गृहभंग
डॉ.एस.एल.भैरप्पा यांची मराठी वाचकांना आज वेगळी स्वतंत्र अशी ओळख करून देण्याची काही एक आवश्यकता नाही. गेल्या तीन चार दशकांहून अधिक काळापासून मराठी वाचकांचा भैरप्पांच्या पुस्तकांशी परिचय आहे. भैरप्पांची मराठीमध्ये मोठी ओळख निर्माण करून देण्यामध्ये त्यांच्या पुस्तकांच्या अनुवादिका उमा कुलकर्णी यांचा मोठा वाटा आहे. उत्तम अनुवाद कसा असावा? यासंबंधीचे माझे साधे सोपे निकष आहेत. अनुवाद वाचत असताना आपण सतत अडखळतोय असं होता कामा नये. एखादं वाक्य वाचलं असता पुढचा संदर्भ लागण्यासाठी ते वाक्य पुन्हा पुन्हा वाचण्याची गरज पडू नये. गृहभंग या निकषावर अतिशय खरी उतरते. उमाताईंनी भैरप्पा यांची गेल्या वर्षी मराठीत अनुवादीत केली गेलेली कादंबरी म्हणजेच 'गृहभंग' ही होय. मला खूप आवडली ही कादंबरी.
'गृहभंग' चं कथानक घडतं ते १९२० - १९४५ या दरम्यान कर्नाटकातील 'रामसंद्र' या छोट्याशा गावात. ही गोष्ट आहे नंजम्मा ह्या कानडी ब्राम्हण स्त्रीची. या कादंबरीत वरील कालखंडात एकूण भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रीचं स्थान काय होतं हे वाचणं फार फार वेदनादायी आहे. नंजम्मा ही त्या स्त्री वर्गाचं प्रतिनिधित्व करते ज्यांना ना माहेरची सोबत आहे ना सासरी सुख आहे. १९२० ला टिळक गेले. त्या अगोदर संमती वयावरुन टिळक विरुद्ध आगरकर हा वाद अवघ्या महाराष्ट्राने अनुभवला आहे. बालविवाह ही गोष्ट तर या काळात शास्त्रसंमत. नंजम्माचाही बलविवाहच झाला तो ही एका शानभोग (गावातील महसूल गोळा करणारी व्यक्ती) असलेल्या चेन्निंगरायशी. हे महाशय बायकोशी बोलताना शिवी हासडल्याशिवाय तोंडातून एक वाक्य बाहेर काढत नाही. नवरा, सासू असे हलकट तर वडील, भाऊ भयंकर कोपिष्ट! नवरा खाण्यासाठी इतका लाचार की त्याचे खाण्यासंबंधीचे प्रकार वाचतानाही आपल्याला शिसारी आल्याशिवाय राहत नाही. कादंबरीतल्या खल प्रवृत्तीच्या पात्रांच्या तोंडात सतत शिव्या. ह्या शिव्या अनुवादित करताना उमाताईंनी कुठेही हात आखडता घेतलेला दिसत नाही किंवा त्या शिव्यांची धार बोथट केली आहे असंही नाही. कादंबरीत संपत्तीसाठी, खाण्यासाठी, पैशाचे लोभी लोक तर पदोपदी भेटतातच त्याचबरोबर कारूण्याने भरलेली, दुसऱ्यांच्या दुःखाला आपलं दुःखं समजणारे नंजम्माचे शेजारी मादेवय्या तसेच परिस्थितीमुळे वेश्याव्यवसाय करणारी पण वेळ आली म्हणून नंजम्मानंतर अनाथ विश्वला पोटाशी धरणारी नरसी सुद्धा मनात घर करुन जाते. यात अशीही माणसं आहेत जी सुरूवातीला हेकट, क्रूर तर वाटतात पण काहीकाळाने त्यांच्यातही प्रेमाचा, आत्मीयतेचा अंकुर फुटतो. एका घराची होणारी ही वाताहत मनाला फार खात जाते.
महेश एलकुंचवार यांच्या 'वाडा चिरेबंदी' या नाटकात जसं एकत्रित असलेलं कुटुंब पुढे दुभंगून जातं तसंच पण वेगळ्या मार्गाने हे शानभोगी असलेल्या कुटुंबाचा गृहभंग होतो. नंजम्मा ही थोडी साक्षर स्त्री असल्याने ती नवऱ्याच्या शानभोगीच्या चोपड्या लिहून, पळसाच्या पानांच्या पत्रवाळ्या विणून संसार कसाबसा चालवत असते. तिला हे फार वेळीच कळून चुकतं की ही परिस्थिती बदलायची असेल तर त्याला एकच उपाय आहे आणि तो म्हणजे शिक्षण. ती आपल्या सर्व मुलांना शिकवण्यासाठी खूप मेहनत घेत असते पण या मेहनतीवर पाणी फेरलं जातं ते गावात येणाऱ्या सततच्या प्लेगने. आपल्याला प्लेग माहीत असतो तो टिळकांनी केसरीत लिहिलेल्या "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?" आणि त्यानंतर चाफेकर बंधूंनी केलेल्या रँडच्या हत्येसंदर्भात. पण प्रत्यक्षात प्लेग गावात आल्यावर गावांमध्ये नक्की काय घडायचं हे आपल्याला फारसं माहीत नसतं. प्लेग आल्यानंतर त्यावर गावातले लोक काय करत हे खूप डिटेलमध्ये 'गृहभंग' मध्ये वाचायला मिळतं. गृहभंग ही त्या खंबीर असलेल्या नंजम्माची गोष्ट आहे.
गृहभंग
मूळ लेखक - डाॅ. एस.एल.भैरप्पा
अनुवाद - उमा कुलकर्णी
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस
पाने - ३६८
किंमत - ४९०
अजिंक्य कुलकर्णी
खूपच छान, एका सुंदर पुस्तकाचा सुंदर परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद
ReplyDeleteधन्यवाद 😊
Deleteखूपच छान पुस्तक परिचय... अनुश्री खैरे
ReplyDeleteधन्यवाद मॅडम.
Delete