एलिझाबेथ
१५४७ मध्ये इंग्लंडचा राजा आठवा हेन्री याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सहावा एडवर्ड याला अगदी थोड्या काळासाठी राज्योपभोग घेता आला. त्याच्यानंतर त्याची जेष्ठ कन्या मेरी ही सिंहासनावर आरूढ झाली होती. मेरी ही कट्टर कॅथलिक असते. तिला एका मोठ्या व्याधीने त्रस्त केलेले असते. मेरीच्या मृत्यूनंतर तिची प्रोटेस्टंट असलेली सावत्र बहीण एलिझाबेथ ही राज्यावर येते. हीच ती इंग्लंडच्या सुवर्णयुगाची विधाती म्हणून इतिहासात ख्यातनाम असलेली पहिली एलिझाबेथ राणी. शेखर कपूर यांचा एलिझाबेथ (१९९८) हा ब्रिटिश सिनेमा या राणीची कारकीर्द दर्शवतो. राज्यावर आल्यानंतर एलिझाबेथने आपल्या बाह्य व अंतर्गत शत्रूंना दूर करून आपलं आसन कशाप्रकारे सदा सर्वकाळासाठी बळकट केलं याची एक उत्कंठावर्धक कहाणी म्हणजेच 'एलिझाबेथ'
या सिनेमाची सुरुवात ज्या दृश्याने होते त्यात तीन प्रोटेस्टंट पंथीय व्यक्तींना (दोन पुरुष व एक स्त्री) एका भर चौकात सरणावर उभे केले जाते. हातपाय करकचून आवळलेले असतात. स्वतःला सोडवण्यासाठीची याचना, ते आजूबाजूच्या त्यांच्या मृत्यूचा तमाशा पाहायला आलेल्यांकडे अगदी जीवाच्या आकांताने करत असतात. पण उलट ही आलेली मंडळीच त्यांना मरताना पाहण्यासाठी उत्सुक असतात. काय गुन्हा केलेला असतो त्या तिघांनी ? तर, कॅथलिक लोकांच्या प्रभावाखाली असणाऱ्या इंग्लंड मध्ये ते 'पाखंडी' (?) प्रोटेस्टंट धर्माचे पालन करण्याचा प्रयत्न करत असतात हा. इतक्यात तिथे धर्मगुरू येतात व त्या तिघांवरचे आरोप पत्र वाचून दाखवतात. सर्व कसं एकदम कायद्याच्या चौकटीत व्हायला हवा ना! नंतर त्या तिघांना जाळून टाकले जाते त्यांच्या आक्रोशाने अक्षरशः आसमंत आक्रंदून जातो.
एलिझाबेथ (केट ब्लांचेट) ही प्रोटेस्टंट धर्माला मानणारी असते. इंग्लंडची राणी मेरी ही मात्र कट्टर कॅथलिक. ती लवकरच ख्रिस्तवासी होते. पण कपटी, कटकारस्थानात पटाईत असलेला ड्युक ऑफ नोर्फोक (ख्रिस्तोफर एक्लेस्टन) हा अगोदरच मेरीला प्रॉटेस्टंट धर्माविरुद्ध कारवाई करायला भाग पाडत असतो. एलिझाबेथ ही मेरीची सावत्र बहीण. मेरीला मूलबाळ नसतं, म्हणून राज्याची पुढील वारसदार ही एलिझाबेथच होणार असते. ड्युक ऑफ नोर्फोक याला मात्र हे नको असतं. तो मेरी च्या मार्फत एलिझाबेथ चा काटा काढण्याचा प्रयत्न करतो पण, पुराव्या अभावी त्याला अपयश येतं. एलिझाबेथ ही इंग्लंडची महाराणी होते. राज्य कारभाराबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असणाऱ्या एलिझाबेथचा आता सामना होतो एकाचढ एक अशा धूर्त, कपटी, मुत्सद्दी, राजकारण धुरंदर बिशपांसोबत, इतरही राज्यकर्त्यांसोबत ज्यांना प्रॉटेस्टंट राणी नको असते. एलिझाबेथ सोबत असतो तिचा प्रियकर लाॅर्ड राॅबर्ट डडली (जोसेफ फिनेस) परंतु, राॅबर्टने आगोदरच एक गुप्तपणे लग्न केलेलं असतं जे एलिझाबेथ पासून तो लपवून ठेवतो. जेव्हा हे एलिझाबेथला समजतं तेव्हापासून तिचा प्रेमावरचा विश्वास उडतो. तसेच एलिझाबेथ सोबत आणखीन एक व्यक्ती असतो, राज्याचा गुप्तहेर प्रमुख सर फ्रान्सिस वॉल्सिंघम (जेफ्री रश). हा धूर्त, कावेबाज तर आहेस पण आहे मात्र राजनिष्ठ. एलिझाबेथ एका अतितटीच्या प्रसंगी त्याचा सल्ला नाकारते त्याचा मोठा फटका इंग्लंडला बसतो. तो फटका काय बसतो हे मूळ सिनेमातच पाहणे योग्य. राणीचा अजून एक सल्लागार असतो विल्यम सेसिल (रिचर्ड अॅटनबरो) पण हा जरा जुन्या विचारांचा असतो पण राजनिष्ठ आहे. एलिझाबेथ आपले सिंहासन वाचण्यासाठी पुढे काय काय करते, या चांडाळ चौकडीचा बंदोबस्त ती व वाॅल्सिंघम कसे करतात हे चित्रपटातच पाहणे उत्तम.
केट ब्लँचेट या आॅस्टेलिअन अभिनेत्रीचे हाॅलिवूड मध्ये पाय जमवण्यामध्ये ह्या सिनेमाने अगदी मोलाची भूमिका निभावली होती. एलिझाबेथ या सिनेमाच्या भरगोस यशानंतर तिला कधी मागे वळून पहावे लागले नाही. शेखर कपूर सारख्या एका भारतीय दिग्दर्शकाने सोळाव्या शतकातील इंग्लंडच्या एका महाराणीच्या जीवनावर एक भव्य चित्रपट तयार करावा व त्याने प्रचंड यश मिळवावं हे निश्चितच भारतीय म्हणून आपल्याला अहं सुखावणारं आहे. शेखर कपूर यांनी एलिझाबेथ ला एक स्त्रीवादी (फेमिनिस्ट) म्हणून दाखवल्याचे सिनेमात आपल्याला वेळोवेळी जाणवतं. हा चित्रपट मध्ययुगीन तसेच रेनेसाँ च्या कालखंडातला आहे. कॅथलिक व प्रोटेस्टंट या दोन्ही पंथांमधला संघर्ष या काळात कोणत्या टोकाला गेला होता त्यावर हा सिनेमा प्रकाश टाकतो. 'जगाला प्रेम अर्पावे' या धर्माच्या मुळ शिकवणीला तिलांजली देत 'सिंहासनाला प्रेम अर्पावे' जणू याचाच चाललेला आटोकाट प्रयत्न या सिनेमात पहायला मिळतो. इंग्लंडचेच मांडलिक असलेले स्काॅटलंड, स्पेन, फ्रान्स यांचे व इंग्लंडच्या राजकीय संबंध किती कचकडीचे होते हे यातून समजून येतं. या मांडलिक देशांची इंग्लंडच्या प्रभावापासून मुक्त होण्याची चाललेली धडपड, त्यासाठी राजकारणाचे शह काटशह पडद्यावर प्रभावीपणे मांडलेत. एलिझाबेथ च्या भूमिकेत केट ब्लँचेट कमालीची सुंदर दिसली आहे. तिचे तांबुस सोनेरी केस, तिची उजळ त्वचा जणू किरणोत्सर्ग करते की काय असा भास होतो आपल्याला. तिच्याकडे असं एक राजबींड रुप आहे की जे एलिझाबेथ म्हणून अगदी फिट्टम फिट्ट बसतं. कॅमेऱ्याने टिपलेले टाॅप व्ह्यू, भव्यदिव्य राजवाडा, स्त्री-पुरूषांचे सोळाव्या शतकातील पोषाख, चित्रपटाचे सेट्स हे सर्व प्रेक्षक म्हणून आपल्याला जणू शेक्सपिअरीअन काळाची सफरच घडवतात.
एलिझाबेथच्या जीवनाकडे पाहिलं तर तीच्या आयुष्यात आपल्याला खुप एकटेपणा जाणवतो. पहिल्या प्रियकराने धोका दिल्यामुळे, प्रेम ही गोष्टच आपल्यासाठी नाहीये अशी जणू तिने आपली समजूतच करुन घेतलेली आहे. त्यामुळे तिने आपल्या हृदयातील प्रेम नावाच्या कप्याला कायमचेच कुलूप लावलेलं दिसतं. शेवटी राज्याभिषेक झाल्यावर ती म्हणते I am your queen and I married with England हे वाक्य उच्चारताना तिच्या चेहऱ्यावरच्या करारी भाव पाहण्यासाठी हा सिनेमा पहावा. या चित्रपटासाठी केटला सर्वोत्तम अभिनेत्रीचे गोल्डन ग्लोब आणि बाफ्टा हे पुरस्कारही मिळालेत. एलिझाबेथ ला ७१ व्या आॅस्कर सोहळ्यात सर्वोत्तम चित्रपट व सर्वोत्तम अभिनेत्रीचे नामांकन होते.
अजिंक्य कुलकर्णी
यु ट्यूबवर असेल तर बघेन.
ReplyDelete