Scoop
जिग्ना व्होरा या गुन्हेगारी जगाच्या वार्ताहर. त्यांच्या 'बिहाइंड बार्स इन भायखळा' या पुस्तकावर आधारित व हंसल मेहता दिग्दर्शीत वेब सिरिज म्हणजे स्कूप. इतर वृत्तपत्रांना मिळण्यापूर्वी एखाद्या वृत्तपत्राला मिळालेली व त्याने प्रसिद्ध केलेली बातमी म्हणजे स्कूप. करिष्मा तन्ना या टिव्ही मालिका कराणाऱ्या अभिनेत्रीला स्कूप मध्ये जिग्नांची भूमिका साकार करण्याची चांगली संधी मिळाली आहे. त्या भूमिकेला पडद्यावर न्याय देण्यात ती मोठ्या प्रमणात यशस्वी ठरली आहे. जिग्ना ह्या 'एशियन एज' या इंग्रजी वर्तमानपत्राच्या गुन्हेगारी जगताच्या वार्ताहर होत्या. 'मुंबई मिरर', 'मिड डे', 'फ्री प्रेस जर्नल' आणि 'एशियन एज' ही वर्तमानपत्रे आपला व्यवसाय वाढवणे, तसेच 'सर्वात आधी आपणच बातमी मिळवली/ छापली' या साठी या वर्तमानपत्रांची सुरु असलेली घाणेरडी चढाओढ या वेबमालिकेत पाहताना आपण फार अस्वस्थ होतो. सनसनाटी बातम्या मिळवायच्या. का मिळवायच्या ? तर, वर्तमानपत्राचा खप वाढवण्यासाठी. पत्रकारांनाही आपण किती डॅशिंग आहोत, आपली कशी वरवर पर्यंत 'पोहोच' आहे हे दाखवण्यासाठी, प्रमोशन मिळवण्यासाठी. आणि ह्या बातम्या मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात ह्या गोष्टीला आज आपण बऱ्यापैकी used to झालो आहोत. पण अशा काळातही पत्रकारीतेची मूल्ये जपणारा, नीतिमान संपादकाची भूमिका मोहम्मद झिशान अय्युब याने फार उत्तम प्रकारे साकारली आहे. छोट्या छोट्या भूमिकेतील सहकलाकारांनी आपापली भूमिका उत्तम वठवली असेल तर मालिकेची उंची वाढायला मदतच होते हे स्कूपमध्ये पुन्हा दिसून आलं
मुंबई पोलिसांची जी प्रतिमा आपल्या मनात टिपिकल बाॅलिवूडी सिनेमांनी उभी केलीली असते त्याला ह्या मालिकेत सरळ सरळ तडा जातो. मुंबई पोलिसांचे दाऊद, छोटा राजन, छोटा शकील या गुंडासोबत असलेले अप्रत्यक्ष सलोख्याच्या संबंध असतात हे पाहून आपल्याला चिड येते. हरमन बवेजाने ही पोलिस अधिकाऱ्याची भूमिका छान केली आहे. भायखळा जेल मध्ये जिग्ना यांनी काय भोगलं असेल याची कल्पना मालिकेतील चौथा आणि पाचवा भाग पाहिल्यावर आपल्याला येते. जेल मध्ये कैद्यांच्या एकमेकांच्या गँग, इतर कैद्यांवर आपले वर्चस्व रहावे म्हणून चाललेले ह्या गँग लिडरचे प्रयत्न, कैद्यांना कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे, 'आपण जामीन मिळण्यास सुद्धा अपात्र आहोत' अशीच त्यांची समजूत झालेली असते. जामीन मिळवण्यासाठीच्या साध्यासुध्या कायद्याचे त्यांना ज्ञान नसणे हे वास्तव फार अस्वस्थ करते. जेवणाचे हाल, अस्वच्छ जेल हे पाहणं फार किळावाणं आहे. मालिकेतील हे दोन भाग जरा स्लो झाले आहेत. ही मालिकेची गरज पण आहे. पण तरीही प्रेक्षक म्हणून आपल्याला वाटतं की,''कधी संपेल हे? आणि कोर्ट रुम ड्रामा कधी सुरु होईल?" शेवटच्या भागात जो कोर्ट रुम ड्रामा आहे तो कमाल झालाय! जैमिनी पाठक यांनी ही वकिलाची भूमिका फार छान केली आहे. एकंदरीत सहा भागांची ही मालिका पहायला हरकत नाही. अर्थात गुन्हेगारी संबंधित मालिका पाहण्याची इच्छा असेल तर. १३-१४ वर्षांखालील मुलांना अजिबात दाखवू नये.
अजिंक्य कुलकर्णी
Great 👍
ReplyDelete