The Dropout

फिलिस गार्डनर:- "तुला माहीत नसेल तर सांगते. वर्षानुवर्षे संघर्ष करत, रक्त आटवलं तेव्हा कुठे आज मुलींना, स्रियांना शिक्षणाचे दरवाजे उघडले आहेत. आर्थिक स्वातंत्र्य मिळालं आहे. तू चुकीच्या मार्गाने जात आहेस. आणि तुझ्या ह्या चुकीची किंमत कॅलिफोर्नियातील हजारो मुलींना भविष्यात चुकती करावी लागेल. फार संघर्ष केल्यानंतर हे दिवस आलेत, नास करु नकोस त्याचा."

एलिझाबेथ :- "स्टीव्ह जाॅब्ज, बील गेट्स हे याच स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे Dropout विद्यार्थी होते. मला माझ्या जवळच्या लोकांनी सांगितलं आहे की मी अशीच ब्रिलिअंट आहे." 

फिलिस गार्डनर:- "ब्रिलिअंट? तुला माहीत नाहीये का, माझ्या अवतीभोवती नोबेल लाॅरेट्स आहेत ते!"

 अशा कठोरपणे नीतिमूल्ये जोपासणाऱ्या या प्रा. गार्डनर बाईंनी समजावून सांगितलं तरी त्या सोळा सतरा वर्षाच्या मुलीच्या डोक्यात काही केल्या प्रकाश पडेना. कारण तिला एका वेडाने झपाटलेलं होतं. जगातील सर्वात कमी वयात अब्जाधीश होणं हे तिचं वेड. स्टॅनफोर्ड विद्यापीठात बायोटेक्नॉलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या या मुलीला या वेडाने इतकं झपाटून टाकलं की तिला अब्जाधीश होण्याच्या पुढे काहीच दिसेनासे झाले. तिने शिक्षण अर्धवट सोडलं. स्वप्न (?)पूर्ण करण्यासाठी अनिवासी भारतीय सनी बलवानी याच्या सोबत सूत जुळविले. एक कंपनी स्थापन केली. 'थेरोनोज' हे नाव त्या कंपनीचे. थेरपी + डायग्नोसीस याचा अपभ्रंश म्हणजे थेरोनोज. त्या मुलीच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली की लोकांना वेगवेगळ्या आरोग्य चाचण्या करण्यासाठी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी रक्त द्यावे लागते. त्याऐवजी एटीएम कार्ड सारख्या एखाद्या कार्डवर रक्ताचा एक थेंब दिला आणि ते कार्ड एखाद्या मशिनमध्ये घातल्यावर आपल्याला पाहिजे त्या सर्व आरोग्य चाचण्या करून मिळाल्या तर? 

   तसं पहायला गेलं तर फार विलक्षण कल्पना होती ही. कुणाही गुंतवणूकदाराला मोहावणारी. त्या मुलीच्या या मनमोहक कल्पनेने कोण कोण भारावलं नव्हतं? लोक तिला तरुणांची भावी आदर्श वगैरे म्हणायला लागले होते. वाॅलग्रीन सारखी मातब्बर कंपनी म्हणू नका, रुपर्ट मरडाॅक म्हणू नका, इतकच काय राॅकफेलर सुद्धा तिच्या कंपनीत गुंतवणूक करण्याचा विचार करत होती. पण या मुलीच्या कंपनीला मात्र तसं मशिन तयार करण्यात कधीच यश आलं नाही मग आपल्या स्वप्नाचं काय? ते कसं गुंडाळून ठेवायचं? मग सुरू होतो एकावर एक खोटे बोलणे, आर्थिक फसवणूकीवर फसवणूकीचा सिलसिला. बुडत्याचा पाय खोलात याप्रमाणे ती यात इतकी अडकत जाते बाहेर यायचे मार्ग बंद होऊन जातात. आपल्या कंपनीतल्या सर्व कामगारांना इतकी सक्त ताकीद असते की ते बाहेर एक बोलत नसत. पेटंट्स कंपनीच्या नावावर न घेता मुख्य केमिस्टच्या नावावर  रजिस्टर करायची. उद्या गोत्यात आलो तर पहिला बळी आपला जाणार हे जेव्हा माहीत होते त्याला तेव्हा तो आत्महत्या करतो. अन्न आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना लाच देऊन कधीही कंपनीच्या प्रयोगशाळेचे आॅडीट होऊ दिले नाही. तिची थेरोनोज कंपनी स्वतः तर मशिन तयार करू शकली नाहीच पण जे मशिन थेरोनोज स्वतःचं म्हणून दाखवत होती त्यातली मुख्य प्रणाली तर सिमेन्सची होती. सिमेन्सला याबद्दल काहीच माहिती नव्हती. अशी ही फसवणूकीचा धंदा राजरोसपणे सुरु होता. बरं आता त्या थेरोनोजच्या मशीनने ज्या चाचण्या केल्या त्याचे रिपोर्ट जे रुग्णांना दिले ते तरी खरे होते का? तर तेही नाही. लाखो लोकांचं चुकीचं अरोग्य निदान केलं गेलं होतं. या लाखो लोकांनी आजार नसताना विनाकारण डायबेटीस, ब्लडप्रेशरच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. 

     त्या मुलीच्या ह्या सर्व गोरखधंद्याची माहिती वाॅलग्रीन कंपनीच्या माजी अध्यक्षाचा नातू जो थेरोनोज मध्ये काम करत होता त्याने वाॅल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्राच्या एका पत्रकाराला सांगितली. शोधपत्रकारीता करणाऱ्या या पत्रकाराचे नाव आहे जाॅन कॅरीरू. कॅरीरू यांचे बॅड ब्लड नावाच्या पुस्तकाचा रिव्हू मी जानेवारीत लोकसत्तामध्ये वाचला होता. मा.गांधी नेहमी म्हणायचे की केवळ आपलं ध्येय शुद्ध असून चालत नाही तर ध्येयाकडे जाणारा मार्गही शुद्धच हवा.ती मुलगी इथेच फसली. अवास्तव महत्वाकांक्षा ह्या केवळ स्वतःलाच खड्ड्यात घेऊन जात नाही तर तुमचे कुटुंबातील सदस्यांना, आणि तुम्हाला आदर्श मानणाऱ्या लोकांनाही तुम्ही खड्ड्यात घेऊन जाता.  गार्डनर बाईंची भविष्यवाणी खरी ठरली. कॅलिफोर्नियात आजही बँका, पतपुरवठा करणाऱ्या संस्था ह्या वीस बावीस वर्षाखालील मुलींना व्यवसाय करण्यासाठी कर्ज देण्यास नकार देतात. येणाऱ्या असंख्य मुलींच्या स्वप्नांना सत्यात येण्याअगोदरच त्यांची राखरांगोळी होते आहे. यासाठी ती जी मुलगी जबाबदार होती तिचं नाव आहे एलिझाबेथ होम्स. एलिझाबेथ होम्स वरील Dropout नावाची ही सिरिज गरमचांदनी वर पहायला मिळेल. 

ता.क. -  अमेरिकन न्यायालयाने एलिझाबेथ होम्सची चौकशी करण्याचे आदेश दिले (२०१३).गेल्यावर्षी या प्रकरणावरची सुनावणी झाली. एलिझाबेथ त्यात दोषी सापडली गेली. तिला  होवीस बावीस वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते किंवा झाली असेल आता. 

अजिंक्य कुलकर्णी 

Comments

Popular posts from this blog

मनुष्य गौरव दिन!

रेणुका देवी यात्रोत्सव - अस्तगाव

विज्ञानव्रती एच.सी.वर्मा