चरित्रलेखनाची वीण गुंफणाऱ्या वीणाताई
प्रिय वीणाताई,
सर्वप्रथम वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा आणि नमस्कार. गेल्या दशकभरातली माझी सगळ्यात मोठी कमाई जर काही असेल तर ती म्हणजे तुमचा मला मिळालेला स्नेह. फार थोडे लेखक मी असे पाहिले आहेत जे मला जसे त्यांच्या पुस्तकात, व्यासपीठावर पहायला मिळाले अगदी तसेच ते त्यांच्या वैयक्तिक जीवनातही आहेत त्यात तुमचा क्रमांक वरचा. हा कमालीचा प्रामाणिकपणा मला तुमच्यात दिसतो. आज तुम्ही वयाच्या ऐंशीव्या वर्षात पदार्पण करत आहात. अशा वेळी तुमच्यातल्या गुणांविषयी चार शब्द लिहून तुमची कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. मराठी साहित्य विश्वात नावापुढे 'कार' लागणाऱ्या बहुतेक तुम्ही एकमेव लेखिका असाव्यात. 'एक होता कार्व्हर' लिहिल्यामुळे तुम्ही 'कार्व्हरकार' झालात. वाचकांचं इतकं प्रेम तुम्ही कामावलेलं आहे. मराठी वाचकांना अनोळखी असणारे जवळजवळ डझनभर चरित्रे तुम्ही लिहिली आहेत. गेल्या चाळीस वर्षात कार्व्हरने हजारो - लाखो लोकांना जगण्याची प्रेरणा, उमेद दिली आहे. लीझ माइटनर, रोझलिंड फ्रँकलीन, सारखी स्री संशोधकांची चरित्र वाचून कित्येक तरूण मुलींना उमेदवारीच्या काळात प्रेरणा मिळाली. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे तुम्ही लिहिलेल्या रिचर्ड बेकर यांच्या चरित्राच्या प्रस्तावनेत ज्या प्रेरणा तांबेंचा उल्लेख कराता त्याही याला अपवाद नाही. त्या स्वतः एक संशोधक आहेत. इंग्लंड मध्ये त्यांच्या वाटेला आलेल्या कटू अनुभवातून बाहेर पडण्यात त्यांना तुम्ही लिहिलेल्या रोझलिंड, लीझ या चरित्रांनी प्रेरणा दिली असं त्या आवर्जुन नमूद करतात. चरित्रलेखन या विषयाला अकादमिक पठडीतून बाहेर काढत त्याला ललित अंगाने लिहिण्याचा नवीन पायंडा तुम्ही पडलात. चरित्रलेखनात लालित्य आणण्याचं महत्त्वाचं काम तुम्ही यशस्वीरित्या पार पाडलं आहे.
कार्व्हरने तुम्हाला मोठी ओळख दिली. आयडा स्कडर, लीझ माइटनर, रोझलिंड, सर्पतज्ञ, गोल्डा, राॅबी ही सर्वच चरित्र प्रेरणादायी. या सर्वांवर मराठी वाचकांनी भरभरून असं प्रेम केलं. पण तरी जेवढं प्रेम वाचकांनी कार्व्हरच्या पदरात टाकलं तेवढं प्रेम वाचकांनी खानखोजेंच्या चरित्राला दिलं नाही अशी माझी समज आहे. खानखोजेंच चरित्र मला यासाठी महत्वाचं वाटतं कारण त्यांच्या संशोधनासाठी तुमची आर्थिक, मानसिक, शारीरिक अशा सर्व पातळीवरची गुंतवणूक त्यात झाली होती. खानखोजेंच्या शोधार्थ तुम्ही नागपूरला गेला होतात. त्यावेळी खानखोजे यांच्या बद्दलची कागदपत्रे ज्यांच्या जवळ होती ते दादासाहेब ती कागदपत्रे तुम्हाला द्यायला तयार नव्हते. नागपूर टाइम्स च्या संपादिका गद्रे म्हणून ज्या होत्या त्यांनी तुम्हाला शब्दशः ओलीस ठेवलं या कागदपत्रांच्या झेरॉक्स काढून आणेपर्यंत. दिल्ली, कोलकाता, नागपूर असा किती प्रवास केलात तुम्ही तेव्हा कुठे हे पुस्तक तयार झालं. मला आठवतंय की तुमच्या घरी मी मुक्कामी असताना खानखोजे यांच्या शोधाचा तुमचा हा जो प्रवास मी तुमच्या तोंडून ऐकला होता. ते ऐकत असताना चार तास कसे गेले ते कळालंही नाही. ही सर्व चरित्र लिहीत असताना कितीतरी लोक तुमच्या मदतीला धाऊन आली. त्या प्रत्येकाच्या बाबतीत तुम्ही कृतज्ञ आहातच. पण तुम्ही जसं नेहमी म्हणता की,"मला वाचकांनी सर्वात जास्त प्रेम दिलं." तुम्ही लिहिलेलं कार्व्हरचं चरित्र आवडलं म्हणून साक्षात दुर्गाबाई भागवतांनी स्वतः लिहिलेले कार्व्हरचं चरित्र प्रकाशित करायचं मागे घेतलं. ही गोष्ट एखाद्या पुरस्कारापेक्षाही कितीतरी मोठी आहे असं मला वाटतं.
तुमची मुलं शितल आणि अनुप आज आपापल्या क्षेत्रात चांगलं काम करत आहेत. उल्लेख करावा वाटतो तो म्हणजे तुमचे जावई कौस्तुभ बॅनर्जी यांचा. 'आधुनिक फॅरेडे' असं त्यांच्याबद्दल म्हटलं जातं. इलेक्ट्रॉनिक सर्किट मधील 'इंडक्टर' मध्ये त्यांचं संशोधन वाखाणण्यासारखं आहे. त्याच बरोबर मला चंद्रकांत अण्णांचाही उल्लेख करावासा वाटतो. आपल्या पत्नीला स्वतःची अशी मतं असली पाहिजे अशी त्यांची लग्नाची अट होती. आजच्या काळात अशी अट असणारे किती मुलं असतील ? अण्णा उर्दू गझलांचे उत्तम जाणकार आहेत. अण्णांची पडद्यामागची भूमिका मला महत्वाची वाटते.
आज तुमच्या वयाच्या लेखिका सोशल मिडियापासून चार हात लांब राहतात. हे आमचं माध्यम नाही असं बहुतेकांना वाटतं. अशा या काळात सोशल मिडिया हे माध्यम तुम्ही किती उत्तमप्रकारे हाताळताहात याचं खरंच अप्रूप वाटतं. या माध्यमाचा वापर करुन तुम्हाला अधिकाधिक वाचकांशी जोडून घेता आलं आणि तुम्ही अधिकाधिक सोशल झालात. वाचकांशी थेट संवाद साधता येईल असा तुमचा यामागचा मानस. यातल्या तांत्रिक बाजू माहित नसतील तर त्यापासून बाजूला न जाता लहान मुलाला जितकं निरागस कुतूहल असतं तशा कुतुहलाने तुम्ही त्यातले बारकावे तुम्ही समजावून घेता. तुमच्या नवीन नवीन शिकण्याच्या याच वृत्तीमुळेही तुम्ही अधिकच सोशल झालात असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. आपल्यात तसं पाहिलं गेलं तर पन्नास वर्षांचं अंतर. पण आम्ही तिशी पस्तीशीतली मुलं आजूबाजूला घडणाऱ्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, पर्यावरणीय गोष्टींबद्दल काय, कसा विचार करतो हे ही तुम्हाला जाणून घेण्यात रस असतो. आमचं मत तुम्हाला महत्त्वाचं वाटतं. तुम्ही त्याची दखल घेता. या सहजतेमुळेच आपल्यातलं हे वयाचं अंतर केव्हाच गळून गेलं. त्याची जागा स्नेहाने घेतली. परवाच कैलास आणि माझं बोलणं झालं की तुम्ही आमच्याशी ओळख ठेवावी असं आमचं काहीही कर्तुत्व नाहीये. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही आमची विचारपूस करता. अन्यथा माझी शेती कशी चालली आहे? इकडे माझ्या घरी काय चालू आहे याची चौकशी करण्याचं तुम्हाला काही कारण नाही. तुमच्या या केवळ चौकशीनेही हृदय आपुलकीच्या आद्रतेने भरून येतं.
पर्यावरणाबद्दलही तुम्ही किती सजग आहात. तुम्ही किती आत्मविश्वासाने म्हणता की, "मी किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांनी कधी फटाके फोडले नाहीत. घरात आलेला कागद वाया जाऊ नये म्हणून तुम्ही झेराॅक्स च्या पाठकोऱ्या भागावर पुस्तकांचे कच्चे खर्डे लिहिलेत. तुमचं राहणीमानही अत्यंत साधं. मला त्यात कधीही कोणत्याही प्रकारचा बडेजावपणा जाणवला नाही. हा असा साधेपणा आज फार विरळ झाला आहे. कित्ती कित्ती दिलत तुम्ही आम्हा वाचकांना! इतकं असूनही तुम्ही नेहमी म्हणता की, "माझ्या लेखनाची समीक्षा झाली नाही. माझी लेखक म्हणून किती वाढ झाली? मुळात ती वाढ झाली की नाही हे मला माझी समीक्षा झाल्याशिवाय कळणार तरी कसं?" आता प्रश्न असा आहे की तुमच्या पुस्तकाची समीक्षा करणार कोण ? तुम्हीच इतकी दुर्मिळ चरित्रे शोधून काढली आहेत की त्याच्या पलीकडे जाऊन त्या चरित्रांचा अभ्यास असणाराच त्याची समीक्षा करू शकतो. तुम्ही आयुष्यभर कधी तुमच्या तत्वांपासून ढळला नाहीत. मी राजकीय तसेच जिवंत व्यक्तीवर लिहिणार नाही हे पथ्य तुम्ही आजपर्यंत पाळत आला आहात. याला अपवाद फक्त गोल्डा आणि राॅबी या दोन चरित्रांचा. गोल्डा हे राजकीय चरित्र तर राॅबी डिसिल्वा हे हयात असतानाच तुम्ही त्यांचं चरित्र लिहिलत. त्याबद्दलची तुमची कारणेही स्पष्ट आहे. पुढच्या वर्षी तुमचे सहस्त्रचंद्र दर्शन असेल. अशा वेळी माझ्यासारख्या वाचक काय करु शकतो? तुमच्यातल्या गुणांचं सिंहावलोकन मात्र मी नक्कीच करू शकेन. तुमच्यासाठी नाही तर माझ्यासाठी. तूर्तास इतकेच. थांबतो. वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा आणि नमस्कार करतो.
तुमचा
अजिंक्य
अगदी मनापासून लिहिलं आहेस अजिंक्य! वीणाताईंशी वैयक्तिक परिचय नसणाऱ्या माझ्यासारख्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू कळले. परमेश्वर वीणाताईंना दीर्घायुरायोग्य देवो..
ReplyDelete