Food choices
कोणतं अन्न हे आपल्यासाठी योग्य आहे हा प्रश्न कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. नेहमीच ज्वलंत मुद्दा असतो हा. या संदर्भात गेल्या दोन तीन दिवसात काही टेड टाॅक्स ऐकले, काही लेख वाचले तर काही डाॅक्युमेंटरीज पाहील्या. त्यातली आवडलेली आणि पटलेली डाॅक्युमेंटरी म्हणजे Food Choices ही होय. अमेरिकी आहारतज्ज्ञ डाॅ.पामेला पाॅपर या म्हणतात की माणसांसाठीच्या वनस्पती अन्नाचे साधारण चार गट केले जातात. किंवा आपले अन्न या चार गटांकडून यायला हवे. फळं, भाज्या, डाळी/धान्य आणि शेंगा. हे वनस्पती अन्न असल्याने त्याच्यावर फार प्रक्रिया झालेल्या नसतात. काॅर्नेल विद्यापीठातील बायोकेमिस्ट थाॅमस कॅम्पबेल ज्यांची पोषणद्रव्य (न्यूट्रिशन) या विषयात पीएचडी झालेली आहे व या विषयावर त्यांचे बरेच प्रबंधही प्रकाशित आहे. 'द चायना स्टडी' हे त्यांचं अतिशय गाजलेलं पुस्तक. त्यांच्या पोषणद्रव्य अभ्यासावर आधारित आत्तापर्यंत १८ हून अधिक डाॅक्युमेंटरी फिल्म येऊन गेल्या आहेत. डाॅ. कॅम्पबेल म्हणतात की काॅर्पोरेट सेक्टरर्सना त्यांच्या पॅकेज्ड अन्नपदार्थांची भरमसाठ विक्री करायची आहे. त्यासाठी आपली पारंपारिक अन्नसाखळी तोडल्याशिवाय हे शक्य होणार नाही. म्हणून आक्रमक जाहिरातींमधून पारंपारिक अन्न सदोष आहे हे लोकांच्या मनावर ठसवावं लागेल.
विषववृत्ताजवळ राहणाऱ्या लोकांनी आहारात मका किंवा स्टार्च युक्त पदार्थ सेवन केले पाहिजे. विषववृत्तापासून वर उत्तरेकडे आणि खाली दक्षीणेकडे गेले असता लोकांनी आपल्या आहारात प्राणिज अन्न (मटन, चिकन, टर्की, अंडी) खाणे बंद करायला हवं. दक्षीण व उत्तर ध्रुवांवरील लोक जे एस्किमो मध्ये वगैरे राहतात त्यांनी मात्र मांस खाणे गरजेचे आहे कारण त्यांच्यासमोर दुसरा पर्यायच नाहीये. पण एकूण पृथ्वीवरील लोकांच्या तुलनेत या ध्रुवांवर राहणाऱ्या लोकांचा टक्का हा अत्यल्प आहे. त्यामुळे त्यांना अपवाद म्हणून सोडून देता येते. म्हणजे प्राणिज अन्न खाणे हा काही सार्वत्रिक नियम होऊ शकत नाही. जर प्राणिज अन्न खायचे बंद केले तर मानवी शरीरात प्रोटीन्स, कॅल्शिअम, ओमेगा (३ व ६) ही आम्ल मिळणार नाही आणि परिणामी शरीरात यांची कमतरता जाणवत राहील असा एक आरोप केला जातो. म्हणजेच या पोषणद्रव्यांच्या अभावी मी कमजोर होईल का? तर असं काहीही होणार नाही, याला कोणताही शास्त्रीय आधार नाहीये. डाॅ. मायकेल ग्रेमर सांगतात की आपल्या आवतीभोवती इतका वनस्पती आहार उपलब्ध असताना आपल्या आहारात प्रोटीन्सची कमतरता येणे हे निव्वळ अशक्य आहे. वनस्पती आहारात कुठेही प्रोटीन्स ची कमतरता नसते. डाॅ. पामेला म्हणतात की मुळात माणसांना इतक्या प्रोटीन्स ची गरजच काय आहे ? उलट जास्त प्रोटीन्स युक्त आहार घेत असाल तर रोगांना बळी पडण्याचीच शक्यता वाढते. इतकेच नाही तर भात (तांदूळ) ज्यात सगळ्यात कमी प्रोटीन्स असतात तेव्हढे जरी आपल्या आहारात असले तरी आपल्याला आवश्यक असलेली प्रोटिन्सची गरज भागते.
कमी कार्ब्ज असणाऱ्या, स्पोर्टस् ड्रिंक्स, प्रोटीन बार यांचे प्रमोटर आपले प्रोडक्ट विकण्यासाठी आक्रमक जाहिराती करतात की माणसांना जास्त प्रोटिन्स युक्त आहार आवश्यक आहे. वास्तविक तसं काहीही नाहीये. जेव्हा आपण जास्त प्रोटीन युक्त आहार (मांस, मटण, अंडी) सेवन करतो त्यावेळी आपण आपल्या किडनी, यकृतावर अतिरिक्त ताण देत असतो. ज्याचा परिणाम कर्करोग होण्याची शक्यता वाढवण्यात होतो. प्राणिज पदार्थ खाण्याने हृदयरोग होण्याच्या शक्यता देखिल खूप प्रमाणात वाढतात. जास्त प्रोटीन हे आपल्या रक्तातील कोलेस्टेरॉल वाढवण्यास मदतच करते. प्राणिज पदार्थ खाल्ल्याने आपल्या शहरातील फ्री रॅडिकल वाढतात. स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन या संप्रेरकाचेही स्रवण जास्त प्रमाण वाढते. त्यामुळे स्रीयांमध्ये छातीचा कर्करोग (ब्रेस्ट कँसर) होण्याची शक्यता वाढते. आपण चिकन, टर्की,मासे हे खातो म्हणजे नक्की काय करतो? आपण या प्राण्यांचे स्नायू खातो असा त्याचा अर्थ होतो. यात भरपूर प्रोटिन्स, कोलेस्टेरॉल चरबी असते. चिकन आणि फोर्क पेक्षाही जास्त चरबी ही माशांमध्ये असते. Fish is not a healthy food for human ever. हृदयरोगतज्ज्ञ माशांचे तेल खाण्यास सांगत असतात. जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण माशांचे तेल खाण्यास सुरुवात केली तर आपण आपल्या रक्तातील एचडीएल कोलेस्ट्रेराॅल वाढवत आहोत. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की डॉक्टरी अभ्यासात पोषणद्रव्य (न्यूट्रीशन) हा प्रकार फार काही शिकवला जात नाही. सगळी गडबड तिथेच आहे! पी.एस.एम (प्रिव्हेंटिव्ह अंड सोशल मेडिसिन) या अभ्यासक्रमाकडे मेडिकल सायन्स चे विद्यार्थी दुर्लक्ष करतात. माशांच्या तेलाबद्दल डाॅ.पामेला म्हणतात की आपल्या शरीरात दोन महत्त्वाचे फॅटी ॲसिड असतात. ओमेगा-3 आणि ओमेगा-6. ओमेगा-6 हे मांसाहारात सर्वात जास्त आढळते. मांसाहार जास्त केला तर ओमेगा-6 ची शरीरातील मात्रा ही खूप वाढते. ओमेगा-3 : ओमेगा-6 चे मानवी शरीरातील प्रमाण हे 1:1 किंवा फार फार तर 1: 4 असे असायला हवे. तर आज हे प्रमाण आपल्या आहारात मांसाहार केल्याने 1: 25 ते 1: 30 इतके जाऊन पोहोचले आहे. या ओमेगा-3 चे प्रमाण वाढवण्यासाठी औषध कंपन्या आपल्याला माशांचे तेल वापरलेल्या कॅप्सूल सेवन करण्यास भाग पाडत आहेत. पण ते मांसाहार कमी करा असे मात्र कधीही सांगणार नाहीत. अधिक जाणून घेण्यासाठी ही डाॅक्युमेंटरी आवर्जून पहा.
टीप :- एक Dominion नावाची डाॅक्युमेंटरी पाहीली भयंकर अंगावर आली ती. आॅस्ट्रेलीया मध्ये डुक्कर, कोंबडी, टर्की, गाय या प्राण्यांचे अवाढव्य खाटिकखान्यांवर, त्या प्राणी पक्षाचे केले जाणारे हाल पाहवत नाही आपल्याला. माणूस इतका क्रुर कसा होऊ शकतो त्याबद्दल न बोललेलंच बरं.
1) Food Choices
अजिंक्य कुलकर्णी
👍👌👌
ReplyDelete