चॅलेंजरचं चॅलेंज आणि O ring
Quantum electrodynamics अर्थात QED च्या शोधाबद्दल रिचर्ड फाईनमन ओळखले जातात. त्याबद्दल त्यांना भौतिकशास्त्रातलं नोबेल हे इतर दोघांसोबत विभागून दिलं गेलं होतं. फाईनमन यांनी आयुष्यात सर्वात शेवट ज्या चॅलेंजला फेस केलं ते म्हणजे 'चॅलेंजर' हे होय. चॅलेंजर या नावाच्या नासाच्या अंतराळयानास झालेल्या दुर्घटनेमुळे त्याची चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्या समितीमध्ये फाईनमन यांची नियुक्ती झाली होती. फाईनमन या समितीवर जाण्यास अजिबात उत्सुक नव्हते. असं नाही की या दुर्घटनेबद्दल त्यांना हळहळ नव्हती. पण न जाण्याचे कारण हे त्यांना झालेला पोटाचा कॅन्सर आणि बोन मॅरोचं सततचं दुखणं हे होतं. पण त्यांची तिसरी पत्नी ग्वेनेथच्या आग्रहाखातर फाईनमन या समितीत सामील झाले. फाईनमन यांना नेहमीच सरकारी कामाचा, त्यांच्या कार्यपद्धतीचा तिटकारा होता.
'चॅलेंजर' हे यान २८ जानेवारी १९८६ रोजी फ्लोरीडाच्या केप कॅनाव्हरल या स्पेस स्टेशनवरून आकाशात झेपावले. आकाशात झेपावल्याच्या अवघ्या ७३ व्या सेकंदाला या अवकाशयानाच्या अक्षरशः चिंधडया चिंधडया उडाल्या व यानात असलेले सातही अंतराळवीर त्या स्फोटात मरण पावले. फाईनमनांचं 'व्हाट डू यु केअर?' या पुस्तकात याबद्दल भरपूर वाचायला मिळेल. अवकाशात झेप घेण्यासाठी अधिकची ताकद सापडावी म्हणून अवकाशयानाला बाहेरच्या बाजूस काही प्रोपेलंट बुस्टर बसवलेले असतात. या प्रोपेलंट बुस्टरमध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन आॅक्सिजनच्या ज्वलनाचा एक तीव्र झोत जमिनीच्या दिशेने प्रचंड वेगाने बाहेर पडत असतो. याच्या विरूद्ध प्रतिक्रिया म्हणूनच तर अवकाशयान हे आकाशात झेपावत असतं. अवकाशयान हे दंडगोलाकार टाक्यांसारखे असते जे आट्यांच्या साहाय्याने एकमेकांत जोडलेले असातात. वेळोवेळी यानाचं वजन कमी व्हावं म्हणून हे दंडगोलाकार भाग आणि बुस्टर्स यानापासून सुटे होतात. दोन दंडगोलाकार भाग एकमेकांना जिथे जोडलेले असतात तिथे एक इंग्रजी O आकाराची SBR (स्टाइरीन ब्युटॅडाइन रबर) ची रबरी रिंग वापरलेली असते. या रबराबद्दल थोडं सांगावं लागेल. केमिस्ट्रीच्या भाषेत हे SBR रबर एक कृत्रिम रबर आहे जे स्टाइरीन व ब्युटॅडाइन या दोन रसायनांपासून तयार करतात. या रबराचे वैशिष्ट्ये म्हणजे हे (जर वरील दोन्ही रसायने योग्य प्रमाणात वापरले असेल तर ) तापमान वाढल्यास प्रसरण पावते म्हणजेच मऊ होते व तापमान थंड असल्यास ते आकुंचन पावते म्हणजेच कडक होते. ही दुर्घटना टिव्हीवर लाखो लोकांनी याची देही याची डोळा पाहीली. कारण या यानात अंतराळवीर म्हणून एक प्राथमिक शिक्षीका गेली होती. अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी या दुर्घटनेची चौकशी करणारी समिती नेमली त्याचे अध्यक्ष राॅजर्स म्हणून कुणीतरी होते. राॅजर्स कमिशन म्हणून हा अहवाल ओळखला जातो.
SBR रबराचं म्हणजेच O ringच कंत्राट ज्या माॅर्टन थिओकोलला दिलं होतं त्याच्याबद्दल सातत्याने तक्रारी येत असताना सुद्धा नासा त्याच्याकडे डोळेझाक करत होती. नासाला त्यावेळी फंडही खूप कमी मिळायचा. फाईनमन यांना मात्र याच्याशी काहीएक देणे-घेणे नव्हते. विज्ञान काय सांगते आणि यानाच्या बाबतीत कोणत्या योग्य वस्तू वापरणं आवश्यक होतं हे फाइनमन यांच्या दृष्टीने जास्त महत्वाचं होतं. दुर्घटना झाली त्या दिवशी सकाळचे तापमान अतिशय थंड होते. त्यामुळे ही रिंग जी गरम होऊन प्रसरण पावायला पाहिजे होती ती प्रसरण न पावता उलट आकुंचण पावली आणि पुढचं सगळं रामायण घडलं. ग्वेनेथला फाईनमनने या चौकशी समितीत सहभागी व्हावे असे वाटले. कारण रिचर्ड असं काहीतरी शोधून काढेल ज्यावर इतरांचं सहजासहजी लक्षही जाणार नाही. फाईनमन यांनी शोधून काढलेली रबराची चूक की ज्यामुळे हा येव्हढा मोठा अपघात झाला यावर नासा आणि इतर शास्त्रज्ञ विश्वास ठेवायला तयार नव्हते. शेवटी पत्रकार परिषदेत फाईनमन यांनी एका काचेच्या ग्लासात SBR रबराचा एक तुकडा टाकला त्यावर काही बर्फाचे तुकडे टाकले व सर्वांच्या समोर हे सिद्ध केले की थंड वातावरणामुळे हे रबर प्रसरण पावू शकले नाही अन् हा अपघात घडला.
सिनेमाची You tube link
अजिंक्य कुलकर्णी
Comments
Post a Comment