औषधसाक्षरता वाढवणारे पुस्तक - औषधभान
कोरोना आल्यापासून ज्या गोष्टींकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आमूलाग्र बदलला त्या दोन गोष्टी म्हणजे एक आपलं आरोग्य, आणि दुसरं म्हणजे औषधे. Msc करत असताना ch453 या नॅचरल प्रोडक्ट अँड ड्रग केमिस्ट्री या विषयात आम्हाला औषधांच्या माॅलेक्युल विषयी बरेच शिकायला मिळाले. औषधांची हाताळणी करताना किंवा ती घेत असताना जर हलगर्जीपणा झाला तर त्याचे काय परिणाम होतात याबद्दल मात्र मी त्यावेळी तरी अनभिज्ञ होतो. अशाच एका दिवशी लोकसत्तेत 'अँटिबायोटिक्स: समजून घेऊया!' हा प्रा.मंजिरी घरत मॅडमचा लेख वाचण्यात आला होता. त्या एका लेखाने औषधांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच बदलला. लोकसत्तेत घरत मॅडमचे लेख आवर्जुन वाचू लागलो. 'औषधभान' हे त्यांचं सदर मी नियमित वाचत असे. त्या लेखांचेच हे पुस्तक.
पुढे मी औषधांबद्दल सीरिअसली विचार करायला लागलो कारण औषधे ही सुद्धा एक प्रकारची रसायनेच आहेत. डाॅक्टरांनी दिलेली औषधे, त्याचे डोसेज, औषधांच्या ठरलेल्या वेळा या गोष्टी नियमित पाळू लागलो. प्रिस्क्रिप्शन वर डाॅक्टरांनी औषधांची नावे सुटसुटीत लिहिलेली असावी, कारण काही ब्रँड्सची नावे इतकी सारखी असतात पण औषधी गुणधर्म मात्र पूर्णपणे वेगळे असू शकतात. अशावेळी ध चा मा होण्याचा धोका संभवतो. उदा. Dimox आणि Dimol हे सुवाच्य अक्षरात लिहिलेले नसेल तर किती गोंधळ होईल? अमेरिकेत काही राज्यांमध्ये प्रिस्क्रिप्शनमध्ये खराब हस्ताक्षर हा दंडनीती गुन्हा आहे. औषधांचे मुख्य दोन भाग पडतात एक असतो प्रिस्क्रिप्टेड आणि दुसरा असतो नाॅन प्रिस्क्रिप्टेड. बहुतेक औषधे ही पहिल्या गटात मोडणारी आहेत. यात अजून छोटा गट आहे OTC म्हणजे ओव्हर द काऊंटर. यात पॅरासिटामोल, ॲस्पिरीन, बाम, मलम वगैरे येतात. आता प्रिस्क्रिप्टेड औषधे कोणती आणि नाॅन प्रिस्क्रिप्टेड औषधे कोणती ते कसं ओळखावं ? तर ज्या डाॅक्टरांच्या चिठ्ठीवर डाव्या कोपऱ्यात लाल रंगाची Rx ही खूण दिसेल किंवा मेडिकल मधून घेतलेल्या औषधांच्या स्ट्रीपवर Schedule H drug असे लिहिलेलं असेल ती प्रिस्क्रिप्टेड औषधे समजावी. झोपेच्या गोळ्यांवर NRx असं लिहिलेलं असतं. औषधांचा शरीरावर परिणाम होतो कारण शेवटी ती पण रसायनेच आहेत. इमर्जन्सी गर्भनिरोधके वारंवार वापरल्यास हार्मोनल संतुलन बिघडण्याचे चांसेस जास्त असतात.
औषधांच्या वेळा पाळणे हा ही एक महत्वाचा मुद्दा असतो. काही औषधे ही रिकाम्या पोटी घ्यायची असतात तर काही भरल्या पोटी. रिकाम्या पोटी जी औषधं घ्यायला सांगितलेली असतात ती तशीच घ्यायची असतात कारण रिकाम्या पोटी पोटात अन्नाची लुडबूड नसल्यामुळे औषध आतड्यात लवकर पोहोचते. शिवाय अन्नाची आणि औषधाची आंतरक्रीयाही होऊ शकते. 'एंटरीक कोटेड' औषधांची मात्रा ही आतड्यांमध्ये पोहोचणे आवश्यक असते म्हणून ही औषधं गोळ्या/कॅप्सूल रिकाम्या पोटी घ्यायची असतात. तर बरीचशी वेदनाशामके, लोहयुक्त औषधे, अँटिफंगल औषधे ही भरल्यापोटीच घ्यावी. एक सर्वात महत्वाचा आणि कळीचा मुद्दा म्हणजे औषधांची 'एक्सपायरी डेट' हा होय. ज्या महिन्यात/सालात ते औषध एक्सपायर होणार असे लिहिलेले असते ते ती तारीख ओलांडून गेल्यावर लगेच निकामी होते का? इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की उत्पादन तारीख समजा दोन तीन वर्षापूर्वीची असली, तरी तो माल 'जुना' होत नाही व अंतिम मुदतीपर्यंत औषध उत्तम, गुणकारी व सुरक्षित असते. आय ड्राॅप्स, सिरप यांच्यासारख्या औषधांना दोन एक्सपायरी डेट्स असतात. एक असते उत्पादनाची अन् दुसरी असते औषध उघडून वापरण्यास सुरुवात केल्याची. वैद्यकीय क्षेत्रासमोर सध्या सर्वात ज्वलंत प्रश्न जर कोणता असेल तर तो म्हणजे अँटिबायोटिक्स हळूहळू निष्प्रभ होत चालले आहेत. करोना काळात रेमेडेसीवीर चा काळाबाजार तर सर्वांच्याच परिचयाचा आहे. हजार बाराशे रूपयाचे हे औषध काळ्याबाजारात तीस चाळीस हजाराच्या घरात गेलेलं कित्येकांनी पाहिले असेल. गेल्या काही वर्षांपासून अँटिबायोटिक्सना दाद न देणाऱ्या जंतूंनी वैद्यकिय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. 'लॅन्सेट' ने याबद्दल तीव्र नाराजी वेळोवेळी व्यक्त केली आहे. एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे अँटिबायोटिक्स हे केवळ आणि केवळ डाॅक्टरांच्या चिठ्ठीनेच घ्यायची औषधे आहेत. आपण औषधे घेत असताना ती मध्येच घ्यायची सोडून दिली किंवा घेतानाच निम्मी घेतली तर अपुऱ्या कोर्समुळे औषधांच्या तावडीतून वाचलेले जीवाणू मग आपल्या अस्तित्वाची लढाई चिवटपणे लढतात. आपल्या शत्रूच्या (अँटिबायोटिक्स) कामाची पद्धत जोखून ते चतुरपणे स्वतः मध्ये बदल घडवून आणतात आणि मग हे अँटिबायोटिक्सना दाद देत नाहीत यालाच 'अँटिबायोटिक्स रेझिसटन्स' असे म्हणतात.
द्रव औषधे ही शक्यतो चमच्याने न घेता त्या औषधासोबत येणाऱ्या मापानेच घ्यावी कारण चमचा लहान असेल तर औषधाचा डोस कमी पोचतो तर चमचा मोठा असेल तर डोस प्रमाणापेक्षा जास्त होऊ शकतो. खोकल्याच्या औषधांच्या बाबतीत एक महत्वाची काळजी म्हणजे ही औषधे शक्यतो खिडकीत ठेवू नये. जनरली ही औषधे गडद जांभळ्या (अंबर कलर) रंगाच्या बाटल्यांमध्ये येतात. याचाच अर्थ असा होतो कि या औषधांवर सूर्यप्रकाश पडू देऊ नये. सुर्यप्रकाशामुळे या औषधांमध्ये बदल होऊ शकतात व औषधाची परिणामकारकता कमी होऊ शकते. औषधांबद्दच्या अशा अनेक छोट्या-छोट्या पण महत्वपूर्ण माहितीने भरलेलं हे पुस्तक आहे.
पुस्तक - औषधभान
लेखिका - प्रा. मंजिरी घरत
प्रकाशन - मेनका
किंमत - १५०₹
अजिंक्य कुलकर्णी
अतिशय उपयुक्त पुस्तकंबद्दलची माहिती...Thank You
ReplyDeleteThanks
Delete