गोल्डा- एक ज्यू माता
इतिहासाला नवे वळण देण्याची क्षमता काही प्रत्येकात नसते. ज्या लोकात असे वळण देण्याची क्षमता असते त्यांची संख्या ही नेहमी अगदी बोटावर मोजण्याइतकीच असते. आणि जगाचा नकाशा बदणाऱ्यांची संख्या तर ती त्याहूनही कमीच! अश्या कमी असणऱ्यांच्या यादीतील एक ठळक नाव म्हणजे इस्त्रायल च्या पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मेअर.
गोल्डाचा जन्म ३ मे १८९८ रोजी युक्रेन(रशिया) मध्ये झाला. गोल्डाचे लहानपण तसे हालाखितच गेले. घरी झायाॅनवादी श्रमिक चळवळीचे लोक येत असत त्यामुळे आपणही या चळवळीत सामील व्हावे हे बालपणीच गोल्डाला वाटू लागले. लहानपणापासुन गोल्डावर तिच्या मोठ्या बहिणीचा शेयना प्रभाव होता. शेयनासुद्धा झायाॅनवादी होती. रशियन लोकांकडून ज्यूंवर होणारे 'प्रोग्रोम' हल्ल्यांना कंटाळून गोल्डाचे वडील आपल्या कुटुंबकबिल्यासह अमेरिकेत स्थाईक झाले. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीला जागत एकदा गोल्डाच्या लहानपणी ती प्राथमिक शिक्षण घेत असताना सिनेगाॅग च्या चौकात झायाॅनवादी श्रमिक संघटनेच्या मोर्चात तिने केलेले भाषण असो वा तिच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावीत म्हणून तिने शाळेच्या मंचावरुन उपस्थितांच्या हृदयालाच साद घातली व चांगला फंड गोळा करुन मुलांच्या पुस्तकांचा प्रश्न सोडवला. या प्रसंगातूनच कदाचित गोल्डाला स्वतःलाच समजायला सुरूवात झाली असावी की आपल्यात नेतृत्वाचे गुण आहेत म्हणून. पुढे तिचा मित्र माॅरिस मेअरसन याच्याबरोबर तिने विवाह केला तो एका अटीवर , की विवाहानंतर दोघांनी पॅलेस्टाईन मधल्या ज्यूंच्या किबुत्झ मध्ये रहायला जायचे.
ज्यूंचे स्वतंत्र राष्ट्र असावे या विचारसरणीला झायाॅनवाद असे म्हणतात व त्याचा उद्गाता होता थिओडोर हर्झल. पुढे नोव्हेंबर १९१७ मध्ये ब्रिटिशांनी ' ज्यूंची स्वतंत्र भूमी पॅलेस्टाईन मध्ये असावी याला मान्यता दिली.' माॅरिस व गोल्डा मेहरावियातील किबुत्झमध्ये राहू लागले, मुलेही तिथेच झाली. मेहरावियात ती सुधारणा करू लागली. तिचे गुण ओळखून डेव्हिड रेमेज यांनी WWLC ची सचिव होशील का म्हणून विचारले तर तिनेही ती जबाबदारी सहज स्वीकारली. गोल्डाने पुरुषांच्या बरोबरीने आपनही काम करू शकतो हा विश्वास त्यावेळच्या ज्यू स्त्रीयांना दिला. असे असतानाही तिने स्रीवादी स्त्रीयांशी वा संघटनांशी जोडून घेऊन स्वतःला मर्यादा घालून घेत नव्हती. उलट स्त्रीवादी संघटनांना तिचे जगणे आदर्शवादी वाटत होते.१९२१ नंतर जगभरातील ज्यू स्थलांतरित होऊन पॅलेस्टाईन मध्ये येत. अरब ज्यूंच्या या येणाऱ्या लोंढ्यांवर योजनाबद्धपणे हल्ला करत. वाढत चाललेली ज्यूंची संख्या व त्यामुळे ज्यूंच्या हाताला काम मिळावे म्हणून अरबी मजुरांना काढून टाकू लागले गेले. यावर चिडून अरब हे घातपात घडवत. तसेच आपल्या जमिनीवर हे ज्यू आक्रमण करत आहे ही भावनाही होती त्यामागे.
हे हल्ले थांबवावे व ज्यूंना स्वतंत्र भूमी मिळावी म्हणून १९३२-३३ मध्ये डेव्हिड बेन गुरिअाॅन व सहकाऱ्यांनी झायाॅनवाद्यांचे पाठबळ मिळवून 'मापाइ' पक्ष वाढवला. पक्ष सोपवत असलेल्या जबाबदाऱ्यांमुळे गोल्डाची कामे वाढत होती म्हणून काही तिने कुटुंबाकडे व मुलांकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. ती त्यांच्या खाण्यापिण्याचे व्यवस्थित पाहत असे. गोल्डा आपण घेतलेल्या निर्णयाबद्दल ठाम असे तो स्वभावच होता तिचा आधी सर्वांचे ऐकून घ्यायचे व एकदा का निर्णय झाला की मग तो तडीस नेल्याशिवाय तिला चैन पडत नसे.प्रसंग पडल्यास ती आपले गुरू बेन गुरिअाॅन यांचा विरोधही सहन करत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोपातील कोणताही देश अरबांना उघड विरोध करत नसे याचे उत्तर एका शब्दात द्यायचे ठरले तर ते आहे 'खनिजतेल'. तेल हे प्रत्येक राष्ट्राची उर्जा आहे. म्हणून तर ब्रिटिशही ज्यूंच्या स्वतंत्र राष्ट्राच्या स्थापनेला उघड दुजोरा देत नसत. ज्यू हे अल्पसंख्यांक होते. जगाच्या व्यासपीठावर त्यांना आवाज नव्हता. तो आवाज भविष्यात गोल्डा या नावाने बुलंद ठरणार होता. गोल्डा विचाराने समाजवादी होती व त्याची तत्वे ती व्यक्तीगत जीवनात कसोशीने पाळीत असे. पण व्यक्तीगत जीवनात टोकाची समाजवादी असलेली गोल्डा जेव्हा पॅलेस्टाईन बाहेर जात तेंव्हा तेथील ज्यूंना कळकळीने आवाहन करत की, काहीही करा....पैसे कमवा .... आणि इकडे पॅलेस्टाईनकडे पाठवा.
राजकीय जबाबदारी सांभाळणाऱ्यांना बऱ्याच वाटाघाटी कराव्या लागतात असे म्हटले जाते, गोल्डा मात्र याला अपवाद आहे. गोल्डा Negotiations मध्ये फार वेळ दवडत नसे. जर Negotiations मध्ये फार काही निष्पन्न होणार नसेल तर बाई त्या बैठकीतुन तडकाफडकी निघून जात असे. ज्यूं साठी काढलेल्या स्थानांतरनाच्या श्वेतपत्रीकेनुसार जगभरातील ज्यू स्थानांतरीत होऊन पॅलेस्टाईन मध्ये येत होते. तेंव्हा ब्रिटिश मात्र श्वेतपत्रिकेत सांगितलेल्या पंच्याहत्तर हजार परवाना पत्रांचा आकडा पार केल्यावर नविन परवाने देत नव्हती. त्यावेळी इंग्लंडमध्ये मजूर पक्ष सत्तेत होता. त्यांना गोल्डाने अगदी ठणकावून सांगितले की नविन वाढीव परवाने द्या नाहीतर जगभरातील ज्यूंना पॅलेस्टाईनमध्ये कसेही करून आणल्याशिवाय आमच्या समोर 'पर्याय नाही'. 'पर्याय नाही' हा त्यावेळी जणूकाही वाकप्रचार झाला होता. ज्यूंयेतर तर मदतीला सर्वबाजुने नकार देत होतेच खुद्द जे ज्यू होते ते जगविख्यात शास्त्रज्ञ आइनष्टाइन यांनीही ज्यूंच्या स्वतंत्र राष्ट्र संकल्पनेला दुजोरा दिला नाही. ते या संकल्पनेच्या समिती समोर कधीच आले नाही.
बेन गुरिआॅन व डाॅ.वाईझमन हे दोघेही थोर होते. डाॅ. वाईझमने अॅसिटोन तयार करण्याची सोपी पद्धत शोधून ती ब्रिटिशांना दिली ज्याचा वापर ब्रिटिशांनी बाँम्ब बनवण्यासाठी केला होता महायुद्धात. त्याबदल्यात आपण ब्रिटिशांकडुन आपल्या राष्ट्रांचा प्रश्न मार्गी लावून घेऊ अशी वाईझमन यांची योजना होती. त्यावेळी इंग्लंड मधील झायाॅनवाद्यांना बेन गुरिआॅन व गोल्डाने सावध केले की, " हे ब्रिटिश आपल्याला दिलेला शब्द पाळणार नाहीत." कोणत्याही परिस्थितीत ज्यूंचे राष्ट्र असलेच पाहिजे ही झायाॅनवाद्यांची भूमिका होती. त्यासाठी ते काहीही करायला तयार होते. एकदा तर गोल्डा एकटी सिमा ओलांडून जाॅर्डनचे राजे अब्दुल्ला यांना भेटायला गुप्तपणे गेली होती. अब्दुल्लांच्या एका दुसऱ्या भेटीत अब्दुल्ला गोल्डाला म्हणाले की " स्वतंत्र राष्ट्राची इतकी घाई का आहे तुम्हाला? " तेव्हा गोल्डा उसळलीच ती म्हणाली " २००० वर्ष कमी झालेत की काय अजून आम्ही गुलामीत रहायचे ". अरबांसोबत असलेल्या तेल संबंधामुळे इस्त्रायलला फार मदत मिळत नव्हती मग आता काय करायचे, राष्ट्रासाठी पैसा कुठुन आणायचा तर गोल्डा समोर एकच मार्ग होता तो म्हणजे अमेरिकेतील श्रीमंत ज्यू. गोल्डाने अमेरिकन ज्यूंना आवाहन केले. पण पैश्यासाठी त्यांच्यासमोर ती लाचार होऊन कधीच गेली नाही. उलट तुम्ही अमेरिकी ज्यूंनी पैसा देणे हे तुमचे कर्तव्यच आहे असे म्हणायलाही तीची अडखळली नाही. अमेरिकेत ज्यूंकडुन मोठा निधी जमा करवून देतो काही कमिशन द्याल का असे विचारणाऱ्याला ती साफ नकार देत. असे फसवनूक करुन उभारलेला पैसा मला नकोय हे ठणकावून सांगत. तिचा हेतू व कार्यपद्धती फार शुद्ध असत. या पहिल्याच अमेरिकावारीत गोल्डाने तब्बल ५० मिलियन डाॅलर निधी गोळा केला होता.
पुढे इस्त्रायलच्या स्थापनेनंतर गोल्डाने आपल्या आडनावाचे हिब्रूकरन केले. मायरसन ची ती मेअर झाली. गोल्डाने बराच काळ इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्रीपद भुषवले. गोल्डाला कामाचा इतका उरक होता की तिने मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत एक प्रस्ताव मांडला की आपल्याला वर्षभरात तीस हजार घरकुल उभारायचे आहेत. कारण गोल्डाला जगात ज्या कुणा ज्यू ला इस्त्रायल मध्ये स्थाईक व्हावंस वाटत असेल त्याने यावं खुशाल. त्याकरता व १९४९ साली नव्याने आलेले साडेतीन लाख निर्वासित ज्यूंचे पुनर्वसन करायचे होते म्हणून ही योजना होती. त्याकरता पैसा ? मग पुन्हा अमेरिकावारी ! गोल्डा एकाच वेळी कित्येक आघाड्यांवर लढाई खेळत असे. परराष्ट्रमंत्रीपद स्वीकारल्या स्वीकारल्या ईजिप्तच्या नासेर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले. या कामाला फुस होती सोविएत युनियनची. या राष्ट्रीयीकरणामुळे इस्त्रायलचा युरोपशी संपर्क तुटणार होता. नाईलाजास्तव सिनाई प्रदेशावर प्रथम स्वतः आक्रमण करून तो प्रदेश इस्त्रायलच्या सैनिकांनी ताब्यात घेतला. शेवटी अमेरिकेच्या दबावामुळे तिथून इस्त्रायली सैन्याने माघार घेतली. नासेरला इस्त्रायलचा येनकेन प्रकारे नायनाट करायचा होता तो प्रयत्न इथे फसला.या युद्धाचा गोल्डाच्या मन बुद्धीवर प्रचंड ताण पडत होता. नंतर गोल्डा लेवी एश्कोलच्या आग्रहावरून मापाइ पक्षाची अध्यक्ष झाली. गोल्डाने पडझड झालेल्या या पक्षाला पुन्हा बांधले. सिनाई प्रदेशातून सैन्य मागे घेण्याच्या निर्णयात एश्कोलचा वाटा मोठा होता. या माघार घेण्याच्या निर्णयाचे वाईट परिणाम गोल्डा व मापाइ पक्षाला भोगावे लागले. लोक तिच्या नेतृत्वावर शंका घेऊ लागले. तिची लोकप्रियतेत प्रचंड घसरण झाली होती.
गोल्डाला राजकारणातून निवृत्त व्हायचे होते की लगेच तिच्यावर 'पंतप्रधान' होण्याची जबाबदारी चालून आली. जगातील तिसरी व इस्त्रायलची पहिली महिला पंतप्रधान होण्याचा बहुमान गोल्डाच्या नावे आहे.काळासोबत मात्र गोल्डा आपल्या समाजवादी विचारसरणीत बदल करत नव्हती. कामगारांच्या पगारवाढीस तिने नकार दिला.त्यासाठी तिला बऱ्याच जणांच्या रोषाला सामोरे जावे लागले. 'सिक्स डे वाॅर', 'ब्लॅक पँन्थरांचा उठाव', 'ब्लॅक सप्टेंबर', 'म्युनिक हत्याकांड' या प्रकरणात तिने आपल्या नेतृत्वाची चुनुक दाखवली. उतारवयात गोल्डाच्या मनावर अनेक आघात झाले 'योम किपूर' मध्ये ईजिप्तसोबत चे हरलेले युद्धाची ही जखम तर ती आपल्या सोबतच घेऊन गेली. या युद्धात इस्रायल चे २५०० सैनिक मारले गेले.या युद्धात ईजिप्त व इस्त्रायल मध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मी च कसा जबाबदार आहे व त्याचे श्रेय आपल्याला मिळावे यासाठी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष हेन्री किसिंजरांचा चाललेला प्रयत्न पुस्तकात फार छान प्रकारे समजावले आहे. ते असं का करत होते त्याचे उत्तर पुस्तकात शोधावे. गोल्डा पंतप्रधानकाळात शेवटी हुकूमशाहीकडे झुकलेली होती. आपल्या निर्णयाच्या विरोधात बोललेले तिला सहन होत नव्हते. गोल्डाचे हे असे विविध पैलु वीणा गवाणकरांनी गोल्डाचे लिहिलेले चरित्र 'गोल्डा - एक अशांत वादळ' या पुस्तकात वाचायला मिळेल.
----------------------------------------
पुस्तक - गोल्डा, एक अशांत वादळ
लेखिका - वीणा गवाणकर
प्रकाशक - इंडस बुक सोर्स
किंमत - ४९९₹
अजिंक्य कुलकर्णी - अस्तगांव
Thanks. Ajinkya....nice article!👍
ReplyDeleteThank you
DeleteWell said Ajinkya Bhau
ReplyDeleteThanks
Deleteअतिशय सुरेख शब्दांकन अजिंक्य
ReplyDeleteThank you.
Delete