'अनफर्गेटेबल' - जगजित सिंग

 हे पुस्तक वाचेपर्यंत जगजित सिंग यांच्याबद्दल सर्वसामान्य रसिकाला जेव्हढी माहिती असते; तेवढीच माहिती मला होती. जगजित सिंह यांच्या ज्या काही गजल, चित्रपटातील गाणी आहेत उदा. 'तुम जो इतना मुस्कुरा रहे हो", "होटों से छू लो तुम मेरा गीत अमर कर दो", "तुमको देखा तो ये खयाल आया" इत्यादी. यापलीकडे माझी काही झेप गेली नाही. जगजित सिंग यांनी गायलेल्या गाणी गजला आपण ऐकल्या पाहिजे हे मला एका पुस्तकाची प्रस्तावना वाचल्यावर जाणवले. लेखिका नीलांबरी जोशी यांचे 'मनकल्लोळ' हे ते पुस्तक.  नीलंबरी मॅडम यांना जगावेसे वाटेना, आत्महत्या करण्याचे विचार त्यांच्या मनात येत होते. त्या म्हणतात की त्यावेळी मी ब्लॅक कॉफीचे मगचे मग रिचवायचे आणि जगजित सिंग यांना ऐकत बसायचे. हे जेव्हा वाचलं त्यावेळी जगजित सिंग यांना ऐकले पाहिजे असं वाटायला लागलं. मागच्या महिन्यात उल्का राऊत यांनी हर्मन हेस या इंग्रजी लेखकाच्या 'सिद्धार्थ' या पुस्तकाचा अनुवाद केल्याची पोस्ट त्यांच्या फेसबुक भिंतीवर टाकली होती. मी ते पुस्तक त्यांच्याकडून मागवलं. सोबत त्यांनी हे 'अनफर्गेटेबल जगजित सिंह' हे पुस्तकही पाठवलं. 

    सेलिब्रेटी झालेल्या व्यक्तींचा यशाच्या शिखरावर असताना पाय घसरण्याची शक्यता ही फार असते. आणि त्यांच्या या घसरण्याच्या चटक मटक बनवलेल्या बातम्या वाचायला लोकांना आवडतातही. ही वाचक म्हणून अत्यंत वाईट मानसिकता आहे. पण जगजित सिंग यांच्या बाबतीत मात्र असे होत नाही. उलट जगजित सिंग हे मला जास्त मानवी वाटले. हे वाटण्याचं कारण मला त्यांचा साधेपणा जास्त भावला. सत्या सरन हे इंग्रजीतून संगीत, चित्रपट विषयक लिहिणाऱ्यातलं एक मोठं नाव आहे. त्यांच्या 'बात निकलेगी तो फिर' या पुस्तकाचा 'अनफर्गेटेबल जगजित सिंग' असा हा अनुवाद उल्का राऊत यांनी केला आहे. तो रोहन प्रकाशन तर्फे प्रकाशित झाला आहे. अमरसिंग आणि बच्चनकौर या दाम्पत्याच्या अकरा मुलांपैकी जगजित सिंह हे तिसरा अपत्य होय. लहानपणी गुरुद्वाऱ्यात गुरबानी गाणे,  मोहम्मद रफीची गाणी म्हणायची त्यांना भारीच हौस होती. हे गात असताना त्यांना आपल्यात गायकीचे गुण आहेत हे लक्षात आलं. पुढे काॅलेज मध्ये गाण्यांच्या स्पर्धेत यश बक्षीसं मिळाल्यामुळे त्यातच करिअर करावं असं त्यांना वाटू लागलं. पुढे चित्रपट सृष्टीत पार्श्वगायक म्हणून नशीब अजमावण्यासाठी ते मुंबईला आले. टाचा घासल्या. हालाखीत दिवस काढले. तो काळ मुकेश, रफी, किशोर कुमार यांचा सुवर्णकाळ होता. नटांच्या त्यावेळी तर फार वेगवेगळ्या तऱ्हा असायच्या. नटांची एक विचित्र मागणी असायची कि त्यांच्यावर चित्रित होणाऱ्या गाण्याला पार्श्वगायक म्हणून त्यांनीच निवडलेल्या गायकांनी आवाज दिला पाहिजे अशी. त्यामुळे त्यांच्या हट्टापुढे दिग्दर्शकांनाही मान तुकवावी लागत असे. या सर्व दादा गर्दीत त्यांना स्वतःला सिद्ध करायचे होते.


   जगजित सिंह यांचे त्यावेळी मुंबईत काही जिवलग मित्र बनले. त्यातलं एक मोठं नाव म्हणजे सुभाष घई. पण सुभाष घई यांना अजून 'शोमॅन' व्हायला वेळ होता. शेवटी अनेक सायास केल्यानंतर जगजित यांना कामं मिळू लागली. कष्टाला फळ आलं. एचएमव्ही या म्युझिक कंपनीने जगजित यांचा अल्बम काढायचे ठरवले. या अल्बम मुळे जगजित यांचे तर आयुष्यच पालटले. पण घरची माणसं मात्र कायमची दुरावली गेली. त्याचं झालं असं की या अल्बमच्या कव्हरसाठी फोटोसेशन करायची म्हणून त्यांनी दाढी व डोक्यावरची पगडी काढली. नामधारी शिख पंथाचे असलेल्या त्यांच्या वडिलांना जगजित यांची ही बंडखोरी मान्य झाली नाही.  वडिलांनी जगजित सिंग यांच्यासोबत आपले संबंध कायमचे तोडले.  सेलिब्रिटी असले म्हणून काय झालं शेवटी ती देखिल माणसंच होती. त्यांनाही भावभावना, राग द्वेष असणारच. त्यांच्याही धार्मिक श्रद्धा दुखावल्या जाऊ शकतात. आपल्या जन्मदात्या वडिलांनी आपल्याबरोबरचे संबंध कायमचे तोडल्यामुळे जगजितसिंह यांना फार फार वाईट वाटलं. 

     1976 साली आलेल्या 'Unforgettable' या अल्बमने जगजित सिंग यांना अपार लोकप्रियता मिळवून दिली. या अल्बम मध्ये त्यांना गाण्यात साथ दिली ती चित्रासिंग यांनी. चित्रा सिंग त्यावेळी विवाहित होत्या. डेबू दत्ता यांच्या त्या पत्नी. त्यांना एक मुलगीही होती मोनिका. मोनिका सिंग हिने पुढे माॅडेलिंग क्षेत्र गाजवलं. दत्ता हे ब्रिटानिया कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होते.  चित्रासोबत जगजित यांच्या हृदयाच्या तारा जुळल्या. दत्ता यांना दुसरी मुलगी आवडू लागल्याने पुढे ते चित्रा यांच्यापासून वेगळे झाले. जगजित सिंग यांनी मोनिकासह चित्राचा स्वीकार केला. इथे जगजित माणूस म्हणून मोठे दिसतात. पुढे त्यांना एक मुलगाही झाला. त्याला ते बाबू असे म्हणत. बाबू झाला तरी जगजित सिंह यांचं मोनिका वरच प्रेम काही कमी झालं नाही.  सतरा अठरा वर्षाचा झाल्यावर बाबुला एक जबरदस्त अपघात झाला. त्या अपघातात बाबूचा मृत्यू झाला. हा इतका मोठा मानसिक धक्का होता चित्रा आणि जगजीत सिंग यांच्यासाठी कि ते या धक्क्यातून कित्येक वर्ष बाहेर पडू शकले नाहीत.  बाबू च्या जाण्याने चित्रा जगजित यांच्या आयुष्यात दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. एकतर चित्रा आणि जगजित सिंग यांच्या प्रेमाची काच थोड्या कामापुरती का होईना पण तडकली. कशी? तर ते मुळ पुस्तकातच वाचावे. टीव्ही वाहिन्यांनी आणि वर्तमानपत्रांनी मात्र या अपघाताला 'श्रीमंत बापाचं बिघडलेलं पोर' हा असा टॅग लावून ते मोकळे झाले. वास्तविक असं काहीच नव्हतं. आपल्याकडची माध्यमं ही पहिल्यापासूनच इतकी बेजबाबदार होती का याबद्दल वाचकाला हे प्रकरण वाचताना शंका यायला सुरुवात होते. या वर्तमानपत्रांच्या आणि वाहिन्यांच्या चुकिच्या वार्तांकनाच्या विरोधात तसेच त्यांनी चालवलेल्या या अपप्रचाराच्या  विरुद्ध मोनिकाने कशाप्रकारे लढा दिला हे मुळ पुस्तकातच वाचणे इष्ट.

   जगजित हे तुम्हा आम्हा लोकांना सारखेच सामान्य माणूस होते. आपल्या गायकीच्या जोरावरती खऱ्या अर्थाने मोठे झाले होते. चित्रासिंग यांनी त्यांना पत्नी म्हणून, एक चांगली गायिका म्हणून दिलेली साथ ही फार मोलाची होती. जगजीत हे चित्राला सन्मानाने वागवत. या पुस्तकात जगजित यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर जास्त फोकस आहे त्यांच्या सांगितीक आयुष्याच्यापेक्षा. अर्थात त्यामुळे जगजित यांचे विविध पैलू आपल्याला उलगडत जातात. जगजित यांनी गायक म्हणून एवढे मोठे यश मिळवलं खरं पण या यशाने ते कधी हुरळून गेले आहे असं कुठेही या पुस्तकात वाचायला मिळत नाही. माणूस म्हणून जगजित सिंग यांचे हे मोठे यश म्हणावे लागेल.  उत्तर आयुष्यात तर त्यांना कमालीचं यश, प्रसिद्धी, पैसा मिळाला. एखाद्या मोठ्या व्यक्ती बद्दल वाचत असताना मी नेहमी एका गोष्टीकडे लक्ष देतो कि ही सदर व्यक्ती यशाच्या शिखरावर विराजमान असताना माणूस म्हणून कधी घसरली तर नाही ना!  ते जर झाले नसेल तरच त्या व्यक्तिमत्वबद्दल मला ममत्व वाटायला लागतं. जगजित सिंह यांच्या बाबतीत आपलं वाचक म्हणून तेच होतं. एक गायक म्हणून, एक माणूस म्हणून, एक पिता म्हणून तसेच एक पती म्हणून ते कधी अधःपतित झालेले दिसले नाही या पुस्तकात. त्यामुळे ते जास्त अपील होतात. आवर्जुन वाचावं असं पुस्तक आहे हे.


पु- अनफर्गेटेबल जगजित सिंग

ले- सत्या सरन, अनुवाद - उल्का राऊत

प्रकाशन - रोहन

किंमत - २५०₹


अजिंक्य कुलकर्णी 

Comments

  1. विनय कुलकर्णी,नासिक11 April 2021 at 18:26

    अप्रतिम पुस्तक ओळख

    ReplyDelete
    Replies
    1. वाह ! मी यांची फॅन‌ आहे. जरुर वाचायला हवं पुस्तक.‌धन्यवाद. चांगल्या पुस्तकाचा परिचय करुन दिलात.

      Delete
    2. धन्यवाद. आवडेल तुम्हाला हे पुस्तक.

      Delete
    3. धन्यवाद. आवडेल तुम्हाला हे पुस्तक.

      Delete
  2. एकदम मस्त...वाचावे वाटते पुस्तक...एक तर मी जगजीत सिंग यांनी खूप मोठी फॅन आहे, त्यामुळे त्यांच्या पुस्तकावरील ब्लॉग आवर्जून वाचला, छान वाटले...
    अनुश्री खैरे

    ReplyDelete
    Replies
    1. आवर्जुन वाचा मॅडम तुम्ही. आवडेल तुम्हाला.

      Delete
  3. सर मी त्यांचं बात निकलेगी तो फिर
    हे इंग्रजीत वाचलंय

    हे वेगळं आहे का

    ReplyDelete
    Replies
    1. हा त्याच पुस्तकाचा अनुवाद आहे.

      Delete
  4. मी जगजीत सिंग यांनी फॅन आहे !पुस्तकाची ओळख छान करून दिली आहे तुम्ही .
    पुस्तक वाचलेच पाहिजे असं वाटतेय !

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. आवडेल तुम्हाला हे पुस्तक.

      Delete
  5. बात निकलेगी तो फिर...
    "Destiny plays a vital role in human life.."
    "खेळ कुणाला दैवाचा कळला" हे खरच सत्य आहे का..
    हे वाटण्याचं कारण म्हणजे नुकताच वाचून संपवलेलं गझलसम्राट जगजित सिंह यांचं चरित्र 'बात निकलेगी तो फिर.." दैव, नशीब याबाबतीत पुन्हापुन्हा विचार करायला लावणारं आहे.सथ्या सरण या पत्रकार महिलेने लिहिलेलं खूप सुंदर चरित्र आहे. एक पंजाबी मुलगा ज्याला जन्मत:च जणू आवाजाची,संगीताची दैवी देणगी मिळालीये, त्याच्या स्वरात, सुरात आणि बोटात जादू आहे, त्याचा जन्म झाला तोच मुळी संगीतासाठी. गुरुग्रंथसाहेबातील दोहे गातांना त्याला त्याची आवड लागते आणि मग रेडिओच्या गाण्यातून त्याची ओढ दृढ होत जाते. त्याचे वडीलही त्याला साथ देतात ते त्याला संगीत गुरुंकडे नेऊन मात्र त्याला मोठा पल्ला गाठायचा असतो. लंबी रेस का घोडा म्हणून तो अखंड साधना सुरू ठेवतो आणि कॉलेजमध्येच एक प्रसिद्ध गायक म्हणून नावारूपास येतो. बक्षिसं
    त्याच्याकडे ढिगाने चालत येतात मात्र त्यात अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. वडिलांना तो IAS व्हावा असं वाटतं मात्र त्याच्या मनात वेगळीच धून रुंजी घालत असते. पुढे संगीत हाच त्याचा अभ्यास होऊन बसतो. इतरांप्रमाणेच तोही स्वप्नांच्या नगरीत येऊन आपलं नशीब आजमावू पाहतो आणि मायापुरी मुंबईत पाय ठेवतो. पण पार्श्वगायनात संधीसाठी त्याला वाट पाहावी लागेल असं सांगितलं जातं पण वाट पाहील तो जगजीत कसला. तो ती वहिवाट सोडून स्वतःचीच एक नवी पायवाट तयार करतो आणि ते अजरामर संगीत तयार करतो की चित्रपटासाठी गाणी गाण्या ऐवजी त्याचीच गाणी चित्रपटात घेण्यासाठी चढाओढ लागते. मात्र या काळात त्याला ही 'आम आदमी' सारखाच संघर्ष करावा लागतो. जो प्रत्येक यशस्वी माणसासाठी अपरिहार्य आहेच. छोट्या मैफिलीपासून सुरू झालेला हा प्रवास मग पुढे लाईव्ह कॉन्सर्ट च्या रूपाने जगभर फोफावते आणि त्याच्या नावाप्रमाणे तो खरंच जग जिंकून घेऊन लाखो-करोडो रसिकांच्या गळ्यातील ताईत बनतो. हा साधासरळ, सोज्ज्वळ गायक मनानेही तितकाच तरल व हळवा असतो चित्रा सिंहशी विवाह करताना तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीची परवानगी तो नम्रपणे घेतो,ज्याने तिच्याशी आधीच घटस्फोट घेतलेला असतो.पुढे चित्रा व जगजित त्यांचा गायनप्रवास आणि यश पैसा प्रसिद्धी हे त्यांच्या अप्रतिम संगीत साधनेतून त्यांना आपोआपच मिळत जाते. मात्र सर्व काही चांगले असताना नियती तिचा डाव खेळते आणि एका क्षणात त्यांचं हे सुमधुर संगीत बेसूर करते. विवेक सिंग उर्फ बाबू असा प्राणाहून प्रिय मुलगा एका अपघातात बळी पडतो आणि त्यांचं विश्व उद्ध्वस्त होते. या संकटातून भानावर यायलाच त्यांना सहा महिने लागतात.जगजीत मात्र मरेपर्यंत यातून सावरत नाही. (एक आह भरी होगी हमने ना सूनी होगी जाते जाते तुमने आवाज तो दी होगी)या ओळी त्या दुःखावेगाची तीव्रता सांगण्यास पुरेशा आहेत.तो प्रसंग वाचताना वाचकाचं काळीज चिरत जातो तर प्रत्यक्ष त्या आई-वडिलांच्या मनाची काय अवस्था झाली असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही.त्यानंतर चित्रांनं गाणं बंद करणे आणि जगजित जी ने तो 'दर्द' तो 'अहसास' आपल्या गझलामध्ये उतरवने सारच अकल्पनीय. उर्वरित आयुष्यात धार्मिकतेकडे व अध्यात्मिकतेकडे झुकलेली त्यांची मने,लहान मुलात राहणारे जगजित बाबुला त्यांच्यात कुठेतरी शोधू पाहतात. सहवादकांसोबत असो की सफाई कामगारांबरोबचे त्यांचे वागणे नेहमीच सहानुभूतीपूर्ण व आत्मीयतेचे राहिलेले. बडेजाव,अहं व गर्व यांचा लवलेशही त्यांना कधी शिवला नाही. त्यांच्या चाहत्यांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहनसिंग व त्यांची पत्नी, माजी पंतप्रधान अटल जी, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या सारख्या महान हस्तीबरोबरच लाखो-करोडो देशी-विदेशी चाहते होते व आजही आहेत. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण देऊन गौरविले मात्र गझल रसिकांसाठी ते भारतरत्न पेक्षाही मोठे आहेत कारण त्यांचे स्थान त्यांच्या हृदयात आहे.अमर होणे म्हणतात ते यापेक्षा वेगळे काय असते..? या महान गझल सम्राटास त्यांच्या 80 व्या जन्मवर्षाच्या निमित्ताने शतशः नमन
    ✒️प्रशांत सुसर
    बुलडाणा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मनुष्य गौरव दिन!

रेणुका देवी यात्रोत्सव - अस्तगाव

विज्ञानव्रती एच.सी.वर्मा