इनसाईड पिक्सार

  पिक्सार ही एक प्रचंड क्रियेटिव्ह लोकांनी भरलेली एक कंपनी (ॲक्चुली स्टुडिओ) आहे. ज्यांनी पिक्सारचे सिनेमे पाहिलेले नसतील तर त्यांनी समजून घ्यावं कि आपण आयुष्यातला कितीतरी मोठा आनंद गमावला आहे. टाॅय स्टोरी, कोको, कार्स १,२,३, इनसाइड आऊट, अप, फाईडींग निमो, ब्रेव्ह, फाईडींग डोरी, सौल, रॅटोटाईल, वाॅल ई अजून कित्ती कित्ती नावे घ्यायची? पिक्सारची मुहूर्तमेढ रोवली ती तितक्याच क्रियेटिव्ह असणाऱ्या स्टिव्ह जाॅब्जने. टू डी अॅनिमेशनचा थ्री डी अॅनिमेशन मध्ये होणारा बदल जाॅब्जने हेरला आणि त्याचं त्याने सोनं केलं. पिक्सार स्टुडिओ बद्दल डिस्ने हाॅटस्टार वर मी नुकतीच एक सिरीज पाहिली 'इनसाईड पिक्सार' नावाची. दहा दहा मिनिटांचे वीस भाग फक्त. आपण काहीतरी क्रियेटिव्ह पाहतोय असं एक वेगळंच फिलिंग ही सिरिज पाहताना आपल्याला येतं. एक तास चाळीस मिनिटात सिनेमा आपण पडद्यावर पाहून लगेच संपवतो. पण तेव्हढ्या लांबीचा ॲनिमेटेड सिनेमा तयार करायला या स्टुडिओला कमीतकमी अडीच ते तीन वर्ष लागतात. मला आठवतयं 'लव्हींग व्हिन्सेंट'(हा पिक्सारचा सिनेमा नाहीये) हा सिनेमा तयार व्हायला तब्बल पाच वर्ष लागली होती. 

   तर पिक्सार स्टुडिओत हे ॲनिमेटेड सिनेमा कसे तयार होतात? त्यामागे दिग्दर्शक काय प्रकारची मेहनत घेतात. डबींग कलाकार आपले आवाज एखाद्या पात्राला देतात खरं पण त्या आवाजावरही संस्कार करावे लागतात. तो आवाज त्या पात्राला काशाप्रकारे सुट होईल यावरही बरच काम करावं लागतं नंतर. कितीतरी अर्कचित्र काढावी लागतात. ॲनिमेशन मध्ये एका सेकंदाच्या चित्रीकरणासाठी २४ पोजेस असलेली वेगवेगळी अर्क चित्र काढावी लागतात. म्हणजे पडद्यावर एका सेकंदाच्या ॲनिमेशन साठी त्या अर्कचित्रकाराला चोवीस वेगवेगळ्या पोजेस मधीली चित्र चितारावी लागतात. आपल्याला असं वाटतं की ॲनिमेटेड सिनेमा हा सगळा कंप्यूटरचा खेळ आहे. तर असं अजिबात नाहीये. म्हणजे कंप्यूटर वर कामे केली जातात पण ते फक्त एक साधन आहे सिनेमा तयार करण्याचं. Its not computer dominated movies it's really the people that make the movie. पिक्सार मधली लोकं क्रियेटिव्ह आहे तर त्यांच्या पोटात सुद्धा तितकेच क्रियेटिव्ह पण पौष्टिक अन्न जायला हवं. म्हणजे स्टुडिओत काम करणाऱ्यांचा मेंदू अधिक उत्तेजित होईल. भूक लागल्यावर सुग्रास जेवण मिळाल्यावर कोण आनंदी होणार नाही? पिक्सार स्टुडिओचं कँटीन या बारीक सारीक गोष्टींची सुद्धा फार काळजी घेतं. आज Marylou Jaso या सुंदर तसेच कल्पक तरूणीच्या हातात हे कँटीन आहे. 


     सिनेमाच्या माध्यामातून पिक्सार प्रेक्षकांना खरोखर वैश्विक अनुभव मिळवून देतो किंवा त्यासाठीच त्यांची निर्मिती केली जात असावी असाही माझा एक अंदाज आहे. हृदयाने, विनोदाने, अद्भुततेच्या अनुभवाने, आश्चर्याने जगभरातील प्रेक्षक जोडणे हे त्यांचे मुख्य लक्ष असावे. प्रेक्षक कोणत्याही प्रदेशातला, भाषेतला असुद्या, आपल्या निर्मितीची भाषा अशी असावी की ती प्रत्येकाच्या हृदयाला जाऊन भिडली पाहिजे. इंग्रजीत म्हणतात ना 'मोअर यू पर्सनल मोअर यू युनिव्हर्सल' तसं. पिक्सारचे दिग्दर्शक, संगीतकार, तंत्रज्ञ, क्रियेटिव्ह टीम हे वेगळं काही करत नाही तर आपल्याच आजूबाजूच्या लोकांकडून जवळपासच्या निसर्गातून प्रेरणा घेतात. ही लोक घरातल्या, हाॅटेलातल्या, बसस्टाॅपवरच्या लोकांचं फार बारकाईनं निरीक्षण करतात. हे रोजचं जगणंच आपल्या फिल्ममध्ये क्रियेटिव्हली कसं मांडता येईल असा विचार ते करतात. अर्थात सगळेच अनुभव हे काही सत्य नसतात. काही काल्पनिकही असतात पण त्याची प्रेरणा ही कुठे ना कुठे सत्य अनुभवावर आधारलेली असते. म्हणूनच जगातल्या सर्व प्रेक्षकांना ते भिडतं. उदा. Soul या सिनेमातील कृष्णवर्णीय न्हाव्याच्या दुकानातील प्रसंग पहा. फार सुरेख आहे तो. या आधी कृष्णवर्णीय लोकांचे न्हाव्याच्या दुकानातले अनुभव soul याच्या इतके प्रभावी कुणीच चित्रित केलेले नाहीत. कोको सिनेमात शेवटी मिगेल जेव्हा त्याच्या ममा कोकोसाठी Remember me हे गाणं गातो तेव्हा रडूच येतं. म्हणूनच सांगतोय की हे सिनेमे आपल्या भावनेला फार हळुवार स्पर्श करतात. पिक्सारच्या स्टुडिओत एक थिएटर आहे. स्टुडिओ जितका सिनेमा तयार करून झाला आहे तो त्या थिएटर मध्ये त्या सिनेमाच्या संबंधित सगळे लोक पाहतात. अगदी सामान्य प्रेक्षकाप्रमाणे पाहतात. पिक्सार स्टुडिओत एका थिएटर मध्ये पडद्यावर आपण जे पाहतोय ते मनाला भिडतय का याची खातरजमा केली जाते. मनाला नसेल भिडत तर त्यात काय सुधारणा करायला हव्या यावर चर्चा होते. ॲनिमेटेड सिनेमाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे इथे खऱ्या अर्थाने सिनेमॅटीक लिबर्टी घेता येते. म्हणजे सिनेमातील पात्राचे पाय निमुळते आणि धड असं सिक्स पॅक वालं दाखवता येतं त्यांना. दोन ऐवजी तीन चार किंवा एकच डोळा त्या पात्राला त्यांना दाखवता येतो. कठपुतळी आणि ॲनिमेशन मध्ये मोठा फरक हा की कठपुतळीला सहाच ठिकाणी वाकवता येतं तर ॲनिमेशन मध्ये शरीराचं कोणतही अंग कसही, कितीही वाकवता येतं. मानवी भावना जसे की दुःख, आनंद ,राग, द्वेष, प्रेम या सगळ्या भावना ज्या आपल्या चेहऱ्यातून व्यक्त होतात त्यात भुवयांची भूमिका फार महत्वाची असते हे मला पहिल्यांदा या सिरिज मुळे समजले. फार माहितीपूर्ण आणि उत्साहवर्धक आहे ही सिरिज. 


अजिंक्य कुलकर्णी 

Comments

  1. खूपच छान माहिती दिली सर👍👍👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मनुष्य गौरव दिन!

रेणुका देवी यात्रोत्सव - अस्तगाव

विज्ञानव्रती एच.सी.वर्मा