सिद्धार्थ- 'स्व' शोधाचा प्रवास

हर्मन हेस हा एक जगप्रसिद्ध जर्मन लेखक. कवी, कादंबरीकार म्हणून त्याची जगबर ख्याती पसरली होती. हेसला जगभर ही ख्याती त्याच्या ज्या कादंबरीने मिळवून दिली ती कादंबरी म्हणजे 'सिद्धार्थ' ही होय. चालू वर्ष (२०२२) हे या कादंबरीचे शतक मोहोत्सवी वर्ष. हेसला १९४६ सालचं नोबेल पारितोषिक मिळालं होतं. या कादंबरीचे नाव जरी सिद्धार्थ असले तरी ही कादंबरी गौतम बुद्धा बद्दल नाही. कादंबरीचा काळ हा मात्र बुद्धाच्या समकालीन आहे. या कादंबरीचा नायक सिद्धार्थ याच्या जीवनात बौद्ध धर्म आणि हिंदु धर्म यांच्या विचारसरणीचा मिलाफ झालेला दिसतो. भारतीय तत्वज्ञान हे पूर्णपणे निवृत्ती प्रधान व पूर्णपणे प्रवृत्ती प्रधानही नाही तर या दोघांचा मानवी जीवनात समन्वय असायला हवा या विचारांवर ते जोर देतं. ज्याला मानवी जीवनाचा अर्थ कळाला तो सिद्धार्थ असा सिद्धार्थ या शब्दाचा अर्थ आहे. तो जे शोधत होता ते त्याला सापडलं आहे. सिद्धार्थ या नावातच हेस आपल्याला खूप काही सांगून जातो.

  सिद्धार्थच्या या अध्यात्मिक प्रवासात त्याला वेगवेगळे अनुभव येतात. वेगवेगळ्या गोष्टी तो शकतो. अंतिम सत्याचा शोधार्थ निघालेल्या सिद्धार्थचा प्रवास मानवी जीवनात प्रेम हे अंतिम सत्य आहे या गोष्टीजवळ येऊन थांबतो आणि तो खरोखरीच सिद्धार्थ होतो. या कादंबरीचे कथानक जितके सशक्त आहे तितकीच विलक्षण या कादंबरीची भाषा शैली आहे. या कादंबरीत नायकाचं एक झपाटलेपण आहे. कादंबरी वाचायला घेतली की ती खाली ठेववत नाही. ही कादंबरी वाचून आपण भारतीय लोक अतिशय तृप्त तर होतोच पण तरी एक अनामिक हुरहूर मनाला लागून राहते. भारतीयांना संसारात राहुनही निवृत्तीचं असलेलं एक सुप्त आकर्षण असतं हे कारण असावं असं मला वाटतं. भारतीयांना या 'अज्ञात शक्तीचा' शोध घेण्याची एक ओढ असते. भारतापासून हजारो मैलावर असलेल्या जर्मनीत वाढलेला हेस जो भारतात कधी आलाही नाही तरी तो भारतीय तत्वज्ञानाचे सार सामावलेलं असलेली एक सुंदर कादंबरी लिहितो याचं खूप आश्चर्य वाटतं! आज शंभर वर्षे उलटून गेली तरी या कादंबरीची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. कारण हेसने या कादंबरीत जे मानवी जीवनाचे अंतिम सत्य सांगितलं आहे तेच मुळात चिरंतन आहे.


  या कादंबरीतून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण जर काय शिकत असू ती म्हणजे की तुमच्या जवळचे ज्ञान तुम्हाला इतरांना देता येतं; पण शहाणपण कसं देणार? ते प्रत्येकाला स्वतःचं स्वतःच मिळवावं लागतं. तेच तुमचं बलस्थान होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही उत्तम यश मिळवू शकता. शहाणपण हे मुळातच तुमच्याकडे असावं लागतं. ते शिकून मिळत नाही. इतरांना शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न केला तर तो असफल ठरतो. सिद्धार्थने हा जो स्वतः स्वतःचा शोध घेतला आहे तो कोणताही मानवी गुरू न करता. आपल्याकडे अवधूत(दत्त) यानेही कोणताही मानवी गुरु केलेला नाही. अवधूताने निसर्गातील विविध प्राणी, पक्षी, किटक यांच्यापासून काही ना काही शिकत स्वतःचा विकास केला. अवधूताचे हे २१ गुरु सर्वश्रृत आहे. विश्व कधीही एकतर्फी किंवा एकच बाजू दर्शवणारं नसतं. कोणतीही गोष्ट किंवा कोणीही व्यक्ती पूर्णतया चांगली किंवा वाईट नसते. एकाच वेळी संसार आणि निर्वाण या दोन्हीही गोष्टी साध्य करता येतात. आपण आयुष्यात पापं ही केलेली असतातच पण आपण त्यातून मुक्तही होऊ शकतो. आपण कधीतरी बुद्धही होऊ शकतो. ही बुद्ध होण्याची सुप्त क्षमता प्रत्येकामध्ये असते फक्त तिची जाणीव होणे आवश्यक असते. 


   सिद्धार्थ भोगा मध्ये सुद्धा इतका रममाण झाला होता की त्याने त्यातलं टोक गाठलं होतं. पण इच्छाशक्तीच्या जोरावर तो त्यातून बाहेरही आला. चिक्कूच्या बिया प्रमाणे समोरच्या मानवाला राहता आले पाहिजे. सभोवताली सगळा गर असताना तो अंगाला चिटकता कामा नये. मानवी जीवनाचे अंतिम सत्य हे प्रेम आहे या मध्यवर्ती कल्पने भोवती गुंफलेली ही एक सुंदर कादंबरी आहे. मोक्षाचा मार्ग आपला आपणच शोधून काढायचा असतो. खरा साधक कोणाचेही विचार अथवा शिकवण ही आंधळेपणाने स्वीकारत नाही. अवतीभोवती घडणाऱ्या विविध घटना, विविध व्यक्ती यांच्याकडूनही तो खूप गोष्टी शिकत असतो. 'परिपूर्ण जीवन' या भ्रामक कल्पनेतून आपण बाहेर पडून जीवन आहे त्या स्वरूपात, जसं आहे तसं स्विकारायला शिकलं पाहिजे. जगावर प्रेम करायला शिकले पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं आनंदाने स्वागत करायला शिकलं पाहिजे. 


अजिंक्य कुलकर्णी 



Comments

  1. खूप सुंदर माहिती दिली आहेत आपण ह्या कादंबरीची! कधी एकदा वाचायला घेते इतकी उत्सुकता लागली आहे... Thanks a lot sir for sharing this wonderful book review!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी

      Delete
    2. खुप छान माहिती दिलीय...वाचायला नक्कीच आवडेल

      Delete
  2. खूपच छान विश्लेषण

    ReplyDelete
    Replies
    1. आपला लेख वाचल्यावर ही कांदबरी वाचण्याचा मोह झाला. आपल्यामुळे नवीन पुस्तकाशी परिचय झाला. खुप खुप धन्यवाद!

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मनुष्य गौरव दिन!

रेणुका देवी यात्रोत्सव - अस्तगाव

विज्ञानव्रती एच.सी.वर्मा