मातीगारी

    आफ्रिकी साहित्य विश्वातील एक मोठं प्रस्थ म्हणजे गुगी वा थियांगो. थियांगो हे मूळचे केनिया या देशातील. थियांगो यांचे आपली मातृभाषा गिकुयू आणि इंग्रजीवरही प्रचंड प्रभुत्व आहे. सुरुवातीच्या चार कादंबऱ्या त्यांनी इंग्रजीत लिहिल्या. 'नागहिका दिंदा' हे नाटक लिहिल्यामुळे थियांगो यांना कैदेत ठेवले गेले होते. कैदेत असताना त्यांनी निर्णय घेतला की आपण कादंबरी ही आपल्या मातृभाषा गिकुयूतच लिहायला हवी. कैदेत लिहिण्यासाठीचे साहित्य उपलब्ध करुन देत नसल्यामुळे त्यांनी आपली कादंबरी ही अक्षरशः टाॅयलेट पेपरवर लिहिली. पुढे त्यांनी आपल्या साहित्यिक अभिव्यक्ती साठी गिकुयूच कायम ठेवली. थियांगो यांची 'मातीगारी' ही कादंबरी सर्वप्रथम गिकुयू भाषेत १९८६ साली प्रकाशित झाली. माराठीत त्याचा नुकताच अनुवाद प्रसिद्ध केला आहे मैत्री प्रकाशनाने. तर अनुवाद केला आहे नितिन साळुंखे यांनी.

     या कादंबरीच्या कथानकाला केनियातील तत्कालीन राजकीय वातावरणाची पार्श्वभूमी आहे. केनियात सत्तर ऐंशीच्या दशकात प्रचंड राजकीय अनागोंदी होती. नावाला लोकशाही पण प्रत्यक्षात हुकूमशाहीच तिथे राज्य करत होती. अशा राजकीय अराजकतेच्या काळात ही कादंबरी प्रकाशित झाली आणि या कादंबरीने केनियन समाजात एक अभूतपूर्व वादळ निर्माण केलं. मातीगारी हा जो या कादंबरीचा नायक आहे त्याने उपस्थित केलेले प्रश्न हे लोकांच्या तोंडी आले. अभूतपूर्व आणि नोंद घेण्याजोगी गोष्ट अशी की, कादंबरीचा नायक मातीगारी हे एक कादंबरीचे पात्र न राहता एका वास्तविक लोकनेत्याच्या रुपात लोकांत ओळखले जाऊ लागले होते. एकदा तर केनिया सरकारने चक्क मातीगारीला अटक करण्याचे फर्मानही जारी केले होते. केनिया सरकारला जेव्हा त्यांना कळले की, मातीगारी हा वास्तविक प्राणी नसून ते काल्पनिक कादंबरीतले एक पात्र आहे,ज्याने लोकांचे मन आणि मस्तिष्क भारावून टाकले आहे; हे कळाल्यावर त्यांनी बाजारातून मातीगारीच्या सर्व प्रती जप्त केल्या. घराघरात घुसून त्यांनी लोकांकडून ह्या कादंबरीच्या प्रती जप्त केल्या.

    अन्याय्य सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या एखाद्या लेखकासमोर, त्याच्या साहित्यासमोर ती सत्ता घाबरते आणि त्या साहित्यावर बंदी आणते, त्याच्या अटकेचं वाॅरंट काढते. पण एखाद्या देशातील सत्ता ही एखाद्या कादंबरीतल्या पात्राला घाबरते हे उदाहरण मात्र एकमेवाद्वितीयच असेल! फक्त यावरूनही या कादंबरीचं आणि लेखकाचं सामर्थ्य लक्षात यावं. मातीगारी या कादंबरीतलं मुख्य पात्र मातीगारी हा आफ्रिकेतील अतिशय पददलित समाजातील अन्यायग्रस्त तरुण आहे. त्याने एका दुर्गम, ओसाड डोंगरावर अपार कष्ट करुन सुजलाम सुफलाम् शेती फुलवली. तो तिथे छानसं घरही बांधतो. पण त्या सुंदर शेतीवर नजर पडते एका गोऱ्या ब्रिटिश पोलिसाची. त्या गोऱ्या ब्रिटिशाला मदत करतो मातीगारीच्याच जमातीतला एक तरूण. त्या गोऱ्या अधिकाऱ्याने त्याला शेतीतला हिस्सा देण्याचे आमीष दाखवलेले असते. मातीगारीला स्वतःच्याच शेतातून, घरातून बळजबरीनं हकलून दिलं जातं. नंतर या अन्यायाच्या विरोधात तो पेटून उठतो. पण केवळ एकट्याने पेटून उठून चालणार नाही तर हा अन्याय्यी व्यवस्थेच्या विरूद्ध आपल्या सर्व समाज्यालाही जागे करावे लागणार आहे. म्हणून मातीगारी भूमिगत चळवळ उभी करतो. 

    लोकांमध्ये जाऊन तो लोकांना प्रश्न विचारून विचारतो की, "तुम्ही आपल्या मुलांना माती खाताना आनंदानं बघत बसाल काय? या राक्षसांनी आपल्या धरतीवरचं कोवळं सौंदर्य कसं मातीमोल केलंय हे तुम्ही फक्त बघत बसणार का? शांततेच्या बुरख्याआड लपून तुम्ही भीतीला तुमच्यावर राज्य करुन देता? मातीगारी कारखाण्यात काम करणाऱ्या कामगारांनी वाढिव वेतनासाठी जो संप केला आहे त्या संपांनाही वेळोवेळी मदत करत असतो. मातीगारी देशातल्या राजकारण्यांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पाद्रींना-देशातल्या विभिन्न वर्गांना प्रश्न विचारतो. तो बसमध्ये, रेल्वेत, हाॅटेलात, चर्चमध्ये प्रत्येक ठिकाणी सत्य आणि न्याय शोधत असताना भेटणाऱ्या प्रत्येकाला प्रश्न विचारत असतो. प्रश्न विचारून तो प्रत्येकाला जागं करत असतो. असं हे क्रांतिकारी पात्र असलेली ही कादंबरी वाचकांनी आवर्जुन वाचावी. या पुस्तकातील गिकुयू उच्चार बरेचसे चुकलेले आहेत. उदा. लेखकाचं ना थ्योन्गो असं नसून ते थियांगो असं आहे. मला गिकुयू भाषा येत नाही पण गिकुयू भाषेमधील शब्दांचा उच्चार कसा याच्या काही टिप्स लेखकाने स्वतः त्यांच्या 'द पर्फेक्ट नाईन' या महाकाव्यात दिल्या आहेत त्यावरून मी हे म्हणतोय. अर्थात जे ज्याला माहीत आहे त्यालाच खटकेल. 

अजिंक्य कुलकर्णी

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मनुष्य गौरव दिन!

रेणुका देवी यात्रोत्सव - अस्तगाव

विज्ञानव्रती एच.सी.वर्मा