बदलाचा प्रवास

 अमेरिकन जमिनीला वर्णसंघर्ष काही नवा नाहीये. सिव्हिल वॉरच्याही अगोदर पासून ते काल परवाच्या ब्लॅक लिव्ह्ज मॅटर वाल्या जॉर्ज फ्लाॅईड पर्यंतचा या चळवळीचा हा असा मोठा इतिहास आहे. या अमानवीय गोष्टींमध्ये झालेल्या मोठ्या बदलाची सुद्धा अमेरिकन माती साक्षीदार आहे. कित्येक गावे, शहरं या बदलाचे साक्षीदार म्हणून तो इतिहास आजही आपल्याला सांगू पाहत आहे. गेल्या चाळीस पन्नास वर्षांपूर्वीही हा वर्णसंघर्ष तितकाच टोकदार होता. हा वर्णसंघर्ष विज्ञानाची पंढरी समजल्या जाणाऱ्या नासा सारख्या संस्थेलाही चुकला नाही. अमेरिकेचा जॅकसन भाग असो वा दूरहॅम (नाॅर्थ कॅरोलीना) असो सगळीकडे कृष्णवर्णीय लोकांनी उपेक्षा, अवहेलना सहन केली आहे. श्वेतवर्णीय लोक आपल्याला माणसं म्हणून सुद्धा मोजत नाही. तिरस्काराची वागणूक तर पदोपदी देतात. कॅथरीन स्टॉकेट या लेखिकेची 'द हेल्प' नावाची कादंबरी वाचल्यावर लक्षात येतं की, अमेरिकेतील जॅकसन भागात घरकाम करणाऱ्या कृष्णवर्णीय मोलकरणीं साठी श्वेतवर्णीय लोक वेगळा संडास बांधत असत. 'रेस' नावाचा सिनेमा पाहिल्यावर लक्षात येतं की, एखाद्या खेळाडूने देशासाठी ऑलिम्पिक पदक जरी जिंकलं असलं, तरी त्याला सार्वजनिक सभागृहात की जिथे त्याचाच सत्कार होणार असतो, त्याठिकाणी त्या कृष्णवर्णीय खेळाडूनेही कृष्णवर्णीयांसाठीच्याच वेगळ्या रांगेतून यायचं. 

   कॅथरीन जॉनसन या नासातील महिला शास्त्रज्ञालाही ऑफिसच्या इमारतीत कृष्णवर्णीय स्त्रियांसाठी वेगळे बाथरूम असावे याकरता करावा लागलेला संघर्ष हा सर्वपरिचित आहे. तारजी हॅनसन या अभिनेत्रीने तो प्रसंग 'हिडन फिगर्स' या सिनेमामध्ये कसला जिवंत गेला आहे! निव्वळ कमाल. या सर्व प्रकारच्या घटनांचा शेवट काय झाला? तर बदल घडला! घडताहेत. घडतील. माणसांचा माणसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. कातड्याचा रंग वेगळा असला तरी शेवटी ती पण आपल्यासारखीच हाडामांसाची माणसं आहेत हे स्वीकारलं गेलं. अशीच एक घटना घडली आहे दूरहॅम या साउथ कॅरोलिना मधल्या शहरात. १९७२ मध्येही दूरहॅम इथे वर्णद्वेष हा टोकाचा होता. कृष्णवर्णीयांना दूरहॅम मधून हाकलून लावण्यासाठी कृष्णवर्णीय लोक राहत असलेल्या भागातील घरभाडे अवाच्या सव्वा पद्धतीने वाढवले जातात. श्वेतवर्णीयांच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरू दिलं जात नाही. एखाद्या तरुणीचा बॉयफ्रेंड जर कृष्णवर्णीय असला तर तिला धमकावलं जातं त्याची साथ सोडावी म्हणून. जर श्वेतवर्णींयांच्या दुकानातला कामगार हा कृष्णवर्णी असेल तर त्या दुकान मालकावर त्या कृष्णवर्णीय कामगाराला काढून टाकण्यासाठी मोठा दबाव टाकला जातो. इतकच नाही तर जेव्हा कृष्णवर्णीयांच्या एका शाळेला आग लागली (!की लावली) व त्यात शाळेचं मोठं नुकसान झालं होतं. तेव्हा या कृष्णवर्णीय शाळेतील मुलांना श्वेतवर्णीय मुलांच्या शाळेत प्रवेश द्यायचा की नाही त्याची गोष्ट म्हणजे 'द बेस्ट ऑफ एनिमी' हा सिनेमा होय. ओशा डेविडसन या लेखकाच्या कादंबरीवर आधारित हा नितांत सुंदर सिनेमा. लोकांच्या मनपरिवर्तनाचा हा सुंदर प्रवास अनुभवायचा असेल तर हा सिनेमा पाहायला विसरू नका. बदल होतात!

अजिंक्य कुलकर्णी

Comments

Popular posts from this blog

मनुष्य गौरव दिन!

रेणुका देवी यात्रोत्सव - अस्तगाव

विज्ञानव्रती एच.सी.वर्मा