मनुष्य गौरव दिन!
सृष्टीतील श्रेष्ठ निर्मिती ही मनुष्य आहे. पण मनुष्य सृष्टीचालकासोबत असलेला आपला संबंध विसरून स्वतःचीच पीछेहाट करवून घेतो. अशावेळी तो स्वतःला बलहीन समजायला लागतो. भावनिक आद्रतेचे बाष्पीभवन झाल्यासारखं, जीवनात गरीमा गमावून बसल्यासारखं स्थिती तो अनुभवतो. अशावेळी निस्वार्थ प्रेमाची ऊब व उत्साह त्याला मिळाला तर, जीवनाला काही अर्थ प्राप्त होतो. असे केल्याने त्या व्यक्तीमधील आत्मगौरव, अस्मिता, तेजस्विता अशा विविध गुणांना पंख फुटतात. असाच प्रभूस्पर्श 'हट टू हट आणि हार्ट टू हार्ट' घेऊन गेले स्वाध्याय परिवाराचे प्रणेते प. पू. पांडुरंग शास्त्री आठवले. ज्यांना संपूर्ण स्वाध्याय परिवार प्रेमाने 'दादाजी' म्हणतो. त्यांचा जन्मदिन (19 ऑक्टोंबर) स्वाध्याय परिवार हा 'मनुष्य गौरव दिन' म्हणून साजरा करतो. भारतातील कृतिशील तत्वज्ञांमध्ये ज्यांचा क्रमांक फार वरचा लागतो. स्वाभिमान गमावलेल्या, हीन-दीन तसेच केवळ लाचारी करण्यातच जीवनाची इतिकर्तव्यता समजणार्या लोकांना स्वाभिमानाचं महत्व कधी समजेल का ? त्यांना स्वतःबद्दल कधी गौरव वाटेल का ? ही दादांची व्यथा होती. स्वाभिमानानं परिपूर्ण असं जीवन कुणाला जगावसं वाटणार नाही? दादांची दुसरी एक व्यथा होती की उच्चवर्णीय आहे म्हणून त्याला समाजात सन्मान आणि अन्यवर्णीय आहे म्हणून त्याचा अपमान? हे काही योग्य नाही. समाजात फक्त वित्तवान, सत्तावान, ज्याच्याकडे चांगले शिक्षण आहे काय फक्त त्यांनीच गौरवपूर्ण जगायचं का? ज्यांच्याकडे वरील पैकी काहीच नाही त्यांनी ते नाही म्हणून लाचारीचं जीणं जगायचं का? मग प्रश्न असा आहे की ज्यांच्याकडे पद, प्रतिष्ठा, पैसा, सत्ता शिक्षण असं काहीच नाही त्यांनी कशाच्या जोरावर गौरवपूर्ण जगावं? अशी कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे या मागे पडलेल्या वर्गाच्या पाठीचा कणा ताठ होईल. ती गोष्ट म्हणजे 'मी प्रभूचा अंश आहे' ही. ते ईशतत्व माझ्यात आहे हे आहे ते गौरवाचे कारण. गीतेतही कृष्णाने म्हटले आहे की 'ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः.' केवळ मनुष्यच भगवंताचा स्पर्श समजू शकतो. कारण विकसित बुद्धीशक्ती ही फक्त मनुष्याकडेच आहे. ही संपूर्ण सृष्टी चालवणारा ईश्वर माझ्यासोबत आहे यात आत्मगौरव (स्वतःबद्दलचा अभिमान) आहे.
भक्ती ही एक मोठी सामाजिक शक्ती आहे. दादांनी भक्ती मधील लाचारीही दूर केली. ईश्वर माझ्यासोबत आहे याने जसा स्वतःबद्दलचा आत्मगौरव वाढतो तसेच ईश्वर दुसऱ्या व्यक्तीमध्ये सुद्धा आहे याने परसन्मानही उभा राहतो. आत्मगौरवात मी छोटा नाही, हलका नाही ही समज व्यक्तीमध्ये उभे राहते. समाजात वित्तवान लोक जसे दानधर्म करतात तसं मला करता येत नाही या विचाराने ही मनुष्य स्वतःला हलका समजू शकतो. दादांनी या गोष्टीवर गहन चिंतन केले होते. त्यानंतर विविध प्रवृत्तींद्वारे मनुष्यातील ही लाचारी दूर कशी होईल यावर काही प्रयोग केले. मनुष्य स्वतःच्या कर्मावरचा मालकी हक्क सोडू शकत नाही असा बर्ट्रांड रसेलच्या प्रश्न होता. कार्ल मार्क्स म्हणतो की अपौरूषेय वित्त (कुणाचीही मालकी नसलेले) कुणी उभं करू शकत नाही म्हणून. दादांनी या दोन्ही विचारवंतांना आपल्या विविध प्रयोगातून उत्तरे दिली. या विविध प्रयोगातूनही लोकांमध्ये गौरव उभा राहिला. उदा. 'योगेश्वर भावकृषी' सारखा प्रयोग आहे. त्यात जी व्यक्ती नांगरायला जाते ती पेरायला जात नाही. जो खुरपणी करायला जाते तो सोंगणीला जात नाही. जो काढणीला जाते तो विक्रीला जात नाही. त्यामुळे या प्रयोगातून निर्माण झालेल्या धान्यावर कुणा एकट्याचा असा मालकी हक्क असत नाही. तसेच अशी ही अपौरूषेय लक्ष्मी निर्माण करण्यात आपलाही वाटा आहे यानेही सर्वसामान्यांना गौरव वाटतो.
'सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो' अर्थात भगवंत माझ्यात आहे. विश्व चालवणारी शक्ति माझ्या हृदयात आहे तर मी स्वतःला हलका का समजू? अशी भक्तीची बैठक दादांनी सर्वांना दिली. जीवनात कृतज्ञता निर्माण व्हावी म्हणून दादांनी त्रिकालसंध्या सारखा क्रांतिकारी प्रयोग दिला. कोळी बांधवांसाठी मत्स्यगंधा, हिर्याला पैलू पाडणार्यांसाठी हिरामंदिर, शेतकर्यांसाठी योगेश्वर भावकृषी सारख्या यशस्वी प्रयोगातून अपौरुष्येय लक्ष्मी (indwelling wealth ) निर्माण करून दाखवली. UNO चे माजी सदस्य आणि इराणचे तत्कालीन शिक्षण मंत्री डॉ. माजिद रेहनुमा या कार्याचा गौरव करताना म्हणतात की Swadhyay is silent but yet singing revolution. केवळ ब्रेड ओरियंटेड शिक्षण घेतलेल्या आजच्या तरुण मुलांना लाईफ ओरियंटेड शिक्षण मिळावे म्हणून भावसौरभ -सिन्नर, भावनिर्झर – अहमदाबाद, तत्वज्ञान विद्यापीठ – ठाणे इथे शैक्षणिक प्रयोग केले.
गीतेतील विविध सिध्दांत आणि दैवी गुण जीवनात उतरविण्याचा विश्वास सामान्य माणसातही उभा केला दादांनी. ज्याचा जवळ पैसे आहे तो विहीर खोदतो त्याला पाणी लागते पण शेजारच्या व्यक्तीच्या विहीरीचे पाणी कमी होते, ज्याचे पाणी कमी झाले तो Have not आणि ज्याला पाणी मिळाले तो Haves. आजची ही एक ज्वलंत समस्या आहे Haves आणि Have Not या दोघातली दरी कमी कशी करणार ? ज्याचाजवळ पैसा आहे तो दान करतो पण घेणारा मात्र हलका लाचार, दीन बनतो. देणार्यालाही मोठा असल्याचा अहं नाही आणि घेणार्यातही दीनातेचा भाव नाही… काय असा समाज असू शकतो ? तर , हो ! अशी गावंच्या गावं दादांनी बदलवून दाखवली आहेत. 'अमृतलायम' म्हणतात त्याला. समाजात विषमता ही राहणारच. सुधारकांना वाटते की समान संधी दिल्याने विषमता जाईल. पण समान संधीने समर्थ हा अधिक समर्थ बनेल. त्यामुळे Haves आणि Haves Not मधील फरक हा एकमेकांशी निस्वार्थ संबंध बांधल्यानेच कमी होऊ शकतो. यासाठी दादांनी 'भक्ति' उचलली. 'Bhakti is a Social Force' ही दादांची धारणा आहे.
मानवी जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या अर्थशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, तत्वज्ञान या पाचही अंगांनी दादांनी विविध समाजांचे (आगरी, वागरी, सागरी, नागरी, शेतकरी, कष्टकरी) दादांनी उत्थान घडवून आणले. दादांना भारत सरकार तर्फे पद्मविभूषण तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील रॅमन मॅगसेसे तसेच टेम्पलटन सारखे मानाचे पुरस्कारही मिळालेले आहेत. असा आत्मगौरव आणि परसन्मान मनुष्यांमध्ये उभा करणाऱ्या पांडुरंग शास्त्री आठवले उर्फ दादांचा जन्मदिवस हा स्वतःचा जन्मदिवस म्हणून साजरा न करता तो अखिल मानवजातीचा गौरव म्हणून साजरा करण्यात यावा यातच या दिवसाची त्याची महत्ता दिसून येते. मनुष्य गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
अजिंक्य कुलकर्णी
8208218308
Jay yogeshvar dadana manapasun namaskar
ReplyDeleteधन्यवाद
Deleteपुजनीय पांडुरंग शास्त्री आठवले (दादाजी) यांच्या गहन आणि सुक्ष्म जीवन दृष्टीचा सुंदर सारांश अजिंक्य भाऊ..👌👌👌👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद
Deleteखूप खूप धन्यवाद
DeleteAushyabhar swatahala eka mothya satkarma sathi vahun dena..he khup kami lokanna jamata...ईश्वर माझ्यासोबत आहे याने मनाची दुर्बलता निघून जाते व स्वतःच्या असण्याचा गौरव वाटू लागतो..', dadancha ha vichar khup chaan sangitlas.!! Khup khup Shubheccha.
Deleteआपणासही शुभेच्छा
Deleteअभिनंदन भाऊ, खूपच छान मांडणी केली आहे संक्षिप्त स्वरूपात दादांच्या वैश्विक कार्याचा आढावा घेतला आहे. घागर मे सागर.
ReplyDeleteजय योगेश्वर
🙏🏻
ReplyDelete