एक अप्रतिम शालेय विज्ञान पुस्तक.
मार्च-२०१९ माझ्या मोठ्या बंधूंचे सासरे श्री अनंत शास्त्री लावर हे त्यांच्या एका मठाच्या पौरोहित्याच्या कामासाठी मेलबर्न ला गेले होते. त्यांना आम्ही सगळे अण्णाच्या म्हणतो. अण्णा तिकडून निघण्याच्या काही दिवस आधी मी त्यांना म्हणालो की येताना माझ्यासाठी मेलबर्न मधले इयत्ता नववी व दहावीचे विज्ञान व गणितची क्रमिक पुस्तके घेऊन याल का? त्यांनी स्वतःचे काही सामान सोडून माझी ही तीन चार पुस्तके आणली ज्याचे वजन जवळजवळ ४-५ किलो तर सहज असेल. एकूण किंमतही साधारण ४५ आॅस्ट्रेलिअन डाॅलर इतकी झाली होती. ही पुस्तके माझ्यासाठी घेऊन आल्याबद्दल अण्णांचे आभार मानतो.
तर सांगायचा मुद्दा हा की गेल्या दोन एक महिन्यापासून मी वेगवेगळ्या देशातील इयत्ता दहावीच्या गणित, विज्ञानाच्या पुस्तकांचा अभ्यास करत आहेत. वेगवेगळ्या देशात या वयोगटातील विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान हे विषय कसे शिकवले जातात? मला या गोष्टीचे खूप कुतूहल आहे. हे मेलबर्नचे इयत्ता दहावीचे विज्ञानाचे पुस्तक वाचताना मी विशेष आनंद झाला. आनंद यासाठी की या किशोरवयात असाही डिझाईन केलेला अभ्यासक्रम शिकवता येऊ शकतो. पहिल्या प्रकरणाचे नाव हे फारच इंट्रेस्टींग आहे. पहिलं प्रकरण आहे 'Science Investigation skills.' हे प्रकरण साधारणपणे ३५ पानांचे आहे. या प्रकरणात विज्ञानामध्ये संशोधन करणं म्हणजे नेमके काय करायचं असतं? कसं करायचं असतं त्याची थेअरी तसेच काही कृतीही दिलेल्या आहेत? संशोधनासाठीच्या आवश्यक असलेल्या गुरूकिल्ल्या काय आहेत हेही सहज सोप्या भाषेत दिले आहे. संशोधन करताना त्या केलेल्या अभ्यासाचे पृथक्करण कसे करावे, काही मोजमापांची (calculation) गरज पडली तर ती कशी करावी? मोजमापांचे गणित माहीत नसेल तर त्यासाठी संशोधकाला स्वतःला गणित आलेच पाहिजे असे काही नाही. तो एखाद्या गणिततज्ञाचीही मदत कशी घेऊ शकतो हे सांगितले आहे. मिळालेल्या माहिती चे पृथःकरण कसे करावे? आपण मिळवलेल्या माहीतीची इतर गोष्टींशी तुलना कशी करावी? दोन गोष्टींधला फरक कसा स्पष्ट करावा? आपल्या म्हणण्याला सिद्ध कसे करावे? त्यावरून अनुमान कसे काढावे? दुसऱ्यांना आपण शोधलेला विषय समजावून सांगायचा असेल तर त्याचे स्किल्स काय?तर त्याबद्दलही मुलांना शिकवले जाते. समजा केलेलं संशोधन हे जेनेटिक्सशी संबंधीत किंवा तशाच तत्सम शाखांशी निगडीत असेल तर त्याची नैतिक बाजू तपासावी लागेल? याबद्दलही मुलांना समजेल असे मुद्दे यात आहे.
संशोधनाची सामुग्री कशी organized करावी? संशोधन सामूहिक रित्या करायचे असेल तर समुहामध्ये काम करण्यासाठीच्या गुरूकिल्ल्याही यात सांगितल्या आहेत. ग्रुप वर्क इफेक्टिव्ह कसा होईल या कडे पुरेपूर लक्ष दिले गेले आहे. आपल्या संशोधनाचे स्त्रोत कुठं मिळतील (internet, library) ते कसे शोधावे? उपलब्ध असलेली वैज्ञानिक मासिके कशी चाळावी? सशोधनासाठी इंटरनेटचा वापर कसा करावा? माहिती अधिकृत आहे हे पडताळून कसे पहावे? Physics, chemistry, Biology या विषयातील संशोधन प्रयोगशाळेत पडताळून पाहाण्यासाठी प्रयोगशाळेत प्रयोग कसे करावेत? संदर्भग्रंथांमधून आपल्याला गरजेची टिपणे (Notes) कशी काढावी? याबद्दलचं मार्गदर्शन या पुस्तकात मिळते.
संशोधन झाल्यानंतर त्याचे पोस्टर, रिपोर्ट, सादरीकरण, फ्रुफ रिडिंग हे कसं तपासावे हे ही या प्रकरणात येतं. जर तुम्हाला विज्ञान संशोधनात रस नाहीये पण वैज्ञानिक लिखाण करण्यात आहे तर, वैज्ञानिक लेखन (Scientific writing) कसं करावं? वैज्ञानिक पुस्तके कशी लिहावी? वर्तमानपत्रात विज्ञानपर लेख कसे लिहायचे असतात? थोडक्यात scientific journalism छोटे छोटे धडे यात दिले जातात. एखाद्या विज्ञानपर कार्यक्रमाचे पोस्टर कसे बनवावे? त्या पोस्टरचा ले आउट,फाॅन्ट,रंग,त्यावरचे अॅनिमेशन चित्र काय असावे? विज्ञानपर कार्यक्रमांचे आयोजन कसं करावे? असं एकंदरीत भारावून टाकणारी प्रकरणे या पुस्तकात आहेत. हे भारावून जाणं का होतं? कारण आपल्याकडे शालेय अभ्यासक्रमात तर सोडा पदव्युत्तर पदवी मध्येही यातल्या कोणत्याही गोष्टी शिकवल्या जात नाही. मला Msc org chemistry च्या दुसऱ्या वर्षाला असताना मलाही ह्याच नैराश्याने ग्रासलं होतं की, 'मी दोन महिन्यांनी मास्टर डिग्री घेईन पण माझ्या मनाने मला साधी नवी रियाक्शनची कल्पनाही करवत नाही.' काहीच नवं सुचत नाहीये मला. मग मी स्वतःला मास्टर का म्हणावं? कोणता नैतिक अधिकार आहे मला? केवळ विद्यापीठाच्या निकालाचा हा कागद म्हणतोय म्हणून मी स्वतःला मास्टर म्हणवून घ्यावं का?
दहावं प्रकरणही असेच आश्चर्याचा धक्का देणारं आहे. या प्रकरणाचे नाव आहे Forensic Science. या प्रकरणात pathology, ballastics, toxicology या शांखांची ओळख करवून दिली गेली आहे. गुन्हा घडला त्या ठिकाणचा physical evidence काय आहे? एखाद्या व्यक्ती चा मृत्यू झाला असेल तर मृत्यू च्या वेळचा पुरावा कसा शोधावा? क्राईम सिन च्या ठिकाणी काही झटापट झाली असेल तर त्या ठिकाणी हत्याराच्या काही खुणा आहेत का? काही ट्रॅक इंप्रेशन उदा. चपला बुटाचे ठसे आहेत का? बोटांचे ठसे कसे गोळा करावे, गुन्हा घडला तिथे एखाद्या व्यक्तीवर काही विषप्रयोग झाला आहे का, त्या मृत व्यक्तीच्या शरिरावर आर्सेनिक, अँटिमनी, थॅलिअम यांचा प्रयोग केल्याच्या काही खुणा दिसतायत का? एखाद्या व्यक्तीला मारण्यासाठी काही किरणोत्सारी पदार्थांचा वापर केला असेल तर तो कसा ओळखावा? मृत शरिराचे शवविच्छेदन कसे करावे? मिळालेल्या पुराव्यांची सुसंगती कशी वठवावी या प्रकरणांचाही अंतर्भाव या पुस्तकात आहे. उत्खननात एखादा मानवी सापळा मिळाला तर त्या सापळ्याच्या कवटीचे विच्छेदन कसे करावे? समोरच्या व्यक्तीला भुलवण्यासाठी जर एखादा फोटो माॅर्फ केलेला असेल तर तो कसा ओळखावा? इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचे ट्रॅकिंग कसे करावे? डीएनए कसे तपासावे? बोटांचे ठसे कसे तपासावे हे ही या प्रकरणात शिकवले जाते.थोडक्यात सायन्टिफिक क्रिमिनोलाॅजी इन्व्हेस्टिगेशन कसे करावे हे सर्व या प्रकरणात समाविष्ट केलेले आहे. आणि हे सर्व कितवीत शिकवले जाते? कितवीत? इ य त्ता द हा वी!
अजिंक्य कुलकर्णी.
Informative Post
ReplyDeleteSuper 👌🏼
ReplyDeleteविज्ञान प्रसार हि भारत सरकारची संस्था सुध्दा बर्याच शाश्वत आणि शास्त्रीय विषयांवर काम करते आहे, तसेच विविध भाषी डिजीटल लायब्ररी ची निशुल्क सुविधा देते, पण अशी माहिती आमचे लेखक व तज्ञ देत नाहीत.
ReplyDeleteमाहिती निश्चित ऊपयोगी आहे