'इति-आदि' - दैनंदिन वस्तूंच्या इतिहासाचा अथ: पासून इतिः पर्यंतचा धांडोळा.

 केवळ सनावळ्यांप्रमाणे घडणाऱ्या घटनांचा तपशील देणे म्हणजेच सांस्कृतिक इतिहास लेखन असं नाहीये. सांस्कृतिक इतिहास हा काही केवळ लढाईच्या मैदानतच घडतो असंही नाही. तर तो प्रत्येक पिढ्यांच्या स्वयंपाक घरातही घडून गेलेला असतो. पण अशा इतिहासाची फारशी नोंद न घेणं, त्याचं दस्तऐवजीकरण न करणे हा आपल्या लोकांना लागलेला पूर्वीपासूनचा शापच आहे  जणू. सांस्कृतिक इतिहास लेखन हे किती वेगवेगळ्या अंगाने होऊ शकतं याचा जणू एक नवा मार्गच अरूण टिकेकर आपल्याला दाखवून देत आहेत. दैनंदिन खान्या-पिण्याच्या वस्तू या आपण कधीपासून वापरू लागलो आहोत? त्या वस्तू, खाद्यपदार्थ जर विदेशी असतील तर त्यांना सर्वप्रथम आपल्याकडे कोण घेऊन आलं? कोणत्या मार्गाने त्या आपल्यापर्यंत पोहोचल्या, याचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करणे हा ही एक मोठा बौद्धिक आनंद देणारा भाग असतो. काही खाद्यपदार्थ हे उच्चभ्रू 'अभिजन' लोकांचेच होते. ते 'जनां'चे कसे झाले? उदा. आईस्क्रीम. तर काही खाद्यपदार्थ हे 'जनां'चे होते ते नंतर 'अभिजनां'त कसे रुळले? उदा. सिताफळ.

 भारतीय गंधविद्या ही देखील किती विकसित होती हे ही या पुस्तकातील गुलाबाच्या फुलावरील प्रकरणावरून लक्षात येते. अंबा या फळावरील प्रकरण तर निव्वळ कमाल आहे. या रोजच्या वापरातील वस्तू, खाद्यपदार्थांच्या बाबतीत देश-विदेशात प्रचलित असलेल्या दंतकथा, लोककथा वाचताना खूप मौज येते. कितीतरी नवे( actually जुने) शब्द या पुस्तकातून समजतात. बटाटा, साबुदाणा, मिरची ही पिकं एतद्देशीय नाही. साबुदाणा जो टॅपिओका नावाच्या वनस्पतीपासून तयार होतो. दक्षिण अमेरिकेत सापडणाऱ्या या वनस्पतीपासून तयार होणारा साबुदाणा दक्षिण अमेरिकेतून पोर्तुगीज आणि स्पॅनिश लोकांच्या मार्फत आशियात पोहोचला. बटाटा तो ही दक्षिण अमेरिकेतून जगभर पसरला. आज हिंदुस्थानी खाद्यसंस्कृतीचा महत्वपूर्ण भाग बनलेली जिन्नस म्हणजे 'मिरची'. पण ही भारतात तर पंधराव्या शतकात आली. १४९८ साली वास्को-द-गामा हा भारतात आला, आपल्यासोबत त्याने मिरची आणली होती. ती हिंदुस्थानभर पसरायला आणखी कालावधी लागला. किती अंतर्विरोध आहे पहा आलं, काळी मिरी, पोहे-उपमा या एतद्देशीय पदार्थांना आपण आपल्या खाद्यसंस्कृतीतून बरचसं वर्ज्य केलं. कित्येक देशी पदार्थांचे तर नावही काढत नाही आपण! पण विदेशातून आलेला साबुदाणा, बटाटा, मिरची हे पदार्थ केवळ आपल्या खाण्यापिण्याच्या पदार्थातच मिसळले नाही तर त्यांनी "उपवासाला साबुदाणा चालतो, बटाटा चालतो" या सबबीखाली आपल्या उपवासाच्या पदार्थातही मुख्य स्थान पटकावलं! 



     निसर्गातील कित्येक गोष्टींपासून मानवाने प्रेरणा घेतलेली आहे उदा.राइट बंधूंनी विमान तयार करण्याची प्रेरणा पक्षांना हवेत विहार करताना बघून मिळाली. तशीच फ्रेंचांना डाळिंबाच्या फळापासून हातबाँब तयार करण्याची प्रेरणा मिळाली. इंग्रजीत डाळिंबाला 'पोमोग्रनेट' म्हणतात त्यावरून हातबाँबला 'ग्रेनेड' हे नाव पडले. डाळिंब चिरल्यावर त्याचे जसे शेकडो दाणे बाहेर पडतात तसे ग्रेनेड फुटल्यावर त्याची शेकडो शकले होतात. आज इव्हेंट मॅनेजमेंट केलेल्या मातब्बर लोकही फिके पडतील इतका खासा बेत असायचा पेशावाईच्या काळात. त्याला नाना फडणीसी बेत म्हणत. त्या बद्दल मुळ पुस्तकातच वाचलेलं बरं. 'कोशिंबिरी, लोणची नाना प्रकारची असा नाना फडणीसी बेत' या प्रकरणात पेशवाई काळात जेवनास कसे बसत? काय काय बेत असत खाण्यासाठी? काय काय वाढले जात पानात? पान कसे वाढले जात? याची खासमखास माहिती आपल्याला खास टिकेकरी शैलीत वाचायला मिळते. त्या काळी खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे किती बारकाईने लक्ष पुरवले जात होते हे ध्यानात येते. आज इतके उपहारगृह आपल्या अवतीभोवती आहेत तरी या पुस्तकात नमूद केलेले पदार्थ जे एतद्देशीय होते त्यांचा वारसा टिकवण्याऐवजी आम्ही मात्र विदेशी पदार्थ खाण्यात गुरफटून गेलो. पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करण्यात आम्ही धन्यता मानली.  खाद्यसंस्कृतीमुळे भाषिक संमृद्धीही प्रचंड वाढते यावर कुणाचही दुमत असण्याचे काही कारण नाही. पदार्थाच्या चवीमुळे, त्यांच्या बाह्य स्वरूपामुळे प्रत्येक भाषेत खूप म्हणी, वाकप्रचार रूढ झालेले आपल्याला पहायला मिळतात. उदा - 'कडू कारलं मग ते तुपात घोळा किंवा साखरेत गोळा कडू ते कडूच, ॲन ॲपल अ डे कीप्स डाॅक्टर अवे'. मानवी स्थलांतरांमुळे हेच खाद्यपदार्थ एका संस्कृतीतून दुसरीकडे पोहोचले. मानवी संस्कृतींचा इतिहासाचा अभ्यास हा असा खाद्यपदार्थांना वगळून पुर्ण होऊच शकत नाही. डाॅ. अरुण टिकेकर हे स्वतः एक संशोधक होते. मुंबई विद्यापिठाचा त्यांनी इतिहास लिहिला आहे. या पुस्तकात वारंवार ज्यांचा उल्लेख होतो ते डाॅ. पा.कृ.गोडे हे भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतील संशोधक यांनी या विषयात किती मोठे काम करून ठेवलं आहे हे जाणवतं. सदर लेख डाॅ.पा.कृ. गोडे यांना समर्पित करतो आणि थांबतो. 


पु- इति- आदि

ले- अरुण टिकेकर

प्र- रोहन

किंमत - ५००

अजिंक्य कुलकर्णी 

Comments

Popular posts from this blog

मनुष्य गौरव दिन!

रेणुका देवी यात्रोत्सव - अस्तगाव

विज्ञानव्रती एच.सी.वर्मा