरी सोडून, बायका मुलांवर घरची जबाबदारी सोपवून एक वर्षासाठी नागझिऱ्याच्या जंगलात जाऊन राहिले होते. कालच माझ्या एका मित्राने सांगितले की आता किरण पुरंदरे हे पुण्यातील सर्व घरदार सोडून कायमचे नागझिऱ्याला रहायला गेले आहेत. मारूती चितमपल्ली हे एक मोठं उदाहरण आहे आपल्याकडे. कृष्णमेघ कुंटे बारावीत नापास झाले तर आता वर्षभर काय करायचं म्हणून शिष्यवृत्ती घेऊन ते एक वर्ष मदुमलाईच्या जंगलात संशोधनासाठी निघून गेले. मानसशास्त्रही सांगतं की निसर्गापासून जर आपण तुटलो तर आपला बुद्ध्यांकही कमी होतो. तेव्हा निसर्ग आणि येणारा काळ याची आपल्याला सांगड घालावी लागणार आहे.

अजिंक्य कुलकर्णी

Comments

  1. सर आपण खूपच छान लेखन केलंय. पण आजच्या संकुचित सामाजिक मानसिकतेचा विचार करता असे निर्णय घेणे म्हणजे दिव्यच.शिक्षण व्यवस्था money oriented झाल्याने ज्ञान हा शिक्षणाचा भाग नष्ट झालाय व इन्फॉर्मेशन महत्वाचे झालेय......
    निसर्ग आपला गुरू होऊ शकतो हे आपल्या मनी नाहीच,कारण निसर्ग सोडून शहरीकरणाच्या भौतिकतेचे आकर्षण प्रचंड आहे.पण आपला लेख वाचल्यावर निश्चितच याबाबत विचार करायला हवाच अशी आशा वाटते...
    धन्यवाद

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मनुष्य गौरव दिन!

रेणुका देवी यात्रोत्सव - अस्तगाव

विज्ञानव्रती एच.सी.वर्मा