मन्नू भंडारी
विसाव्या शतकातील हिंदी साहित्याचा अभ्यास करायचा ठरल्यास ज्या लेखिकेचे साहित्य वाचल्याशिवाय, आपल्याला पुढे जाताच येणार नाही अशी प्रतिभावंत लेखिका म्हणजे मन्नू भंडारी! नुकतेच त्यांच १५/११/२०२१ रोजी देहावसान झाले. मन्नूजींनी आपल्या साहित्यातून केवळ स्त्रियांवर होणारा अन्याय चित्रित केला नाही तर, त्यांच्या कादंबऱ्यांतून त्यांनी सशक्त, पुरोगामी स्त्रियांचं चित्रण केलं आहे. जसे आपका बंटी मधील शकुन ही घटस्फोटीत स्त्री. आपका बंटी ही कादंबरी वाचताना वाचक बंटी या आठ नऊ वर्षाच्या मुलाची, आई बापाच्या घटस्फोटामुळे जी मानसिक ओढाताण होते त्यात गुंतून जातो. अर्थात ते महत्त्वाचे आहेच पण आई वडीलांचा घटस्फोट जरी झाला असला तरी शकुन एक स्त्री आहे. स्त्री म्हणण्यापेक्षाही ती एक माणूस आहे. तिलाही पुढे जावंसं वाटतं. पण त्याच बरोबर बंटीसाठी तीचं आई म्हणून आतडंही तुटतं. तिलाही स्वतःचं एक आयुष्य आहे. पण समाज त्याकडे कधी लक्ष देणार नाही. त्या लहान मुलाचं काय होईल? त्याचं भवितव्याचं काय? याचाच विचार समाज करत असेल. पण त्याच्या आईचं काय? शकुन जेव्हा दुसरं लग्न करते तेव्हा असंही वाटू शकतं की ही स्वार्थी आहे की काय? पण तसं नाहीये. उलट शकुन ही नव्या पिढीची, बदलत्या सामाजिक मानसिकतेचे प्रतिनिधित्व करणारी स्त्री वाटते.
मन्नूजींनी चूल आणि मूल या परिघातली स्त्री कधी चितारली नाही. आपका बंटी आणि महाभोज ह्या त्यांच्या कालजयी अशा कलाकृती आहेत. मन्नूजींनी सिनेमांच्या पटकथाही लिहिल्या. मन्नूजी ह्या भारतीय मध्यमवर्गीय समाजाच्या प्रतिनिधी कथाकार आहेत. त्या आयुष्यभर एक स्वाभिमानी, सिद्धांतवादी लेखिका म्हणूनच नावारूपाला आल्या. स्वातंत्र्यानंतर ज्या दोन लेखिकांनी साहित्य जगतातून आपली राष्ट्रीय अशी ओळख निर्माण केली आणि स्त्रियांच्या दबलेल्या आवाजाला आपल्या साहित्यातून वाचा फोडली त्यात पहिला क्रमांक लागतो कृष्णा सोबती यांचा तर दुसरा मन्नू भंडारी यांचा.
मराठी साहित्य विश्वात सत्तरच्या दशकानंतर दलित साहित्याने विद्रोह करत आपला असा एक आवाज बुलंद केला. तो मराठी साहित्यामध्ये एक महत्वाचा पडाव होता. त्याच दरम्यानच्या काळात हिंदी साहित्य विश्वात 'नयी कहानी' नावाचे एक साहित्यिक आंदोलन जोर धरत होते. नयी कहानी या आंदोलनात मोहन राकेश, कमलेश्वर, मन्नूजींचे पती व 'हंस'चे संपादक, लेखक राजेंद्र यादव ही सर्व मंडळी होती. या सर्व मंडळीत स्त्रियांचा पक्ष सशक्तपणे जर कुणी हाताळला असेल तर तो एकट्या मन्नूजींनी. राजेंद्र यादव यांच्या रंगेल स्वभावामुळे मन्नूजींची त्यांच्या सोबत संसार करण्याची इच्छा मेली व ते विभक्त झाले. मन्नूजी विचारांच्या बाबतीत इतक्या स्पष्ट होत्या की त्यांनी आपल्या आत्मचरित्रात आपले पती राजेंद्र यादव यांना सुद्धा सोडले नाही. असं असतानाही राजेंद्र यादव जेव्हा गेले तेव्हा त्यांच्या शोकसभेला त्या आवर्जुन उपस्थित राहिल्या. मन्नूजींची ती कदाचीत शेवटची सार्वजनिक उपस्थिती असावी. कित्येक वर्षांपासून त्या वाचकांपासून शरीररुपाने जरी दुर असल्या तरी आपल्या साहित्याच्या माध्यमातून मात्र त्या कायमच वाचकांसोबत राहिल्या. राहतील. ज्यांनी आपका बंटी, महाभोज आणि यही सच है या कादंबऱ्या वाचलेल्या असतील ते मन्नूजींना कधीच विसरू शकणार नाही. मन्नूजी या केवळ कथाकार,कादंबरीकार नव्हत्या तर महाभोज कादंबरीतून भारतीय राजकारणाच्या पतनाची गाथाच मांडणारी पहिल्या लेखिका होत्या.
आपका बंटी वर जेव्हा सिनेमा आला व त्या सिनेमाच्या निर्मात्या, लेखकाने जेव्हा या कादंबरीची खूपच मोडतोड केली ती काही मन्नूजींना सहन झाली नाही. तेव्हा काॅपी राइट कायद्याखाली त्यांनी निर्मात्यांना कोर्टात खेचलं होतं. मन्नूजींच्या जीवनात आपल्याला कोणत्याही प्रकारचे वैचारिक विचलन दिसून येत नाही. त्यामुळेच पुरस्कार, व्यासपीठ वगैरे गोष्टींचा मोह त्यांना कधी झाला नाही. साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना कधी दिला गेला नाही. उलट त्यांच्यापेक्षा कित्येक पटीने दुय्यम, तिय्यम दर्जाच्या कवीला तो दिला गेला. इतकच नाही तर मन्नूजींना साहित्य अकादमीच्या फेलो म्हणूनही कधी नियुक्त केलं गेलं नाही. या पुरस्कार फिरस्कार गोष्टींची त्यांनी कधी फिकिर केली नाही. वाचकांनीच त्यांना इतकं भरभरून दिलं की असे शेकडो साहित्य अकादमी त्यांच्यावर ओवाळून टाकले तरी कमीच आहे.
सत्तरच्या दशकात जिथे बाॅलिवूड सिनेमावर अँग्री यंग मॅनचं गारुड होतं त्याच काळात मन्नूजींच्या 'यही सच है' वर अमोल पालेकांचा 'रजनीगंधा' हा सिनेमा आला. या सिनेमात स्री च्या चित्रणात जी इमानदारी आहे ती आजही खूप दुर्लभ आहे. हिंदी लेखक, कवी प्रियदर्शन आपल्या एका लेखात म्हणतात की,"हिन्दी सिनेमातील खूप बोल्ड आणि रॅडीकल फेमिनिस्ट सिनेमातही स्त्री चं इतकं सहज आणि स्पष्ट रुप कुणी दाखवू शकलेलं नाहीये." मन्नूजींवर किती आणि काय काय लिहू असं झालंय. तरी इथे थांबतो. जमल्यास वाचा त्यांना. आपका बंटी आॅडीओ स्वरूपात तर महाभोज वर एक नाटक यु ट्यूबवर उपलब्ध आहे. त्यांच्या कित्येक गाजलेल्या कथाही यु ट्यूब वर ऐकायला मिळतील. गरज आहे ती फक्त त्यांचं लिहिलेलं वाचण्याच्या, ऐकण्याच्या इच्छेची.
मन्नूजींना भावपूर्ण श्रद्धांजली
अजिंक्य कुलकर्णी
Lekh chaan hota..Mannu ji vishai..nakkich youtube var ajun information baghel.. samajacha chitran karnarya asha niswarthi Kathakar...kadambarikaar lekhikela salam.
ReplyDelete