शासन, साहित्यिक आणि बांधिलकी

 आणीबाणीतल्या अनुभवाने दुर्गाबाईंना आतून बाहेरून हालवून टाकले होते. शासन म्हणजे लेखकांचे आश्रयदाते आणि लेखक म्हणजे जणू त्यांचे आश्रित. आणिबाणी नंतर दुर्गाबाई स्वतःशीच विचार करु लागल्या की लेखक नि शासक यांच्यामधला संबंध नेमका कसा असावा? काही लेखकांच्या मते तो सौहार्दाचा असावा. पण असा विचार करणे हे पूर्णपणे एकतर्फी आहे. कारण शासनाचा पक्ष हा केव्हाही इतका सामर्थ्यशाली असतो की तो तुमच्या (म्हणजेच साहित्यिकांच्या) सहकार्यास फारसा उत्सुक नसतो. राज्यकर्त्ये स्वतः मोठेपणा मिरवण्यासाठी, "लेखकांना अनुदाने देणे हे सरकार म्हणून  आमचे कर्तव्यच आहे!" अशी भाषणेही करत असतात. पण यात छुपा अर्थ असा असतो की, "आम्ही तुम्हाला दान देत आहोत". आणि बहुसंख्य लेखकांना ही अनुदाने दान वा उपकार न वाटता ती त्यांची हक्काची देणगी वाटते. लेखकांचा दावा हा असतो की शासनाच्या या अनुदानामध्ये दान किंवा उपकार काहीही नसते तर तो जनतेचा पैसा परत जनतेलाच दिला जात असतो. मग प्रश्न असा पडतो जर जनतेचा पैसा जनतेलाच परत द्यायचा असेल तर तो एका विशिष्ट वर्गालाच(लेखक, गायक, खेळाडू इ) का दिला जातो? सुतार, लोहार, चांभार कुणबी यांना का दिला जात नाही? 

    तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली गेली पाहीजे की कोणतेही शासन ही मदत अगदीच फुकट देत नाही, तर शासन ज्यांना ती मदत करते, त्यांच्याकडून त्यांच्या विचारस्वातंत्र्याचे दान मागते. विचारस्वातंत्र्याची किंमत देऊनच शासनाचे सहकार्य पदरात पाडून घेतले जाते. जोवर लेखक शासनाशी मिळतेजुळते घेऊन, नव्हे प्रसंगी नमते घेऊन राहतो, तोवरच शासन व लेखक यांचे संबंध नीट व सौहार्दाचे राहतात. शासनाबरोबरच्या साहित्यिकांच्या संबंधाचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली गेली पाहिजे की, ज्या शासनाकडून आपण पुरस्कार घेणार आहोत त्या शासनाचा चेहरा आणि आत्मा, त्याची जाहीर तात्विक विचारसरणी आणि त्यांची कृती यात एकवाक्यता आहे का? आज शासनाच्या अंतरंग आणि बहिरंग यात प्रचंड तफावत आहे. आज अत्यंत कठीण गोष्ट जर कोणती बनली आहे तर ती ही की शासनाचा चेहरा पाहून आपण त्याच्या अंतरंगाबद्दल, वर्तनाबद्दल कसलाही तर्क काढू शकत नाही. त्यामुळे कळून सवरून किंवा नकळतही लेखकाकडून स्वतःची शस्त्रे शासनाच्या पायावर ठेवली जाणे तेथे अशक्य नसते आणि येथेच लेखकांची अभूतपूर्व फसगत होऊ शकते. कारण लेखकाची शस्त्रे म्हणजेच त्याची कल्पनाशक्ती, त्याची मुक्त विचारशक्ती. ही मुक्त कल्पनाशक्ती नि विचारशक्ती समोरच्या प्रस्थापित वस्तुस्थितीला पर्याय सुचवते. समोरच्या वस्तुस्थितीवर टीका करावयास प्रवृत्त करते. शासनाचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगवेगळे असतात. आज जगातील अनेक लोकशाही राजवटी या नामधारी लोकशाही आहेत. वरवर जाहीर फतव्यातून लोकशाही परंतु कृतीतून हुकूमशाही, लष्करशाही.

     दुर्गाबाई म्हणतात की या बिकट परिस्थितीत शासनावर बारीक लक्ष ठेवतील असे निरपेक्ष लोक समाजात आवश्यक आहेत. हे लक्ष ठेवण्याचं काम करणारे लोक कोण असू शकतात? तर समाजातील विद्वान मंडळी, शिक्षक, लेखक, कलावंत, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक इ. कारण ही मंडळी स्वतंत्र प्रज्ञेने विचार करू शकतात. त्यांना त्या प्रकारचे बाळकडूच मिळालेले असते. दुर्गाबाई म्हणतात की, लेखकांनी शासनाच्या आहारी जाता कामा नये तसेच पुंजीपतींच्याही आहारी जाता कामा नये.  शासनाच्या आहारी गेल्यास तो त्याचे सत्त्व व त्याची लेखक म्हणून असलेली समाजातील विशिष्ट ओळखच गमावून बसतो आणि शेवटी अगदी हतबल बनून राहतो. निष्काम व निर्भय लोकांची एखादी बुद्धिमान फळी जर देशात नसेल तर सरकारच्या दृष्कृत्यांचा सरकारला जाब विचारील असा आवाजच देशात असणार नाही. 

लेखकांची "बांधिलकी" या गोष्टीवरची या पुस्तकातील दोन प्रकरणे मुळातून वाचण्यासारखी आहे. ती दोन प्रकरणे वाचल्यावर मूल्यव्यवस्था धूसर होत चाललेल्या आजच्या काळात आपली बौद्धिक जळमटे दूर होतात. शासन आणि साहित्यिक संबंध यावरची इतकी सुंदर चर्चा माझ्या तरी वाचण्यात याआधी आलेली नाही. सार्त्र, काम्यू, मार्क्स यांच्याही विचारांचे विविध दृष्टिकोन दुर्गाबाईंच्या चष्म्यातून विस्तृतपणे या पुस्तकात वाचायला मिळतात. विचारांच्या बाबतीत, लेखक म्हणून असलेल्या बांधिलकीच्या बाबतीत, मूल्यांच्या बाबतीत, दुर्गाबाईंची आपल्या जीवनात किती स्पष्टता होती हे फार फार प्रकर्षाने जाणवतं. आपल्याला काय करायचं आहे हे समजो अथवा न समजो पण काय नाही करायचंय याची तरी स्पष्ट जाणीव होते हे पुस्तक वाचून! 

पुस्तक - शासन, साहित्यिक आणि बांधिलकी

लेखिका - दुर्गा भागवत

प्रकाशन- देशमुख आणि कंपनी

किंमत - २२५₹

पृष्ठे- १५६

अजिंक्य कुलकर्णी

Comments

Popular posts from this blog

मनुष्य गौरव दिन!

रेणुका देवी यात्रोत्सव - अस्तगाव

विज्ञानव्रती एच.सी.वर्मा