नाही नियम तरीही...
'ब्लाॅकबस्टर' हे घरगुती मनोरंजन क्षेत्रातल्या एका दादा कंपनीचं नाव. साल होतं साधारण २०००. त्यावेळी या कंपनीचे भांडवली बाजारातलं मुल्य होतं तब्बल सहा अब्ज अमेरिकन डाॅलर. आणि त्यावेळी जगभरात ब्लाॅकबस्टरचे जवळजवळ नऊ हजार दुकाने होती. केवळ दोन वर्षंच आगोदर स्थापन झालेली एक छोटी कंपनी ती डबघईला आलेली होती. ब्लाॅकबस्टरने आपल्याला पदरात घ्यावं म्हणून ती छोटी कंपनी प्रयत्नशीलही होती. पण दुर्दैवाने ब्लाॅकबस्टर सोबत काही तिचा पदर जुळला नाही. हा व्यवहार होऊ शकला नाही म्हणून त्या छोट्या कंपनीने आपल्यात हळूहळू काही बदल केले. ब्लाॅकबस्टर मात्र आपल्यात काहीही बदल करायला तयार नव्हती. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. ब्लाॅकबस्टरने २०१० साली आपली दिवाळखोरी जाहीर केली. २०१९ साली ब्लाॅकबस्टरचं फक्त एकच दुकान शिल्लक राहीलं. दरम्यानच्या काळात त्या छोट्या कंपनीने स्वतःतच काही महत्वपूर्ण बदल केले. २०१२ नंतर मोबाईल अॅपच्या माध्यमातून आॅनलाईन चित्रपट, वेबसिरीजचं प्रसारण सुरु केलं. स्वतःचे चित्रपट ,वेबसिरीजची निर्मीती करायला सुरुवात केली. २०१९ हे तेच साल होतं ज्यावेळी या छोट्या कंपनीची निर्मिती असलेला 'रोमा' चित्रपटाने आॅस्करच्या तीन सोनेरी बाहुल्या पटकावल्या. सर्वोकृष्ट चित्रपटाचा यादीत रोमाला नामांकन मिळाले होते. आणि ती छोटी कंपनी आज जगातल्या १९० देशात प्रसारित होते आहे. खऱ्या अर्थाने ग्लोबल झाली होती. ती छोटी कंपनी म्हणजे 'नेटफ्लिक्स' ही होय.
नेटफ्लिक्स चे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रिड हॅस्टिंग आणि इनसेड बिझनेस स्कुल च्या प्राध्यापीका एरीन मेअर या दोघांनी मिळून लिहिलेलं पुस्तक म्हणजे 'नो रूल्स रूल्स' हे होय. एरीन मेअर यांना ओळखले जाते ते २०१४ साली आलेलं त्यांचं बेस्ट सेलर पुस्तक 'द कल्चर मॅप' च्या लेखिका म्हणून. नेटफ्लिक्स या कंपनीने कामाच्या ठिकाणी आपलं स्वतःचं असं एक वर्क कल्चर उभं केलं आहे. नेटफ्लिक्सची कामगारांची धोरणे काय आहेत? नेटफ्लिक्सच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत कंपनीच्या धोरणात होत गेलेला बदल असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. त्यांनी पुस्तकाचे चार भाग केले आहे. 'फर्स्ट स्टेप टू कल्चर आॅफ फ्रिडम अँड रिस्पाॅन्सीबिलीटी', 'नेक्स्ट स्टेप टू कल्चर आॅफ फ्रिडम अँड रिस्पाॅन्सीबिलीटी', 'टेक्निक टू रिइनफोर्स अ कल्चर आॅफ फ्रिडम अँड रिस्पाॅन्सीबिलीटी' आणि 'गोइंग ग्लोबल' या प्रकारची. एकोणीस वर्षात नेटफ्लिक्स च्या समभागाची किंमत ही एक डाॅलर वरून तीनशे पन्नास डाॅलर वर जाऊन पोहोचली जेव्हा नेटफ्लिक्स ने अमेरिकेच्या बाहेर आपला विस्तार करायचा ठरवला तेव्हा. सुरूवातीला केवळ इंग्रजी भाषेतील विषयांनाच(कंटेंट) प्राधान्य असायचं. त्यात बदल करून मग इतर भाषांमधले सिनेमे आणि वेबसिरीजही निवडले गेले. जसे क्राउन , आॅरेंज इज अ न्यू ब्लॅक या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहेत. दोन महिन्यापुर्वी आलेली 'द क्विन्स गँबीट' ने तर बघणाऱ्यांचे सर्व रेकाॅर्ड मोडित काढले आहे. हे झालं इंग्रजी मधलं. इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषा 'इलाईट' स्पॅनिस, 'डार्क' जर्मन, 'सेक्रेड गेम्स' हिंदी यासारख्या इंग्रजी व्यतिरिक्त भाषांमधल्या काही मालिकाही प्रचंड गाजल्या. व्यवसायात बदल, स्थलांतर झाले तर भल्यभल्या उद्योगांना खीळ बसलेली याची कितीतरी उदाहरणे आपल्या आजुबाजूला पहायला मिळतात. पण नेटफ्लिक्सने आपल्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात चार महत्त्वाचे बदल काळानुरूप केले. नेटफ्लिक्स 2000 च्या दरम्यान एक फक्त पोस्टाने डीव्हीडी पाठवणारी कंपनी होती जीच्याकडे जुण्या टीव्ही मालिका आणि सिनेमांच्या डिव्हीडी असायच्या. त्यात बदल करत 'हाऊस ऑफ कार्ड' पासून त्यांनी स्वतःची निर्मिती सुरू केली इतरांच्या स्टुडिओत भाडेपट्टयाने. त्यात पुढे जाऊन मग स्वतःचा स्टुडिओ उभारून तयार केलेले 'स्ट्रेंजर थिंग्स' सारखे पुरस्कार प्राप्त सिनेमे देखील तयार झाले. आणि महत्त्वाचा बदल म्हणजे केवळ अमेरिकेत असणारी ही कंपनी नंतर खऱ्या अर्थाने जागतिक घरगुती मनोरंजन करणारी कंपनी झाली. ही झाली नेटफ्लिक्स ची पडद्यावरची भरभराट. खरी गोष्ट तर पडद्याच्या पाठीमागे आहे नेटफ्लिक्स एक कंपनी म्हणून. रीड यांची पहिली कंपनी 'प्युअर सॉफ्टवेअर' ही डबघईला गेल्यानंतर त्यांनी नेटफ्लिक्स सुरू केली. प्युअर च्या अनुभवातून शिकत रीड यांनी नेटफ्लिक्समध्ये लवचिकता, कर्मचाऱ्यांना मोकळेपणा आणि नवसंशोधन यावर जास्तीत जास्त भर दिला. नियंत्रण करण्याऐवजी रीड म्हणतात की," मला हे समजून चुकले होते की वरील तीन गोष्टी ह्या तुमची जोपर्यंत धोरणे बनत नाही तो पर्यंत कंपनीत गोंधळ हा चालूच राहतो. कंपनीच्या प्रगतीसाठी वरील तीन गोष्टी आवश्यकच आहेत". हा धोरण बदल झाला कारण रीड यांच्या वाचनात एरीन यांचं 'द कल्चर मॅप' हे पुस्तक आलं होतं. रीड यांनी एरीन यांना भेटण्याचे निमंत्रण दिले. रीड सोबत झालेल्या बैठकीनंतर एरीन यांनी हाॅलिवूड, सिंगापूर, ॲमस्टरडॅम आणि अशा कित्येक ठिकाणच्या नेटफ्लिक्स च्या शेकडो आजी माजी कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या या पुस्तकासाठी.
पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात एरीन म्हणतात की एखाद्या प्रोजेक्टसाठी तुम्ही हुशार माणसांची निवड केली आहे पण त्यात एक व्यक्ती जरी आळशी, कामाशी अप्रामाणिक असेल तर त्या एका व्यक्तीमुळे सर्व प्रोजेक्ट धुळीस मिसळला जाण्याची शक्यता असते. त्या एका व्यक्तीमुळे टीममधल्या इतरांचा प्रोजेक्ट मधला रस कमी होऊ शकतो. ती एक व्यक्ती प्रोजेक्ट मधल्या इतर व्यक्तींना समजावत असते की प्रोजेक्ट काही फार महत्त्वाचा नाहीये, जो की असतो! त्यामुळे होतं काय की जी चांगली टीम जमून आलेली असते ती आता एकमेकांच्या उणिवा काढायला सुरुवात करते. एकमेकांचा अपमान करायला सुरुवात करतात. आणि शेवटी प्रोजेक्टचा इस्कोट होतो. हे होऊ नये यासाठी एरीन म्हणतात की अशा लोकांना लवकरात लवकर कामावरून काढून टाकवं. आळशी लोक कमी केले की चांगल्या लोकांची लोकांची घनता वाढते यालाच नेटफ्लिक्सच्या भाषेत 'टॅलेंट डेन्सिटी' म्हटले जाते. ही कुशल मंडळी कामाच्या प्रती प्रामाणिक, उत्कट आणि सर्जनशील असतात. कंपनीत ही टॅलेंट डेन्सिटी वाढवायची असेल तर या टीमकडून काही सर्जनात्मक काम करून घेऊन, चांगलं उत्पादन ग्राहकांना द्यायचं असेल तर कंपनीत कर्मचाऱ्यांना मोकळेपणा (कँडर) दिला पाहिजे.
त्याचबरोबर त्यांनी केलेल्या कामाबद्दल प्रतिसाद मग तो चांगला वाईट काय असेल तो द्यायलाच हवा. प्रतिसादाने कर्मचारी आपल्या कामात सुधारणा करतो का ? तो दिलेल्या प्रतिसादाकडे कसा पाहतो? यासंदर्भात एरिन यांनी एक सर्वे केला होता. त्यातील निष्कर्ष पुढील हे पुढील प्रमाणे आल होते. 72% कर्मचाऱ्यांना वाटते की त्यांच्या कामातल्या तृटी सकारात्मकतेने सांगितल्या गेल्या असत्या तर त्यांना त्याच्यात. सुधारणा करता आली असती. तर 92% कर्मचाऱ्यांना असं वाटते की त्यांना नकारात्मक प्रतिसादही योग्य मार्गाने कळवला गेला तर त्यांची त्यात सुधारणा करायची तयारी आहे. कंपनीतील मोकळेपणा बद्दल रीड म्हणतात की नेटफ्लिक्स मध्ये आम्ही इतका मोकळेपणा देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत की चार-पाच हुद्याने जरू एखादा व्यक्ती खाली असेल आणि त्याला वरिष्ठांची एखादी चूक लक्षात आली तर ती तो मोकळेपणाने त्यांच्या निदर्शनास ती आणून देतो. प्रतिसाद (फिडबॅक) द्या! ही विनंतीच करण्याची वेळ यायला नको. तो दुसऱ्याला सहज स्वतःहून देता यायला हवा. असा मोकळेपणा कामाच्या ठिकाणी तयार करण्यासाठी रीड 4A माॅडेल सांगतात. प्रतिसाद देणे(एम टू असिस्ट, ॲक्शनेबल) प्रतिसाद घेणे(ॲप्रिशिएट, ॲक्सेप्ट आॅर डिस्कार्ड) हे ते 4A माॅडेल. एखाद्या कर्मचार्याला दुसऱ्या कंपनीकडून नोकरीसाठी काही प्रस्ताव आला तर याबद्दल त्याने नेटफ्लिक्समध्ये मनमोकळेपणाने कोणासोबतही चर्चा करावी अशी रीड यांची धारणा आहे. रीड अजून एक महत्त्वाच्या गोष्टीवर भर देतात. कंपनीतील नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीने सुट्टी घेणे यावर. कर्मचाऱ्यांना हव्या असलेल्या सुट्ट्या मंजूर करणे, मंजूर करताना सुट्यांचे कारण न विचारणे. कंपनीतील वरिष्ठांनी 'मी पण सुट्टी घेतो!' हा आदर्श घालून दिला पाहिजे. सुट्टी घेऊन परतल्यावर त्यांनी सुट्टीत काय आनंद लुटला याबद्दल इतर सहकाऱ्यांबरोबर चर्चा केली पाहिजे. हे सर्व वाचत असताना मला बर्ट्रांड रसेलचं एक वाक्य आठवलं. रसेल म्हणतात की," आळशी माणसांवर कायमच टीका होत असते. त्यांच्याबद्दल नेहमी उपरोधानं बोलले जाते. पण काही न करता स्वस्थ बसणे हा खरोखर गुन्हा आहे का ? सतत काहीतरी काम करायलाच हवं असं आपल्या मनावर बिंबवलेलं असतं. खुप काम करणे हे प्रतिष्ठेचं आणि मोलाचं आहे या गृहितकानं जगात हाहाकार माजवला आहे". काम करण्याला अवाजवी प्रतिष्ठा असल्यामुळे आज कुणी 'काम करणं चांगलं की वाईट? " असा प्रश्न विचारला तर लोक त्याला वेड्यात काढतील. कामातून ब्रेक घेऊन पुन्हा ताजतवाणं होऊन आल्याने कर्मचाऱ्यांची सर्जनशीलता वाढते यावर रीड यांचा विश्वास आहे. कर्मचारी कंपनीचा पैसा कसा वापरतात याबद्दल रीड म्हणतात की "कंपनीच्या पैशाने जेव्हा कर्मचारी जेव्हा एखाद्या ठिकाणी प्रवास किंवा मुक्काम करतो त्यावेळी त्याने त्या बिझनेस टूर मध्ये किती पैसा खर्च केला हे मी सहसा पाहत नाही. पण कंपनीच्या आर्थिक विभागाला जर त्या व्यक्तीने वाजवीपेक्षा जास्तच खर्च केला आहे हे वारंवार लक्षात आलं त्या खर्चाबद्दल त्याला जाब विचारलाच जातो. अमुक एक पंचतारांकित हाॅटेलच का निवडलं मुक्कामासाठी, विमान प्रवासात बिझनेस क्लासचं टिकिटच का बुक केलं? अशा प्रश्नांची समर्पक उत्तरे त्यास देता आली नाही तर नेटफ्लिक्स त्याला कोणतीही दयामाया न दाखवता कंपनीतून काढून टाकते. योग्य तिथे आवश्यक तो खर्च करावाच! पण शक्य तिथे काटकसरही करत कंपनीचा पैसाही वाचवावा.
'पे टाॅप आॅफ पर्सनल मार्केट' या प्रकरणात रीड व एरीन म्हणतात की आपल्याला किती पगार मिळाला हवा हे तुमच्या स्वतःपेक्षा आणि तुमच्या बाॅस पेक्षा कुणीच चांगलं सांगू शकत नाही! म्हणून मुलाखतीच्या वेळी आपल्याला किती पगार असायला हवा याबद्दल आपल्याला व्यवस्थित बोलता यायला हवं. इतर कंपन्यांच्या तुलनेत नेटफ्लिक्स पाच ते दहा टक्क्यांनी पगार जास्तच देण्याचा प्रयत्न करते. एखाद्या पदासाठी उमेदवार निवडताना हा विचार करू नये की याच्या एकट्याच्या पगारात आपण तीन जण घेऊ शकतो. पण हे लोक विसरतात की हा एकटा त्या तीघांइतके काम करू शकतो. वरिष्ठांच्या गैरहजेरीत कोणता योग्य निर्णय घ्यायचा याची कुवत त्या एकट्या मध्ये असते. एरीन म्हणतात म्हणतात की अशी हुशार माणसे हेरली पाहिजे, त्यांना चांगला पगार, चांगली पदं दिली गेली पाहिजे. बराच वेळा कर्मचारी इतर कंपन्यांत नोकरीसाठी अर्ज दाखल करतात. का? तर पगार वाढ मिळते म्हणून. आहे ती कंपनी केवळ पगारवाढीसाठी सोडणारे ४५% टक्के कर्मचारी असतात. पण मग पगारवाढच हवी आहे तर आहे त्या कंपनीच्या बॉसशीच बोलावं ना! बहुतांश कर्मचारी हे बोलत नाही कारण त्यांना हवा असलेला मोकळेपणा मिळत नाही म्हणून. तसेच सगळीकडे कंपन्यांना, संस्थांना 'कुटुंब' 'परिवार' म्हणण्याचा प्रघात आहे. रीड यांना हे कंपन्यांना कुटुंब, परिवार म्हणनं मान्य नाही. कामाच्या ठिकाणी फक्त आणि फक्त व्यावसायिक वृत्तीच जोपासली गेली पाहिजे. ते कौशल्य जर नसेल तर कामचुकार व्यक्तीकडे तुम्ही कारूण्याच्याच दृष्टीने पाहणार. त्याला कामावरून काढून टाकायला तुम्ही धजावणार नाही. एक दोन महत्वाचे मुद्दे या पुस्तकात खटकणारे आहेत पहिला म्हणजे रीड कंपन्यांची आर्थिक बाबतीतील धोरणे याबद्दलची सर्व माहिती कर्मचाऱ्यांना वरिष्ठांनी दिली पाहिजे याबद्दल ते आग्रही वाटले. ते म्हणतात की ह्या गोष्टी सांगितल्याने कामाच्या ठिकाणी मोकळेपणा येतो. पण समजा एखाद्याने या गोष्टी बाहेर कुणाकडे ही गुपितं फोडली आणि कंपनीचे शेअर्सचे भाव पडले तर...? हे कुणी केलं आहे हे उघडकीस आल्यावर त्या कर्मचाऱ्याला 'इनसायडर ट्रेडिंग' अंतर्गत तुरुंगात जावे लागेल त्याचं काय? दुसरा मुद्दा असा की 'प्रेक्षकांची झोप हीच आमची सर्वात मोठी स्पर्धक आहे' ह्या विधानाने 2017 साली रीड यांनी बरीच खळबळ उडवून दिली होती. ओटीटी प्लॅटफॉर्म वरुन प्रसारित होत असलेल्या उत्सुकता ताणणाऱ्या (बिंज वाॅच) वेब सिरीज मुळे जे मनोविकार येऊ घातले आहे त्याबद्दलही रीड काहीही बोलत नाही या पुस्तकात.
पुस्तक - नो रूल्स रूम्स
लेखक- रीड हॅस्टींग, एरीन मेअर
प्रकाशक - डब्ल्यू एच ॲलन
पृष्ठे- २९४
किंमत- ७९९ ₹
अजिंक्य कुलकर्णी
खुप काम करणे हे प्रतिष्ठेचं आणि मोलाचं आहे या गृहितकानं जगात हाहाकार माजवला आहे"
ReplyDeleteहे बरं वाटलं वाचून कारण मला पण लै काम करण्याचा कंटाळा ए.
हा हा हा! किरण्या तू आहेच आळशी.😄
Deleteअजिंक्य सर आपण खूप छान प्रकारे लेखन करता, हेवा वाटतो नेहमी ...
ReplyDeleteआपल्या वाचनाला नमस्कार 👍👍👍
धन्यवाद सर
Deleteअजिंक्य, "नो रुल्स रुल्स" पुस्तकाचं सार व्यवस्थित मांडलय तुम्ही. पुस्तकातल्या प्रकरणांची थोडक्यात करुन दिलेली ओळख आणि लेखकांना नेमकं काय म्हणायचंय हे सांगताना उत्सुकताही टिकवून ठेवणं तुम्हाला साधलंय असं वाटतं. हे पुस्तक मिळवून वाचायला हवं.
ReplyDeleteधन्यवाद! Corporate मध्ये असणाऱ्या किंवा सर्व्हिस सेक्टर मध्ये काम करणाऱ्या कुणाही व्यक्तीने वाचावं असं पुस्तक आहे हे.
Delete