इतिहासाला कलाटणी देणारी पन्नास चरित्रे...
मागच्या पंधरवड्यात 'अशोका विद्यापीठ' हा मोठ्या चर्चेचा विषय झाला होता. कारण होतं प्रा. प्रताप भानु मेहता आणि अरविंद सुब्रमण्यम या दोन प्राध्यापकांची केली गेलेली लाजिरवाणी हकालपट्टी. याच अशोका विद्यापीठात राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक असलेले सुनील खिलनानी यांचे 'इन्कार्नेशन - अ हिस्ट्री ऑफ इंडिया इन फिफ्टी लाइव्ह्ज' या पुस्तकाचा सविता दामले यांनी 'यांनी घडवला इतिहास' या नावाने केलेला हा अनुवाद मंजुळ प्रकाशनातर्फे प्रकाशित आहे. भारतीय इतिहासाचा पट हा प्रचंड मोठा आहे. त्यातील निवडक पन्नास व्यक्तींवर लिहिणे हे तसे अवघड काम. इतिहासाला आकार देण्याऱ्या काही व्यक्ती असतात. कित्तेक पुस्तकांना विषय पुरवण्याची ताकद असलेल्या या चरित्रांचा सहा सात पानात आढावा घेणे हे ही तसे अवघडच काम म्हणावे लागेल. पण हे आव्हान व्यवस्थितरित्या पेललं आहे प्राध्यापक खिलनानी यांनी. गौतम बुद्धापासून ते धीरूभाई अंबानी पर्यंत, म्हणजे जवळजवळ अडीच हाजार वर्षांच्या कालखंडाचा आढावा या पुस्तकात घेतला गेलेला आहे. भारत हा असा देश आहे की जिथे एकाच वेळी किंवा वेगवेगळ्या कालखंडात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि बौद्ध या धर्मांनी राज्य केलं आहे. या धर्मांच्या तात्विक, सामाजिक, सांस्कृतिक वादांमधून जी चरित्र घडली त्याचं शक्य तितक्या तटस्थपणे परिशीलन खिलनानी यांनी केलं आहे. हे पुस्तक वाचताना अनुवादिका सविता दामले यांना प्रचंड मेहनत करावी लागली असणार हे जो या पुस्तकाचं ॲक्टिव रिडींग करेल त्याला नक्कीच जाणवेल. कारण यात वापरलेले शब्द आपल्याला तशाप्रकारे विचार करायला प्रवृत्त करतात. यासाठी पुस्तकाच्या काही चरित्रांचा आढावा थोडक्यात घेऊया.
गौतम बुद्धांच्या चरित्रात ते म्हणतात भारत-नेपाळ सीमावर्ती भागात सिद्धार्थ गौतम या महामानवाचा जन्म झाला. त्याने स्वतःचे असे एक वेगळे अध्यात्मिक तत्वज्ञान निर्माण केले होते. जनमानसावर पगडा असलेल्या जाती व्यवस्थेचं आणि धार्मिक अधिकारांना त्याने आपल्या तर्काने आव्हान दिलं. तत्त्वज्ञान, राजकारण यांच्यावर आधारित काही नवे प्रयोग त्यांनी केले. बुद्धाला समाधीत साक्षात्कार झाला आणि तिथून तो बाहेर आला तेव्हा त्याला 'मुक्त' वाटू लागले. मुक्त करणारा जीवन मार्ग तो लोकांना सांगू लागला. त्याची हिच शिकवण बनली 'धम्म'. 'धम्म'चा अर्थ होतो 'नियम'.'स्वतःमध्ये इतरांना शोधा, या दुनियेतील लोकांकडे करूणेणं पहा' हे त्यांनी शिकविले. धम्मात उच्च तसेच खालच्या जातीतील लोकांनाही शिक्षण मुक्तपणे घेता येत होते पण; पुरुषसत्ताक दृष्टिकोनातून बुद्धाचीही सुटका झालेली नाही. कारण सुरुवातीला खळखळ केल्यावरच त्याने भिक्षुणी म्हणून स्त्रियांना संघात प्रवेश दिला होता. त्याचप्रमाणे भगवान महावीर यांच्या चरित्राबद्दल बोलायचं झालं तर भगवान महावीर हे जैन धर्मातील चोवीसवे तीर्थकार होते. त्यांनी पौरोहित्यची भूमिका नाकारली. वैदिक धर्मापासून काही वेगळे तत्त्वे त्यांनी मांडली. उग्र तप आणि कडक शिस्तीचे पालम करत महावीरांनी 'कल्पसूत्र' आणि 'अचरंगसूत्र' अशी दोन चरित्र आहेत. या दोन्ही चरित्रात रेखाटलेले महावीर हे प्रत्यक्षात मात्र अधिक कनवाळू, काटेकोर, सत्वगुणी असावेत. जैन धर्माची वैचारिक आक्रमकता आणि ब्राह्मण जातीच्या ताकदीबद्दलचा आकस अजूनही त्या धर्माच्या इतिहासात हिंसक सुड घेतलेल्या घटना जवळजवळ नाहीत. या अहिंसावादी तत्त्वज्ञानामुळेच जैनांना निरूपद्रवी बनवले असावे. कट्टरतेमुळे या धर्माचे रक्षण झाले आहे हे खरं पण त्यामुळेच कदाचित बौद्धधर्माप्रमाणे हा जैनधर्म भारताबाहेर वाढू शकला नाही. या धर्माचा प्रसार मर्यादीत असल्याने हा कोणाला धोकादायकही वाटला नाही. परंतु जैन धर्मात ही एक मुद्दा कायमचा विवादास्पद राहिला आहे, तो म्हणजे 'आत्मज्ञानाच्या मार्गाने स्त्रिया ही जाऊ शकतात का? 'कठोर दिगंबर जैन परंपरेनुसार स्त्रियांना साध्वी पदावर नेमलं जाऊ शकत नाही. कारण त्यांच्या शरीरात स्त्रीबीजं तयार होतात व मासिक पाळीतील चक्रात ती मारली जातात म्हणून. सर्वसंगपरित्याग करून दिगंबर अवस्थेत जीवन जो जगतो तोच दिशेने मोक्षाच्या दिशेने जाऊ शकतो, अशी या धर्माची समजूत आहे. महात्मा गांधींवर टॉलस्टॉय यांच्या विचाराचा जबरदस्त पगडा असला तरी, गांधींना आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या भारतीय मातीतील आदर्शाची निकड भासली असावी. म्हणूनच गांधीजींनी अहिंसेच्या तत्त्वाला बुद्ध आणि महावीर यांचा चेहरा दिला.
पाणिनी हे संस्कृत भाषेतील एक मोठे व्याकरणकार. त्यांनी अवघ्या चाळीस पानातून एक परिपूर्ण अशी व्याकरण प्रणाली निर्माण केली जिला मानवी इतिहासात तोड नाही. या बहुमूल्य निर्मितीचे नाव आहे 'अष्टाध्यायी'. स्टॅन्फोर्ड विद्यापीठातील भाषा शास्त्राचे प्राध्यापक पाॅल किपार्स्की म्हणतात की," ही सुंदर व्याकरण नियमावली म्हणजे बौद्धिक यश आहे. मी त्यात गुंगून राहण्याचं आणखीन एक कारण म्हणजे अजूनही तिच्या बाबतीत मला खूप काही शोधून काढायचा आहे". संस्कृत या शब्दाची उकल काय? तर 'निर्दोष कृतीने साध्य केलेली अशी ती भाषा' अशी फोड केली जाते. संस्कृत ही अतिशय नेमकेपणा ची भाषा आहे. उदाहरणार्थ इंग्रजीत कर्ता, प्रत्यक्ष कर्म वगैरे संदर्भातून अर्थ शोधावा लागतो परंतु; संस्कृत मध्ये मात्र आठ विभक्तीप्रत्यय यांचा वापर करून शब्दांना अर्थ दिले जातात. पाणिनीला आपली आधीभाषा ही संक्षिप्तच हवी होती. कारण त्यामुळेच ती स्मरणात राहीली असती, पुढच्या पिढीला देता आली असती. पाणिनीच्या कार्याचं वर्णन करणारा संस्कृत शब्द आहे 'व्याकरण'. व्याकरण म्हटले की आपल्याला भाषेचे नियम किंवा इंग्रजीत ज्याला ग्रामर म्हणतो ते आहे की काय असे वाटू शकते. पण संस्कृत मध्ये व्याकरणाचा अर्थ इतका संक्षिप्त नाहीये. संस्कृतात व्याकरणाचा अर्थ व्यापक आहे. भाषाशास्त्रानुसार 'व्याकरण' हा वेदांच्या सहा अंगांपैकी एक अंग आहे. पाणिनीच्या 'अष्टाध्यायी'मुळेच संस्कृत प्रादेशिक बदलांना सामोरी गेली. वेदांबाहेरही तिचा उपयोग करता आला. म्हणूनच तिच्यात अभिजात साहित्य निर्माण झालं. संस्कृतनं भारताला एक सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मता दिली जी विसाव्या शतकापर्यंत कोणत्याही राजकीय सत्तेला देणं शक्य झालं नव्हतं. कोलंबिया विद्यापीठातील संस्कृतचे प्राध्यापक शेल्डन पोलाॅक यांनी या प्रकाराला 'संस्कृत काॅस्मोपाॅलीज' असं नाव दिलं आहे. संस्कृतच्या अभ्यासाचा ऱ्हास झाल्या कारणाने लोकांचा पाणिनीमधील रस कमी झाला. संस्कृतच्या नाव्याने शोध घेणारे म्हणतात की संस्कृत ही ब्राम्हणांची मक्तेदारी होती हा दावा खोटा आहे. पाणिनीच्या 'अष्टाध्यायी'मुळे ती सर्वसामान्यांची झाली होती. पुढे स्थानिक आणि काही वैश्विक कारणांनी ही भाषा लयास गेली. कारण तेराव्या शतकापासून तिची जागा फारसी घेत होती. तलवारीच्या बळावर आशियाई मुस्लिम साम्राज्ये फारसीचा जोरदार प्रचार करत होते.
राजराजा चोल वरच्या लेखात एक महत्त्वाची गोष्ट समजते ती म्हणजे राजराजा चोल याने तंजावूर येथे एक 'राजराजेश्वर' नावाचं एक भव्य मंदिर उभारलं होतं. ब्रिटिशांनी एकोणिसाव्या शतकात सुरुवातीला याच मंदिराच्या उंचीचा वापर करत त्याच्या कळसावर एक दुर्बीण बसवली. त्यायोगे त्यांना भारतीय भूमीचे सर्वेक्षण करता आले. राजराजा चोल याच्या राज्ययंत्रणेच्या अभ्यासक, विदुषी चंपकलक्ष्मी म्हणतात की, "मंदिर बांधले आहे हे सत्तेला विधीवत अधिष्ठान देण्याचा साधन असतं. जोवर तुम्ही मंदिर बांधत नाही तोवर तुम्ही सम्राट म्हणून स्वतःची द्वाही फिरवू शकत नाही कि ज्या प्रदेशावर ताबा ठेवायचा आहे त्यावर तुमची सार्वभौम सत्ता आहे असा दावाही करू शकत नाही.
आत्मशोधासाठी भटकंती करणारे बुद्ध महावीर गुरुनानकही या पुस्तकात भेटतात. तसेच एक विशिष्ट समाज आपलं अस्तित्वच मान्य करत नाही, माणूस म्हणून जगण्याचा समतेचा अधिकार नाकारतो त्या समाजाच्या विरुद्ध बंडखोरी करणारे डॉ. आंबेडकर, बसवराज, पेरियार यांच्याबद्दलचे लेखही या पुस्तकात वाचायला मिळतात. मा.ज्योतिराव फुले, छ. शिवाजी महाराज. दारा शिकोह वरचा लेख तर फारच सुंदर आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक, चित्रपट, संगीत, चित्रकला, राजकारण, समाजकारण, अध्यात्म यांच्या पन्नास पुष्पांची सुंदर माळ या पुस्तकात गुंफली आहे. शिखांचे पहिले गुरू गुरूनानक यांच्यावरील लेखत एक महत्वाचा उतारा आहे. 'गुरुनानक हे महावीर आणि गौतमबुद्ध यांच्या प्रमाणे आत्मशोधा करता बाहेर पडले. त्यांना साक्षात्कार झाला त्यावेळी ते आपल्या गावी पुन्हा परतले. माझ्या विचारात संसारी लोकांनाही जागा आहे. संसार करत करत अध्यात्मिक साधनाही करता येते हा विश्वास गुरुनानक यांनी लोकांना दिला. गुरुनानकांची ही केवढी मोठी उपलब्धी आहे'. गुरुनानक जेव्हा हिमालयात गेले तेव्हा एका उंच डोंगरावर एका महात्म्याने त्यांना विचारले की, "बाळ खाली जगात काय परिस्थिती आहे?" तेव्हा गुरुनानकांनी त्यांना उत्तर दिले की, "सर्वच शहाणी सुरती माणसं इथे वर येऊन थांबले आहेत तर तिथे खाली काय होणार याची अपेक्षा काय करता आहात तुम्ही?" यावरून नानकांना ऐहिक जग किती महत्त्वाचं होतं हे समजतं. अगबरावरील लेख वाचताना फार वाईट वाटतं. सम्राट अकबरचा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी फारसी, अरबी, मोगली आणि युरोपियन दप्तरांचा आधार घ्यावा लागतो. पण अकबराच्या दरबारातील हिंदू राजे त्याच्याकडे कसे पाहत होते याबद्दल फार संदर्भ सापडत नाही. इतकेच नव्हे अकबराच्या दरबारात ज्या धार्मिक, तत्त्वज्ञान, सामाजिक विषयावर चर्चा चालायच्या त्यामध्येही हिंदूंनी फार सहभाग सहभाग घेऊन आपल्या नोंदी ठेवल्या आहे असेही आढळत नाही. अकबराचा कालखंड म्हणजे सोळावे शतक. या काळात जगभर धर्मसत्ता राज्य करत होती. त्याकाळी असा कोणी राजा नव्हता जो धर्मचिकित्सा करत असे. त्याला अकबर हा एकमात्र अपवाद होता.
स्वतःबद्दल बाळगलेला फाजील समजुतीमुळे राजकीय दृष्ट्या एकटा पडलेला शेहजादा दारा शिकोह. फाजील आत्मविश्वास माणसाचा कसा घात करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे दारा शिकोह. दारा शिकोहवर लिहिलेला लेख वाचल्यावर मला एक गोष्ट जाणवते की; केवळ विचार चांगले असून चालत नाही. समाजात चांगले विचार टिकविण्यासाठी आपल्याकडे शक्ती, सामर्थ्य असावं लागतं. नियोजन, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. औरंगजेबाने दाराचा चार तासात खेळ संपवला याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे औरंगजेब हा सामर्थ्याचा पूजक होता.
हे पुस्तक वाचताना एक खंत आपल्याला वाचक म्हणून वारंवार जाणवल्याशिवाय राहात नाही. ती म्हणजे या पुस्तकातल्या बऱ्याच चरित्रांचा अभ्यास विदेशी लोकांनीच जास्त करुन केलेला आहे. असा तटस्थ अभ्यास आपले लोक केव्हा करणार? आणि समजा आपले लोक असा अभ्यास करत असतील तर तो अभ्यास लोकांपर्यंत पोहोचत का नाही? आपला इतिहास, आपली संस्कृती, समजून घेण्यासाठी विदेशी लोकांचा संशोधन वाचवा लागतंय. विदेशी लोकांचं संशोधन वाचण्यात वावगं काहीच नाही पण त्यातून आपला अकर्मन्यतावाद मात्र जास्त अधोरेखीत होतो. आपल्याला हे पुस्तक या ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या नंतरच्या काळातील प्रवाहा बद्दलही विचार करायला लावते. नंतरच्या काळातील भारतीय सरकारी अधिकारी, उद्योजक किंवा आदिवासी नेत्यांनी या ऐतिहासिक व्यक्तिरेखांचा कसा चक्रावून टाकणारा वापर केला हे वाचण्याची इच्छा असेल तर हे पुस्तक आवर्जून वाचावे.
पुस्तक - यांनी घडवला इतिहास
लेखक - सुनील खिलनानी
अनुवाद - सविता दामले
प्रकाशक - मंजुल प्रकाशन
पृष्ठे - ४३६
किंमत - ४९९₹
अजिंक्य कुलकर्णी
खूप छान भाऊ
ReplyDeleteThanks
Deleteअप्रतिम कुलकर्णी सर
ReplyDeleteधन्यवाद भरत सर
Deleteकुठे मिळेल हे पुस्तक?
ReplyDeleteबुकगंगा किंवा अॅमेझाॅनवर मिळेल. नाहीतर मंजुळ प्रकाशनाच्या साइटवर.
ReplyDelete