बॅरिस्टरचं कार्टं
काही आत्मचरित्र ही आत्मचरित्र नसतात, कारण ती आपल्यासमोर त्या त्या काळाच्या समाजचित्राचा आरसा धरत असतात. आत्मचरित्रात/आत्मकथनात समकालीन समाजात घडणाऱ्या घडामोडींचा दाखला जर सापडत नसेल तर ते बऱ्याचदा फक्त आत्मसमर्थनात अडकण्याचा मोठा धोका असतो. या आत्मसमर्थनाला काही आत्मचरित्र मात्र अपवाद असतात. कारण ते वाचताना वाचक म्हणून आपल्याला प्रामाणिक वाटायला लागतात. अशी आत्मचरित्रे समाजातील माणसांच्या चांगुलपणाचं जसे मनमोकळेपणाने कौतुक करतात तसेच त्यावेळच्या समाजातील ढोंग, गैरसमज, अंद्धश्रद्धा यांच्यावर शाब्दिक चाबकाचे फटके मारायलाही मागेपुढे पहात नाही. मला आत्मचरित्रात नेहमी त्या व्यक्तीच्या समकालीन आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक गोष्टींचे संदर्भ हवे असतात. त्यांची दखल जर त्यात घेतलेली नसेल तर सदर व्यक्ती नक्की कुठून कुठे पोहोचलेला आहे याची मला लिंक लागत नाही. डाॅ.हिम्मतराव बावस्करांच्या 'बॅरिस्टरचं कार्टं' या पुस्तकात हा समाज आरसा मला पानापानातून दिसला. या पुस्तकात केवळ हिम्मतरावच भेटत नाही आपल्याला तर सत्तर ऐंशीच्या दशकातला ग्रामीण महाराष्ट्र भेटतो.
डाॅ. हिम्मरताव बावस्कर हे नाव मी पहिल्यांदा वाचले ते २०११ साली लोकसत्ताच्या 'सर्वकार्येषु सर्वदा' या उपक्रमात. त्यात त्यांच्या विंचूदंशावरील संशोधनाचा धावता आढावा घेतला होता. मी Msc करत होतो त्यावेळी. त्या लेखात त्यांचा फोन नंबर देखील होता. मी त्यांना फोन करून संशोधन कसं करायचं असतं? त्यासाठी काय काय करावं लागतं? असे माझ्या त्यावेळच्या समजेप्रमाणे काही प्रश्न विचारले होते. मला आजही आठवतय संध्याकाळी सातच्या दरम्यान मी फोन केला असेल. त्यांच्याशी बोलल्यावर माझ्या आत काहीतरी हललं होतं. शिकून घरी थांबून काही करता येईल का या विचाराने मी तेव्हा चाचपडत होतो. असो. डाॅ.बावस्करांचा जन्म जालना जिल्हातील देहेड या अतिशय मागास गावात झाला होता. घरात अठरा विश्व दारिद्रय हे पाचवीलाच पुजलेलं होतं. परंतु वडिलांना आपल्या मुलांनी शिकावं हा ध्यास होता. त्यात मुलांना निजामशाहीच्या पाऊलखुणा असलेल्या मराठवाड्यात शिकवायचं नाही असा वडिलांचा आग्रह होता. वडील देहेडमधील भुजंगराव या ब्राम्हणाच्या घरी सालगडी होते. या ब्राम्हण कुटुंबाचे जालन्याला देखील एक घर होते. ब्राम्हण कुटुंबाच्या जालन्याच्या घरी हिम्मतरावांच्या वडिलांना एकदा जेवणाची संधी मिळाली. झालं. त्यावेळी त्यांनी त्या कुटुंब प्रमुखास विचारले, ''तुम्हाला इतकं चांगलं अन्न खायला कसं मिळतं? या कोड्याचं उत्तर मला आता मिळालं आहे!'' 'शिक्षण' हेच या कोड्याचं उत्तर आहे हे आता मला उमगलं आहे! हिम्मतरावांचे वडील विष्णूकाकांना म्हणाले "मी माझ्या मुलांना मराठवाड्यात शिकवणार नाही मी त्यांना विदर्भात घेऊन जाऊन त्यांची शिक्षणं पुर्ण करणार आहे." तेव्हा विष्णूकाका त्यांना म्हणाले "तू तर देहेडचा 'बॅरिस्टर'च आहेस'' या बॅरिस्टरचा मुलगा हिम्मत याला शाळेच्या मुख्याध्यापकाने 'कार्टं' म्हणून हिणवलं होतं. म्हणून बॅरिस्टरचं कार्टं.
डाॅ. बावस्करांना लहानपणापासून शिक्षणाची विलक्षण आवड. त्यांचे वडिलबंधूनाही शिक्षणाची आवड होती. वडिलबंधूंनी वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनाने ही आवड त्यांची कायम राहीली. देहेडपासून सुरु झालेला हा प्रवास MBBS ते MD हिम्मतराव कसा पुर्ण करतात हे मुळ पुस्तकातच वाचलेलं बरं. तो प्रवास फार कष्टाचा, अतिशय खडतर आहे. नोकरी मिळवण्यासाठी त्यावेळच्या सरकारी बाबूंनी दिलेला त्रास, भ्रष्टाचाराने बरबटलेली आपली शासनव्यवस्था वाचून मन खट्टू होतं. नाहीच का उजाडणार? असा प्रश्न वाचक म्हणून आपल्याला सतत टोचत राहतो. वैद्यकीय संशोधन करायचे हे जेव्हा निश्चित झाले तेव्हा त्यावेळच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी डाॅ. बावस्करांची केलेली कुचेष्टा, तिरस्कार हे वाचक म्हणून आपल्यालाच फार लागतं. काहींनी शेवटपर्यंत यांना मानसिक रोगी म्हणून हिणवलं. 'लॅन्सेट' या वैद्यकीय संशोधनाच्या नियतकालिकात एक प्रबंध डाॅ.बावस्करांना पाठवायचा होता. 'त्या प्रबंधात माझे नाव घाल' असे एका मोठ्या अधिकाऱ्याने त्यांना सांगितले पण बावस्कर त्याला बधले नाहीत. म्हणून त्या अधिकाऱ्याने त्याच्या हयातीत बावस्करांच्या विंचूदंशावरील एकही प्रबंध भारतात प्रकाशित होऊ दिला नाही. डाॅ.बावस्करांना लंडनच्या सुप्रतिष्ठीत 'सीबा फाउंडेशन' ने भाषणाला आमंत्रीत करुन देखील नाही. इतका मोठा बहुमान मिळेला असतानाही बावस्करांच्या वाट्याला हे असे भोग यावेत हे रोगट समाजाचे लक्षण आहे. याच बरोबर काही अशी पण लोकं होती ज्यांनी डाॅ. बावस्करांना मनापासून निस्वार्थ म्हणू अशी मदत केली. त्यात त्यांना MD करत असताना शिकवणाऱ्या दिवटे मॅडम. या दिवटे मॅडमचा मनाचा मोठेपणा हा मुळ पुस्तकाचं वाचायला हवा. मदनशेट, देवकीनंदन महाराज, पालोदचे भाऊ, अनिल अवचट या लोकांनी वेळोवेळी मोलाचे सहकार्य केलं.
विंचूदंशावर 'प्राझोसीन' हे औषध रामबाण उपाय म्हणून काम करते हे शोधून काढणे हे डाॅ. बावस्करांचे केव्हढं मोठं यश! सोडिअम नायट्रोप्रुसाइड हे रसायन तर मी नेहमीच वापरतो. बारावीच्या विद्यार्थींच्या प्रयोगात त्याचा नेहमी वापर होतो. पण याने इतके प्राण वाचवलेले असतील असं काधीच वाटलं नव्हतं. डाॅ. बावस्करांचे हे विंचूदंशावरील संशोधनातले यश हे इतकं मोठं आहे कि, कोकण, कर्णाटक, गुजराथ, आंध्रप्रदेशातील विंचूदंशाने होणारे मृत्यूचे प्रमाण ४०टक्क्याहून ते १% हूनही कमी झालेले आढळते. एकेकाळी ज्या व्यक्तीने विंचूदंशाने माणसं तडफडून मरताना पाहीली त्या डाॅ. बावस्कारांच्या शोधाचे हे फलित होते की दवाखान्यात भरती झालेला प्रत्येक विंचूदंशाचा रूग्ण हा हातपाय धड घरी जात होता. मृत्यूच्या दाढेतून कित्येकांना या 'प्राझोसीन' ने वाचवले. खरंच , काय कमावलं आहे या व्यक्तीने आयुष्यात! परदेशात कौतुक झाले तरच ते खरं संशोधन अशी गुलाम मानसिकतेचं दर्शन वेळोवेळी या पुस्तकात होतं. संशोधन करू पाहणाऱ्या प्रत्येक मुलाला/मुलीला हे पुस्तक वाचयला दिलं पाहिजे. संशोधन हे मोठमोठ्या प्रयोगशाळेतच होतं असा (गैर)समज असणाऱ्यांना हे पुस्तक एक पथदर्शकाचे काम नक्कीच करते. हाती शुन्य असताना देखील किती मोलाचं संशोधन करता येतं हे या पुस्तकात वाचायला मिळतं.
पुस्तक:- बॅरिस्टरचं कार्टं
लेखक :- डाॅ.हिम्मतराव बावस्कर
प्रकाशक :- मॅजेस्टिक
पृष्ठे:- २६४
अजिंक्य कुलकर्णी
छानच... एक उत्कंठावर्धक आत्मचरित्र आहे असे लक्षात येते...
ReplyDeleteडॉ अनुश्री खैरे
धन्यवाद मॅडम.
Delete